01 December 2020

News Flash

चार पिढय़ांचा गणपती

गणपती मूर्तिकार म्हणून प्रसिद्धीला आलेल्या पेणच्या देवधर घराण्यात दुसऱ्या पिढीनं या गणपती मूर्तीपासून आपल्या दोन्ही मुलांना दूर ठेवायचं ठरवलं होतं आणि तिसऱ्या पिढीनं आपल्या मुलांना

| September 7, 2013 01:01 am

भिकाजीपंत देवधर तळकोकणातून आले आणि पेणमध्ये स्थिरावले. ते शाडूचे गणपती अतिशय सुबक बनवत. तेच त्यांच्या पुढच्या पिढय़ांनीही आत्मसात केले. १८८० पासून सुरू झालेली ही मूर्तिकलेची परंपरा चार पिढय़ांनी कायम ठेवली. आता चार पिढय़ांची ही परंपरा संग्रहालयात रूपांतरित होते आहे. या चार पिढय़ांविषयी.. गणेशोत्सवाच्या निमित्ताने.
कोणताही माणूस आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करताना वाड-वडिलांच्या जीवनाचं अवलोकन आणि स्वत:च्या जीवनातले अनुभव या दोन्हींची सांगड घालूनच विचार करतो. गणपती मूर्तिकार म्हणून प्रसिद्धीला आलेल्या पेणच्या देवधर घराण्यात दुसऱ्या पिढीनं या गणपती मूर्तीपासून आपल्या दोन्ही मुलांना दूर ठेवायचं ठरवलं होतं आणि तिसऱ्या पिढीनं आपल्या मुलांना मुद्दाम मुंबईला शिकायला पाठवलं. मुलं उत्तम शिकलीसुद्धा आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग करायला पुन्हा घरी परतली आणि मूर्तिकलेतही रमली, आपापला व्यवसाय सांभाळून. म्हणजे इच्छा असो वा नसो, पेणच्या देवधर घराण्याच्या चारही पिढय़ा नियतीनं गणपती मूर्तीशी नातं जोडूनच पृथ्वीवर पाठवल्या एवढं मात्र नक्की!
निर्वाह कठीण, कोकणातून नशीब अजमावण्यासाठी मुंबई-पुण्याकडे जाण्याचा तो काळ होता, म्हणजे एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध! हरहुन्नरी कलाकार असलेले भिकाजीपंत देवधरही असेच निघाले शहराकडे; पण थेट मुंबईला न जाता, कुणा नातेवाइकांच्या ओळखीनं किंवा आधारानं म्हणा, पेणला थांबले. हातात कला होती, कष्ट करण्याची तयारी होती. पागोटी बांधण्याचा व्यवसाय मिळाला, तो करता करता ते गणपती करायला शिकले. शाडूचे गणपती ते अतिशय सुबक बनवत. ते वर्ष असावं १८८०. तेव्हापासून पेणच्या देवधरांकडच्या गणेशमूर्तीचा इतिहास ज्ञात आहे. यंदा त्यांचं १३३वं (एकशे तेहतिसावं) वर्ष आहे.
कै. भिकाजीपंत पोट भरण्यासाठी म्हणून पेणला स्थिरावले खरे, पण त्या काळाच्या मानाने त्यांनी चांगलाच व्यवसाय केला असणार. कारण अल्पावधीतच त्यांनी स्वत:चे घर बांधले होते.
भिकाजीपंतांचे पुत्र बाबूराव देवधर वडिलांच्या हाताखाली लहानपणापासून काम करू लागले. उत्तम तयार झाले. कला रक्तातच होती, जोडीला धडपड आणि नव्याचं स्वागत करण्याची वृत्ती होती. गणपती, दत्त आणि इतर देवदेवतांच्या काचेच्या फ्रेममधल्या प्रतिमा बाबूराव तयार करत. रांध्याची छोटी छोटी खेळणी बनवत. फोटोग्राफी हा विषय तेव्हा अतिशय नवीन, कुतुहलाचा होता. बाबुरावांनी त्या काळात मिळणारा उत्तम कॅमेराही विकत घेतला होता म्हणे. पण त्यांना नशिबानं आणि त्यांच्या प्रकृतीनं साथ नाही दिली. फारसं यश चाखलं नाही त्यांनी. त्यामुळे की काय आपल्या मुलांना मातीकामापासून लांब ठेवायचा निश्चयच केला त्यांनी. पण बाबूरावांचं अकाली निधन झालं तेव्हा त्यांचा मोठा मुलगा राजा फक्त १६ वर्षांचा, धाकटा वामन ११ वर्षांचा होता. घरात म्हातारी आई अन् पत्नी, मातीकामात हात घातला तर मुलांच्या आयुष्याची माती होईल असं मानणाऱ्या बाबूरावांच्या राजाभाऊंनी अल्पवयात अंगावर पडलेली घराची जबाबदारी तर पेललीच पण मातीकामातूनच सोन्यासारखा गणपतीचा व्यवसाय उभारला. भरभराटीला आणला.
