अपर्णा देशपांडे – adaparnadeshpande@gmail.com
गेल्या दहा वर्षांत आपल्या हातातलं ‘स्मार्टफोन’चं स्थान पक्कं झालं आणि दिवसभर आपण वापरत असलेल्या ‘गॅजेट्स’ची, ‘स्क्रीन्स’ची संख्या, त्यांनी व्यापलेला वेळ कसा वाढत गेला हे कळलंही नाही. या गॅजेट्स आणि स्क्रीन्सच्या वेढय़ात आताची लहान मुलं खूप ‘मोठ्ठी’ झालीत याचा अनुभव मागच्या पिढय़ांना पदोपदी येतो. ही मुलं इतकी ‘स्मार्ट’ आहेत, की त्यांच्या तशा असण्याचं कौतुक वाटतं आणि कधी काळजीही वाटते.. सगळेच असे मोठे होऊ लागले, तर मग ‘लहान’ कुणाला म्हणायचं, हा प्रश्नच आहे.
जेव्हा आपण स्वत:ला फार हुशार, ज्ञानी आणि शहाणे समजायला लागतो नं, तेव्हा एखादी अशी व्यक्ती भेटते, जी हळूच आपल्या या समजुतीच्या फुग्याला टाचणी लावत क्षणात त्यातली हवा काढून टाकते. ‘पुलं’च्या भाषेत बोलायचं तर, ‘मी मी म्हणणाऱ्यांचा पाडाव करते’ आणि तरुणाईच्या भाषेत बोलायचं तर ‘सुमडीत तुमची वाट लावून जाते’. माझ्या बाबतीतही असंच घडलं.
आमच्या शेजारच्या नीताला थोडय़ा वेळासाठी बाहेर जायचं होतं, म्हणून तिनं तिचं साडेचार वर्षांचं ‘तुफान’ माझ्याकडे आणून सोडलं. त्याला वेळीच आवर नाही घातला तर काय होतं याची कल्पना असल्यानं तो आल्याबरोबर मी विचारलं, ‘‘सोमू, कार्टून लावायचं?’’ ती वावटळ एका जागी बसवण्याचा हा सोपा मार्ग वाटला मला.
‘‘काट्टून नाई, स्टोली शांग.’’ सोमूनं गुगली टाकली.
‘‘गोष्ट? बरं.. ऐक हा.. एक नं क्रो असतो.. कावळा. खूप उडून उडून त्याला ना खूप तहान लागते. त्याला पाणी प्यायचं असतं, पण कुठेच पाणी मिळत नाही. मग कावळा विचार करतो..’’
‘‘वेलाच आहे ‘क्लो’! ‘शिगी’ (स्विगी) करायचं ना पानी!’’ त्यानं ताबडतोब उत्तर दिलं.
बरोबरच आहे.. आजचा कावळा घरबसल्याच पाणी ‘मागवेल’ ना? आपल्याला हवा तो खाद्यपदार्थ घरपोच मागवता येतो, हे सोमू बघतोय रोज. काळ बदललाय, मग गोष्टही बदलायला हवी. मी गोष्ट पुढे रेटली.
‘‘हो सोमू, बरोब्बर! मग त्या कावळ्यानं किनई कंपनीला फोन केला. हॅलो..’’
‘‘छट्! क्लो बोलत नशतो. मोबाइलवल ताइप कलतो. तुला नाई येत श्टोली!’’ सोमूनं मला ‘ढ’ ठरवून टाकलं होतं. आता त्याच्या कल्पनेतील कावळा काय करेल नेम नाही. मला हसायला आलं. जुन्या इसापनीतीतल्या कथा ऐकताना, वाचताना आपल्याला हे कालानुरूप येणारे प्रश्न नव्हते सुचले, पण आजची ही ‘सुपर ब्रेन’वाली पिढी वेगळ्या विचारांची आहे.
‘‘मला मोबाइल गेम खेलायचाय.’’ गोष्ट सांगण्याच्या परीक्षेत मला अनुत्तीर्ण करून आता माझ्या मोबाइलकडे नजर खिळवून महाराज बोलले.
‘‘माझ्या मोबाइलमध्ये गेम्स नाहीयेत..’’ माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्यानं पटकन मोबाइल घेतला, ‘ येडं समजते का मला’ असा कटाक्ष टाकून चक्क ‘गुगल प्ले स्टोअर’ उघडलं आणि या ‘अडाण्या बाईला’ अलिबाबाची गुहा दाखवली.
‘‘हे बघ!’’ तो म्हणाला. त्याला हवा तो गेम एका मिनिटात माझ्या मोबाइलमध्ये आलाही. माझी जीभ टाळूला! तो मात्र मोबाइलमध्ये गुंग. इतक्या कोवळ्या वयात त्याला मोबाइल देऊ नये, असा विचार करेपर्यंत महाशय खेळातील प्रथम पायरी जिंकून हाताचा तळवा आवळून ‘येस!’ म्हणत होते.
