17 January 2021

News Flash

गद्धेपंचविशी : स्वत:ला शोधताना..

आज मागे वळून बघताना आठवणींची गर्दी होतेय मनात

‘अलबत्या गलबत्या’- चेटकी

दिलीप प्रभावळकर

आयुष्याच्या विशी ते तिशीच्या टप्प्यात अनेक गोष्टी आल्या, क्रिकेट, अभ्यास, नोकरी, लेखन, अभिनय, संगीत, माऊथ ऑर्गन, लग्न.. दरम्यान, कधीही वाटलं नव्हतं, पण पूर्णवेळ अभिनेता आणि अर्धवेळ लेखक झालो. विशी-पंचविशीत माझी स्वत:ला शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली ती आजही सुरू आहे. माझ्या व्यक्तिमत्त्वासारखी एकही भूमिका मी आजवर केलेली नाही. मला तशी भूमिका करायची आहे..

आज मागे वळून बघताना आठवणींची गर्दी होतेय मनात. मी गेली चार-पाच दशकं नाटय़ क्षेत्रात आहे, पण माझे बाळाचे पाय वगैरे पाळण्यात कधी दिसले नाहीत हेही तितकं च खरं. प्रत्येक वयात प्रत्येक मुलाला जे जे व्हायला आवडायला हवं, ते ते सारं मला व्हायला आवडलं असतं. पण मी फारसा महत्त्वाकांक्षी नव्हतो. कॉलेजमध्ये जाईपर्यंत मी पु. ल. देशपांडे यांच्या ‘बटाटय़ाच्या चाळी’तील कोचरेकर मास्तरांसारखा सावध सज्जन होतो. नाही, मी त्यात आता थोडा बदल करून म्हणेन, की सावध, संकोची सज्जन होतो. भाबडा वगैरे नव्हतो, पण सावध नक्की होतो. इतर मुलांना जसं वाटायचं, की आपल्याला सर्वानी ओळखावं, तसं मलाही वाटायचं. पण मी त्यासाठी अवाजवी कष्ट मात्र कधी घेतले नाहीत.

माझ्या दोन शाळा- ‘शारदाश्रम’ आणि ‘छबिलदास’. मी बरा विद्यार्थी होतो. ‘छबिलदास’मधले तुळपुळे सर कधीतरी माझा निबंध वाचून दाखवायचे, त्या वेळी मला उगीच ओशाळल्यासारखं वाटायचं. ‘एस.एस.सी.’ झाल्यावर सगळे जातात म्हणून मीही रुईया महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. रुईया तेव्हाही क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर होतं. बॅडमिंटन चॅम्पियन नंदू नाटेकर, क्रिकेटचे कॅप्टन अजित वाडेकर हे ‘रुईया’चे.  मला क्रिकेटपटू व्हायचं होतं, ‘रुईया इलेव्हन’मध्ये खेळायचं होतं. पण ‘रुईया’चे पहिले एकशे अकरा खेळाडू निवडले गेले असते तरी त्यात माझा समावेश झाला नसता. ती हौस मी नंतर निखिल वागळेच्या ‘षट्कार’ नियतकालिकासाठी ‘गुगली’ हे सदर लिहून भरून काढली. (त्या वेळी द्वारकानाथ संझगिरी, मकरंद वायंगणकर, उमेश आठलेकर हे मला क्रिकेटच्या ‘आतल्या बातम्या’ सांगायचे आणि त्यावर मल्लिनाथी करत मी ते विडंबनात्मक सदर लिहायचो.) पण ‘रुईया’मध्ये शिकताना आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठी माझी निवड डॉ. सरोजिनी वैद्यबाईंनी केली. शं. ना. नवरे यांची दोनच पात्रांची ‘जनावर’ नावाची ती गंभीर एकांकिका होती. त्या वेळी दुसरं पात्र विजय रानडे करायचा. बाई आम्हाला घेऊन क्लब हाउसला गेल्या. आमच्या मदतनीस म्हणून सगळ्या मुली होत्या. एकांकिकेच्या शेवटी विजयचं पात्र माझ्या पोटात सुरी खुपसणार होतं. ती लागू नये म्हणून तिथे एक पॅड लावायचं होतं. मी एकांकिकेच्या टेन्शनमध्ये आणि विजयही त्याच ताणात. मुलींना कसं सांगणार की हे बांधायला मदत करा! मग एका स्पर्धक महाविद्यालयाच्या मुलाला मी विनंती केली. ते पॅड बांधताना तो आशीर्वचन बोलला- ‘‘तू कितीही पॅड बांध किं वा काहीही कर, तुझी एकांकिका पडणार!’’ माझं टेन्शन आणखी वाढलं. त्याही काळात एकांकिका पाडापाडीचे खूप प्रकार चालत. एकांकिकेत ‘एन्ट्री’ला माझं पहिलंच वाक्य होतं- ‘‘मी राणीच्या बागेतून आलोय.’’ मागून कोणीतरी ओरडला, ‘‘तिथलाच वाटतोयंस.’’ प्रचंड हशा. मी गार पडलो. पण नंतर नेटानं एकांकिका पुढे नेली. पाच मिनिटांत प्रेक्षागृहात शांतता पसरली. मला त्या स्पर्धेत अभिनयाचं पारितोषिक मिळालं. त्याच वर्षी ‘रुईया’च्या गॅदरिंगमध्ये आम्ही पद्माकर डावरे यांची ‘कोणी गोविंद घ्या’ ही विनोदी एकांकिका बसवली. तीही खूप गाजली. बरेच जण मला ‘छुपा रुस्तुम’ म्हणाले. ‘रुईया’चं भित्तीपत्रक निघतं. त्या भित्तीपत्रकासाठी तू लिही, असं आमचे नांदिवडेकर सर म्हणाले. त्या काळात आमचे आवडते लेखक होते  पु. ल. देशपांडे. त्यांच्या ‘बटाटय़ाच्या चाळी’तील ‘राघूनानांची कन्येस पत्रे’ यासारखं काहीतरी लिहावं, म्हणून मी ‘काही वासऱ्या’ या नावाचा लेख लिहिला. कॉलेजमधला स्कॉलर मुलगा, भंकस करणारा मुलगा, एक मुलगी अशा वेगवेगळ्या मुलामुलींच्या रोजनिशीतील ती पानं होती. मला लेखनाचं पारितोषिक मिळालं.

