07 March 2021

News Flash

आसवांचा येतो वास

नैराश्य ही काही शरीरावरची जखम नसते. तर ही वेदना खूप खोल आणि खरी असते. ती समजून घेतली नाही तर आपलंच हे जवळचं माणूस खूप खूप

| February 21, 2015 03:18 am

नैराश्य ही काही शरीरावरची जखम नसते. तर ही वेदना खूप खोल आणि खरी असते. ती समजून घेतली नाही तर आपलंच हे जवळचं माणूस खूप खूप दूर जाऊ शकतं. कारण, आरती प्रभूंचे शब्द ते अनुभवतात. हसायचे कुठे? कुठे आणि केव्हा?
 कसे आणि कुणा पास?
इथे भोळ्या कळ्यांनाही
आसवांचा येतो वास!
औदासीन्याचा आजार हा एकविसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाचा आजार. हे शतकच मुळात धकाधकीचे, अमर्याद गतीचे आणि जीवघेण्या स्पध्रेचे आहे. ‘ये दिल मांगे मोर’ हा जणू या शतकाचा पासवर्ड असावा असे वाटते. म्हणूनच मानसिक रोगांनी त्रस्त आणि ग्रस्त असे हे शतक. स्त्रियांत नैराश्येचे प्रमाण दुपटीने जास्त आहे. तरीसुद्धा दोन तृतीयांश स्त्रियांना त्यासाठी लागणारी आवश्यक मदत मिळत नाही किंवा त्या मदतीपर्यंत पोहोचत नाहीत, हे खरे तर दुर्दैव आहे. चार स्त्रियांमागे एक स्त्री इतक्या मोठय़ा प्रमाणात नैराश्य जाणवते. नैराश्य म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत रोजचेच रडगाणे आहे, असे विधान करणाऱ्याने मुद्दाम जाणून घ्यावे की तो एक अत्यंत गंभीर व खोलवर रुजणारा आजार आहे. मानवी अस्तित्वाला पूर्ण ग्रहणासारखा गिळून टाकणारा आजार आहे. या लेखात नैराश्याची खास लक्षणे व कारणे आपण जाणून घेऊ या.
यात उदासीनता, असहायता, निराशा, कमी आत्मविश्वास इत्यादी लक्षणे प्रथमदर्शनी ओळखता येणारी व हीच नैराश्याची मुख्य लक्षणे आहेत. अर्थात ही सगळ्यांमध्ये अशीच व्यक्त होतात असेही नाही. नैराश्य हे कधी सौम्य प्रमाणात, कधी मध्यम वा कधी तीव्र स्वरूपाचे असू शकते. यातली काही जैविक लक्षणे खूप महत्त्वाची आहेत. या जैविक लक्षणांमध्ये भूक कमी होणे, वजन कमी होणे, झोप कमी लागणे, बद्धकोष्ठता होणे, खूप थकवा जाणवणे दिसून येते. सहा-एक महिन्यांत काही वैद्यकीय कारण नसताना आठ ते दहा किलोपर्यंत वजन कमी झालेले आढळते. माझ्या ओळखीतल्या एक ताई, त्यांचे वजन असे अचानक कमी झाल्याने धास्तावल्या होत्या. त्यांना स्वत:ला काय झाले आहे ते त्यांना कळेना. वास्तविक पाहता त्यांची मानसिक चिडचिड, उद्वेग, अस्वस्थपणा आणि अशा पद्धतीने वजन कमी होणे हा खरे तर त्यांच्या नैराश्याचाच भाग होता. त्यांची भूक ज्या प्रमाणात कमी झाली होती त्यापेक्षाही अधिक प्रमाणात त्यांचे वजन कमी झाले होते. म्हणून कामाचा तणाव जरा जास्त झाला आहे म्हणून थोडी भूक कमी झाली आहे व त्यामुळे हे वजन घटले आहे असा सोपा समज त्यांनी करून घेतला, किंबहुना या स्त्रिया करून घेतात. ही नैराश्याची लक्षणे असू