News Flash

स्मृती आख्यान : विस्मरण का होतं?

वयानुसार या प्रकारच्या विस्मरणाची वारंवारता वाढत जाऊ शकते.

मंगला जोगळेकर mangal.joglekar@gmail.com

गंभीर स्वरूपाचं विस्मरण काही काळापुरतं बाजूला ठेवून रोजच्या आयुष्यातल्या विसरण्याच्या घटनांचा विचार केल्यास ऐन वेळी काही गोष्टी पुन:पुन्हा प्रयत्न करूनही न आठवणं, तर काही वेळा भयावह आठवणी विसरायचं ठरवूनही न विसरता येणं, असे कित्येक प्रसंग लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणाच्याही आयुष्यात घडू शकतात. वयानुसार या प्रकारच्या विस्मरणाची वारंवारता वाढत जाऊ शकते. त्याची कारणं वाचताना कदाचित तुम्हाला असंही वाटेल, की त्यातली काही टाळण्याजोगी आहेत. वैयक्तिक पातळीवर आपण या कारणांची लक्षपूर्वक नोंद ठेवली तर याची जाणीव नक्की होईल.    

गेल्या काही लेखांमधून आपण विविध वयोगटांत येणाऱ्या विस्मरणाच्या प्रश्नांची ओळख करून घेतली. तसंच मेंदूबद्दल, त्याच्या कार्यपद्धतीबद्दलही माहिती करून घेतली. स्मरणावर किंवा विस्मरणावर परिणाम करणाऱ्या काही विशेष बाबींचा इथे विचार करू या. ही चर्चा प्रत्येकाच्या जीवनात येणाऱ्या सर्वसाधारण अनुभवांबद्दल आहे, गंभीर विस्मरणाबाबत नाही. जीवनातील ताण हे विस्मरणाच्या प्रश्नाचं महत्त्वाचं कारण आहे. सध्याच्या जीवनशैलीमुळे ताण वाढतच चालला आहे, याबद्दल आधीच्या लेखांमध्ये नमूद के लं होतंच. त्याची पुनरुक्ती टाळण्यासाठी ताणाचा उल्लेख खालील चर्चेत केलेला नाही.

काळाचा महिमा

आपण सातत्यानं नवीन माहिती आत्मसात करत असतो. या नवीन माहितीबाबत असं दिसतं, की काही काळानं आपण नवीन मिळवलेली माहिती, प्रसंग, घटना विसरून जातो. समजा, तुम्ही एखादा कार्यक्रम पाहिलात, त्यात तुम्हाला ‘वाढतं वय आणि आहार’ याबद्दल बरंच काही समजलं; परंतु ऐकलेल्या माहितीचा तुम्ही काहीच उपयोग केला नाहीत, ती माहिती कोणालाही सांगितली नाहीत, त्याप्रमाणे आपल्या राहाणीत काही बदल केले नाहीत, तर ही माहिती कालांतरानं तुमच्या आठवणीतून हद्दपार होईल. इतकंच नाही, तर तुम्ही असा कुठला कार्यक्रम पाहिला होता हेदेखील तुमच्या स्मरणातून पुसलं जाईल. समजा, दर आठवडय़ाला तुम्ही ग्रंथालयातून मासिकं घेऊन येता. त्यातलं वाचलेलं तुमच्या किती लक्षात राहातं? माळ्यावर ठेवलेल्या वस्तू काही वर्षांनंतर काढल्या जातात तेव्हा त्यातल्या बहुतेक वस्तू स्मरणातून गेलेल्या असतात, हा अनुभव प्रत्येकानं घेतलेला असतो. म्हणजेच तुम्हाला असं दिसेल, की तुमच्या आयुष्यातील माहिती, घटना इत्यादी बरंच काही विसरलं गेलेलं असतं. मात्र यामध्ये काळजी वाटण्याजोगं काहीच नाही. शास्त्रज्ञांच्या मते नवीन माहितीला जागा द्यायची, तर मेंदूला नको असलेल्या माहितीचा कचरा उचलण्याचं काम करायला हवं. वर्तमानकाळातील जीवन जगण्यात अडथळे येऊ द्यायचे नसतील तर आठवणींच्या ‘गेट-कीपर’चं काम करताना मेंदूला कार्यतत्परता दाखवायलाच हवी.