कॉलेज संपल्यावर मी पदव्युत्तर पदवीसाठी ‘बायोफिजिक्स’ हा विषय निवडला आणि त्यासाठी ‘टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर’ला प्रवेश मिळवला. त्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी आमचे ‘एम.एससी.’चे तास होत. ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ (टी.आय.एफ.आर.) येथे ‘जेनेटिक्स’, ‘मॉलेक्युलर बायॉलॉजी’चे तास होत. माझ्या विषयांच्यापेक्षा त्या वास्तूच्या मी इतक्या प्रेमात पडलो, की मला तिथंच ‘डॉक्टरेट’, ‘पोस्ट डॉक्टरेट’ करायची स्वप्नं पडायला लागली. माझे ‘मॉलेक्युलर बायॉलॉजी’चे प्राध्यापक होते डॉ. ओबेग सिद्दिकी. त्यांचाही माझ्यावर प्रभाव पडलेला होता. त्या वेळी ‘एम.एससी.’ला मला प्रथम वर्ग मिळाला. वडिलांनी अधिक शिक्षण घे, असं सुचवलं. मी ‘भाभा अणूसंशोधन केंद्र’ येथे ‘रेडिएशन टेक्नॉलॉजी’चा डिप्लोमा केला. त्या अभ्यासक्रमाला देशातील विविध शाखांतील विद्यार्थी निवडले गेले होते. त्यामागचा उद्देश होता, की वेगवेगळ्या क्षेत्रांत या तंत्राचा वापर व्हावा. पण तो उद्देश माझ्या बाबतीत सफल झाला नाही. आई आणि बाबा दोघेही कला शाखेचे. माझी आई ‘विल्सन’मधून ग्रॅज्युएट झाली होती. बाबांनी ‘एल्फिन्स्टन’मधून संस्कृत आणि इंग्लिश विषयात ‘एम.ए.’ केलं होतं. धाकटय़ा भावानं ‘व्ही.जे.टी.आय.’मध्ये अभियांत्रिकीला प्रवेश घेतला होता. मला टी.आय.एफ.आर.मध्ये ‘पीएच.डी.’ करायचं होतं. मला सहज प्रवेश मिळेल असं वाटलं, पण तसं झालं नाही. सहा महिने वाट बघितली. मी अगदी घायकुतीला आलो आणि सरळ ‘फार्मास्युटिकल इंडस्ट्री’मध्ये आधी ‘युनिकेम’मध्ये आणि नंतर ‘रॅलीज’च्या ‘टी.सी.एफ.’ डिव्हिजनमध्ये बारा-तेरा वर्ष नोकरी केली. ही माझी सर्वात दीर्घकालीन नोकरी. माझी नाटकाची, दूरदर्शनची, चित्रपटाची कारकीर्द याच नोकरीच्या काळात घडली. तीही कोणतीही सवलत न घेता. इथंच माझ्या आयुष्यात ‘रंगायन पर्व’आलं.

