News Flash

छोटे संघर्ष मोठे परिणाम

स्वातंत्र्यलढय़ातील सहभागामुळे स्त्रियांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. राजकीय- सामाजिक प्रश्नांचे भान येऊ लागले होते.

| February 28, 2015 01:01 am

स्वातंत्र्यलढय़ातील सहभागामुळे स्त्रियांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. राजकीय- सामाजिक प्रश्नांचे भान येऊ लागले होते. त्याचे दृश्य परिणाम दिसू लागले. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले. विधवा-विवाहांना उत्तेजन मिळाले. स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल एका निश्चित दिशेने सुरू झाली.
विज्ञान क्षेत्रात संशोधन करू इच्छिणाऱ्या एका तरुण स्त्रीने बंगळुरूमधील एका रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये अर्ज केला. आत्तापर्यंत कोणाही स्त्रीला इथे प्रवेश दिला नव्हता, म्हणून तिलाही प्रवेश नाकारण्यात आला; पण प्रवेश मिळाला नाही म्हणून गप्पा बसणारी ही मुलगी नव्हती. इन्स्टिटय़ूटचे तेव्हाचे डायरेक्टर ‘रामन् इफेक्ट’चा शोध लावून नोबेल पारितोषिक मिळवणारे सर सी.व्ही. रामन् यांना प्रत्यक्ष भेटून गळ घालावी म्हणून ती वडिलांना बरोबर घेऊन त्यांना जाऊन भेटली. ‘शास्त्रीय संशोधन हा मुळी स्त्रियांचा प्रांतच नाही अन् इथे मुलींना प्रवेश दिला तर मुलांचे अभ्यासातून लक्ष उडेल? असा युक्तिवाद करून रामन् यांनी तिची विनंती धुडकावून लावली. ‘तुमच्या संस्थेत प्रवेशासाठी लागणारी सर्व अर्हता माझ्याकडे आहे. असे असूनही तुम्ही मला केवळ मी बाई आहे म्हणून प्रवेश नाकारत असलात तर मी अजिबात परत जाणार नाही. इथेच तुमच्या दाराशी गांधीजींच्या मार्गाने सत्याग्रह करत बसेन,’ असे तेजस्वी उत्तर तिने दिले आणि प्रवेश मिळवला. ही बाणेदार मुलगी म्हणजे केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला संशोधक डॉ. कमला सोहोनी होय.
गांधीजींचे सत्यासाठी लढा देण्याचे शस्त्र स्त्रियांनी रोजच्या व्यवहारात कसे वापरले याचे हे मूर्तिमंत उदाहरण. अहिंसेचे तत्त्वसुद्धा महात्मा गांधीजी कस्तुरबांकडून शिकले हे आपल्याला माहीत नसते. डरबनमध्ये गांधीजी राहात होते, तेव्हा त्यांच्याबरोबर ख्रिस्ती, मद्रासी, गुजराती वगैरे अनेक प्रकारचे लोक असत. खोलीत लघवीसाठी मोरीऐवजी एक भांडे असे. ते उचलण्याचे काम एक दिवस कस्तुरबांकडे आले, तेव्हा त्यांच्या डोळय़ांत पाणी आले. ‘‘असली धुसफुस माझ्या घरात चालणार नाही,’’ असे गांधींनी त्यांना बजावले. तेव्हा चिडून ‘‘मग तुमचे घर तुमच्यापाशीच ठेवा. ही मी चालले,’’ असे कस्तुरबा म्हणाल्या, तेव्हा तरुण गांधींनी हात ओढून बाहेर नेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. सात्त्विक संतापाने रडत कस्तुरबा म्हणाल्या, ‘‘तुम्हाला एक लाज नाही. मला आहे. मी बाहेर पडून जाणार कुठे? इथे आईबाप थोडेच आहेत? आणि त्यांच्याकडे तरी का जाऊ? मी बायको पडले, तुम्ही घाल त्या लाथा मला खाल्ल्या पाहिजेत..’’