पुरेसं लक्ष नसल्यामुळे विसरणं

रेडिओवरील एखादा कार्यक्रम ऐकता, ऐकता तुम्ही स्वयंपाकघरात काम करत आहात असं समजा. एकीकडे घरकाम करणाऱ्या मावशीही येऊन त्यांचं काम सुरू करतात. पलीकडच्या खोलीत कु ठे तरी तुमचा मोबाइल वाजतो आहे. भाजी शिजल्यावर ती तुम्ही गॅसवरून खाली उतरवून ठेवता. फारच छान झाला कार्यक्रम, असं काही तरी म्हणत रेडिओ बंद करता. इकडे पाहाता, तर घरकामाच्या मावशी आलेल्या तुम्हाला दिसतात. तुम्ही म्हणता, ‘‘अगं, तू कधी आलीस?’’ ती म्हणते, ‘‘तुम्ही रेडिओ ऐकत होतात तेव्हा.’’ मग तुम्ही कढईतून भाजी दुसऱ्या भांडय़ात काढायला जाता आणि तुम्हाला प्रश्न पडतो, ‘अरे, तिखट-मीठ सगळं घातलं का मी यात?’ तितक्यात मोबाइल वाजतो. पलीकडून तुम्हाला विचारलं जातं, ‘‘तू नव्हतीस का घरी?’’ तुम्ही म्हणता, ‘‘अगं, घरीच होते; पण मला कळलंच नाही केव्हा तुझा फोन आला ते..’’ अनेकांना कदाचित ही त्यांचीच गोष्ट वाटेल. का घडल्या या सगळ्या घटना? तर काय चाललं आहे याकडे तुमचं लक्षच नव्हतं म्हणून. बरोबर? लक्ष नसल्यामुळे माहिती मेंदूपर्यंत पोहोचलीच नाही.  पुरेसं लक्ष न देता आपण किती तरी कामं करत असतो. चष्मा काढतो, तो कुठे तरी ठेवतो. पेन वापरतो, ते कुठे तरी ठेवतो, कारण आपण आपल्याच नादात असतो. ठरावीक वेळी करायच्या गोष्टी वेळेवर केल्या जात नाहीत, त्यापाठीमागेही हेच कारण असतं. औषधं घ्यायचं विसरणं, वेळेवर दिवे बंद न करणं हे रोजच चाललेलं असतं. मुख्य म्हणजे ज्या विचारात आपण मग्न असतो, ते विचारही बरेचदा फुटकळच असतात. लहानपणी ‘‘लक्ष कुठे आहे तुझं? सारखं आपलं आपल्याच तंद्रीत,’’ असं म्हणून आईच्या खाल्लेल्या टपल्या तुम्हाला आठवल्या की नाही?

निरीक्षणाचा अभाव हे कारणही बऱ्याच वेळेला विस्मरणासाठी जबाबदार असतं. एक उदाहरण पाहू. एका घरातील श्री. दुपारी बँकेची कागदपत्रं नीट ठेवत असताना दार वाजलं म्हणून घाईघाईनं हातातली कागदपत्रं कुठे तरी ठेवून दार उघडायला गेले. इकडे त्यांच्या सौं.नी कपाट बंद करून टाकलं. पाहुणे बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे गप्पा रंगल्या. बँकेच्या कागदपत्रांचं ते विसरूनही गेले. पुढच्या महिन्यात बँकेत जायची वेळ आली आणि मग त्यांना आठवण झाली. मग काय, गेला आठवडा शोधाशोधीत. सकाळी गॅसवर चहा आणि दूध एकाच वेळी ठेवून आपण दारात पेपर आणायला जातो. पेपर हातात आला की साहजिकच एखादी बातमी लक्ष गुंतवून टाकते. इकडे दूध उतू जायला वेळ लागत नाही. एका वेळी जास्त गोष्टी केल्या, की अवधान जायला वेळ लागत नाही. निरीक्षणाचा अभाव, एका वेळी अनेक गोष्टी करणं, ही कारणं स्वतंत्र वाटली तरी त्याचा परिणाम कामावरचं लक्ष विचलित होण्यात किंवा एकाग्रता ढळण्यात होत असतो. म्हणून त्यांचा उल्लेख पुरेसं लक्ष नसणं या कारणाखाली केलेला आहे.