त्याचाही किस्सा आहे. माझं पहिलं नाटक आमच्या हाऊसिंग कॉलनीतील गणेशोत्सवात मी केलं. मीच लिहून स्वत: काम केलं होतं. वृंदावन दंडवतेनं ते नाटक पाहिलं आणि त्यानं मला ‘रंगायन’ संस्थेमध्ये बोलावलं. मी पंचविशीपण गाठली नव्हती. पण मी रंगायनचा प्रेक्षक-सभासद होतो. रंगायनची काही नाटकं मला कळायची, बरीचशी डोक्यावरून जायची. पण अशा संस्थेत काम करायला बोलावणं हे मला एकदम भारी वाटलं. नाटक होतं विजय तेंडुलकरांचं ‘लोभ नसावा, ही विनंती’. कॉलनी आणि कॉलेजबाहेरचं हे माझं पहिलं नाटक. त्यामुळे माझा परीघ विस्तारला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेंडुलकर नावाचा नाटककार भेटला. काय व्यक्तिमत्त्व होतं त्यांचं! साहित्यिक असावा तर असा. त्यांच्याभोवती वलय होतं. त्यांचं मोजकं बोलणं, ‘पॉज’ घेऊन बोलणं.. मी त्यांना नकळत न्याहाळत गेलो. मग ते मला टप्प्याटप्प्यावर भेटत राहिले. त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आणि तो कायम राहिला. त्या वेळची एक हृद्य आठवण- आमचं नाटक ‘राज्य नाटय़ स्पर्धे’च्या अंतिम फेरीत धडकलं. जोरात प्रयोग सुरू होता. दोन एन्ट्रींच्या दरम्यान मी मेकअप रूममध्ये आलो. पाहातो, तर तेंडुलकर अगदी शांतपणे एकटे तिथं बसून लिहीत होते. मी त्यांना विचारलं, ‘‘हे काय? तुम्ही नाटक बघत नाही?’’ ते त्यांचा ऐतिहासिक पॉज घेऊन सावकाश म्हणाले, ‘‘माझं नाटक मी बघत नसतो.’’ त्या क्षणापासून मला त्यांच्याबद्दल कुतूहल वाटत राहिलं. त्याच वेळी माझ्यातल्या विनोददृष्टीला जाणवलं, की या विचारवंत नाटककाराची ही शैली आहे. पण पोकळ आणि काहीही सांगण्यासारखं नसलेल्या एखाद्या व्यक्तीनं जर ही शैली स्वीकारली तर ती कशी हास्यास्पद दिसेल, म्हणजे ‘आव जेत्याचा, पण वकूब बेताचा’अशी तऱ्हा असलेला माणूस कसा दिसेल, ते मी एका प्रहसनात लिहिलं आणि ते आम्ही दूरदर्शनवर ‘गजरा’ कार्यक्रमात सादर केलं. त्यात मी स्वत:ला ‘इंटलेक्च्युअल’ समजणाऱ्या आणि सभोवतालच्या ‘मिडिऑक्रिटी’बद्दल आंबट चेहऱ्यानं बोलणाऱ्या प्राध्यापकाची भूमिका केली होती. नंतरही मी तेंडुलकरांच्या नाटकात भूमिका केल्या. त्यांना भेटलं की प्रत्येक वेळी विचारांच्या भिंगऱ्या सुरू व्हायच्या. ते बोलताना एकाग्रतेनं बोलायचे आणि ऐकताना तितक्याच एकाग्रतेनं ऐकायचे. ते इतक्या एकाग्रतेनं ऐकायचे, की मला वाटायचं आपण खरंच काहीतरी महत्त्वाचं बोलत आहोत का..  मग माझाही आत्मविश्वास वाढायचा.

