गोपाळ कृष्ण गोखले, बाबासाहेब आंबेडकर आणि रवीन्द्रनाथ ठाकूर तीन थोर व्यक्तिमत्त्वं. त्याचं संपूर्ण आयुष्य एका ध्येयाला वाहिलेलं. त्या ध्यासाने त्यांना त्यागमय बनवलं, सहिष्णू बनवलं. त्या आयुष्याला ना मोहाला शरण जाण्याचा अधिकार होता ना उत्फुल्ल आयुष्य जगण्याचा. पण याच संघर्षमय आयुष्याला शांतवून गेली ती त्यांच्या आयुष्यात आलेली ‘तिची’ मैत्री. मनातला एक हळुवार कोपरा अलगद त्या मैत्रीला वाहिला गेला,  अगदी आयुष्यभर. देहतेचा स्पर्शही नसलेली ही मैत्री, म्हणूनच अधिक उत्कट आणि निर्मोही.
उद्याच्या जागतिक मैत्री दिनानिमित्त हे खास तीन संपादित लेख अरुणा ढेरे या सिद्धहस्त लेखिकेच्या तरल लेखणीतून उतरलेले. ‘पद्मगंधा प्रकाशन’ प्रकाशित करत असलेल्या ‘प्रेमातून प्रेमाकडे’ या पुस्तकातून या तिघांबरोबरच इतरही काही थोर व्यक्तिमत्त्वांच्या मैत्रीकथा उलगडल्या आहेत.
कधी अभ्यासाच्या निमित्तानं, तर कधी स्वैर वाचन करता करता पुष्कळ चरित्रं-आत्मचरित्रं हाती आली. अनेक थोर माणसांचा पत्रव्यवहारही अशाच कारणांनी चाळला गेला. त्या माणसांचे त्यांच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातले तपशील त्यांच्या काळाशी कसे जोडले गेले आहेत याचा विचार करताना विशेष लक्ष गेलं, ते स्त्री-पुरुष मैत्रीच्या संबंधाकडे.
संस्कृतीचा दीर्घ इतिहास पाहता भारतीय समाजाला स्त्री-पुरुष मैत्रीकडे फार निर्भयपणे पाहता आलेलं नाही. वेगवेगळ्या जातिसमूहांमध्ये या संबंधातले वेगवेगळे संकेत होते आणि आहेत; पण बहुतेक रक्तसंबंधांपलीकडचे स्त्री-पुरुषांचे संबंध सामाजिक दृष्टीने नेहमी प्रश्नचिन्हांकित राहत आले. मानीव नाती समाजाला फारशी मान्य झाली नाहीत आणि याबाबतीतलं समाजाचं दडपण स्त्री-पुरुषांमधल्या मैत्रीच्या नात्यावर, मुख्यत: लिंगभेदामुळे, नेहमीच राहिलं. स्त्री-पुरुष संबंधातला एक पदर लैंगिकतेचा आहे, हे खरं; पण त्यापलीकडे जाऊन आधार, दिलासा, आश्वासन, सांत्वन, प्रोत्साहन आणि जिव्हाळा यांचेही पदर त्यात मिसळतात. अंतर्यामीचा एकटेपणा पुष्कळसा नाहीसा करणारा संवाद मैत्रीच्या गाभ्याशीच असतो आणि सर्जनशील व्यक्तीसाठी तर तो उत्तेजन आणि उल्हास यांचा अनुभव देणारा असतो.
त्याग, समर्पण, निष्ठा, धैर्य यांच्या व्यक्तिगत अनुभवांनी कधीकधी हे मैत्रीचं नातं तोलून धरलेलं दिसतं. तर कधी शांतपणे आणि निष्ठापूर्वक मैत्रीमधल्या सुखदु:खाचं दान माणसांनी ओंजळीत घेतलेलं असतं. कधी निरोपाला किंवा मृत्यूला मैत्रीच्या संदर्भात फारसा अर्थही उरलेला नसतो आणि कधी मैत्रीच्या लहानशा हातांनी मोठय़ा जीवनध्येयांच्या ज्योती पेटवल्या जातात. कधी या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं आणि कधी भक्तीत होतं. विवाहानं कधी त्या मैत्रीला दीर्घकालीन एकत्रपणाचा अवकाशही मिळतो. मैत्रीची अशी रूपमाया सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या थोरामोठय़ांच्या आयुष्यांतही दिसते. समाजात वावरणारी, समाजाचं नेतृत्व करणारी, नामवंत अशी माणसं. त्यांच्या थोरवीच्या तळाशी त्यांचं माणूसपणही आहेच आणि त्या माणूसपणाच्या मुठीत मैत्री नावाचं मूल्य. त्या मैत्रीविषयी लिहिलेले हे ललितबंध आहेत.
एका अतिनाजूक आणि अतिअवघड अशा आंतरसंबंधाच्या व्यवहारी जगातल्या वाटचालीचा मागोवा मर्यादित साधनांनिशी घेणं आणि त्यातही तो थोर अशा स्त्री-पुरुषांच्या आयुष्यांतून घेणं ही गोष्ट तशी मोठय़ा जोखमीची आहे. ही जोखीम स्वीकारण्याचं फक्त एक महत्त्वाचं कारण सांगायचं, तर प्रेममय मैत्री ही जगण्याला अर्थपूर्ण करणारी, संघर्षसंगिनी होऊ शकणारी आणि हृदय समृद्ध करणारी एक प्रेरणा आहे, एक शक्ती आहे, हा अनुच्चारित विश्वास त्या थोरांच्या विचार-वर्तनातून उमटताना जाणवला. वाचताना इतरांनाही तो जाणवेल, अशी खात्री आहे.