19 September 2020

News Flash

सूक्ष्म अन्नघटक : ..आणि मंडळी!

सूक्ष्म अन्नघटकात पण असे ‘आणि मंडळी’ असलेले काही घटक आहेत. त्यातील काही घटकांची ही ओळख.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. नितीन पाटणकर

जर ‘क्ष’ हा अन्नघटक खूप महत्त्वाचा असेल तर तो इतर दहा घटकांसोबत मिसळून औषधातून न येता त्याचे स्वतंत्र औषध मिळायला हवे. शिवाय त्याचा डोस किती हे माहिती हवे. हे माहीत नसेल तर उगाच भरमसाट पैसे मोजून असली ‘सूक्ष्म अन्नघटकयुक्त भेळ’ घेण्याने फक्त औषध कंपनीचा फायदा होतो. त्यामुळे ऐकीव माहितीवर न जाता योग्य सल्ला घ्यायला हवा.

पु.ल. देशपांडे यांच्या एका लेखात उल्लेख आहे, की ते एकदा ‘शहाडे आठवले आणि मंडळी’च्या दुकानात जातात. ‘अहो शहाडे, एक धोतराचं पान दाखवा’ असं सांगतात. पण समोरचा माणूस लक्षच देत नाही. दुसऱ्यांदा ते, ‘‘अहो आठवले’’ अशी हाक मारून बघतात; तरीही लक्ष दिले जात नाहीच. तेवढय़ात कोणीतरी ‘अहो कुलकर्णी’ अशी हाक मारल्यानंतर ते गृहस्थ ‘ओ ’ देतात. पुलं म्हणतात, ‘‘अरेच्चा, हे शहाडे नाहीत, आठवले नाहीत हे तर ‘आणि मंडळी’ आहेत.’’ सूक्ष्म अन्नघटकात पण असे ‘आणि मंडळी’ असलेले काही घटक आहेत. त्यातील काही घटकांची ही ओळख.

यातील एकाचे नाव आहे ‘को क्यू टेन’ (Co Q 10). ‘को क्यू टेन’ हा घटक शरीरात जी कामे करतो, ती खूप महत्त्वाची असतात. त्याची कमतरता फारशी दिसून येत नाही. शरीर ‘को क्यू टेन’ बनवू शकते त्यामुळे त्याला ‘जीवनसत्त्व’ या सदरात धरत नाहीत. ‘व्हिटॅमिन’ हा शब्द तयार झाला त्याची एक कथा आहे. शरीर बनवू शकत नाही, असे अत्यावश्यक (व्हायटल) आणि त्यात नत्र (नायट्रोजन) हा महत्त्वाचा घटक म्हणून अमाइन. म्हणून त्याला ‘व्हायटलअमाईन’ म्हणू लागले. नंतर समजले, की असे पदार्थ हे ‘व्हायटल’ असले तरी ‘अमाइन’ असलेच पाहिजेत, असे नाही. म्हणून मग त्याला ‘व्हिटॅमिन’ म्हणू लागले. ‘को क्यू टेन’ तर शरीर बनवू शकते म्हणून ते जीवनसत्त्व नाही. हा क्षार नाही. हा सूक्ष्म प्रमाणात लागतो. मग याला कुठच्या गटात ठेवायचा? हा अपक्ष आमदारांसारखा असतो. अशा स्वावलंबी आमदारांचाही शेवटी एक गट होतोच. म्हणून त्याला मी ‘..आणि मंडळी’ म्हणतो.

हा ‘को क्यू टेन’ काम तरी काय करतो?

प्रत्येक पेशीमध्ये मायटोकाँड्रिया नावाची यंत्रं असतात. साखर (ग्लुकोज) किंवा मेदाम्ल (फॅटी अ‍ॅसिड) या दोन हजारांच्या नोटा आहेत असे समजू. शरीर फक्त छोटेसे एक पशाचे नाणे स्वीकारते, नोटा नाही. त्या नाण्याला ‘ए.टी.पी.’ असे म्हणतात. आपण ‘दोन हजारांची मोड आहे का,’ असे विचारतो तेव्हा आपल्याला कोणी त्या नोटेचे चार तुकडे करून, प्रत्येक तुकडा म्हणजे पाचशेची नोट आहे, असे सांगून चार तुकडे हातात ठेवत नाही. पण शरीरात मात्र या साखर (ग्लुकोज) किंवा मेदाम्ल (फॅटी अ‍ॅसिड) नोटांचे छोटे-छोटे तुकडे करून त्यांना ‘ए.टी.पी.’ बनवून मग साठवले जाते. नोटांचे तुकडे करून त्यांची ‘ए.टी.पी.’ची नाणी पाडण्याचे काम हे मायटोकाँड्रियामध्ये होते. हे काम करण्यात ‘को क्यू टेन’चा मोठा वाटा असतो.