त्याच काळात रत्नाकर मतकरी यांच्याशी भेट झाली. त्यांच्या नाटकांतील वैविध्यपूर्ण भूमिका म्हणजे माझ्यासाठी स्वत:चा शोध होता. ही प्रक्रिया आनंददायी होती. पंचविशीच्या सुमारास मतकरींची भेट झाली आणि त्यांनी मला जो वाव दिला त्यामुळे मी घडलो. त्या वेळी मी एक छोटीशी नाटिका लिहिली आणि केली. विषय होता एका मतिमंद मुलीचा वाढदिवस- ‘मुन्नीचा वाढदिवस!’. ‘चौकट राजा’ हा चित्रपट मी खूप नंतर केला. पण ‘मुन्नीचा वाढदिवस’ या नाटुकल्यात मतिमंद मुलीच्या बापाची भूमिका मी केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ‘गजरा’चे निर्माते-दिग्दर्शक विनायक चासकरांचा फोन आला. ते म्हणाले, ‘‘अरे, तुला व्ही. शांताराम यांनी बोलावलं आहे.’’ मी गेलो. हळूच त्यांच्या केबिनमध्ये शिरलो. समोर अनंत माने, राम कदम बसले होते. मला पाहून अण्णा खूप आनंदित झाले. चित्रपटाचा चालताबोलता इतिहास समोर बघून मी काहीसा बावरलो होतो. व्ही. शांतारामांनी त्या दोघांना मुन्नीच्या वाढदिवसाची कथा ऐकवली आणि म्हणाले, ‘‘जे आम्ही चित्रपटात तीन तासांत सांगू शकत नाही ते या पोरानं पंधरा मिनिटांत सांगितलं.’’ ते मला म्हणाले, ‘‘माझ्याबरोबर काम करा.’’ मी दचकलोच. इतक्या मोठय़ा माणसाबरोबर काम करायचं? पण मी हरखून गेलो नाही. ‘‘मी उद्या सांगतो,’’ असं म्हणून तिथून निघालो. त्यांना चार महिन्यांतले प्रत्येकी दहा दिवस असे चाळीसएक दिवस हवे होते. मी नोकरीवाला मध्यमवर्गीय. कदाचित सलग सुट्टी जमली असती, पण हे शक्य नव्हतं. नोकरी सोडून द्यायची माझी तयारी नव्हती. माझी आवड बघून माझे वडील मला एकदा म्हणाले होते, ‘‘तुला हवं तर नोकरी सोडून दे. नाटकातच करिअर कर.’’ यावर मीच त्यांना म्हणालो होतो, ‘‘कसं शक्य आहे हे? हे बेभरवशाचं क्षेत्र आहे.’’ हा माझा स्वभाव. अखेर मी अण्णांना नकार कळवला. पण नंतर माझ्या वडिलांचं भाकीत खरं ठरलं. मी पूर्णवेळ अभिनेता आणि अर्धवेळ लेखक बनलो.

या दरम्यान ‘एक डाव भुताचा’ हा चित्रपट केला. त्याला सलग तीस दिवस हवे होते. ‘एक डाव भुताचा’ हा चित्रपट वॉल्ट डिस्नेच्या ‘ब्लॅकबिअर्ड्स घोस्ट’ या चित्रपटाचा द. मा. मिरासदारांनी लिहिलेला मराठी अवतार होता. मी दबकत दबकत माझ्या पारशी बॉसकडे गेलो. त्यांना म्हणालो, ‘‘मला वॉल्ट डिस्ने चित्रपटावर आधारित मराठी चित्रपटात काम करायला निवडलं आहे. मला सुट्टी मिळेल का?’’ त्यांना आश्चर्य वाटलं आणि म्हणाले, ‘‘आय एम प्राऊड ऑफ यू. तीस दिवस काय, पस्तीस दिवस रजा घे!’’ मी तो चित्रपट केला.

‘लोभ नसावा’ या नाटकानंतर मी ‘नाटक’ नावाची एक कथा लिहिली. ती कथा घेऊन मी ‘मोहिनी’ मासिकाचे आनंद अंतरकर यांच्याकडे गेलो. त्यांनी ती वाचली आणि मला कौतुक करणारं एक पत्र लिहिलं. ते पत्र आजही मी जपून ठेवलं आहे. त्यांच्या त्या पत्रानं माझं लेखनधैर्य वाढवलं आणि मी आणखी लिहू लागलो. त्या लेखांचं एक पुस्तक नंतर तयार झालं- ‘हसगत’.

