News Flash

अजूनी येतो वास फुलांना

सुरू झालेली प्रत्येक मैफल भैरवीच्या टप्प्यावर येऊन थांबणार आहे. हे ठाऊक असले तरी भैरवीचे सूर कानावर आले की हुरहुर लागतेच.

| December 21, 2013 07:19 am

‘मिळून साऱ्या’च्या वर्षभराच्या प्रवासानं दिसले ते स्त्रीचं विश्वरूप आणि ते सांभाळण्यासाठी तिला स्फुरलेल्या, अमलात आणलेल्या नव्या नव्या कल्पना. त्या कल्पनांमागे अनेकदा स्वत:चे व स्वत:च्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठीची मूलभूत प्रेरणा होती, तसेच होता त्यांच्या व कुटुंबाचा आस्तित्वाचा प्रश्न! माध्यमांत सवंगतेची जणू स्पर्धा लागली असताना जीवनातील काही मौलिक टिपण्याची आणि टिकवण्याची या सदराच्या माध्यमातून केलेली ही धडपड; खरेतर मर्ढेकरांच्याच शब्दात नेमकेपणाने त्याचे वर्णन करता येईल, ‘अजून येतो वास फुलांना..’
सुरू झालेली प्रत्येक मैफल भैरवीच्या टप्प्यावर येऊन थांबणार आहे. हे ठाऊक असले तरी भैरवीचे सूर कानावर आले की हुरहुर लागतेच. मित्रमंडळींबरोबर जमलेला गप्पांचा फड संपल्यावर, अजून बरेच काही बोलायचे राहिलेच की अशी चुटपुट चहाचे रिकामे, सुकलेले कप गोळा करता-करता वाटू लागते. मनातलं सगळं काही बोलून कधी होतच नाही आणि जे लिहिलं त्यापेक्षा बरंच लिहायचं बाकी आहे, असं वाटत राहातं. हा अपुरेपणाचा शाप वाहातच असतो आणि दर दिवशी नवा मुक्काम, नवा किनारा समोर येत असतो..
‘आम्ही साऱ्या’ सदरात लिहायचे होते ते आपल्या भोवतालच्या परिस्थितीत अनुकूल बदल घडावा यासाठी एकत्र येऊन पुढाकार घेणाऱ्या स्त्रियांविषयी. त्यांच्या त्या प्रयत्नांविषयी. या प्रवासाला दोन वाटा होत्या. एक, भोवतालच्या परिस्थितीतील, प्रगतीच्या वाटेत अडथळा आणणारा एखादा त्रासदायक घटक दूर करण्यासाठी एकत्रित येऊन लढणे आणि दुसरी, एकत्रितपणे उन्नतीच्या नव्या, आजवर न चोखाळलेल्या वाटांचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे. स्वत:चा आर्थिक, भौतिक (आणि अनेकदा बौद्धिकही!) विकास होण्यासाठी धडपड करण्याची एक अंत:प्रेरणा माणसात सहसा जन्मत:च असते. कारण या धडपडीला येणारी सुबत्तेची फळे तो समाजात बघत असतो. उन्नतीसाठी करावयाच्या या प्रयत्नात आपल्याखेरीज इतर चार-चौघांना सहभागी करून घेण्याचा विचार करणे सोपे नसते. त्यामुळे दुर्मीळही असते. या प्रवासातील यशापयशापेक्षा त्या वाटेवरील काल्पनिक अडथळेच आधी जीव घाबरा करतात. एकत्र काम करताना मला कोणी फसवील का? कामात इतरांनी अंगचोरपणा केला तर मलाच कामाचा बोजा वहावा लागेल का? मिळणाऱ्या फळापैकी माझ्याच ओंजळीत कमी वाटा पडला तर? आणि या सगळ्या धडपडीत पदरी शेवटी अपयशच आले तर? अशा कितीतरी प्रश्नांचे काटे प्रवास सुरू करण्यापूर्वीच कुचूकुचू टोचू लागतात आणि मग पावलं माघारीच्या दिशेने फिरतात.