ही घटना १८९८ची. गांधीजी नेहमीच आपल्या पत्नीवर स्वामित्व गाजवत; पण कस्तुरबा सारे सहन करत. त्यांनी कधीही गांधींचा अपमान वा मानहानी केली नाही. ही सोशिक, सहनशील वृत्तीच स्त्रीची मोठी शक्ती आहे हे गांधीजींच्या लक्षात आले व त्यातूनच अहिंसात्मक प्रतिकाराचे शस्त्र त्यांनी आपल्या लढय़ात फार प्रभावीपणे वापरले.
गांधीजींच्या आवाहनानुसार स्वातंत्र्यलढय़ात स्त्रियांचा जो सहभाग वाढला त्याचा परिणाम म्हणजे स्त्रियांमध्ये वाढीला लागलेली राजकीय जाणीव आणि सामाजिक प्रश्नांचे त्यांना आलेले भान. सर्व वर्गातील आणि थरांतील स्त्रियांनी आपापल्या परीने या लढय़ात भाग घेतला. दारोदार जाऊन कपडे, देणग्या गोळा केल्या. स्वत:ला अटक करवून घेतली. दूरदूरवरच्या तुरुंगांत त्या भरती झाल्या. जाणवावेत असे बदल स्त्रियांच्या चळवळीतील सहभागाने निर्माण केले. स्त्रियांचे शिक्षण आणि घराच्या उंबरठय़ापलीकडच्या कामांत, अर्थार्जनात त्यांचा सहभाग या काही प्रमुख बाबी होत. साधी राहणी, दैनंदिन जीवनात, लग्न समारंभात, खाण्यापिण्यात भपकेबाजीला फाटा, सूतकताई यांना वेळ मिळावा म्हणून, ‘रांधा वाढा उष्टी काढा’ या दैनंदिन रहाटगाडग्यातून स्त्रीची सुटका यावर गांधीजींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चळवळीने भर दिला.
या बदलामुळे स्त्रियांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. विवाह साधेपणाने होऊ लागले. हुंडय़ाची प्रथा काही प्रमाणात कमी झाली. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले. विधवा-विवाहांना उत्तेजन मिळाले. पडदा पद्धती असलेल्या प्रतिष्ठित कुटुंबांतील स्त्रियांनी पडद्याचा त्याग केला. विभावरी शिरूरकर यांच्यासारख्या बंडखोर लेखिकांनी स्त्रियांच्या लैंगिक मानसिकतेचे प्रश्न कथांमधून लोकांपुढे आणण्याचे धाडस केले. स्वातंत्र्यलढय़ातील स्त्रियांच्या सहभागाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे केवळ शहरी सुशिक्षित स्त्रियाच या लढय़ात सहभागी झाल्या असे नाही, तर ग्रामीण भागातील शेतकरी स्त्रिया आणि आदिवासी स्त्रिया यांच्यात निर्माण झालेले पारतंत्र्याचे भान. १२ मार्च १९३० ला सुरू झालेली दांडीयात्रा ६ एप्रिलला समाप्त झाली. गांधीजींनी या मिठाच्या सत्याग्रहासाठी निवडलेल्या ७१ दांडीयात्रांमध्ये एकाही महिलेचा समावेश नसल्याने स्त्रिया नाराज होत्या. दांडीयात्रेच्या शेवटच्या दिवशी सरोजिनी नायडू सामील झाल्या आणि या सत्याग्रहात अटक झालेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या; पण शेवटच्या दिवशी देशातल्या लाखो स्त्रिया या सत्याग्रहात आपापल्या ठिकाणी सामील झाल्या आणि या आंदोलनाला एक विशाल स्वरूप प्राप्त झाले. बंगालमध्ये हजारो स्त्रियांनी, महाराष्ट्रातल्या आदिवासी आणि कोळी स्त्रियांनी, मद्रासमधल्या (चेन्नई) समुद्रतटावरच्या हजारो स्त्रियांनी, एवढेच काय अलाहाबादमध्ये कमला नेहरू, स्वरूपराणी नेहरू यांच्या आधिपत्याखाली आणि भारतात सर्वत्र स्त्रियांनी मीठ बनवायला सुरू करून मिठाचा कायदा तोडायला सुरुवात केली. सबंध भारतीय स्तरावर स्त्रियांचा सहभाग असलेली ही पहिली चळवळ होती. या अविस्मरणीय दिवशी स्त्रियांनी समुद्रात उडय़ा मारल्या. त्यांच्या हातात शस्त्रे होती ती म्हणजे मातीच्या, तांब्यापितळेच्या घागरी. या बायकांच्या अंगावर ग्रामीण भागात स्त्रिया नेसतात, तशा साडय़ा होत्या. कोणी तरुण होत्या, तर कोणी वृद्धा, कोणी श्रीमंत, कुणी गरीब, कुणी मालकीण कुणी नोकराणी; पण आपल्या सर्व सामाजिक बंधनांना तोडून त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात एकत्रितपणे उडी घेतली होती.
