फादर फ्रान्सिस दिब्रिटो

francisd43@gmail.com

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!

आयुष्याचा प्रवास..  खूप काही घडवणारा. त्याची सार्थकता दडलेली असते त्याच्या पूर्णत्वात. मुक्कामापेक्षा हा प्रवासच अनेकदा रोमांचक ठरतो.. भेटणारी माणसे आणि येणारे अनुभव याहीपलीकडे आयुष्य खूप काही देत असतं.  बालपण ते तारुण्य हा  प्रत्येकाच्या आयुष्यातला पायाभरणीचा काळ. कसोटीच्या वेळी घेतलेले निर्णय असोत की ठरवून केलेल्या कृती, उक्ती त्याच ठरवत असतात प्रत्येकाच्या जगण्याचा पोत!  ‘गद्धे पंचविशी’ हे सदर उलगडणार आहे, याच अनुभवांच्या गाठी. नामवंत सांगणार आहेत, त्यांच्या विशी ते तिशी या वयादरम्यानचे आयुष्यातले उभेआडवे धागे..  त्यांच्या आयुष्याला व्यापून उरणारे.. दर शनिवारी. आजचा पहिला लेख १० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा. ‘प्रेमाशी खेळ खेळायचा नसतो.’ आणि ‘भोगात नव्हे तर त्यागात जीवनाचे सार्थक दडलेले आहे.’ या विधानांची सत्यता पटवणारे अनुभव त्यांचं आयुष्य आमूलाग्रबदलवणारे ठरले. कसे ते त्यांच्याच शब्दांत.

आम्ही चार भाऊ, दोन विवाहित बहिणी. भावांचे संसार फुललेले. मी शेंडेफळ. डोक्यावर आईवडिलांचे छत्र. असा सगळा कुटुंबकबिला. जुने कौलारू घर. अर्धे घर आमचे आणि अर्धे दोघा चुलतभावांचे. त्यांचेही संसार बहरलेले. भाऊबंदकी हा काही वर्षांचा वारसा! मोठय़ा भावंडांत लहानसहान गोष्टींवरून भांडणं होत असत; परंतु दोन्ही घरांतील आम्ही मुलं मात्र आपसांत मैत्री जपून होतो. मोठय़ा चुलत भावाचा मुलगा माझ्या नंतरच्या वर्गात होता. त्या काळी नवीन पुस्तकं विकत घेणे अशक्य होते. आम्ही सर्वच वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून पाठय़पुस्तकांची उधार-उसनवारी करीत असू.

आम्हा कुटुंबांची सामाईक वाडी होती. त्यातील एका नारळाच्या झाडावरून संघर्ष झाला होता. त्यामुळे कुणीही त्याची शहाळी काढत नसत. शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा असे. दुपारची जेवणं झाल्यावर माझ्या चुलत भावाचा मुलगा आणि मी वाडीत जात असू. त्या वादग्रस्त माडाला खेटून एक चिंचेचे झाड होते. आम्ही दोघे चिंचेच्या झाडावर चढून बांबूने शहाळी काढून त्यातील गोड पाणी पोट भरून पित असू. झाड वादग्रस्त असल्यामुळे आमची मजाच मजा चालू होती. आमची केळीची बागही होती. त्या केळींच्या झाडांना पाणी द्यायची जबाबदारी माझी पुतणी बनू व मी, आम्हा दोघांवर होती. माझे काम रहाटावर बैल हाकण्याचे. रहाटमाळेतून पन्हाळात पाणी पडायचे. पन्हाळातून ते पाटात. ते दृश्य खूप मनोहर असायचे. पाटाच्या पाण्यातून चालत केळीच्या बागेत जाणं हा विलक्षण अनुभव असायचा.. त्या अनुभवांतली नितांत सुंदरता माझ्या आयुष्यात झिरपत गेली..

