अक्रोड हे जीवनसत्त्व ई आणि ओमेगा-३ चा स्रोत असून प्रतिकारशक्ती वाढवणारे आहे. अक्रोडातील ‘फॅट’ही आरोग्यदायी समजले जाते. कर्करोगाच्या पेशींशी लढण्याची ताकद यात असून अक्रोड त्वचेच्या तसेच केसांच्या आरोग्यासाठी चांगले समजले जातात. रोज नेमाने केलेलं अक्रोडचे सेवन हृदयविकारापासून दूर राहायला मदत करते.
 
वॉलनट पॅकेट्स
साहित्य : १ वाटी अक्रोड, १ वाटी मैदा किंवा कणीक, १ चमचा तेल किंवा लोणी, पाव चमचा बेकिंग पावडर, १/४ कप दही, चवीपुरते मीठ, दोन मोठे चमचे कुठल्याही फळाचा जॅम, एक मोठा चमचा तूप.
cdc07कृती : अक्रोड मिक्सरमध्ये घालून पावडर करून घ्यावी. त्यात मैदा मिसळावा, बेकिंग पावडर, चवीला मीठ आणि तेल घालावे. मग त्यात दही आणि लागले तर थोडे पाणी मिसळून पीठ भिजवावे. फार मळू नये. या पिठाच्या जाडसर पुऱ्या थापाव्यात. प्रत्येक पुरीवर एक चमचा जॅम ठेवून पुरी दुमडून कडा बंद कराव्यात, कातण्याने कापाव्या किंवा मुरड घालावी. ग्रीज केलेल्या ट्रेमध्ये पॅकेट्स ठेवावी, त्यांना वरून तूप लावावे आणि १८० सें.वर तापलेल्या ओव्हनमध्ये १५ ते १८ मिनिटे सोनेरी रंग येईपर्यंत भाजावी.
टीप- जॅमऐवजी दुसरे कोणतेही गोड तिखट सारण भरले तरी चालेल.
वसुंधरा पर्वते -vgparvate@yahoo.com