उमा बापट

umaajitbapat@gmail.com

नि:शंक मनाने एकमेकांचं ऐकून घेत आपण विचारांची देवाणघेवाण करत असतो. आपण मुलांना आणि समाजाला काही ‘देणं’ लागतो. ते अटींमध्ये हातचं राखून ठेवलेलं ‘देणं’ नसतं. लालसेमध्ये न अडकता योग्य ते आपल्या परीने देत राहणं ही पालकत्वातील सतत चालणारी प्रक्रिया आहे. पालकांनी आणि शिक्षकांनी इतरांना नि:स्पृहपणे हे ‘देणं’ देताना मुलांनी बघितलेलं असणं हा खोलवरचा संस्कार असतो. मुलांच्या अवाजवी अपेक्षा आणि स्वकेंद्रीपणा, अपेक्षाभंगातून येणारी नाराजी, हळूहळू तयार होणारी आक्रमकता या भोवऱ्यात फिरायचे नसेल तर मुलांनी आपणहून ‘देणं’ अनुभवायला हवं.

एका जंगलात एक सिंह राहत होता. त्याच्या छाव्याला म्हणजेच सिंहुल्याला गर्जना करता यावी अशी त्याची फार इच्छा होती. सिंहुल्याला गर्जना शिकवायला तो आतुर झाला होता. खूप प्रयत्न करूनही सिंहुल्या काही गर्जना शिकेना म्हणून सिंहाला वाटलं, जंगलातल्या चांगल्या शिक्षकांची शिकवणी लावू या. त्याने आपल्या सिंहुल्याला कोल्हेगुरुजी, हत्तीदादा अशा बऱ्याच शिक्षकांकडे पाठवलं. पण तरीही सिंहुल्या गर्जना करत नव्हता. एके दिवशी सिंहुल्या त्याच्या मित्रांबरोबर खेळत होता. तेवढय़ात त्यांना बंदूकधारी शिकारी दिसले. मित्रांनी सिंहुल्याला सांगितलं, ‘आता जोरात गर्जना कर, किंवा जीव खाऊन पळ नाही तर आपलं काही खरं नाही.’ आणि सिंहुल्याने जोरदार गर्जना केली.

लहान मुलांसाठीच्या पुस्तकातली ही गोष्ट आहे. पण मी अनेकदा ही गोष्ट पालकांना सांगते. जंगलाचा राजा सिंह एक ‘बाबा’ म्हणून उतावीळ होतो, आपला मुलगा आपण शिकवलेलं  शिकला नाही असा समज करून घेतो. कधी हिंमतही हारतो.. आपण शिकवलेलं लगेच जेव्हा मुलांच्या वागण्यात उतरलेलं दिसत नाही, त्यांच्या बक्षिसांनी किंवा मिळवलेल्या गुणांमधून उठून दिसत नाही तेव्हा ‘मी इतकं केल्याचा काही उपयोग नाही’ असं  काही पालकांना वाटू शकतं.  इन्स्टंटच्या जमान्यात, आपण व्हाट्स अ‍ॅपवर पाठवलेला निरोप बघितल्याच्या खात्री देणाऱ्या खुणा, पाठवलेलं ईमेल त्यांनी पाहिलं आहे का याचा अंदाज बांधण्याची उपलब्ध योजना आदी साधनांच्या भोवती आपला वावर आहे. अनेकांच्या नकळत ‘आत्ताच्या आत्ता’ या मनोवृत्तीचा पगडाही जीवनशैलीवर आहे. या पार्श्वभूमीवर पालक म्हणून ‘नि:स्पृह ‘देणं’  हे सहजी घडणं अवघड होऊन बसलं आहे. ‘कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन.’ पासून ‘यातून मला काय मिळणार’ हे पदोपदी भडिमार करणाऱ्या जगतात आपण येऊन पोहोचलो आहोत. पालक-मूल नात्याची तरी यातून कशी सुटका होणार?