एकदा एका कावळ्याने माझ्या हातातून खाऊचा पुडा लंपास केला. त्यामुळे माझा कावळ्यांवर विशेष राग होता. एकदा विहिरीच्या पाण्याच्या लाकडी दांडयात एक कावळा पाणी पीत होता. मी दगडाचा अचूक नेम धरला आणि त्याच्या दिशेने मारून त्याला जखमी केले. तो जिवाच्या आकांताने धावत होता व मी त्याचा पाठलाग करीत होतो. तो विहिरीच्या काठावर आला. मी त्याचा पाठलाग चालूच ठेवला आणि माझा तोल गेला. विहिरीत पडून माझा कपाळमोक्षच होणार होता, पण सुदैवाने एक झुडूप माझ्या हाती लागले आणि मी वाचलो; पण ती घटना आयुष्य बदलवून गेली..  त्या दिवसांपासून मी मुक्या प्राण्यांचा छळ करण्याचे सोडून दिले. पुढेपुढे तर मी पक्ष्यांबरोबर मैत्री साधण्याचा प्रयत्न केला. चिमण्या, कबुतरे, साळुंख्या यांच्यावर माझा भारीच जीव. त्यांना दाणे घालणे हा माझा छंद! माझ्या निसर्गप्रेमाची ही सुरुवात होती..

आमच्या घरची परिस्थिती बेतास बात होती. फीसाठी पैसे मिळण्याची मारामार. मग पॉकेटमनी मिळणं सोडूनच द्या. माझी पुतणी बनू व मी बांधावर तुळस लावीत असू व तुळशीच्या उत्पन्नातून जे काही मिळत होते ते आमच्या स्वत:साठी होते. केळीच्या बागेतील लोंगर जेव्हा कापली जाई, तेव्हा ती दोन किलोमीटर अंतरावरील नाक्यावर घेऊन जावी लागे. त्याचा आम्हाला प्रत्येकी एक आणा मिळत असे. ती आमची कमाई. खांदे दुखायचे. मान मुडपून यायची; परंतु स्वावलंबी होण्याच्या प्रवृत्तीमुळे आत्मसमाधानही लाभायचे. मला वाचनाची खूप आवड होती. गावात वर्तमानपत्र येत नसे. मोठे बंधू दूध घेऊन मुंबईला जात व परत येताना वर्तमानपत्र घेऊन यायचे. सगळ्यांचं वाचून झाल्यावर संध्याकाळी ते माझ्या वाटय़ाला यायचे. मी ते समग्र वाचत असे, अगदी जाहिरातीसुद्धा. आम्हाला शाळेतून दर शनिवारी एक पुस्तक मिळत असे. ते लवकर वाचून झाले की आम्ही आपसांत त्याची अदलाबदल करीत असू. आमचे कुटुंब खूप ‘सोशल’ होते. सगळ्यांनाच सामाजिक सेवेची आवड होती. माझे बाबा नेहमी सामाजिक सेवेमध्ये व्यग्र असत. मोठे बंधू व्यवसायात होते. दूध आणि भाजीपाल्याच्या व्यवसायांत गुंतलेले होते. ते इतरांनाही त्यांच्या धंद्यात मदत करत असत. ते सर्व मी न्याहाळत होतो. आपणही तशीच इतरांची सेवा करावी असे मला मनापासून वाटत होते. त्यांचे संस्कार माझ्यावर होत गेले. केवळ नोकरी एके नोकरी न करता समाजसेवादेखील करावी, असे माझे मन मला सांगत होते..