शकतात. याशिवाय झोप कमी होणे हे नैराश्यामध्ये आलेच, पण बऱ्याचवेळा स्ट्रेस वा तणावामुळे रात्री विचारांच्या गुंतागुंतीत झोप येत नाही हे जरी खरे असले तरी सकाळी पूर्वीच्या सवयीच्या मानाने खूप लवकर जाग येते. स्त्रिया तशा पुरुषांपेक्षा लवकरच उठतात. कारण मुलांचा नाश्ता आवरणं, सगळ्यांचे डबे भरून देणे, पाणी भरणे व हे सगळे आटपून नोकरीत असल्या तर स्वतच्या कामानिमित्त बाहेर पडणे, यासाठी त्यांच्याकडे बराच वेळ हाताशी असावा लागतो. पण सवयीपेक्षा दोन-तीन तास लवकर जाग येणे, डोळ्यावरची झोप उडून गेली पण अंथरुणातून उठावेसे वाटत नाही, दिवसाची सुरुवात करावी असे वाटत नाही, सकाळची सुरुवात उल्हासित असणे अपेक्षित आहे. त्याऐवजी आपल्या मनावर मणामणाचे दडपण आल्यासारखे वाटते. उठून कामाला लागायचे तर मन घुसमटतं. सकाळी सकाळी मनाला आलेला हा म्लानपणा उत्साहालाच गिळून टाकतो. स्त्रियांमध्ये नैराश्याच्या तक्रारी विशेषकरून आढळतात. त्या अशा
*मन चलबिचल होते. शून्य शून्य होते.
*जीवन नीरस वाटते. समोर असलेली आनंदाची संधीसुद्धा उपभोगता येत नाही.
*सतत डोळे भरून येतात व छोटय़ा-छोटय़ा गोष्टींनी रडू फुटते.
*आपले सतत काही तरी चुकले असे वाटते. अपराधी वाटते.
*प्रचंड थकवा वाटतो. ऊर्जा नाहीच असं वाटतं.
*आयुष्याची गाडी संथ झाल्यासारखी वाटते.
*मन एकाग्र होत नाही. कशात लक्ष लागत नाही.
*रोजच्या साध्या साध्या गोष्टी विसरायला होतात.
*काय करू-काय नको अशी घालमेल होते. एका जागी बसवत नाही.
*साधे साधे निर्णय घेतानासुद्धा भीती वाटते.
*शरीरात काही ना काही वेदना आहे, दुखणं आहे असे वाटत राहते.
स्त्रियांच्या वैवाहिक आयुष्यात त्रासदायक ठरणारी अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाची तक्रार म्हणजे त्यांची लंगिक इच्छाच कमी होते. नवऱ्याला हे असे का कळत नाही, त्याच्यामुळे नवरा-बायकोत शीतयुद्ध सुरू होते. परिणामी नात्यात दरी निर्माण होते. नैराश्यामध्ये स्त्रीला गरज असते ती प्रेमळ आधाराची. पण वरील त्रासामुळे नवरा मात्र तिचा दुस्वास करतो. तोंड दाबून बुक्क्यांचा मार तिला सहन करावा लागतो व औदासीन्य आणखीन वाढते. अनेकदा स्त्रिया मनातली वेदना व्यक्त करू शकत नाहीत. कारण नैराश्य हे शरीरावरच्या इतर जखमांसारखे दिसत नाही. अशावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक मलुल हसू दिसते. त्याला आम्ही ‘स्मायलिंग नैराश्य’ म्हणतो. या स्त्रिया खरे तर त्यांच्या नैराश्याच्या आजारामुळे बिथरलेल्या असतात. त्यांना स्वत:ची उगाचच लाज वाटते. कधी कधी इतर लोकं म्हणतात, म्हणून हे दुखणे खरेच खोटे आहे का, असा विचार त्यांच्या मनात येतो. पण ही वेदना खूप खोल आणि तेवढीच खरी आहे. यावेळी आरती प्रभूंचे शब्द आठवतात –
हसायचे कुठे? कुठे आणि केव्हा?
