‘फेसकॉम’ या ‘ज्येष्ठ नागरिक संघा’च्या महासंघाचे अध्यक्ष रमेश पारखे यांच्याकडे ग्रामीण भागातले शेतकरी, शेतमजूर, आदिवासी वृद्धांपासून मध्यमवर्गीय, उच्चभ्रू असे विविध स्तरांतले ज्येष्ठ वेगवेगळय़ा समस्या घेऊन प्रत्यही येत असतात. महाराष्ट्रातले ३००० ज्येष्ठ नागरिक संघ ‘फेसकॉम’शी संलग्न आहेत. पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कायद्यांची माहिती व्हावी, त्यांची व्यवस्थित कार्यवाही करता यावी तसंच ज्येष्ठांसाठी असलेल्या सरकारी योजनांचा फायदा तळागाळातील ज्येष्ठांपर्यंत पोहोचावा यासाठी ‘फेसकॉम’ शिबिरं व कार्यशाळांचं सातत्याने आयोजन करत आहे. त्या फेसकॉमविषयी..

रात्री दहाची वेळ. दारावरची बेल वाजते. यावेळी कोण आलं असेल या विचारात पारखेवहिनी दार उघडतात. दारात नऊवारी काठपदराची साडी, गळय़ात काळीपोत, हातभर हिरव्या बांगडय़ा घातलेली वृद्धा आणि डोक्याला मुंडास बांधलेला, धोतर उपरणं अशा वेषातला रापलेल्या चेहऱ्याचा वृद्ध गृहस्थ! वहिनी त्यांना घरात घेतात. त्यांची विचारपूस करतात. त्यांना जेऊखाऊ घालतात आणि डोळय़ांतलं पाणी पुसत ते जोडपं आपली कर्मकहाणी सांगू लागतं. अलिबागचं हे शेतकरी जोडपं! शेती भरपूर. त्यांना तीन मुलगे. तिघेही कुशाग्र बुद्धिमत्तेचे! शेतीच्या जिवावर तात्याबांनी तिन्ही मुलांना शिकवलं. दोघं डॉक्टर झाले, एक इंजिनीअर. आज तिघंही मुंबई-पुण्यात स्थायिक झालेत. त्यांनी शहरातल्या सुशिक्षित मुलींशी लग्न केलंय. आता ते गावाकडे फिरकतही नाहीत. वडिलांच्या मागे लागलेत ती शेती विकून टाका. गाव सोडा. इथे आमच्याजवळ येऊन राहा!
‘‘सायेब! आपल्या आईला लेकरू कधी इकतं का? मी माझ्या  काळय़ा आईला कसं इकू?’’ तात्याबांचा आर्त सवाल. ‘‘जिंदगीभर मोकळं वारं प्यालेली आमी मान्स! त्या शहरातल्या चार खोल्यांत जीव घाबरा होतो बगा आमचा. काय बी करा. आमच्या मुलांना समजवा!’’ त्यांनी ‘फेसकॉम’ला आपली व्यथा सांगितली.
ग्रामीण भागातील ही कथा. दुसरी कथा शहरातली. गृहस्थ बँकेत उच्चपदस्थी! पत्नी आयकर अधिकारी. घरात पुरेसा पैसा येत असल्याने मुलांचे खूप लाड केले. दरमहा भक्कम पॉकेटमनी मुलांना देत गेले. मुलं तो उधळत गेली. दरम्यान बँकेत स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर झाली. हातात भरपूर पैसे आले, पण ते त्यांनी वृद्धापकाळासाठी राखून ठेवले. आता मुलांना पॉकेटमनी मिळणं बंद झालं. मुलांना कळलं, वडिलांच्या हातात भरपूर पैसे आलेत. तरीही ते आपल्याला देत नाहीत. ‘‘एवढे पैसे राखून ठेवलेत. मेल्यावर कोणाच्या मढय़ावर घालणार आहात?’’ पोटच्या पोरांनी प्रश्न केला. नुसतं बोलून मुलं थांबली नाहीत. त्यांनी दादागिरी करून या वृद्ध जोडप्याला घरातून हाकलून दिलं. तेही असेच दाद मागायला ‘फेसकॉम’कडे आले.
‘फेसकॉम’ अर्थात ‘ज्येष्ठ नागरिक संघा’च्या महासंघाचे अध्यक्ष रमेश पारखे यांच्याकडे अशा ग्रामीण भागातले शेतकरी, शेतमजूर, आदिवासी वृद्धांपासून मध्यमवर्गीय व पाली हील, केम्प्स कॉर्नरमधील उच्चभ्रू ज्येष्ठ असे विविध स्तरांतले ज्येष्ठ वेगवेगळय़ा समस्या घेऊन प्रत्यही येत असतात. समस्यांच्या पार मुळाशी जाऊन त्या सोडवण्याबरोबरच लोकांमध्ये अशा समस्यांची जाणीव जागृत व्हावी असाही ‘फेसकॉम’चा प्रयत्न असतो. त्या दृष्टीने प्रत्येक वर्षी वेगवेगळय़ा समस्यांवर कार्यक्रम आखले जातात.