तेव्हा मी दहावीत होतो. एकदा आई इतर स्त्रियांबरोबर ध्यानसाधनेसाठी वांद्रे येथे जायला निघाली. तिने मला विचारले, ‘‘तुला मुंबईहून काय आणू?’’ मी तिला म्हणालो, ‘‘आई, माझ्यासाठी एक पुस्तक घेऊन ये.’’ येताना तिने माझ्यासाठी ‘येशूची हाक’ हे पुस्तक आणले. प्रभू येशूने आपल्या पहिल्या शिष्यांना आपले अनुयायी बनण्यासाठी कसे बोलावले, त्याच्या कथा त्या पुस्तकात होत्या. फादर डॉमनिक डिआब्रिओ यांनी त्या पुस्तकाचे अत्यंत ओघवत्या भाषेत भाषांतर केले होते. त्या पुस्तकाने माझ्या मनाचा ठाव घेतला. मच्छीमारी करणारे जॉन, जेकब, पिटर व त्याचा भाऊ अँड्रय़ू या शिष्यांच्या जीवनकथा मी वाचल्या. प्रभू येशूंच्या आमंत्रणाने ते भारावून गेले अन् आपला मच्छीमारीचा व्यवसाय सोडून, सर्वसंगपरित्याग करून प्रभू येशूचे अनुयायी झाले. त्यांच्या त्यागाने मी प्रभावित झालो आणि धर्मगुरू होण्याचे बीज माझ्या मनात पेरले गेले. शाळेतील माझे प्राचार्य फादर बर्नर्ड भंडारी हे अतिशय तपस्वी धर्मगुरू होते. प्रभू येशूच्या शिष्यांप्रमाणे ते समर्पित आणि त्यागी जीवन जगत होते. माझ्या नजरेसमोर ते प्रभू येशूचे जितेजागते अनुयायी होते. त्यांची जीवनशैली पाहून मलाही धर्मगुरू व्हावेसे वाटू लागले..

एका बाजूला हे चालू असताना दुसऱ्या बाजूला मनात वेगळाच गुंता सुरू झाला होता.

ना. सी. फडके यांच्या कादंबऱ्या वाचणे सुरू झाले होते. त्यातील बहुतेक कादंबऱ्या कॉलेजमधील प्रेमप्रकरणांबद्दल होत्या. तशी कोणतीही संधी आम्हाला मिळाली नाही, परंतु स्त्रीविषयी फाजील आकर्षण वाटू लागलं. मन सैरभैर होऊ लागले. अभ्यासावरचे मन उडू लागले. ना. सी. फडक्यांची शैली अतिशय मनोवेधक होती. त्यानंतर ग. त्र्यं. माडखोलकरांच्याही कादंबऱ्या वाचल्या, परंतु त्या थोडय़ा रूक्ष वाटल्या. जीवनातले सत्य नेमके काय आहे ते समजेना. एका संभ्रमावस्थेतून मी जात होतो. हवेहवेसे आणि नकोनकोसे असे काही तरी गुंतागुंतीचे वाटत होते. एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करावे असेही वाटू लागले; पण तशी मुलगी शोधून कुठे मिळणार?  पुढे माझ्या हाती वि. स. खांडेकर यांची ‘ययाति’ कादंबरी पडली. मी ती अधाशीपणाने वाचत गेलो. तिच्यातील रोमँटिक वर्णनं वाचून माझ्या तारुण्यसुलभ मनाला मोहोर येत असे. शरीर फुलून येत असे. स्त्रीविषयी विशेष आकर्षण वाटू लागले. मन भिरभिरू लागले. माझी मन:शांती ढळत होती. काही वर्णने मी पुन:पुन्हा वाचली. मात्र कादंबरीच्या शेवटी शेवटी दिसून आले की, सर्व भोग उपभोगूनही ययाति अतृप्तच राहिला. ही त्याची अतृप्ती पाहून मी स्वत:ला सावरले. त्या वेळी मी स्वत:साठी एक सुभाषित तयार केले होते, ‘भोगात नव्हे तर त्यागात जीवनाचे सार्थक दडलेले आहे.’ पुढे गौतम बुद्धांचे चरित्र वाचून काढले. भरल्या संसारातून गौतम बुद्ध संन्यासाच्या वाटेला लागले. घर, पत्नी व बालक व त्यांच्याबरोबर सर्व साम्राज्याचा त्याग करताना त्यांच्या मनाची झालेली उलाघाल लेखकाने प्रत्ययकारीरीत्या वर्णन केली आहे. सर्व ऐश्वर्याचा त्याग करून ते तपश्चर्या करण्यासाठी बोधिवृक्षाखाली बसले आणि एक दिवस त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले, ते जीवनमुक्त झाले. त्या छोटय़ा चरित्राने माझ्या मनाचा ठाव घेतला. अकरावीत असताना आम्ही काही मुले ध्यानधारणा करण्यासाठी वांद्रय़ाच्या ‘र्रिटीट हाऊस’ला गेलो होतो. तेथेच मी धर्मगुरू होण्याचा माझा बेत निश्चित केला..