हेलन केलर यांना शिकवणाऱ्या त्यांच्या शिक्षिका अ‍ॅन सलीव्हन यांनी ऐकू न येऊ शकणाऱ्या आणि डोळयाने दिसू न शिकणाऱ्या मुलीला शिकवताना आपल्या विद्यार्थिनीला शिकवू ते लगेच समजेल अशी अपेक्षा कधी ठेवली असेल का? त्यांनी शिकवलेल्या पद्धतीने हेलनला जमलं नाही म्हणून त्यांनी शिकवणं थांबवलं तरी होतं का? अ‍ॅन सारख्या शिक्षकांशिवाय हेलन शिकू शकली असती का? कधी काही न उमगल्याने हेलन वैतागली तरी तिला अनुभवातून शिकवण्याचं ‘देणं’ अ‍ॅन यांनी चालूच ठेवलं होतं. हातावर पाणी पडताना तळहातावर ‘वॉटर’ या शब्दाचं  एक एक अक्षर त्यांनी हेलनला स्पर्शातून अनुभवू दिलं. हा प्रसंग हेलन केलरची शिकण्याची एक नवी सुरुवात होती आणि एका परीने तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो अनुभव ठरला. ताबडतोब मुलामध्ये काही बदल दिसण्याची अपेक्षा न करता योग्य ते विश्वासपूर्वक देत राहणं हे किती महत्त्वाचं असतं हे यावरून लक्षात घ्यायला हवं. शिक्षक, पालकांनी हे नित्य स्मरू या. शारीरिक, बौद्धिक कमतरतांवर मात करत मुलांतले सुप्त गुण शोधायचं ‘देणं’ अनेक पालक आपल्या मुलांसाठी करत आले आहेत. ‘यलो’ चित्रपटात आपण अशी आई पाहिली आहे ते आठवेल. या चित्रपटातील आई आपल्या मुलीतील पोहण्याचे कौशल्य ओळखू शकते, ते वाढवायला मदत करू शकते.

अगदी घराघरात, रोजच्या जगण्यात असं किती तरी ‘देणं’ पालक मुलांना देत असतात.  मूल लहान असताना त्याला एक-एक घास भरवण्यापासून सुरुवात होते. मग जेवताना पोळीचे तुकडे करून देतो, ‘तू स्वत:च्या हाताने खा, मी आहे तुझ्याबरोबर.’ असं म्हणत एकीकडे गोष्ट सांगत मुलाजवळ बसणं असा टप्पा येतो. त्यानंतर काही दिवसांनी मूल पोळीचे तुकडे स्वत: करू शकतं. जेवायला भरवावं लागत नाही म्हणून जेवताना पालकांची आवश्यकता उरत नाही असं समजायचं? की एकत्र जेवणं हा पालक-मुलांच्या देवाण-घेवाणीचा अनमोल ठेवा मानायचा?  मुलांनी खावं म्हणून नाना युक्त्या करणारा आईवर्ग सर्वत्र बघायला मिळतो. काही बाबाही खास ‘बाबा-शैलीत’ मुलांना भरवण्याचे अथक परिश्रम आपणहून करत असतात. ऋचाचा बाबा पोळीच्या मधोमध दोन भाग करायचा आणि त्या जागी दोन डोळे बनायचा. एक एक घास देत ‘स्माइली फेस’ पोळी खाता खाता तयार व्हायचा. नि पोळी कधी आणि कशी संपायची कळायचं तर नाहीच शिवाय पोळीत रोज नवीन चित्र बनायचं. वर वर पाहता फक्त जेवण भरवण्याचं ‘देणं’ होतं  का हे? कोणत्याही गोष्टीतली कलात्मकता, दुसऱ्याला रुचेल असं त्याच्या पोटात कसं  शिरायचं? आपल्याजवळ जे आहे त्यातून काय निर्माण होऊ शकतं याचा शोध घेणं, अशा किती तरी खोल संस्कारांचं ‘देणं’ होते ते., एक पोळी अख्खी संपवणं ही इतकी कंटाळवाणी, कष्टदायी गोष्ट असं जरी ऋचाला त्या वयात वाटलं असलं तरी ते जबरदस्तीचं न वाटता खेळीमेळीचं कसं होईल हे बाबाच्या मनापासून ‘देण्याने’ सहज जमू शकलं. ऋचाच्या जेवणाचे अनुभव केवळ गमतीचे नाही तर त्यापलीकडे  बाबाबरोबरच्या नात्याचं  खास ‘देणं’ तिला लहानपणापासून लाभलं. मग ऋचा मोठी होत गेली तरी एकत्र जेवणं आणि त्या ओघात बाबाचं ‘देणं’ चालूच राहिलं. कधी अवघड गणितं सोडवण्याचं तंत्र या अभ्यासू वृत्तीचं ‘देणं’ तर कधी कोणते निर्णय घ्यायची वेळ आली तर आपले प्राधान्य काय या मूल्यांचं ‘देणं’ बाबा अगदी सहज देत राहिला.