शोध सुरू केल्यावर जे समोर येत गेले, दिसत गेले ते निव्वळ चकित करणारेच नव्हते तर अनेकदा गलबलून टाकणारे होते. एकत्रित प्रयत्नांची ही घट्ट, सर्जनशील मूठ बघताना काही महिन्यांपूर्वी इला भट यांच्याशी झालेल्या मुलाखतीतील संदर्भ सतत स्मरत होते. ‘सेवा’ या आपल्या संस्थेद्वारा गुजरातमधील घरेलू स्त्री कामगारांना आधी त्यांचे हक्क आणि मग आत्मसन्मान मिळवून देणाऱ्या इलाबेनच्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. स्त्रियांच्या एकत्रित कामाचा, पुढाकाराचा आणि त्यातून उभ्या राहणाऱ्या चळवळीचा अतिशय संपन्न असा अनुभव असणाऱ्या इलाबेन गप्पांच्या ओघात म्हणाल्या होत्या, ‘स्त्रीमध्ये जन्मत:च एक ‘सेन्स ऑफ टूगेदरनेस’ असतो. वो साथ देती है और निभाती भी है..’ कारण तिच्या विचारात फक्त ती स्वत: व तिचे कुटुंबच नसते. तिला सुरक्षितता देणारा समाज जसा तिच्या मनात असतो तसाच सगळ्यांचे पोषण करणारा निसर्गही तिच्या कृतज्ञताबुद्धीत असतो आणि त्यामुळे कोणताही आनंद, समृद्धी सगळ्यांबरोबर वाटून घेण्याची तिची वृत्ती असते.
वर्षभराच्या या प्रवासानं दिसले ते स्त्रीचं हेच विश्वरूप आणि ते सांभाळण्यासाठी तिला स्फुरलेल्या, अमलात आणलेल्या नव्या नव्या कल्पना. त्या कल्पनांमागे अनेकदा स्वत:चे व स्वत:च्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठीची मूलभूत प्रेरणा होती. भाडेपट्टीवर शेती घेऊन एकत्र कसणाऱ्या, एकत्र येऊन रेशन दुकान चालवणाऱ्या, भूकंपाच्या विनाशानंतर स्वत:ची घरे बांधत शेती कसून त्या शेतमालाची विक्री करणाऱ्या अशा प्रत्येक प्रयत्नांमागे होता. तो त्यांच्या व कुटुंबाचा अस्तित्वाचा प्रश्न! अस्तित्वाची ही लढाई लढताना प्रत्येकीने मार्ग निवडला तो पूर्वी कोणीतरी आखलेला नव्हता तर त्यावर त्या प्रत्येक गटाची कल्पक मुद्रा होती. एरवी, गावातील तळ्याचे व्यवस्थापन करण्याचा किंवा सगळ्यांनी मिळून गावाच्या नदीवर बांधण्याचा, पीक-पद्धतीत प्रयोग करण्याचा विचार त्यांच्या मनात झाला नसता! जगण्याच्या मूलभूत गरजा भागल्यावर ही एकत्र काम करण्याची स्त्रीमधील प्रेरणा मंदावते का? जे दिसलं ते या समजुतीला पाठबळ पुरवणारं नक्कीच नव्हतं.
पोट भरणं ही माणसाची जगण्याची एकमेव प्रेरणा नसतेच मुळी. त्यापुढे आणि पलीकडे असलेले आनंदाचे अनेक हिरवे मुक्काम मग त्याला खुणावू लागतात. नृत्य-गायन-वादन-चित्रकला अशांसारख्या अनेक कलांचा आनंद आणि त्या वाटेने जीवनाचा अर्थ शोधण्याची ओढही माणसाला असते. त्यासाठी एकत्र यावेसे वाटते हे जणू सिद्ध करण्यासाठीच काही स्त्रिया भेटल्या. एकत्रितपणे कलापूर्ण वस्तू निर्माण करणारा, तशाच सेवा देणारा नागपूरचा ‘मोहक’ गट, नाशिकचा लाखी गट, संशोधन-वाचन, लेखन या क्षेत्रात खूप लांबवरचा पल्ला गाठणाऱ्या पुण्याच्या साहित्यप्रेमी भगिनी यांच्याशी बोलताना ‘माणूस एक सामाजिक प्राणी आहे’ हा शालेय अभ्यासक्रमात शिकायला मिळालेला धडा नव्याने उलगडू लागला. परमार्थाच्या ज्या वाटेवरील प्रवास प्रत्येकाला एकटय़ानेच करायचा असतो. त्या वाटेवरील पहिले धडे एकत्रितपणे गिरवत शहाण्या होऊ बघणाऱ्या मैत्रिणी भेटल्या तेव्हा तर एकमेकींना आयुष्याचा तोल सांभाळायला शिकवणाऱ्या एका वेगळ्या स्त्री रूपाचे दर्शन झाले.