मी माझा बेत आईच्या कानावर घातला मात्र, तिला धक्काच बसला. दोन वर्षांपूर्वी वडील देवाघरी गेले होते. मी कुटुंबात सगळ्यात धाकटा असल्यामुळे तिला माझा बेत मुळीच आवडला नाही. मी खूप शिकावे, नोकरी करावी, संसार करावा आणि तिचा सांभाळ करावा हे स्वप्न तिने जपले होते. तिने रडून रडून डोळे सुजवले होते, तिच्या आसवांमुळे मनात क्षणभर चलबिचल झाली, पण चित्त विचलित झाले नाही.

दहावीचा निकाल लागल्यावर आमचे प्राचार्य फादर सायमन डिसोजा हे आम्हा चौघा इच्छुक विद्यार्थ्यांना गोरेगाव सेमिनरीत घेऊन गेले. तेथील प्राध्यापकांनी आमच्या मुलाखती घेतल्या. आम्ही चौघेही जण उत्तीर्ण झालो. माझ्या ज्येष्ठ बंधूनी मोठय़ा मिनतवारीनंतर धर्मगुरू होण्यासाठी जाण्यास संमती दिली. शेवटी माझ्या निघण्याचा दिवस ठरला, २१ जून १९६२. भावांनी गावजेवण द्यायचे ठरवले; परंतु तितकी ऐपत नव्हती म्हणून एका ग्रामस्थाने पालघरला जाऊन पिकलेल्या आंब्याची पाटी आणली व सर्वाना ते आंबे वाटले. मी प्रथमच लांब पँट व पायात बूट घातले होते. सगळा गाव मला पाहायला लोटला होता. आम्ही गावाच्या वेशीजवळ आलो.

एस. टी. बस येण्यासाठी वेळ लागणार होता. कुणी तरी पाटलाच्या घरी जाऊन माझ्यासाठी लाकडी खुर्ची आणली. मला बसण्यासाठी आग्रह केला. असं काही तरी माझ्याबाबतीत पहिल्यांदाच घडत होतं. मी खूपच संकोचून गेलो. बस आली. भाऊ आणि मी बसमध्ये शिरलो. बहिणींनी खालीच उभं राहून मला निरोप दिला. ते दृश्य खूपच हृदयस्पर्शी होते. आम्ही अश्रूंनी एकमेकांना निरोप दिला. वडापिंपळांना आणि ताडामाडांना निरोप देऊन आमची बस विरार स्टेशनच्या दिशेने सुसाट वेगाने निघाली. सहा महिने तरी मी मागे फिरणार नव्हतो. इतक्या प्रदीर्घ वियोगाची ती पहिलीच वेळ होती; परंतु एखाद्या गिर्यारोहकाचे मन जसे पहिल्या पायरीवर असतानाच शिखरावर पोहोचते तशी माझी नजर गोरेगाव येथील ‘संत पायस सेमिनरी’मध्ये कधीच जाऊन पोहोचली होती. मी धर्मगुरू होण्यासाठी सेमिनरीत प्रवेश केला. त्या वेळी माझे वय होते अवघे एकोणीस वर्षांचे..