गरजेच्या वेळेला नेमकी गोष्ट न आठवणं

समजा, मित्रांबरोबर तुमच्या गप्पा चालल्या आहेत. त्यामध्ये बोलण्याच्या ओघात तुम्हाला एखादी गोष्ट आठवतच नाही. होतं की नाही हे सारखं? परवा आमची  मीटिंग चालली होती; पण ऐन क्षणाला माहितीनं गुंगारा दिला. गंमत म्हणजे केवळ एकाच्याच बाबतीत हे घडलं असं नाही बरं का! त्या, त्या वेळेचा ताण असतो तो किंवा विचारांच्या धबधब्यात काही गोष्टी तत्काळ सापडत नाहीत असं म्हणा किंवा मोबाइलच्या कनेक्शनसारखं मेंदूतील कनेक्शन लागत नाही असं म्हणा; पण थोडय़ा वेळानं आठवतात    त्या-त्या गोष्टी. कुठल्या तरी दुकानाचं नाव न आठवणं, कोणाकडून अमुक एक मेसेज आला होता ते न आठवणं, आपण गेल्या वर्षी सहलीला गेलो होतो तेव्हाची काही माहिती न आठवणं, हे असे अनुभव येतच असतात. अशी थोडय़ा वेळेपुरती ही माहिती जणू काही मेंदूतून गायब होते; पण थोडा वेळ ताण दिला, की कशी काय कोण जाणे पुन्हा अवतरते. वयानुसार अशा घटना घडतात, असं अभ्यासकांचं या बाबतीतलं मत आहे.

चुकीचा संबंध लावणं

बऱ्याचदा आपल्याला एखाद्या गोष्टीची अर्धवट माहिती असते. मोठय़ा वयात तर पुरेशी एकाग्रता होत नसल्यानं संपूर्ण माहिती अवगत होत नाही. अर्धवट ज्ञान होतं. मग एखादी वस्तू अमुक ठिकाणी आहे, असं सांगितलं जातं; पण ती तिथे नसतेच. स्वयंपाकघरातल्या एखाद्या वस्तूचा शोध चालू असतो. महिन्याच्या सामानात आणलं होतं, अशी पक्की आठवण असलेला तो जिन्नस आणलाच गेलेला नसतो. कधी कधी काही आठवणी खूप जुन्या झालेल्या असतात. उदा. तुम्ही अनेक वर्षांत न केलेल्या पदार्थाची पाककृती देताना एखादी पायरी चुकीची सांगितली जाते. ‘अमुक शहरामध्ये, अमुक जागी एक ठिकाण आहे, तिथे गेल्याशिवाय तुमची ट्रिप पुरी होणार नाही,’ असं छातीठोकपणे सांगताना गफलत झालेली असते. तुमचा अभ्यास असलेल्या विषयाची माहिती अचानक इकडची तिकडे होते. आपण काही तरी लिहीत असताना कुठे तरी वाचलेलं स्मरतं आणि ते लिखाणात उतरतं. ही कल्पना कशी सुचली, असा प्रश्न आपल्याला पडतो. अशा आठवणींची गल्लत आपण बिनदिक्कत करतो की काय? जरा गंभीरच नाही का हे? पण वाढत्या वयानुसार अशा गफलती अधिक प्रमाणात घडताना दिसतात.

न घडलेल्या सूचित घटना

एखादा अपघात होतो. आपल्याला त्यातलं थोडंच काही तरी आठवतं, पण कालांतरानं सगळं स्पष्ट लक्षात येतंय असं वाटताना काही घटनांची साखळी केवळ आपल्या मनातच तयार व्हावी, असं चित्रपटातच नाही तर प्रत्यक्षातही घडतं. विश्वास ठेवायला थोडं अवघड वाटेल कदाचित. हे असं घडण्याचं कारण म्हणजे अमुक प्रसंग असा घडला (तो घडला नसला तरीही) अशी चुकीची आठवण तयार होते आणि ती स्मरणात पार घट्ट बसते. त्यामुळे एखादी घटना किंवा तिचा काही भाग खरोखरी घडला किंवा घडलाच नाही, हे आपल्याला पटत नाही. मेंदूमध्ये हे रेकॉर्डिग नेमकं कसं होतं हे आपल्याला नीटपणे कळलेलं नाही. कारण मेंदूच्या बाबतीत बऱ्याच बाबी गूढ आहेत; पण आपल्या आठवणींवर याचा परिणाम होऊ शकतो. याबाबत मेंदूबद्दल जाणीवपूर्वक लेखन करणाऱ्या न्यूरोसायन्टिस्ट लिसा जिनोव्हा म्हणतात, ‘विसरणं हा मेंदूचा स्थायिभाव आहे. अनुभवाचे जे तुकडे कायमस्वरूपाच्या आठवणीत रूपांतरित झालेले नसतात  त्यामध्ये कल्पनेचे रंग भरले जातात. ज्या वेळी जुनी आठवण ताज्या स्वरूपात सांगितली जाते, तेव्हा काही माहिती नव्यानं त्यात मिसळली जाते. कुठली नवीन माहिती त्यात विणली जाईल, हे माणसाच्या त्या वेळच्या भावनिक स्थितीवर अवलंबून असेल. जुन्या माहितीबद्दल कोणी काही सल्ला दिला असेल, सूचना केल्या असतील, तर मूळ आठवणीत बदल घडू शकतो. जुन्या आठवणी स्वप्नात बघितल्या गेल्या तरी आठवणींचा संदर्भ बदलू शकतो.’