 कसे आणि कुणा पास?
इथे भोळ्या कळ्यांनाही आसवांचा येतो वास!
स्त्रियांमध्ये नैराश्य जास्त प्रमाणात का आढळते याचा विचार स्त्री-पुरुष भूमिकांच्या विश्लेषणातून करणे आवश्यक आहे. पौगंडावस्था म्हणजे साधारण १६-१७ व्या वर्षांपर्यंत नैराश्याचे प्रमाण मुला-मुलींमध्ये समप्रमाणात आढळते. पण मुली जेव्हा वयात येतात तेव्हा नैराश्याचा धोका मुलींमध्ये अचानक दुपटीने वाढलेला आढळतो. मनोविकाराच्या शास्त्राप्रमाणे स्त्रियांमधील नैराश्याचे प्रमाण हे तिच्या हार्मोन्सच्या पातळीत होणाऱ्या बदलांमुळे होत असते. हे बदल पाळी सुरू होण्याच्या व बंद होण्याच्या टप्प्यात, गर्भारपणात व प्रसूतीनंतर जास्त प्रमाणात होतात. म्हणून नैराश्याचे प्रमाणही या टप्प्यात जास्त वाढते. या जैविक कारणांबरोबर नैराश्याचा धोका हा आनुवंशिकही असतो. याव्यतिरिक्त स्त्रीचे व्यक्तिमत्त्व कसे आहे, तिची भावनिक क्षमता किती आहे, ती किती प्रगल्भ आहे, तिच्यात किती सोशीकता आहे, विपरीत परिस्थितीशी ती कसा सामना करू शकते? यावरही तिला नैराश्य होईल की नाही हे अवलंबून आहे. नैराश्य येण्यामागे स्त्रीच्या आयुष्यातली इतर परिस्थिती आणि सामाजिक कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत. एखाद्या स्त्रीच्या लहानपणी तिच्या आईवडिलांचा मृत्यू झाला तर जी असुरक्षिततेची भावना तिच्यात निर्माण होते, त्यातून पुढे नैराश्य येऊ शकते, कारण गंभीर प्रसंगी सामोरे जाताना लागणारा आत्मविश्वास तिच्यात कमी आढळतो. आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर अचानकपणे भावनिक आधारच नाहीसा झाला तर स्त्रियांना नैराश्य येऊ शकते. माझी एक रुग्ण, जिची आई लहानपणीच गेली होती. काही वर्षांनी तिचे बाबा गेले. ती नंतर आपल्या अपंग भावाचा सांभाळ करीत राहिली. त्याच्यासाठी तिने लग्नही केले नाही. त्याला अगदी पोटच्या पोरासारखे सांभाळले. ती सर्वाना सांगत असे, की माझ्या भावाला माझी नितांत गरज आहे. माझ्या आधाराशिवाय तो जगूच शकत नाही. काही वर्षांनी हा भाऊ अचानक गेला आणि ती तीव्र नैराश्यामध्ये गेली. आता तिच्या हृदयात एक पोकळी होती, एक वेदना होती. ती म्हणाली, ‘मला आजपर्यंत असेच वाटले, की माझ्या भावाला माझी खूप गरज होती. पण आज जाणवते की त्याचीच मला अधिक गरज होती.’