आम्ही वसईतील मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी. सेमिनरीतले माध्यम इंग्रजी. आमची खूप तारांबळ उडू  लागली. आम्हाला इंग्रजी यावं म्हणून शिकवण्या सुरू केल्या गेल्या. प्रशिक्षण सुरू झाले. आमचे बहुतेक प्राध्यापक हे युरोपियन आणि विशेषत: स्पॅनिश होते. त्यांचे इंग्रजी उच्चार समजून घेणं खूप कठीण जायचं. हळूहळू त्याची सवय होत गेली. पहिली तीन वर्षे आम्ही मानव्यशास्त्राचा अभ्यास केला. त्यामध्ये इंग्रजी भाषेचे साहित्य, जगाचा इतिहास व भूगोल या विषयांचा अभ्यास केला. इंग्रजी शिकवणारे प्राध्यापक आयरिश होते. इंग्रजीच्या उच्चारांबद्दल ते खूपच दक्ष होते. त्यांनी आम्हाला शेक्सपियरची नाटके, मिल्टन, वर्डस्वर्थ आदींच्या कवितांची गोडी लावली. सेमिनरीतील प्रशिक्षण हे सर्वागीण होते. तिथे आम्हाला अभ्यासाबरोबर खेळ, नाटय़स्पर्धा, सहली, व्यायाम, योग अशा अनेक गोष्टी करता येत होत्या. सेमिनरीचा अभ्यासक्रम दहा वर्षांचा होता. अनेकांना तो झेपत नसे. काही जण अर्ध्या वाटेवरून निघून जात, तर अपात्र वाटल्यास एखाददुसऱ्या उमेदवाराला सोडून जाण्याचा सल्ला दिला जात असे. असे प्रसंग जेव्हा घडत, तेव्हा आम्ही हादरून जात असू. आपल्यावरही अशी वेळ येणार नाही ना? अशी शंका मनाला स्पर्शून जात असे.

मात्र सेमिनरीमध्ये असतानाच एक तंबी मिळणारी एक घटनाही घडली. १९६५ चा तो काळ. भारत-पाकिस्तान संघर्ष चालू होता. त्या वेळी मुंबईवर काळोखाचे साम्राज्य असे. ते दृश्य पाहाण्यासाठी आम्ही काही ब्रदर्स टेरेसवर गेलो होतो. आमच्या हातात विजेऱ्या होत्या. मजा म्हणून आम्ही टेरेसवरून विजेऱ्या वर-खाली गोल फिरवत होतो. विजेऱ्या फिरवणारे पाकिस्तानचे हेर आहेत, असे समजून आजूबाजूच्या परिसरांतून लोकांचा मोठा घोळका आमच्यावर हल्ला करण्यासाठी सेमिनरीच्या दिशेने निघाला. ही बातमी मृणाल गोरे, डॉ. ज्योती सामंत यांच्या कानावर गेली. प्रसंगावधान राखून त्यांनी सेमिनरीकडे धाव घेतली आणि जमावाची कशीबशी समजूत घालून त्यांना परत पाठवले. आमच्यातले जे जे ब्रदर्स या उपद्व्यापात गुंतले होते, त्यांना अधिकाऱ्यांनी चांगलेच सुनावले. असे प्रसंग क्वचितच, पण हा काळ आमच्या घडण्याचा ठरला. आमच्या सर्वागीण विकासाचा एक भाग म्हणून अधूनमधून एकांकिका आणि तीनअंकी मराठी नाटके सादर करीत असू. आम्ही विद्यार्थ्यांनी ‘वेडय़ाचे घर उन्हात’, ‘डॉ. कैलास’, ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’, ‘देवमाणूस’, ‘रक्त नको मज प्रेम हवे’ आदी नाटय़प्रयोग सादर केले. ‘काळे बेट, लाल बत्ती’ या नाटकात नोकराची भूमिका करण्याच्या निमित्ताने माझाही त्या रंगभूमीवर प्रवेश झाला. पुढे ‘देवमाणूस’ या नाटकाचे मी दिग्दर्शन केले. यामुळे टीमवर्क करण्याचा अनुभव  मिळाला. जे उपयोग पडलं, पुढच्या आयुष्यात धर्मगुरू म्हणून कार्य करताना!

नाटकामधील सर्व भूमिका, अगदी स्त्री भूमिकादेखील आम्ही ब्रदर्स करीत असू. पुढे ती पद्धत बदलली. प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर  एकदा प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. आमच्या मराठीच्या प्रेमाबद्दल त्यांनी आमचे कौतुक केले; परंतु स्त्री पात्र हे स्त्रियांनीच करावे, असा सल्ला त्यांनी दिला. आम्हालाही ते हवेच होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना निर्णय बदलावा लागला. स्त्री पात्र करण्यासाठी वसई किंवा उपनगरातून मुली येत असत. त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्हा तरुणांमध्ये स्पर्धा लागत असे. त्यांना स्टेशनपर्यंत किंवा घरापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही उतावीळ होत असू. आमचे स्त्रीदाक्षिण्य जणू उतू जात असे. ‘फेअर सेक्स’बद्दल आम्हाला उत्सुकता होती, हे ओघाने आलेच; परंतु त्या मुलीही शहाण्या होत्या. आमचे बहाणे त्या ओळखून होत्या..