पिढीगणिक होणाऱ्या मानवी मेंदूच्या विकासाचा नियम, मज्जापेशींचं कार्य, मेंदूच्या विस्तारत जाणाऱ्या क्षमता, तर्कशक्तीचा विकास.. सगळं मान्य हो. पण हे काय आहे? किती झपाटय़ानं बदलतंय लहानांचं जग! बुद्धीच्या पल्ल्याच्या बाबतीत या ‘सुपर बेबीज्’ खरंच अचंबित करतात आपल्याला. आपल्या अंगाखांद्यावर खेळणारी ही चिमुरडी जमात त्यांच्या अवतीभोवती दिसणारं नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणं सगळंच फार वेगात आत्मसात करते. त्यांच्या शालेय पाठय़क्रमातील अभ्यासाबाबत त्यांची प्रगती अशीच असेल असं नाही, पण नवीन तंत्रज्ञान फार पटकन आत्मसात करतात ही मुलं. कधी कधी तर वाटतं, की रोजच्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे आणखी काहीच वर्षांत बाळंसुद्धा जन्मल्याबरोबर एका हातात दुधाची बाटली आणि दुसऱ्या हातात लॅपटॉप घेतील की काय.. या तंत्रज्ञानाचं काय सांगावं बाई! उद्याचं अर्भक जन्मल्याबरोबर ‘स्क्रीन’वर पर्याय शोधून निवडताना दिसलं तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे ते बाळ आता त्याला कमरेला जुना सुती लंगोट हवा का ‘डायपर’ हवं, का ‘तसंच’ राहाण्याची इच्छा आहे, हे आपल्या बोटानं टिचकी मारून निवडू शकेल की काय?.. शक्यता नाकारता येणार नाही. तसंही आज अनेक बालकं मोबाइल दाखवल्याशिवाय जेवतच नाहीत. (यात मात्र दोष पालकांचा.) गंमत म्हणजे तीन वर्षांचं बाळही जेवताना उठावं लागलं, तर जाताजाता मोबाइलवर सुरू असलेला व्हिडीओ आपल्या हातानं ‘पॉज’ करून जातं. हे कमी की काय, म्हणून या वर्षी त्यात भर पडली ती ‘ऑनलाइन’ शाळेची!
आपण लाख पदव्या मिळवल्या असतील हो, पण रोजच्या जगण्यात अनेकदा तीव्र प्रतिक्षिप्त क्रिया असलेले हे चिमुरडे आपल्याला तोंडात बोटं (बोटंच काय अख्खा हात, पाय..) घालायला भाग पाडतात. एक दिवस मी एका नव्यानं उभ्या केलेल्या ‘ए.टी.एम.’ मशीनसमोर उभी होते. पैसे काढण्यासाठी कार्ड आत टाकलं, किल्ली फळीवर (‘की बोर्ड’!) बोटं आपटली.. पण ते यंत्र थंड! मी वाकून, इकडून तिकडे बघत होते. माझ्या चेहऱ्यावरचे अत्यंत बावचळलेले भाव वाचत एक ‘ज्ञानी महापुरुष’, वय वर्षे पाच, त्यांचे दोन भोकरे डोळे माझ्यावर रोखून हसत म्हणाले, ‘‘ही ही! तो ‘टच स्क्रीन’ आहे.’’ आणि आपल्या मातेचा हात धरून अंतर्धान पावले. मातेनं मात्र जाताजाता माझ्याकडे एक विचित्र कटाक्ष फेकला. माझी तारांबळ त्या बाळानं सहजतेनं ओळखली होती. पैसे घेऊन घरी येत होते, तर एका बिल्डिंगसमोर ही गर्दी! सुरक्षारक्षकांशी कोणाचा तरी वाद सुरू होता. आठव्या मजल्यावरील कुण्या ‘सुपर किड’नं आईच्या मोबाइलमध्ये ‘किडे’ केले होते आणि एक-दोन नाही, तर तब्बल बारा पिझ्झावाले खाली हजर झाले होते. आता संपूर्ण सोसायटीला पिझ्झा खायला मिळणार होता. आपण के लेल्या या ‘स्मार्ट’ खोडय़ा किती महागात पडतात याची त्या जीवाला कल्पनाही नसेल. ईश्वर त्याच्या माऊलीला बळ देवो आणि आपल्या मोबाइलमधील बँक खात्यासंदर्भात सुरक्षिततेची काळजी घेण्याची बुद्धी देवो, म्हणत मी पुढे आले. या ‘बालबुद्धी’बद्दल विचार सुरू असतानाच समोरून एक ओळखीतलं कुटुंब आलं. ‘‘नमस्कार मॅडम! तुमच्याकडेच येत होतो, पेढे द्यायला.’’ मी हसत ‘अरे वा!’ म्हटलं. ‘ती’ म्हणाली, ‘‘आम्हाला ‘रोबोटिक्स’मध्ये सुवर्णपदक मिळालंय बरं का!’’
