News Flash

..आणि गुलामगिरीतून सुटका झाली

तीस वर्षे एकाच घरात गुलामगिरीचं आयुष्य जगणाऱ्या लंडनमधल्या त्या तिघींची अखेर सुटका झाली ती ‘फ्रीडम चॅरिटी’मुळे. भारतीय वंशाच्या अनिता प्रेम

| December 21, 2013 08:07 am

तीस वर्षे एकाच घरात गुलामगिरीचं आयुष्य जगणाऱ्या लंडनमधल्या त्या तिघींची अखेर सुटका झाली ती ‘फ्रीडम चॅरिटी’मुळे. भारतीय वंशाच्या अनिता प्रेम यांनी यात महत्त्वाची कामगिरी केली. मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालंय ते भारतातील गुलामगिरीचं भयावह चित्र. लैंगिक शोषण, मजुरी आणि अवयव विक्रीच्या निमित्ताने पळवल्या जाणाऱ्या, त्यांना गुलामगिरीत ठेवणाऱ्या व्यक्तींची संख्या भारतात सर्वाधिक असल्याचं दिसून आलं आहे.
ऑक्टोबर १८, २०१३चा तो एक सर्वसाधारण दिवस. ‘फ्रीडम चॅरिटी’ या महिला व मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या लंडनमधील संघटनेच्या कार्यालयातला फोन खणखणला!  पलीकडून एका महिलेचा क्षीण आवाज ऐकू आला. तिने जे काही सांगितले त्याने ‘फ्रीडम चॅरिटी’च्याच नव्हे तर स्कॉटलंड यार्ड्स या जगातील सर्वाधिक कार्यक्षम मानल्या गेलेल्या पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांचीही झोप उडाली!
‘दक्षिण लंडनमधील एका घरात आम्हाला गेल्या तीस वर्षांपासून बंदिवासात ठेवले गेले आहे. तुम्ही आमची सुटका कराल,’ क्षीण आवाजात त्या स्त्रीने विनंती केली आणि पुढील घटनाक्रम अगदी भरभर पुढे सरकला! ब्रिटिश सरकारचे स्कॉटलंड यार्ड्स, त्यांचे ‘वूमन ट्राफिकिंग’ युनिट आणि ‘फ्रीडम चॅरिटी’चे कार्यकत्रे यांनी मिळून अतिशय योजनाबद्ध पद्धतीने हेपेकफोर्ड प्लेस, लंडन येथील सुटका ’ऑपरेशन’ पार पाडले आणि तीन स्त्रियांची तीस वर्षांच्या बंदिवासातून मुक्तता झाली!
सबंध आयुष्यापकी तीस वष्रे इतका मोठा काळ कोणी गुलामीत काढला असू शकतो ही कल्पना ३०० ते ४०० वर्षांपूर्वीची असेल असे वाटू शकते. पण एकविसाव्या शतकातल्या जगातही असं घडू शकतं, हे अविश्वसनीय. लंडनच्या पश्चिमेकडील भागात राहणाऱ्या एका वृद्ध जोडप्याने तीन जणींना गेल्या तीस वर्षांपासून गुलाम म्हणून आपल्या घरात ठेवले होते. गेल्याच आठवडय़ात त्यांची मुक्तता करण्यात आली. या तीन महिलांपकी एक ब्रिटिश, एक आयरिश तर एक मलेशियन आहे. या महिलांचे वय अनुक्रमे ३०, ५७, ६९ असे आहे.
‘‘आतापर्यंत आम्ही दहा वष्रे गुलामीच्या केसेस पाहिल्या आहेत, पण सर्वात भयंकर आणि पोलिसांच्या रेकॉर्डवर कधीही न बघितलेली अशी ही केस आहे.’’ असे स्कॉटलंड यार्डच्या ‘वूमन ट्राफिकिंग’ युनिटचे डिटेक्टिव्ह निरीक्षक केविन हायलंड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आरोपी जोडपे हे ब्रिटिश नागरिक असल्याचे बोलले जात असले तरीही त्याची पुष्टी झालेली नाही. तसेच या जोडप्याला १९७० साली एकदा कैद झाली होती असेही निदर्शनास आले आहे. इतका घृणास्पद गुन्हा करणाऱ्या या जोडप्याला जामीन मिळाला असून जानेवारी महिन्यात पुढील चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले गेलेत. या जामीन प्रकरणामुळे लंडनमधील वातावरण तापत चालले असून सर्वत्र याबद्दल संताप व्यक्त होत आहे. कामार मौतुम नावाच्या एका मलेशियन स्त्रीने दैनिक टेलिग्राफला दिलेल्या माहितीनुसार, या स्त्रियांमधली सर्वात ज्येष्ठ मलेशियन महिला ही तिची बहीण असून तिचे नाव आयेशा आहे! आयेशा आणि तिचा नियोजित पती