ते माझ्या ऐन तारुण्यातले दिवस होते. शरीरातल्या सर्व क्षमता विकसित होत होत्या. मनाच्या वृक्षाला शृंगारवृत्तीचाही मोहोर फुटत होता. मराठी कथा-कादंबऱ्यांतून मी गुलाबी नात्यासंबंधी वाचत होतो. युवक-युवतींना मार्गदर्शन करण्यासाठी मी नगर येथे गेलो होतो. तरुणाईच्या प्रश्नांवर मनमोकळी चर्चा करीत होतो. एक चुणचुणीत तरुणी आध्यात्मिक विषयावर अनेक प्रश्न विचारून मला भंडावून सोडत होती. आठवडाभराने मी त्यांचा निरोप घेतला. निघताना अनेकांनी माझा पत्ता टिपून घेतला. शिबिर संपवून मी सेमिनरीत परतलो. पुन्हा रुटिन सुरू झाले आणि एके दिवशी मला पोस्टातून आलेला एक जाडजूड लिफाफा मिळाला. त्यात सुवाच्य अक्षरात लांबलचक पत्र होते. त्याची भाषा अतिशय मोहक होती. त्या मुलीने माझ्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला होता. त्यानंतर तिच्या पत्रांचा रतीब सुरू झाला. एका पत्रातून तिने चक्क बिस्किटे पाठवली होती. आध्यात्मिक भाषेत लिहिलेली ती प्रेमपत्रेच होती. मी धास्तावून गेलो आणि सरळ माझ्या आध्यात्मिक मार्गदर्शकाचा दरवाजा ठोठावला. माझ्यातल्या वादळाची त्यांच्याकडे स्पष्ट कबुली दिली. ते मला अतिशय प्रेमळपणे म्हणाले, ‘‘फ्रान्सिस, तू हळव्या मनाचा आहेस म्हणून तुला अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. नकळत हृदये एकमेकांमध्ये गुंततात, पाश निर्माण होतात. तू जो संन्यस्त मार्ग निवडला आहे, त्याच्याशी तुला एकनिष्ठ राहायचे असेल तर तू संयम बाळगायला शीक. त्या मुलीच्या मन:स्थितीचा विचार कर. तीही तुझ्यात गुंतलेली दिसते. म्हणून एक तर हे पाश तोडून टाक किंवा घेतलेला वसा सोडून दे.’’ त्यांनी मला विचारले, ‘‘तुझा काय विचार आहे? तुला मैत्रीण हवी असेल, पण ती तिच्या जीवनसाथीचा तुझ्यात शोध घेत असेल.’’ मी अंतर्मुख झालो. त्या मुलीबरोबरच्या पत्रव्यवहाराला पूर्णविराम दिला. पेल्यातील वादळ हळूहळू शमले. त्या वेळी मी ‘मॉरीस वेस्ट’ यांची ‘द क्लाऊन ऑफ गॉड’ ही कादंबरी वाचत होतो. त्याच्यामधील एका सुविचाराने माझ्या मनाचा ठाव घेतला. ‘प्रेमाशी खेळ खेळायचा नसतो.’  प्रेम खूप चमत्कारिक, भयानक व दुखरे असतेच; पण त्याचबरोबर ते दाहकही असते, याची मला जाणीव झाली. आयुष्यातले प्रेमाचे प्रकरण मी संपवले; पण इतर काही प्रकरणे माझी वाट पाहात होतीच..