पेशींमधील मायटोकाँड्रियासारखी आणखी काही यंत्र असतात. त्यातील एकाचे नाव आहे ‘लायसोसोम’. एखाद्या सोसायटीत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सोय, सोसायटीत प्रक्रिया केंद्र बनवून केली जाते. आपल्या पेशीतही अनंत क्रियाप्रक्रिया घडत असतात. त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे पेशीच्या आतील (इन हाऊस) केंद्र म्हणजे ‘लायसोसोम’. या ‘लायसोसोम’च्या आत प्रक्रिया करण्यासाठी सतत आम्ल वातावरण ठेवावे लागते. ते ठेवण्याचे काम ‘को क्यू टेन’ करते.

हे एक उत्तम अ‍ॅन्टी ऑक्सिडन्टआहे. खासकरून कोलेस्टेरॉलला ऑक्सिजनच्या हल्ल्यापासून वाचवण्याचे काम ‘को क्यू टेन’ करते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्यास प्रतिबंध करण्याचे काम होते. या घटकाचा वापर तारुण्य राखण्यासाठी होतो. ही नुसतीच सांगोवांगीची गोष्ट नाही, तर चक्क काही चाचण्यांतून हे सिद्धदेखील झाले आहे. रोजचे सेलेनियम १०० मिलिग्रॅम आणि ‘को क्यू टेन’ २०० मिलिग्रॅम घेतले तर जोम, ताकद टिकून राहते. कोलेस्टेरॉलला ऑक्सिजनच्या माऱ्यापासून वाचवल्यामुळे धमनीकाठिण्य (एॅथेरोस्क्लेरॉसीस) आणि हृदयरोगाला थोपवण्याचे काम ‘को क्यू टेन’ करते. मधुमेह,  कंपवात (पार्किन्सन्स) अशा आजारांमध्येही हे उपयोगी ठरते. खेळाडूंना आपला खेळ उंचावण्यासाठी, वंध्यत्व निवारणाच्या उपचारांमध्ये, ‘को क्यू टेन’ उपयोगी ठरते.

‘..आणि मंडळींपैकी’ अजून एक महत्त्वाचे नाव म्हणजे क्रोमियम. चित्रपट आणि दूरचित्रवाणी माध्यमाचा प्रभाव जनमानसावर किती पडतो याची काही चांगली उदाहरणेदेखील आहेत. अमेरिकेत चारचाकी चालवताना सीटबेल्ट लावण्याची सक्ती असूनही, सीटबेल्ट वापरण्याचे प्रमाण खूप कमी होते. कुणाच्या तरी डोक्यात कल्पना आली, की चित्रपटाचा जनमानसावरील प्रभाव भलताच ताकदवान असतो त्याचा उपयोग यासंदर्भात जनजागृतासाठी का करू नये? मग त्यांनी निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना विनंती केली, की गाडी चालवण्याचे दृश्य असेल, त्या-त्या वेळी जाणीवपूर्वक नायक, नायिका अगदी स्टाइलमधे सीटबेल्ट लावूनच गाडी चालू करतील असे तुम्ही दाखवा. यात कुठेही कथानकाला धक्का लागणार नव्हता, की काही वेगळी मेहनत लागणार नव्हती. चित्रपटात सीटबेल्ट लावणे दिसायला लागले आणि समाजात सीटबेल्ट लावण्याचे प्रमाण १३ टक्क्यांवरून ८३ टक्क्यांवर पोचले. आणखी एक उदाहरण. लहान मुलांनी पालेभाज्या खाव्या म्हणून चक्क  ‘पोपाय शो’सारखी कार्टून मालिका निघाली. चित्रपट किंवा दृश्य माध्यम हे इतके ताकदवान आहे की त्या माध्यमातून समाजाचे वर्तन बदलू शकते. हे सांगायचं कारण म्हणजे ‘क्रोमियम’बद्दल एका चित्रपटामुळे उडालेला गोंधळ.

क्रोमियम हे मधुमेह नियंत्रणासाठी उपयोगी असते, असा शोध लागला आणि अनेक कंपन्यांनी क्रोमियम पिकोलेनेट हा क्रोमियम क्षार विकायला सुरुवात केली. २००० मध्ये ‘एरिन ब्रोकोविच’ नावाचा ज्युलिया रॉबर्टची प्रमुख भूमिका असलेला, एरिन पॅटी या स्त्रीच्या वास्तव अनुभवांवरचा चित्रपट आला होता. तो मुळातून बघायलाच हवा असा आहे. या चित्रपटाद्वारे, पाण्यातील क्रोमियम पोटात गेल्याने कर्करोगग्रस्त लोकांची गावं (कॅन्सर क्लस्टर) तयार होतात हे सत्य जगासमोर आले. खरेतर अन्नातून मिळणारे क्रोमियम आणि औद्योगिक टाकाऊ पदार्थातून पाण्यात जाऊन कर्करोग जन्माला घालणारे क्रोमियम यात खूप अंतर आहे. तरीही साहजिकपणे ज्यांना क्रोमियम लिहून दिले होते ती माणसे काळजीत पडली. त्यांनी घाबरून डॉक्टरांकडे चौकशी सुरूकेली, क्रोमियम असलेली औषधे बंद केली. नशिबाने क्रोमियम खूप उपयोगी असले तरी ते अत्यावश्यक नाही आणि अन्नातून ते मिळतच असते. त्यामुळे लोकांनी आपणहून औषधे बंद केल्याने फार फरक पडला नाही. अशी आहे या माध्यमाची महती. अशा गोष्टींवर आपल्याकडे नाटक, चित्रपट क्वचितच काढला जातो.