‘‘अरे वा! तुम्ही आधीपासूनच ‘प्रोग्रामिंग’मध्ये तज्ज्ञ आहात. खूप छान!’’ मी बिचारी बोलून गेले..
‘‘मॅडम, ‘ह्य़ां’ना (नवऱ्याला) नाही, आमच्या सावीला मिळालंय मेडल.’’ कुणी तरी मला रिंगणात पालथं पाडून चारी मुंडय़ा चीत केल्यासारखं वाटलं मला. कारण ते ‘सावी’ नावाचं प्रकरण फक्त आठ वर्षांचं होतं. मी तोंडभरून कौतुक करून म्हणाले, ‘‘इतक्या लहान वयात मुंबईला मोठय़ा स्पर्धेत जाऊन पदक आणलंस? ग्रेट!’’
‘‘मी लहान नाहीये. ‘एट इयर्स’ची आहे आता.’’ ती चिमुरडी ठसक्यात म्हणाली.
हल्ली मुलांसाठी ‘रोबोटिक्स’ची ‘किट्स’ मिळतात खरी, पण फक्त त्यावरून रोबोटिक्स स्पर्धा जिंकता येत नाही. व्यवस्थित अभ्यास लागतो आणि संदेश पाठवण्याबाबत डोळे, हात आणि यंत्र यांच्यात अचूक समन्वय असावा लागतो. ही बालकं जर लहान मानली जात नसतील तर मग ‘लहान’ कुणाला म्हणायचं?
दूरचित्रवाणीवरील विविध वाहिन्यांवर या ‘तुफान तल्लख’ बालगुरूंसाठी मोठमोठय़ा ‘बजेट’चे अनेक स्पर्धा कार्यक्रम असतात. अगदी आठ-नऊ वर्षांची मुलंही पंचतारांकित हॉटेल्समधील शेफ्ससारखे महागडे, कलात्मक पद्धतीनं सजवलेले पदार्थ बनवतात, ‘लिटिल शेफ’ किताब मिरवतात. नृत्य, गायन, पाककौशल्य.. विविध प्रकारांत आपल्या कौशल्याचे झेंडे लावून येतात ही मंडळी. फार कमी कालखंडात मुलांच्या वाढलेल्या क्षमतांचं खरंच आश्चर्य वाटतं. अशा कार्यक्रमांमुळे तीन-चार महिने ही मुलं प्रचंड प्रकाशझोतात येतात. सगळ्या माध्यमांवर त्यांना अफाट लोकप्रियता मिळते. स्पर्धा संपून घरी आल्यावर त्यांना इतकी भयानक पोकळी जाणवते, की आपल्या खऱ्या आयुष्याशी जुळवून घेताना त्यांना फार जड जातं. पण मग त्यांनी अशा स्पर्धेत भाग घायचा नाही का?.. घ्यावा की! फक्त तिथली झगमगती दुनिया, यशापयश आणि सत्यातील जग याचा समतोल राखण्याचं प्रशिक्षण देणं ही पालकांची जबाबदारी आहे. त्यांना यशाचा कैफ आणि अपयश दोन्ही संयमानं हाताळता आलं पाहिजे.
या ‘बालकौटिल्यां’च्या बाबतीत पालक आणि समाज म्हणून आपलीही जबाबदारी फार मोठी आहे असं वाटतं. तीक्ष्ण बुद्धिमत्ता किंवा विशिष्ट विषयातील सिद्धहस्तता ही वेगप्रवाही असते. त्यास योग्य निगराणी किंवा आवश्यक तिथे बांध न घातल्यास ती घातक होऊ शकते किंवा त्यास दुरभिमानाचा शाप लागू शकतो. यात त्यांच्या अनेक बालसुलभ लीला, त्यातील निरागसता आणि मृदुलता याला धक्का लागण्याचा धोका असतो.
‘गुगल बॉय’ म्हणून ओळख मिळालेला कौटिल्य पंडित, वयाच्या तिसऱ्या वर्षी अफलातून तबलावादन करणारा सोहम गोराणे, अवघ्या तेराव्या वर्षी करोडोंची उलाढाल करणारा तिलक मेहता, ‘सुपर ब्रेन’ तन्मय बक्षी, यांची बौद्धिक घोडदौड बघून मती गुंग होते. कौशल्याचा आलेख सतत उंचावत नेताना यांच्यातील ‘माणूस’ आणि त्यांचं ‘जगणं’ हरवता कामा नये. आजच्या या ‘बालकौटिल्य’ पिढीला समाधानी, शांत आणि निरामय आयुष्य जगायला मिळो, ही मनापासून इच्छा.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 6, 2021 1:09 am