आमच्या अभ्यासक्रमात आम्ही ‘लिबरेशन थिऑलॉजी’चे (मुक्तीचे तत्त्वज्ञान) धडे घेतले. अन्यायाशी कधीही तडजोड करायची नाही, अन्याय होत असताना निष्क्रिय राहणे म्हणजे अन्यायाला दिलेला पाठिंबा असतो आणि न्यायासाठी लढणे हे धर्मगुरूचे कर्तव्य असते, हा तो धडा; पण अन्यायाचा एक प्रसंग आमच्या या प्रशिक्षण काळात घडला. जर्मन फादर डॉ. नॉबर्ट क्लेस पुरोगामी विचारांचे होते. चर्चमधील अन्यायकारक परिस्थितीबद्दल त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यामुळे अधिकारी वर्ग त्यांच्या विरोधात गेला होता. आम्ही मे महिन्याच्या रजेवर गेल्यावर त्यांची रवानगी जर्मनीला करण्याचा बेत शिजवला गेला होता. आम्हाला त्याची कुणकुण लागली. ‘लिबरेशन थिऑलॉजी’चे वारे आम्ही प्यायलो होतो. त्यामुळे त्या अन्यायाविरुद्ध लढण्याचे आम्ही ठरवले आणि संघर्ष सुरू केला. त्यामुळे अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले. त्या वेळी त्यांनी तात्पुरते नमते घेतले. मात्र आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी घरी गेलो असताना त्यांची बदली करण्यात आली. तेव्हा कपाळावर हात मारून घेण्यापलीकडे आमच्या हातात काही शिल्लक नव्हते. मात्र निदान अन्यायाविरुद्ध लढलो हे काही कमी नाही या विचाराने आम्ही आमच्या मनाचे सांत्वन केले..

त्यानंतर  माझ्या आयुष्यातले एक महत्त्वाचे पर्व सुरू झाले..

२३ ऑक्टोबर १९७२ रोजी माझे सहाध्यायी डॉमनिक फरगोज व माझा होली स्पिरिट चर्च, नंदाखाल येथे दीक्षाविधी पार पडला. जून १९७३ रोजी वसईतील पालीला ‘मदर ऑफ गॉड चर्च येथे साहाय्यक धर्मगुरू म्हणून माझी नियुक्ती झाली. त्या वेळी मी एकोणतीस वर्षांचा होतो. प्रमुख धर्मगुरू फादर पीटर गोम्स हे कोकणी भाषक होते. त्यांचे मराठीचे ज्ञान फारच अपुरे होते, त्यामुळे त्यांनी सर्व कारभार माझ्याच हाती सोपवला. मी दिवसरात्र लोकांच्या सेवेला वाहून घेतले. एका वर्षांत आलेल्या अनुभवामुळे माझ्या धर्मगुरुपदाच्या कार्याला दिशा मिळाली. माझ्यासाठी तो आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याचा श्रीगणेशा ठरला. मुळात मला सामाजिक कार्याची आवड होतीच. आता त्याला रीतसर सुरुवात झाली. त्यासाठी मी जाणीवपूर्वक तरुण-तरुणींबरोबर मैत्री जोडली. त्यांनाही अशा कामाची प्रतीक्षा होतीच. मी त्यांना हाक दिली आणि त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘एक महिना एक गाव’ कार्यक्रम मी ठरवला आणि सर्व तरुणांना एकत्र घेऊन गावागावांना भेटी देण्याचा सपाटा लावला. या तरुणाईमध्ये प्रचंड ऊर्जा होती. आम्ही खेळाचे सामने आयोजित केले. चर्चच्या मदतीसाठी प्रीमिअर शो लावले. त्या चित्रपटांची तिकिटे विकायची जबाबदारी त्यांनीच घेतली. सारेच जण उत्साहात होते. मी त्यांच्याबरोबर हिंडू लागलो. त्यांच्यात बसून खाऊपिऊ लागलो. त्यामुळे त्यांना माझ्याविषयी खूप विश्वास वाटू लागला. पुढे वसईला पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘हरित वसई संरक्षण समिती’ तसेच ‘पाणी बचाव महिला आंदोलन’, ‘एस.टी. वाचवा आंदोलन’, ‘कोलंबी प्रकरण आंदोलन’ करावे लागले, तेव्हा आपसूकच सगळे एकत्र आले. मला व्यक्तिश: फायदा असा झाला की, या तरुणाईच्या सहवासात मला कधीच उदास वाटले नाही. उलट नेहमी कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली.

तो उत्साह आजही माझी साथसोबत करत राहतो.