‘फेसकॉम’चे एकूण दहा विभाग आहेत. जे संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत. हे दहा विभाग मुख्यालयाच्या सूचनांप्रमाणे सुसूत्रपणे काम करतात. महाराष्ट्रातले ३००० ज्येष्ठ नागरिक संघ ‘फेसकॉम’शी संलग्न आहेत. त्यातले १७०० संघ ग्रामीण भागातले आहेत. विशेष म्हणजे १८५ ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष महिला आहेत. त्यातल्या काही महिला निरक्षर असूनही त्या उत्तम कार्य करत आहेत. ‘फेसकॉम’ने वृद्ध स्त्रियांच्या प्रश्नाला प्राधान्य दिले आहे. कारण त्यांचे प्रश्न खूप जटील आहेत. ग्रामीण स्त्रिया, शहरी महिला, निवृत्त स्त्रिया, स्त्रीमुर त्यांत शेतमजूर, वीज भट्टीवर काम करणाऱ्या अशा प्रत्येक स्त्रीवर्गाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्यांच्यासाठी असलेले कायदे वेगवेगळय़ा पद्धतीने राबवावे लागतात. ‘फेसकॉम’ जनजागृतीसाठी दरवर्षी वेगवेगळय़ा संकल्पना राबवत असते.
‘फेसकॉमचे’ अध्यक्ष रमेश पारखे म्हणाले, ‘‘वरवर पाहता ज्येष्ठांच्या समस्या या खाजगी वाटतात.’’ मुलं विचारत नाहीत, घराबाहेर काढतात अशा तक्रारी ते करतात. मान्य आहे की आज हे प्रकार समाजात खूपच वाढलेत. पण आम्ही प्रत्येक केसचा खोलात जाऊन तपास करतो तेव्हा कधी कधी युवकांच्या तक्रारी रास्त आहेत, असं आम्हाला आढळून येतं. मुलं सांगतात, ‘‘वडील आम्हाला आर्थिक स्वातंत्र देत नाहीत. त्यांचे जुने संस्कार सध्याच्या युगात आम्हाला अडचणीचे ठरतात. दुबळं करून टाकतात. म्हणून आमचा उद्रेक होतो.’’ अशा वेळी आम्ही युवकांसाठी जी शिबिरं घेतो, समुपदेशन केंद्र चालवतो त्यांत ज्येष्ठ आणि युवावर्गाला एकत्र आणतो. योग्य समुपदेशनाने त्यांच्या समस्या सुटायला खूप मदत होते.
ज्येष्ठांकडे असलेलं ज्ञान, त्यांचे अनुभव आणि उपलब्ध वेळ यांचा सुयोग्य वापर व्हावा आणि सामाजिक प्रश्नांबाबत ते सक्रिय असावेत या हेतूने ‘फेसकॉमने’ पाणी ‘व्यवस्थापन नियोजन वर्ष’ साजरं केलं. त्यासाठी वेगवेगळय़ा सभा-मेळाव्यांमधून त्यांना प्रत्यक्ष हे काम कसं करायचं याचं योग्य ते प्रशिक्षण दिलं गेलं. रस्त्यात पाण्याची नासाडी होत असेल, एखाद्या सोसायटीत टँकर येत नसेल किंवा पाण्याचा वापर कसा जपून करावा अशा विविध पाणी प्रश्नांविषयी समाजात या जलदूतांनी खूपच जाणीव जागृती केली.
ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळय़ा स्तरांवर काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. उदा. ‘हेल्पेज इंडिया’, ‘डिग्नीटी फाऊंडेशन,’ ‘सिल्व्हर इनिंग्ज’ वगैरे. फेसकॉमने पुढाकार घेऊन अशा सर्व संस्थांना एकत्र आणलं. ही एक मोठी व्होट बँक असल्याने ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्यासाठी ती सरकारवर दबाव आणू शकते या विचाराने सर्व संस्था एकत्र आल्या. त्यांचं नुकतंच कोल्हापूर इथं एकतिसावं अधिवेशन पार पडलं. त्यामध्ये अनेक मागण्या केल्या गेल्या. राज्यमंत्र्यासमोर निवेदन व मागण्यांचे ठराव मांडले गेले. आज संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अशा अनेक चांगल्या सरकारी योजना उपलब्ध असूनही ज्येष्ठांना त्यांचा फायदा घेता येत नाही. त्यासाठी त्यांच्या कार्यवाहीत सुसूत्रता हवी. सोपेपणा हवा. ही ‘फेसकॉम’ची प्रमुख मागणी आहे. आज ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळते. त्यांना कशाला हवी आर्थिक मदत असा सवाल केला जातो. पण कित्येक ज्येष्ठांना केवळ दहा-बारा रुपये पेन्शन मिळते. ही त्यांचं पोट भरायला पुरेशी आहे का? तसंच शेतमजूर, आदिवासी वृद्धांच्या जमिनी गेल्यात. निवृत्त मध्यमवर्गीयांनी मुलांची शिक्षणं केलीत. मुलींची लग्नं केलीत. त्यानं त्यांचे पैसे संपवले. आज त्यांना उद्याची भ्रांत पडलीय. अशा गरीब जेष्ठांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा, व्याधीग्रस्त आणि स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांसाठी मोफत आरोग्य धाम असावं, त्यांना आरोग्य विम्याचं संरक्षण मिळावं, त्यांच्यासाठी जागोजागी विरंगुळा केंदं्र असावीत तसंच ज्या ठिकाणी बस भाडय़ात सवलत नाही तिथे ५० टक्के सवलत मिळावी अशा अनेक मागण्यांसाठी ‘फेसकॉम’ सरकारशी निकराने लढा देत आहे.