 निर्भयपणे आणि बहादुरासारख्या त्या पुढे पुढे जात होत्या. मिठाची छोटी-छोटी पाकिटं तयार करून त्या गल्लीच्या तोंडाशी उभ्या राहात आणि जोरदार आवाजात सांगत, ‘‘आम्ही मिठाचा कायदा तोडला आहे, आता आम्ही स्वतंत्र आहोत. स्वातंत्र्याचं मीठ खरेदी करणारा आहे का कोणी? आणि त्यांचा आवाज कधीच नुसता हवेत विरला नाही. रस्त्यावरून जाणारा प्रत्येक जण तिथे क्षणभर थबके, हातातलं नाणं टाकून मिठाची पुडी घेई आणि अभिमानानं पुढं जाई.
स्त्रियांमध्ये एकजूट आणि समन्वय निर्माण होण्यासाठी स्त्रियांचे अनेक संघ स्थापन झाले. देश सेविका संघ, नारी सत्याग्रह समिती, महिला राष्ट्रीय संघ, लेडीज पिकेरिंग बोर्ड, स्त्री स्वराज्य संघ, स्वयंसेविका संघ इत्यादी. घेराव, प्रभातफेऱ्या, चरखा चालवण्याचं शिक्षण, खादीचा प्रचार वगैरे अनेक कामे या संघटनांनी हाती घेतली. मुंबईच्या गिरणी कामगार महिलांचा श्रमिक देशिका संघ इतका कार्यशील होता की, १९३१मध्ये त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात आला. इतर संघटनांवरदेखील पुढे हळूहळू बंदी आली. स्त्रियांच्या छोटय़ा छोटय़ा पराक्रमाच्या किती कहाण्या सांगाव्यात? ‘रात्र संपली, पण गोष्टी संपल्या नाहीत’, असं उत्तररामचरितात म्हटल्याप्रमाणे लेखामागून लेख लिहिले तरी स्त्रियांची उरलेली किती तरी आंदोलने खुणावत आहेत.
सरकारी कर न भरल्याने ज्यांच्या जमिनी लिलावात गेल्या, त्या स्वस्तात खरेदी करणाऱ्या राष्ट्रद्रोह्य़ांच्या घरापुढे पोराबाळांना घेऊन धरणे देऊन बसून राहणाऱ्या बायका, दिल्लीतील एका निदर्शनात लाठीमाराने घायाळ झालेल्या दहा बायका, बलसाडमधल्या निदर्शनात लाठय़ा झेलणाऱ्या हजारो बायका रक्ताने कपडे माखले तरी पुन्हा दुसऱ्यांदा लाठय़ा खाण्यासाठी उभ्या राहात होत्या. मद्रासमध्ये सत्याग्रही स्त्रियांवर पाण्याचा जोरदार मारा केल्यावर बेशुद्ध पडलेल्या स्त्रिया, वन कायद्याचे उल्लंघन करतांना पोलिसांच्या गोळीबाराची शिकार झालेल्या गोंड आदिवासी स्त्रिया, खादी विकल्यामुळे नऊ महिन्यांची शिक्षा झालेल्या इंदुमती गोयंका; किती स्त्रिया, त्यांची किती आंदोलने, तरी नेतृत्व करणाऱ्या स्त्रियांचे नेतृत्व सर्वश्रुत असल्याने त्यांची दखल मनात असूनही घेता आली नाही.
आता वेध आहेत स्वातंत्र्याचे आणि त्यानंतरही न थांबलेल्या संघर्षमालिकेचे; पण एक मात्र नक्की होते, स्वातंत्र्य चळवळीतील सहभागामुळे स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल एका दिशेने सुरू झाली.   
डॉ. अश्विनी धोंगडे -ashwinid2012@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2015 1:01 am

Web Title: freedom of women small efforts great results
Next Stories
1 स्वातंत्र्य लढय़ातील योगदान
2 अंधारात राहिलेली स्त्रीशक्ती
3 गाऊ त्यांना आरती
Just Now!
X