घरातलं गणपती, खेळणी बनवण्याचं काम राजाभाऊंनी व्यवस्थित चालू ठेवलंच, पण कुशाग्रबुद्धी आणि प्रयोगशीलता यांनी सतत अभ्यासही चालू ठेवला. एका अनपेक्षित घटनेनं त्यांना आयुष्यात यशाची पहिली चाहूल लागली. त्याचं झालं असं, सिनेदिग्दर्शक राजाभाऊ नेने हे राजाभाऊ देवधरांचे लहानपणचे मित्र. नेन्यांचे मामा म्हणजे ‘प्रभात’चे भागीदार दामले. १९३९-४० या वर्षांत प्रभात कंपनीचा ‘संत ज्ञानेश्वर’ चित्रपट खूप लोकप्रिय होत होता. चित्रपटाच्या खेळाच्या वेळी ज्ञानेश्वरांच्या मूर्ती विकायला ठेवाव्या असं कुणाच्या तरी मनात आलं. लगेच चार-पाच कलाकारांकडून मूर्ती मागवण्यात आल्या. त्यातली राजाभाऊ देवधरांनी बनवलेली सुबक सात्त्विक मूर्ती सर्वाच्याच पसंतीला उतरली. आणि हे काम देवधरांनाच मिळालं. ज्ञानेश्वरांच्या कृपेनं देवधरांना नावलौकिकही खूप मिळाला.
ही कीर्ती तत्कालीन कुलाबा प्रांताचे गव्हर्नर एच. एफ. नाईट यांच्या कानावर गेली. त्यांनी पेणला जाऊन देवधरांच्या कारखान्याला भेट दिली आणि सर विन्स्टन चर्चिल यांचा छोटा पुतळा बनवायला सांगितलं. तो पसंत पडल्यावर शंभर प्रती करून मागितल्या. अन् त्या सर्वाना आवडल्या असं कळल्यावर एक लाख प्रतींची ऑर्डर घेता का असं विचारलं. त्यावेळचं तंत्रज्ञान लक्षात घेता राजाभाऊ देवधर उत्तरले ‘अहो दुसरं महायुद्ध संपण्यापूर्वी काय, पण तिसरं युद्ध सुरू होऊन संपलं तरी ही ऑर्डर पूर्ण होणार नाही.’
दरम्यान, राजाभाऊंनी ‘देवधर कला मंदिरा’चं फॅक्टरी अ‍ॅक्टनुसार रजिस्ट्रेशन करून ‘प्रभात कला मंदिर’ नामकरण केलं. १९५२ साली पुण्याच्या स्वस्तिक रबर कंपनीनं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती मूर्ती करण्यासाठी रबर मोल्ड करता येईल का, याबाबत प्रयोग सुरू केले. देवधर बंधूंनी त्यांच्या मदतीनं गणपतीचा साचा बनवून तो वापरण्यात यश मिळवलं. एवढंच नव्हे तर पुढे १२ र्वष हे तंत्रज्ञान गुप्त ठेवण्यात यश मिळवलं.
१९५६ सालापासून अनेक मोठय़ा शहरांत प्रतिनिधी नेमून, त्यासाठी त्या गावातल्या उत्तम नामांकित दुकानांची निवड करून देवधर बंधूंनी ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. गणपती, गौरी तसंच वर्षभर अनेक संत, सरस्वती, राधा-कृष्ण, भगवान बुद्ध.. नवनिर्मितीला आव्हान देणारी ही काही वर्षे व्यावसायिक भरभराटीची ठरली. देवधरांचे घर पेणमधले एक सांस्कृतिक केंद्रच बनले.
काळाच्या ओघात वामनराव देवधरांनी आपली स्वतंत्र निर्मिती सुरू केली ‘कल्पना कलामंदिर’ या नावानं. पेणच्या गणपती व्यवसायावर त्यांनी आपल्या स्वतंत्र प्रतिभेचा आणि शिस्तीचा निराळा ठसा उमटवला. वामनराव स्वत: संगीतप्रेमी. राजाभाऊंनी आपल्या भावामधली कला नेहमी जोपासली. वामनराव उत्कृष्ट बासरी वाजवत. त्याकाळी ‘रेडिओस्टार’ म्हणून त्यांना मोठाच मान मिळे. त्यांनी फक्त बासरीवर लक्ष केंद्रित केलं असतं तर फार मोठं नाव कमावलं असतं असं जाणकार म्हणत.
   दोन्ही देवधर बंधूंकडे अनेक कारागीर काम करत. एखाद्या कुटुंबाप्रमाणे हे काम चाले. गणपती साच्यातून आला तरी त्याचं रंगकाम विशेष करून डोळे रंगवणं महत्त्वाचं असे. देवधरांनी आपली कला मुक्तपणे कारागिरांमध्ये वाटली. परिणाम असा झाला की १९६४-६५ पासून पेणमध्ये अनेक नवे गणपती कारखाने निघाले.
आपण काही शिक्षण न घेता या क्षेत्रात आलो याची रुखरुख राजाभाऊंना असावी. त्यांनी आपल्या धाकटय़ा मुलाला आनंदला जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये मुंबईला शिकायला पाठवलं. पाठोपाठ वामनरावांच्या श्रीकांतनंही जे. जे. स्कूलमध्ये शिक्षण घेतलं.