लेखन आणि अभिनयाबरोबरच माझी स्वत:ची अशी एक खास आवड आहे, ती म्हणजे हिंदी चित्रपटगीतं. माझ्या कॉलेज जीवनात आणि तारुण्याच्या काळात हिंदी चित्रपटगीतांचं मला वेड लागलं ते आजतागायत सुरू आहे. नौशाद, शंकर-जयकिशन, एस. डी. बर्मन, मदन मोहन, सज्जाद, गुलाम महंमद, हेमंतकुमार, वसंत देसाई, सी. रामचंद्र, सलील चौधरी, ओ. पी. नय्यर यांनी माझ्या तारुण्यसुलभ भावनांना समृद्ध केलं. ट्रान्झिस्टरवर लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, महंमद रफी, किशोरकुमार, मुकेश, तलत यांची गाणी लागली की मंत्रमुग्ध होऊन ऐकत असे आणि आजही ऐकतो. मला लता मंगेशकरांच्या एखाद्या गाण्यानं एखाद्या भूमिकेचा मूडही मिळवून दिला आहे. रत्नाकर मतकरी यांचं ‘घर तिघांचं हवं’ हे ताराबाई मोडक यांच्या जीवनावरचं नाटक मी करत होतो. त्यात अत्यंत बुद्धिमान, पण व्यसनी वकील पतीची भूमिका केली होती. मतकरींनी ती व्यक्तिरेखा बदफैलीही रंगवली होती, पण त्याला एक वेगळी किनारही होती. या वकिलाची रखेल मरताना त्याला सव्वा लाख रुपयांचा चेक देऊन मरते, आपल्या पत्नीच्या कार्याचं महत्त्व जाणणारा हा वकील ती सगळी रक्कम पत्नीच्या कार्याला देऊन टाकतो, अशी काहीशी वेगळी भूमिका होती ती. या भूमिकेचा स्थायीभाव मला गवसला, तो लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘अनुराधा’ चित्रपटातील ‘हाय रे वो दिन क्यूं ना आएं’ या गीतातून. लताजींच्या विलक्षण कारुण्यपूर्ण, आर्त, जादूई आवाजानं आणि त्यांच्या स्वर्गीय सुरांनी त्या व्यक्तिरेखेची शोकात्मिका, तिच्यातील हळवेपणा उलगडून दाखवला. ही जाण सर्व प्रकारे मनाला स्पर्श करते, नवं काही सुचायला भाग पाडते, हा माझा अनुभव आहे. अर्थात दर वेळी हे घडत नाही. भूमिकांची कोडी स्वरांनी उलगडतात असं नाही, पण त्यांची काही वेळा मदत होते हे नक्की. सर्व कला या एकमेकींत कुठेतरी गुंतलेल्या असतात. मदन मोहन, सी. रामचंद्र यांच्या गाण्यांत तुम्हाला आतून हलवून सोडण्याची ताकद आहे, किशोरनं गायलेल्या गाण्यांत उमेद, उत्साह दिसतो. हे सारं जादूई आहे हेच खरं. पंचविशीच्या घडत्या वयात ऐकलेल्या या गाण्यांचा भविष्यातील भूमिकांच्या तयारीसाठी वाचनाबरोबरच अप्रत्यक्ष उपयोग झाला.