तर असे हे क्रोमियम. शरीरात इन्सुलिनचे काम व्यवस्थित चालण्यासाठी क्रोमियम लागते. आयर्न आणि क्रोमियम एकत्र घेतले तर आयर्न अ‍ॅबसॉर्पशन कमी होते. मधुमेह झालेल्या लोकांमध्ये १००० मायक्रोग्रॅम क्रोमियम दर दिवशी दिले तर रक्तातील साखरेचे प्रमाण आणि एचबीएवनसी दोन्ही चार ते सहा आठवडय़ांत कमी होतात. आयर्न, कॅल्शिअमसारखे क्षार किंवा क, ड, अ, ही जीवनसत्त्वं यांच्यावर भरपूर चाचण्या होऊन त्याची कमतरता कशी ओळखायची, त्यावर उपाय करण्यासाठी नक्की डोस किती असावेत, हे सर्व माहीत झाले आहे. बाकी बऱ्याच सूक्ष्म अन्नघटकांबद्दल शरीरात ते काय काम करतात हे शोधण्यात आले आहे. बहुतेक अन्नघटकांची कमतरता ही खूप तीव्र असल्याशिवाय त्याची लक्षणं दिसत नाहीत. त्यांची कमतरता भरून काढण्याचा नक्की डोसही माहीत नसतो. याचा गैरफायदा बऱ्याचदा औषध कंपन्या उचलतात.

समजा ‘क्ष’ नावाचा अन्नघटक शरीरात ग्लुकोज नियंत्रणासाठी इन्सुलिनला मदत करतो, तर त्याची जाहिरात ही ‘इन्सुलिनसाठी अत्यावश्यक’ अशी होते. त्या पुढे जाऊन ‘क्ष’ची गरज ही समजा ५० मायक्रोग्रॅम इतकी असेल तरी औषधातील त्याचे प्रमाण २ मायक्रोग्रॅम इतके ठेवून आमचे औषध हे ‘क्ष’ अन्नघटकयुक्त आहे, अशीही जाहिरात करायची. त्याची भरमसाट किंमत ठेवायची. डॉक्टरांनाही बरेचदा नक्की डोस वगैरे काही ठाऊक नसते. त्यांच्यापुढे ‘क्ष’ अन्नघटकाचा डोस गाळून बाकी सर्व शास्त्रीय माहिती ठेवायची. रुग्णही कुठेतरी वाचून सांगतो की, ‘‘डॉक्टर मला ‘क्ष’ हा अन्नघटक कमी पडत असावा. काहीतरी द्या तो भरून काढण्यासाठी.’’ मग डॉक्टर ‘क्ष’ असलेले औषध लिहून देतो. सगळे खूष.

यातून सुटण्यासाठी एक युक्ती सांगतो. जर ‘क्ष’ हा अन्नघटक खूप महत्त्वाचा असेल तर तो इतर दहा घटकांसोबत मिसळून औषधातून न येता त्याचे स्वतंत्र औषध मिळायला हवे. दुसरं म्हणजे, त्याचा डोस किती हे माहिती हवे. हे माहीत नसेल तर उगाच भरमसाट पैसे मोजून असली ‘सूक्ष्म अन्नघटकयुक्त भेळ’ घेण्याने फक्त औषध कंपनीचा फायदा होतो.

मला गुरुस्थानी असणारे सुप्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. अनिल बोरास्कर यांनी एका व्याख्यानात सांगितले होते की, बहुतेक अन्नौषधी आणि सूक्ष्म अन्नघटकांची भेळ विकणाऱ्या कंपन्या या लबाडीने पैसे कमावतात. काही अपवाद असतील पण त्यांचे म्हणणे लक्षात ठेवले पाहिजे. बाकी औषधांच्या बाबतीत गूगलगुरूचा सल्ला घेण्याऐवजी या सूक्ष्म अन्नघटकांच्या बाबतीत घ्यावा. ते कदाचित तुम्हाला आणि तुमच्या डॉक्टरला फायद्याचे ठरेल.

feedback@wisdomclinic.in

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 12:28 am

Web Title: food ingredients dr nitin patankar abn 97
Next Stories
1 कालमर्यादा हवीच
2 विचित्र निर्मिती : अभिनेते अन् दिग्दर्शक
3  ‘मी’ची गोष्ट : माझ्या कवितेची वेदना ..
Just Now!
X