‘‘घरी मातीकामात मनसोक्त रमलो, पण त्याला कलेचा शास्त्रशुद्ध पाया जे. जे. स्कूलनं दिला. मूर्तिकलेतली लय, ताल, तोल, प्रमाणबद्धता हे सारं शिकल्याचा फायदा झाला. दृष्टी विशाल झाली. जागतिक कला समजून घेता आली.’’ एवढं करून आनंद आणि श्रीकांत हे दोन्ही कलाकार आपापल्या कलामंदिरात परतले ते घराण्याचा कलेचा ठेवा वृद्धिंगत करण्याचा निश्चय करून. आनंद देवधर सांगतात, ‘‘कलाशिक्षणानं समज दिली. तसा आम्ही धंदा म्हणून गणपती मूर्ती बनवत राहिलोच असतो, पण इतर अनेक पुतळे बनवून आम्ही प्रतिष्ठा वाढवू शकलो.’’
श्रीकांत वामनराव देवधर म्हणतात, ‘‘अहो, या कामाशी संबंध नसलेल्या आमच्या दोघांच्या पत्नींनीही व्यवसायात मोलाची मदत केली. आम्हाला जो सौंदर्यदृष्टीचा वारसा मिळाला, भाव-भावना पकडण्याचं कसब लाभलं ते कुठल्या स्कूलमधून मिळणं कठीण असतं.’’ राजाभाऊंच्या सदानंदनं बी.कॉम. होऊन कारखान्याची खरेदी, अकौंट्स, व्यवस्थापन सांभाळलं, पण मूर्तिकला मात्र तंतोतंत उचलली ती आनंदनंच. आनंद देवधरांनी वडिलांप्रमाणेच संत विवेकानंद, सरस्वती यांच्या मूर्ती बनवून वाहवा मिळवली. ते म्हणतात, ‘‘मूर्ती बनवण्यापूर्वी मी खूप वाचन करतो. प्रत्यक्ष चेहऱ्यावरचं काम करताना आपली वृत्ती सात्त्विक असेल तरच सरस्वतीचे भाव सात्त्विक उतरतात.’’
श्रीकांत देवधर एक खंत बोलून दाखवतात, ‘‘आम्ही कितीही उत्तम काम केलं तरी आमचं नाव मूर्तिकार म्हणूनच राहिलं. अन् डोक्यात कलेचा किडा म्हणून मूर्तिकारांच्या व्यवसायात आम्ही पक्के धंदेवाईक नाही होऊ शकलो.’’ असं असलं तरी दोन्ही क्षेत्रात देवधरांचा नावलौकिक झालाच. श्रीकांतनं तर मूर्तिकारांच्या संघटनेसाठी, हक्कांसाठी पुष्कळ काम केलं. श्रीगणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक कल्याण मंडळाचे ते अजूनही अध्यक्ष आहेत.
पुण्यातला गणेशोत्सव चित्रित करण्यासाठी योहान्नान्ज बेट्झ हे जर्मन गृहस्थ आले होते. त्यांनी श्रीकांत देवधरांना मूर्तिकलेची प्रात्यक्षिकं करण्यासाठी झुरिकला, रिट्बर्ग म्युझियममध्ये नेलं. आणि गेली काही र्वष श्रीकांत देवधर अशी शिबिरं युरोपभर घेत आहेत. अनेक ठिकाणी मातीकामाकडे स्ट्रेस बस्टर म्हणून पाहिलं जातं. अनेक विदेशी कलाकार त्यांच्या या शिबिरांना हजेरी लावतात. मुंबईत ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ म्युझियममध्ये दरवर्षी जून, जुलैमध्ये त्यांचं शिबीर होतं.
श्रीकांत देवधरांनी काही वर्षांपूर्वी गणपती कारखाना बंद केला. आनंद देवधरही त्याच मन:स्थितीत आहेत. कारण पुढची पिढी भरपूर शिकून आपापल्या आवडीच्या व्यवसायात स्थिरावली आहे. मात्र पाचव्या पिढीतली देविका गणपती उत्तम बनवते, पण व्यवसाय म्हणून नव्हे. आनंद देवधरांनी पेणच्या त्यांच्या प्रभात कलामंदिरातच सुंदर म्युझियम बनवून साऱ्या मूर्ती काचबद्ध करण्याचं व्रत घेतलं आहे. चार पिढय़ांची मूर्तिकलेची ही परंपरा आता संग्रहालयात रूपांतरित होते आहे. म्हणजे ही कला पाचवी पिढी चालू ठेवणार नसली तरी अभ्यासकांना इथे भरपूर माहिती आणि ज्ञान मिळू शकेल, हाच त्यातला समाधानाचा भाग आहे.
vasantivartak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 1:01 am

Web Title: fourth generation ganpati festival
टॅग Chaturang
Next Stories
1 कलाशीर्वाद लाभलेलं कामेरकरांचं घर
2 काव्य जगणारं घराणं
3 संगीत ‘मराठेशाही’
Just Now!
X