हल्ली ज्येष्ठांचे छळ होण्याचे प्रकार वाढलेत. आर्थिक, मानसिक, शारीरिक असे एकूण छळाचे दहा प्रकार आहेत. अशा छळ सोसणाऱ्या जेष्ठांना आधार देण्याचं मोलाचं काम ‘फेसकॉम’करतं. एका गृहस्थांचा मुलगा दर महिन्याच्या एक तारखेला वडिलांबरोबर बँकेत जाई. त्यांची सर्व पेन्शन काढून घेई. त्यांना हातखर्चाला फक्त ५०० रुपये देई. एकदिवस ‘फेसकॉम’च्या कार्यकर्त्यांच्या कानावर हा प्रकार गेला. ‘‘आम्ही संघटना म्हणून वडिलांतर्फे पोलिसांत तक्रार देऊ.’’ असा त्यांनी त्या मुलाला सज्जड दम भरला तेव्हा कुठे हा प्रकार थांबला. वडिलांना स्मृतिभ्रंशाची शिकार ठरवून त्यांची प्रॉपर्टी हडप करण्याचा एका मुलाचा प्रयत्नही ‘फेसकॉम’च्या जागरूक कार्यकर्त्यांनी हाणून पाडलाय.
ज्येष्ठांच्या लैंगिक छळाच्या हकीकतीही अशाच अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. एक ७४ वर्षांचे अतिश्रीमंत वृद्ध! सोबत मिळावी म्हणून ५२ वर्षांच्या स्त्रीशी त्यांनी लग्न केलं. वर्षांच्या आत ती त्यांना ब्लॅकमेल करून अनैतिक उद्योग करू लागली. शेवटी ‘फेसकॉम’च्या कार्यकर्त्यांनी वकिलांचा सल्ला घेऊन त्यांना तिच्या पाशातून मुक्त केलं. त्या उलट दुसऱ्या एका गृहस्थाने साठीनंतर बायकोकडून लैंगिक सुख मिळत नाही म्हणून कॉलगर्लकडे जायला सुरुवात केली. एड्सची शिकार झालेला हा गृहस्थ पत्नीलाही त्या मार्गावर नेऊ पाहात होता. तिला वाचवण्यासाठी ‘फेसकॉम’ने मोलाचा हातभार लावला. ज्येष्ठांना वैद्यकीय मदत देण्यासाठी डॉ. ओंकार माटे,        डॉ. दुष्यंत भादलीकर तसंच कायदेशीर बाबींसाठी अ‍ॅड. स्मिता संसारे यांची मोलाची मदत होते.
सुदैवाने आज मुलांकडून ज्येष्ठ नागरिकांना पोटगीचा हक्क देणारा कायदा अस्तित्वात आला आहे. पण त्यांच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर व्हाव्यात, ज्येष्ठांना त्वरित योग्य तो न्याय मिळावा यासाठी ‘फेसकॉम’ने अनेक पातळय़ांवर प्रयत्न सुरू केले आहेत.
पोलीस आणि प्रशासकीय आधिकाऱ्यांना ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कायद्यांची माहिती व्हावी, त्यांची व्यवस्थित कार्यवाही करता यावी तसंच ज्येष्ठांसाठी असलेल्या सरकारी योजनांचा फायदा तळागाळातील ज्येष्ठांपर्यंत पोहोचावा यासाठी ‘फेसकॉम’ शिबिरं व कार्यशाळांचं सातत्याने आयोजन करत आहे.
ज्येष्ठ नागरिक संघ स्थानिक पातळीवर अनेक उपक्रम राबवत असतात. पण ‘फेसकॉम’ही त्यांचं पालकत्व निभावत असताना व्यापक पातळीवर ज्येष्ठांसाठी कार्य करत आहे.    
संपर्क – रमेश पारखे, अध्यक्ष,
‘फेसकॉम’ कोकण प्रादेशिक विभाग.
कार्यालय, १०३, सखी अपार्टमेंट
टिळक रोड, डोंबिवली (पूर्व).
दूरध्वनी : ०२५१-०२४४१५५६.
मोबाइल- ९९६७००६५२७.