पालक मुलांना काय आणि किती देतात यात बरीच विविधता आजूबाजूला दिसते. ‘तू पोळीबरोबर भाजी संपवलीस तर मी तुला ‘कार्टून’ बघू देईन.’ ‘तू गृहपाठ कर मी गणवेशाला इस्त्री करून देते.’ ‘ तुझा स्पर्धेचा निबंध लिहून तयार आहे.’ ते ‘दोन मुलांसाठी दोन स्वतंत्र घरं घेऊन ठेवतोय’ इथपर्यंत अनेक पालक आपल्या मुलांसाठी काहीना काही करून ठेवत असतात. पुन्हा एकवार विचार करूया. आपल्याला मुलांना पालक, शिक्षक, समाज म्हणून नेमकं काय द्यायचं आहे? शेल सिल्व्हरस्टेन यांचं प्रसिद्ध पुस्तक ‘द गिव्हिंग ट्री’. हे देणारं झाड छोटय़ा वयातल्या मुलापासून ते मूल म्हातारं होईपर्यंत, पारब्यांना लटकण्यापासून ते बुंध्यावर नुसतं विसावण्यापर्यंत देतच रहातं. भारतीय पालकत्व हे असं  चिर-पालकत्व असतं. पण याचा अर्थ असा नाही की मुलांसाठी एटीएम बनावं. निरंतर ‘देणं’  हे परस्पर विश्वासाचं, डोळस प्रेमाचं आणि शाश्वत मूल्यांचं नक्की असू शकतं.

असं ‘ मूल्य-धन ’ मुलांना देण्यासाठी कायम एकमेकांसाठी वेळ हवा. अमुक वेळेत अमूक मिळायलाच हवं. यापलीकडे मला कितीही वेळ आणि कितीही वेळा देत राहावं लागलं तरी मी अनेक सुयोग्य शिकवणींचं ‘देणं’  देत राहीन यावर गाढ श्रद्धा हवी.

आठवून पाहू मी हार न खाता एक गोष्ट सातत्याने केल्याने माझ्या घराला कोणती चांगली सवय लागली?

एखादी गोष्ट शिकवून झाल्यावर ती चुकतमाकत करून बघायला मी मुलाला पुरेसा अवधी दिला. त्यामुळे मूल एखादं कौशल्य चांगल्या उंचीला, टोकापर्यंत नेऊ शकलं. अशी कोणती आठवण सांगता येईल?

‘जर-तू असं केलंस तर मी तुला असं देईन.’ असा आशय सोडून या आठवडय़ात मी मुला-मुलीशी कितीदा बोलू शकले?

लहानपणापासून स्वत:ला काही मिळणार नसताना दुसऱ्याला ‘देणं’ ही घराची संस्कृती असेल तर मुलं ही ‘देणारी’ होतात. आपण देणारे आहोत हा आविर्भाव कणमात्र न ठेवता ती देत राहतात हे जास्त महत्त्वाचे. घराजवळ बांधकामाचं काम चालू होतं  म्हणून स्वत:हून तिथल्या छोटय़ा मुलांना आपले कपडे देणारा एखादा रोहन तुम्हा आम्हा सर्वाच्याच आसपास दिसतो. शाळेत समुपदेशकला भेटून आपला प्रश्न सुकर झाला या अनुभवातून गेल्यावर कोणा मत्रिणीचा प्रश्न स्वत: ओळखून स्वत:च्या परीने तिला समजवणारी तर कधी तिला पहिल्यांदा समुपदेशकाकडे घेऊन येणारी सारा मला आठवते.

२०२० च्या दशकात सेकंदा-सेकंदावर बेतलेला गतिमान काळ असला तरी रोपाला मुळं धरायला काही अवधी तर लागतो ना, मनुष्याचा जन्म व्हायला साधारण नऊ महिने अजून तरी लागत आहेतच ना? म्हणून काय रोप किंवा शरीर नुसतेच घाई-घाईने सगळी पोषण सत्त्वं देऊन टाकत आहेत का? का एक दिवस वाढ दिसली, जाणवली नाही तर पोषण मूल्यं द्यायचं थांबवत आहेत? नाराजी व्यक्त करत आहेत? ‘देणं’  हे मनुष्यात कमी अधिक प्रमाणात पण नैसर्गिक आहे. सामाजिक मानसशास्त्रात ‘आल्टरूईझम’ या संकल्पनेतून ते अभ्यासलं जातं. मेंदूच्या रचनेत आणि कार्यात नि:स्पृह ‘देणं’  यासाठीही काही यंत्रणा आहे जणू

‘द सायन्स बिहाइंड पॉवर ऑफ गिव्हिंग’ किंवा माणसं निरपेक्षपणे मदत का करतात अशासारख्या विषयांवर मानसशास्त्रात संशोधन चालू असतं. नि:स्पृहतेने देण्याचे मनस्वास्थ्यावर विधायक परिणाम होतात, असं अभ्यासातून दिसलेलं आहे. काही लोकांना नि:स्पृह देण्यातही समाधान असतं. सकारात्मक देण्याने आपल्यातली सकारात्मकता आपण अपेक्षा न ठेवताही वाढू शकते. निरागसतेची एकेक काडी वेचू या, निखळ अनुभवांची कडी निखळणार नाही, असं जगू या.

रोजच्या धकाधकीतही निवांत रमता येईल एवढी वेळेची श्रीमंती बाळगू या. एकमेकांना नि:शंक ‘ऐकू या’. निरामय घरटय़ासाठी हे नि:स्पृह ‘देणं’ देऊ या..