ओमर मुनीर हे दोघे ब्रिटनमध्ये पुढील शिक्षण घेऊन तिथेच स्थायिक होण्याच्या उद्देशाने १९६८ साली गेले होते. सामाजिक अस्वस्थतेच्या काळात ते व्हिएतनाम संघर्षांच्या संबंधातील निदर्शनांमध्ये भाग घेऊ लागले होते. दरम्यान ‘मलेशियन अॅण्ड सिंगापोर स्टुडंट फोरम’ या संघटनेकडे आयेशा ओढली गेली. या संघटनेची ख्याती अतिरेकी संघटना अशी होती. या संघटनेचा म्होरक्या व त्याची जोडीदार म्हणजेच हे आरोपी जोडपे असल्याचा दावा मौतुम यांनी केला आहे. आपल्या कुटुंबीयांना आयेशाचे अशा संघटनेशी असलेले लागेबांधे मंजूर नव्हते आणि म्हणून आम्हा कुटुंबीयांचा तिच्याशी कित्येक दशकांपासून काहीच संपर्क नव्हता असेही मौतुम यांनी सांगितले. तसेच आपल्या बहिणीच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेण्याची इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली आहे!
आयेशा आणि म्होरक्याचे असलेले प्रेमसंबंध आणि त्यातून आयेशाला बंदिस्त करण्याची शक्यता यात दिसून येते! या तिघींपकी ३० वष्रे वयाची महिला ही ५७ वष्रे वय असलेल्या आयरिश महिलेची व आरोपी जोडप्यातील पुरुषापासून झालेली मुलगी आहे, असेही काहींचे म्हणणे आहे. आपल्या संबंधातील गुप्तता जगासमोर उघड होऊ नये म्हणून यांना सतत गुलाम म्हणून ठेवले गेले असावे असाही कयास लावला जातो आहे. या तीन महिला आरोपी जोडप्याकडे केव्हापासून आणि कशा आल्या होत्या याबाबत कुठलाच खुलासा यार्ड्सकडून अजून तरी केला गेलेला नाही. या महिलांना सतत बंदिवासात ठेवले जात होते. कधी बाहेर पडल्या तरीही त्यांच्यावर सतत पाळत ठेवली जात असे. त्यांच्यासाठी एक स्वतंत्र खोली होती तिथेच फक्त त्यांना मोकळेपणाने वावरण्याची मुभा होती! या महिलांना सतत मारहाण मात्र केली गेली असल्याचे दिसून आले.
एक ६७ वष्रे वयाचे वृद्ध जोडपे एका तरुण, एका मध्यमवयीन आणि एका वृद्ध महिलेला मारहाण कसे करू शकते आणि गुलाम म्हणून आपल्याजवळ ठेवू शकते याबद्दल इंग्लंडमध्ये मानसशास्त्रज्ञांचे विविध प्रमेय, सिद्धांत पुढे येऊ लागले आहेत. या महिलांपकी कोणीच कसे याबद्दल कुठे बोलले नाही याबद्दलही आश्चर्य व्यक्त होते आहे.
‘‘सतत जर मारहाण केली गेली असेल तर दहशतीला बळी पडून अशी माणसे विद्रोह करण्याची मानसिकताच गमावून बसतात. त्याचप्रमाणे दीर्घकाळ म्हणजे अगदी सात-आठ वर्षे जरी अशा गुलामीच्या वातावरणात जर काढली गेली असतील तर सुटका झाल्यानंतरही या व्यक्ती लवकरच आपल्या पूर्वीच्याच गुलामीकडे पुन्हा वळतात. कारण त्यांच्या बंदिवासाच्या काळात बाहेरचे जग पूर्णपणे बदलून गेलेले असते. त्यांना जगण्यासाठी उपजीविका शोधणेही कठीण होऊन जाते. समाजामध्ये त्यांना कोणी स्वीकारत नाही. त्यांना मग आपले गुलामीतले पूर्वायुष्यच अधिक सुरक्षित वाटते,’’ असे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
ब्रिटिश सरकारकडे चच्रेला आलेले ’मॉडर्न डे स्लेव्हरी बिल’ संसदेत पास होणे आणि अशी घटना लंडनमध्ये त्याच दिवशी उघडकीस येणे हा निव्वळ योगायोग असेलही पण ब्रिटिश सरकारसाठी संबंधित कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी भाग पाडणारा नक्कीच आहे.