या गाणी ऐकण्यातूनच मला ‘माउथ ऑर्गन’ वाजवण्याची प्रेरणा मिळाली. शाळकरी वयात मी पुण्याला गेलो होतो, तिथं माउथ ऑर्गनची सुरावट माझ्या कानावर पडली. कोण वाजवतंय म्हणून मी शोधायला लागलो, तर एक शिराळी नावाचे गृहस्थ तो वाजवत होते. मला शिकवाल का, असं मी त्यांना विचारलं. त्यांनी सुरुवात करून दिली आणि मी नंतर खूप हौसेनं आणि मेहनत घेऊन माउथ ऑर्गन वाजवायला शिकलो. ही कला विशी-पंचविशीत बहरली. मला त्या वेळी जवळपास दीडशे गाणी येत असत. याचा वापर आधी दिग्दर्शक अरविंद देशपांडे यांनी ‘लोभ नसावा’मध्ये आणि नंतर विजय केंकरे यांनी ‘वा गुरू’ या नाटकासाठी करून घेतला. माझं लग्न ठरायला या माउथ ऑर्गनची साथ मिळाली आहे. तीही एक गंमतच आहे. आमच्या शारदाश्रममध्ये एक लवंदे नावाचे गृहस्थ पेईंग गेस्ट म्हणून राहात असत. त्यांचा आणि काही मित्रांचा वाद्यवृंद होता. ते सारे मिळून संध्याकाळी तालीम करत असत. मला गाण्याची हौस. मी ते ऐकायला जात असे. गणेशोत्सवातलं माझं माउथ ऑर्गन वादन त्यांनी ऐकलं होतं. या मंडळींनी शाळकरी वयातल्या मला त्यांच्यात सामील करून घेतलं. त्यांच्यात एक बावकर नावाचे उंच, रुबाबदार गृहस्थ होते. ते ‘एल.आय.सी.’त काम करायचे. ते एक वेगळंच वाद्य वाजवायचे. एक लाकडी खोका होता, त्याला जोडलेली एक उंच काठी आणि त्या काठीच्या टोकापासून निघालेली आणि खोक्याला खूप ताणून बसवलेली लांब दोरी. त्याचं नाव काय असेल ते असेल, पण आम्ही त्याला ‘होममेड बेस इन्स्ट्रमेंट’ असं म्हणायचो. सुटाबुटातले बावकर खोक्यावर पाय ठेवून ते वाद्य वाजवायचे. काही काळानं तो वाद्यवृंद अस्तंगत झाला. दरम्यान काही वर्ष लोटली.. नोकरी करायला लागलो. लग्नाचंही वय झालं होतं. एक दिवस घराची बेल वाजली. दारात बावकर उभे. ते माझ्यासाठी त्यांच्या बहिणीचं स्थळ घेऊन आलेले होते. माझं यथावकाश त्यांच्या बहिणीशी लग्न झालं. एका खूप चांगल्या आणि प्रेमळ मोठय़ा कुटुंबाशी जोडला गेलो. मोठय़ा वयाच्या हौशी वाद्यवृंदात माउथ ऑर्गन वाजवल्याचा असाही फायदा!

मी यापूर्वीच म्हणालो होतो, की माझी स्वत:ला शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली ती आजही सुरू आहे. माझ्या व्यक्तिमत्त्वासारखी एकही भूमिका मी आजवर केलेली नाही. मला तशी भूमिका करायची आहे. पण कोणतीही व्यक्तिरेखा करत नसताना, एखाद्या रात्री माझ्या मनाला चाटून जातं, अरे आता आपण आपली तर भूमिका करत नाही ना? मी खरा कधी असतो? आरशासमोर? मग मला हळूच जाणवू लागतं, आत्तापर्यंत जे जगलोय तो मीच आहे. लताचं गाणं मनात पाझरू लागतं, ‘वो चाँद खिला वो तारे हसे, ये रात अजब मतवाली हैं। समझनेवाले समझ गएं हैं, ना समझे वो अनाडी हैं।’

भूमिकांची कोडी स्वरांनी उलगडतात असं नाही, पण त्यांची काही वेळा मदत होते हे नक्की. सर्व कला या एकमेकींत कुठेतरी गुंतलेल्या असतात. मदन मोहन,  सी. रामचंद्र यांच्या गाण्यांत तुम्हाला आतून हलवून सोडण्याची ताकद आहे, किशोरनं गायलेल्या गाण्यांत उमेद, उत्साह दिसतो. हे सारं जादुई आहे हेच खरं. पंचविशीच्या घडत्या वयात ऐकलेल्या या गाण्यांचा भविष्यातील भूमिकांच्या तयारीसाठी वाचनाबरोबरच अप्रत्यक्ष उपयोग झाला.

प्रत्येकाच्या आयुष्यातला विशी ते तिशी हा कालखंड  खास असतो. आयुष्याची पायाभरणी करणारा हा काळ असल्यानं त्याचं योगदान महत्त्वाचं असतं. नेमकं काय महत्त्व आहे या काळाचं नामवंताच्या आयुष्यात? घेतलेले योग्य-अयोग्य निर्णय, केलेल्या कृती,  मिळालेलं यश-अपयश, भेटलेली माणसं, त्यांचं योगदान.. काय आहेत त्यांच्या आजच्या यशामागचे त्या काळातले अनुभव. सांगताहेत सर्व क्षेत्रांतील नामवंत.. ‘करोना’मुळे गेल्या वर्षी मार्चमध्ये थांबवलेलं हे सदर पुन्हा एकदा नव्यानं दर शनिवारी..

शब्दांकन- डॉ. नितीन आरेकर

nitinarekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2021 12:00 am

Web Title: gaddhepanchvishi article finding yourself by dilip prabhavalkar abn 97
Next Stories
1 एक दशक संपताना!
2 गर्जा मराठीचा जयजयकार : मराठीची पताका फडकत राहो!
3 हेल्पलाइनच्या अंतरंगात : जीवनदायी मदत
Just Now!
X