तुमच्या अनुभवाचा आठवणींना आकार 

आपले प्रत्येकाचे काही विचार असतात, समज-गैरसमज असतात, आधी शिकून मिळवलेली माहिती असते. मेंदू सततच नवीन शिकत असतो. नवीन शिकताना तुम्ही मेंदूला जी माहिती पाठवता त्यावर वरील बाबींसकट तुमच्या मनाच्या अवस्थेचाही परिणाम होत असतो. समजा, एखाद्या उत्पादनाचं विपणन गावखेडय़ांमध्ये करण्यासंबंधी तुम्हाला माहिती दिली जात आहे. तुम्हाला गावाकडचा बिलकूल अनुभव नाही. तुमच्याबरोबर छोटय़ा गावात

र्अध आयुष्य काढलेल्या मित्रालाही हीच माहिती दिली जात असेल, तर तुमच्या दोघांचे मेंदू काय माहिती लक्षात ठेवतील यात मोठा फरक असेल. बरोबर? दुसरं उदाहरण बघू  या. तुमचा आयुर्वेदावर विश्वास आहे. आयुर्वेदिक औषधांचा तुम्हाला चांगला अनुभव आहे.

असं असताना आयुर्वेदाबद्दल न पटणारी

माहिती दिली तर तुम्ही ती स्वीकाराल का?

नाही ना? म्हणून आपली पार्श्वभूमी आपल्या आठवणींना घडवायला मदत करते, असं म्हणणं सयुक्तिक ठरेल.

पाठ न सोडणाऱ्या आठवणी

आपण इथे विस्मरणाबद्दल बोलतो आहोत; पण काही आठवणी काही जणांच्या मनात पिंगा घालत असतात. या आठवणी मनात येऊ नयेत म्हणून खूप प्रयत्न केला जातो; पण नकारार्थी आठवणी, नकोशा घटना, झालेला छळ, अत्याचार, कठीण परिस्थितीत मिळालेली वागणूक आणि त्यामुळे वाटणारी भीती हा आठवणींचा वेगळाच प्रकार आहे, जो पाठ सोडतच नाही. अशा घटना बऱ्याच जणांच्या आयुष्यात घडतात आणि त्या मेंदूमध्ये कोरल्या जातात. मग अशी व्यक्ती परिस्थितीला, ती आणणाऱ्या व्यक्तीला जबाबदार धरते, ती केवळ आयुष्याच्या त्याच काळासाठी नाही तर संपूर्ण आयुष्यासाठी. बऱ्याचदा निराशेचे विचार मनात मूळ धरू लागतात. केलेले प्रयत्न मग अपुरे पडतात, नाही तर अयोग्य दिशेनं होतात. कधी कधी तर प्रयत्नच होत नाहीत. ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर’ किंवा नैराश्यामध्ये अशा भावनांशी झगडा करावा लागतो. अशा वेळी रोजच्या आयुष्यात विस्मरण घडत राहातं, वाढत राहातं.

विस्मरण किंवा चुकीच्या स्मरणाच्या काही कारणांकडे आपण आज बघितलं. आता मी तुम्हाला थोडंसं काम देणार आहे. तुमच्या स्वत:च्या स्मरण-प्रश्नांचा आढावा घेण्याचं. तुम्हाला पुढचे दोन आठवडे तुमच्या प्रश्नांकडे नजर ठेवून ते टिपून ठेवायचे आहेत. ते कशामुळे घडत आहेत, याचा विचार करायचा आहे. त्यासाठी आपण काही करूशकतो का? याबाबत जमल्यास आपल्या मित्रमंडळींमध्ये चर्चा करायची आहे. हे करून पाहाच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 12:31 am

Web Title: forgetfulness in everyday life everyday forgetfulness and tips to end it zws 70
Next Stories
1 पडसाद : ‘ट्रॅजेडी क्वीन’ला सुखाचा हेवा तो काय!
2 पुरुष हृदय बाई : पुरुषपणाची सार्थकता
3 मावशी!
Just Now!
X