या महिलांची सुटका होण्यामागे ज्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींचा हात होता त्यापकी अनिता प्रेम यांचे नाव पुढे येते! ‘फ्रीडम चॅरिटी’ या लंडनस्थित संघटनेच्या संस्थापक असलेल्या अनिता प्रेम यांची ही संघटना बळजबरीने विवाह करून आणलेल्या पीडित महिला, तसेच बाल कामगार इत्यादींसाठी काम करते. ‘ऑनर क्राइम्स’ किंवा कुटुंबाच्या अब्रूपायी केले जाणारे गुन्हे हे इंग्लंडमध्येही लक्षणीय स्वरूपात घडत आहेत. या प्रकरणां मधल्या बळींसाठी व शोषित पीडितांसाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठीदेखील ‘फ्रीडम चॅरिटी’ काम करते.
अनिता प्रेम या भारतीय वंशाच्या असून आता ब्रिटिश नागरिक आहेत. मॅजिस्ट्रेट असलेल्या अनिता प्रेम यांनी वूमन ट्राफिकिंग आणि गुलामगिरीसंबंधित ‘बट इटस नॉट फेअर’ नावाचे एक पुस्तकदेखील लिहिले आहे!
‘‘या घटनेच्या मीडियामधील चच्रेनंतर आमच्याकडे मुक्ततेसाठी येणाऱ्या फोन कॉल्समध्ये चौपटीने वाढ झाली आहे. हे चित्र वरकरणी बरे वाटत असले तरी इतक्या प्रगत म्हणवणाऱ्या आपल्या देशात आणि समाजात गुलामीची पाळेमुळे अजूनही किती घट्ट रुजून आहेत आणि त्याहीपेक्षा ती अदृश्य आहेत हे अधिक खेदजनक आहे’’, असे अनिता सांगतात.
‘या तिघींपकी सर्वात लहान असलेल्या स्त्रीने आमच्या संघटनेविषयीचा एक कार्यक्रम टीव्हीवर पाहिला आणि नंतर आम्हाला संपर्क करून आपल्या सुटकेची विनवणी केली’, असे त्यांनी सांगितले.
लंडनमधल्या एका अगदी साधारणश: भागातील एका सामान्य घरात इतके काही भयंकर वर्षांनुवष्रे घडत राहते आणि शेजारपाजाऱ्यांना याची साधी कुणकुणही लागू नये याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण इतके व्यस्त होत चाललो आहे की अगदी शेजारी काय घडते आहे याची पुसटशीही कल्पना आपल्याला येऊ नये हे आपल्या अत्याधुनिक संस्कृतीचे फार मोठे वैगुण्य आहे असेही त्यांनी नमूद केले.
‘वॉक फ्री फाऊंडेशन’ने केलेल्या ‘ग्लोबल स्लेव्हारी इंडेक्स’ २०१३च्या पाहणीनुसार जगभरात सुमारे तीस दशलक्ष माणसे गुलामीचे जीवन जगत आहेत. सर्वात चिंतेची बाब ही की यात भारताचा क्रमांक पहिला असून (१४ दशलक्ष), चीन (२.४ दशलक्ष) आणि तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान (२.१ दशलक्ष) एवढे गुलामीचे प्रमाण आहे. यानंतर मग नायजेरिया, इथिओपिया, थायलंड, रशिया, ब्रह्मदेश, बांगलादेश इ. नावे आहेत.
भारतातील गुलामीच्या अनेक घटना आपण अधूनमधून वाचतो किंवा पाहतो, पण आपण इथे पहिल्या क्रमांकावर आहोत ही डोळे उघडणारी बाब आहे. गुलामीसाठी किंवा व्यापारासाठी पळवून आणलेल्या व्यक्तींना लंगिक शोषणासाठी अधिक वापरले जाते. त्या खालोखाल बालकामगार, मजूर, किडनी किंवा इतर देह अवयव व्यापार यासाठीही वापरले जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. घटना इंग्लंडमध्ये घडली असली तरी तेथील गुलामगिरीतील लोकांचं पुनर्वसन करण्याच्या कामात भारतीय वंशाच्या एका स्त्रीचा हातभार लागला आहे ही त्यातल्या त्यात सुखद बाब असली तरी त्यानिमित्ताने भारतातल्या गुलामगिरीचं चित्र पुन्हा एकदा समोर येत आहे आणि त्यावर खूप गंभीरपणे काम करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
हेल्पलाइन क्रमांक
पळवून आणल्या गेलेल्या, गुलामीतून सुटका हवी असणाऱ्या व्यक्तींसाठी अथवा त्यांना मदत करू इच्छिणाऱ्यांसाठी हेल्पलाइन भारतातही उपलब्ध आहे.   ०११-३१९०९०२५
०११-३१९०९०२६

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 8:07 am

Web Title: free from slavery
Next Stories
1 ‘घुंगटा’कडून राजसत्तेकडे
2 आरोग्यशील स्त्री सामर्थ्य
3 परी पुतळारूपी उरावे!
Just Now!
X