अजाणतेपणे आपण विशेषकरून स्त्रियांना त्यागाची प्रतिमा मानतो. मात्र अनेकदा त्याच  कुणा प्रिय व्यक्तीवर निरागसपणे अवलंबून असतात. त्या व्यक्तीच्या आपल्या जीवनात नसण्याच्या कल्पनेनेसुद्धा पूर्णपणे कोलमडून जातात. बऱ्याच वेळा एखादी अप्रिय वा दुखद घटना घडली तर नैराश्य येतेच. या प्रसंगांचे मूल्यमापनही करता येते. पण अनेकदा अशीच एखादी घटना घडण्यापेक्षा दुख व नकारात्मक प्रसंगांच्या सतत फेऱ्यात सापडण्यानेसुद्धा नैराश्य येऊ शकते. डोक्यावर खूप कर्ज आहे, अशात नवऱ्याची नोकरी गेली, अपत्याला नेमका गंभीर आजार झाला आणि अशुभ प्रसंगांचा असा ससेमिरा चालूच राहिला. अशा कठीण समयी स्त्रीला जर अपेक्षित असलेला आधार नाही मिळाला तर या सगळ्यांशी झुंजताना ती थकून जाते व निराशेच्या फेऱ्यात अडकते. आणखी खूप महत्त्वाचे कारण म्हणजे ज्या स्त्रियांवर लहानपणीच शारीरिक व मानसिक अत्याचार होतात, लंगिक अत्याचार होतात त्यांच्यात औदासीन्य विकार होण्याचे प्रमाण जास्त असते.
या स्त्रियांच्या मनावर एक भळभळणारी खोल जखम कायम स्वरूपात कोरली जाते. या जखमेतनं जगताना त्यांचे व्यक्तिमत्त्व हे तितके परिपक्व व सक्षम होत नाही. अचानक एखादी दुघर्टना घडली की त्यांना स्वत:ला सावरता येत नाही आणि त्या पटकन नैराश्यामध्ये जातात. जणू पुन्हा एकदा त्या जखमेतनं भळभळणारी जिवघेणी वेदना जगू लागते.
अनेक प्रकारचे शारीरिक आजार जसे की उच्च रक्तदाब, मधुमेह, अर्धाग, कर्करोग, थायरॉइडची समस्या यांसारख्या आजारांमुळे स्त्रियांमध्ये नैराश्य येते. या आजारांच्या बरोबरीने लागणारी सेवा व कौटुंबिक आधार त्यांना मिळतोच असे नाही. बऱ्याचदा त्यांची हेळसांड होते. आपलं जीवन आपण उगाचच रेटत नेतो आहोत की काय असे त्यांना वाटते. कुणाचा आधार नसला की आपण दुसऱ्यांना त्रास देतो आहोत अशी अपराधीपणाची भावना व स्वत:बद्दलचा राग स्त्रीच्या मनात निर्माण होतो. ज्यामुळे नैराश्य अधिक वाढते. स्त्रियांमध्ये औदासीन्य हा विकार तसा ओळखणं कठीणच आहे. कारण बऱ्याचदा ते गृहीत धरले जाते. एखाद्या अप्रिय गोष्टीने नैराश्य म्हणजे स्त्रीसुलभ भावनिक उद्वेग असावा असे नातेवाइकांना वाटते. म्हणून तुझी सहनशक्ती वाढव, मन घट्ट कर किंवा जास्त विचार करू नकोस, असे तिला सांगितले जाते. म्हणूनच स्त्रियांच्या बाबतीत येणाऱ्या नैराश्याबद्दल काही गरसमजुती समजून घ्यायला हव्यात.
सारांश, स्त्रियांमधले नैराश्य ही संवेदनशील गोष्ट आहे. तिच्या प्रियजनांनी तिला या कठीणसमयी योग्य उपचार व आधार देणे आवश्यक आहे. ते कसे ते पाहूच विस्तृतपणे.
डॉ. शुभांगी पारकर -pshubhangi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 3:18 am

Web Title: frustration an emotional disease
टॅग : Chaturang
Next Stories
1 अचपळ मन माझे – शून्य मन
2 स्त्री असण्याची मानसिकता
3 अचपळ मन माझे – मानसिक अनारोग्याच्या पारंपरिक बळी
Just Now!
X