स्वत:च्या कुटुंबाचा परीघ असा व्यापक करीत समाजाच्या सीमेपर्यंत नेण्याच्या या प्रयत्नात नेहमी सगळे काही छान आणि आलबेलच नसते. खूप तडजोडी असतात, सतत न्यायाधीश होऊन निर्णय देण्याचा मोह आवरावा लागतो. अशा वेळी या स्त्रियांना कोणते सूत्र उपयोगी पडले? ‘आयुष्यात समोर येणाऱ्या प्रत्येक घटनेच्या केंद्रस्थानी नेहमी मीच असले पाहिजे असा आग्रह धरून चालत नाही. प्रत्येक भूमिकेत माझे स्थान वेगवेगळ्या पायरीवर असते,’ असे लाखी गटाची राधिका ते सूत्र नेमके चिमटीत पकडताना म्हणाली होती.
या लेखनाने आणखी एक आनंद दिला तो दोन दूरस्थ पण परस्परसंबंधित बिंदू एकत्र जोडण्याचा. स्किझोफ्रेनियासारख्या मानसिक विकाराने ग्रस्त शुभार्थीसोबत काम करणाऱ्या ठाण्यातील ‘त्रिदल’ या गटाविषयी लिहिल्यावर जे ई-मेल्स आले त्यात ‘मला मदतीची गरज आहे’ असे खुलेपणाने सांगणारे शुभार्थी होते आणि ‘माझा एक मित्र त्याच्या पत्नीसाठी मदत शोधतोय त्याला मदत करा, असे सांगणारी त्या माणसाची जिवाभावाची मैत्रीणही भेटली. घराच्या गच्चीवर शेती करू इच्छिणारे, चित्रकला पुन्हा नव्याने सुरू करण्याची स्वप्न बघणारे, दासबोध वाचनाने जीवनाच्या धांदलीत शांतता मिळवू पाहणारे असे सगळे त्या छोटय़ाशा मेल बॉक्सच्या माध्यमातून भेटत राहिले. माध्यमं ही दोन टोकांमध्ये दुवा साधण्याचे, पूल बांधण्याचे काम करतात या विधानाचा साक्षात प्रत्यय देणारे हे अनुभव होते.
 पत्रकारिता सहसा ‘स्कीन डीप’ जाते असे म्हणतात आणि इतपतच खोलवर जाणाऱ्या पत्रकारितेतून दिसणारे जग सहसा भ्रष्ट, स्त्रीच्या फक्त देहाकडे-देहापुरते बघणारे, निसर्गाला अमानुषपणे ओरबाडणारे असेच असते. पण थोडी अधिक खोलवर लेखणी नेली तर जगणं अधिक सुंदर करू बघणाऱ्या व त्यासाठी धडपडणाऱ्या प्रयत्नांचे जिवंत झरे भेटतात. हे झरे अगदी छोटे असतील, पण मोठे होण्याची क्षमता, जोम त्यांच्यात आहे. या झऱ्यांमुळे आपल्या कोमेजलेल्या मनांना टवटवी येते. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातील ठिपक्याएवढय़ा पेडणेकरवाडीत, आंध्रमधील एखाद्या गावातील दलित वस्तीत किंवा मुंबईतील बकाल जगण्यात टिकून राहणारे हे झरे एकत्र आणले तर आजचे, विषण्ण करणारे समाज स्वरूप बदलेल का? असे म्हणणे आज कदाचित भाबडा आशावाद ठरले. पण या प्रयत्नांना बळ देणं, ती धडपड समाजापुढे आणणं यातून अशा नव्या प्रयत्नांना नक्कीच उमेद मिळेल. अनेक नव्या वातींना प्रकाश मिळेल. माध्यमांत सवंगतेची जणू स्पर्धा लागली असताना जीवनातील काही मौलिक टिपण्याची आणि टिकवण्याची ही धडपड; खरेतर मर्ढेकरांच्याच शब्दात नेमकेपणाने त्याचे वर्णन करता येईल, ‘अजून येतो वास फुलांना..’    
    (समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 7:19 am

Web Title: fragrance of flowers
Next Stories
1 दुर्घटनेतून उभा राहिला विधायक प्रकल्प
2 हिरव्या वाटेवरचे हिरवे उत्तर
3 शुभार्थीची यशस्वी वाटचाल
Just Now!
X