गजेंद्र अहिरे – gajendraahire@hotmail.com

‘‘प्रथम भुके नं माझ्याकडून लिहून घेतलं आणि नंतर स्वप्नांनी! मला माझं असं काही शोधायचं होतं. समोरची भिंत तोडण्यासाठी मी भिंतीवर डोकं  आपटायला सुरुवात के ली. नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका करताना आलेल्या अनेक बऱ्यावाईट अनुभवांची ही ‘शोधयात्रा’ म्हणजे माझ्या आयुष्यासाठीची तालीम ठरली.. माझ्या गद्धेपंचविशीतील ही सारी र्वष माझा ‘आज’ घडवणारी..’’

The husband killed his wife and son due to suspicion of character
नागपूर ब्रेकिंग : चारित्र्यावरील संशयातून पतीने केला पत्नी व मुलाचा खून, नंतर स्वत:ही संपवले जीवन
I experienced a golden age in advocacy asserted Justice Bhushan Gavai
‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”
kavita medhekar shares emotional memory
“पाच महिन्यांची गरोदर असताना…”, कविता मेढेकरांनी सांगितली भावुक आठवण; म्हणाल्या, “त्या प्रयोगानंतर खूप रडले”
bjp keshav upadhyay article targeting sharad pawar uddhav thackeray and praskash ambedkar
संगीत खंजीर कल्लोळ…

सकाळपासून कॅन्टीनला बसलो होतो. त्यावेळी वय असेल साधारण १९-२० वर्षांचं. मी असाच  दिवसच्या दिवस कॅन्टीनला पडून असायचो. कॅन्टीन म्हणजे आमचं ‘रुईया कॉलेज कॅन्टीन’. जगातली सगळ्यात सुरक्षित जागा होती ती त्या वेळी माझ्यासाठी. संध्याकाळचे पाच वाजले असतील. खूप भूक लागली होती. निवास आला कुठून तरी. माझ्याकडे पैसे नव्हते. तेव्हा कधीच  नसायचे. त्याला म्हटलं खूप भूक लागलीये, खायला घाल. तो उचकला. म्हणाला, ‘‘काहीतरी काम कर आणि मग खा. तुला जे येतं ते काम कर.’’ पाच मिनिटं तसाच बसून राहिलो. मग कँटीनच्या काऊंटरवर जाऊन बिलाचे काँप्युटर पेपर घेतले मागून आणि लिहित सुटलो. अर्धा तास लिहित होतो. भुकेनं काय काय लिहून घेतलं. मग निवासला म्हटलं, ऐक. त्याला वाचून दाखवलं. वाचून निवास अस्वस्थच  झाला. म्हणाला, ‘‘तू असं लिहित राहा.. मी जन्मभर तुला खायला  घालीन..’’

मग मिसळ खाल्ली आम्ही दोघांनी तिथेच बसून आणि मग कट्टय़ावर आलो. तिथे दुसरं वाचन झालं. आता ऐकणाऱ्यांची संख्या वाढू लागली होती. मग इराणी हॉटेलात तिसरं वाचन झालं. ट्रेन पकडून ठाण्याला आलो ‘गडकरी’ला. तिथं चौथं वाचन झालं आणि त्याच रात्री पहिली तालीम झाली. पुढच्या सहा दिवसांत नाशिकला प्रयोग. ‘स्नेहबंध राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा’. एकांकिका दुसरी आली आणि महत्त्वाची सर्व सहा बक्षिसंही मिळाली. महाराष्ट्रभर एकांकिका करणाऱ्या, नाटकात धडपडणाऱ्या सगळ्यांना ती एकांकिका माहीत झाली. ती होती, ‘कॉकी पॉपीची गोष्ट’.  ट्रॉफीही मस्त होती. अप्पासाहेब बेलवलकर यांची छोटी प्रतिकृतीच होती ती. मी आणि प्रवीण नाशिकवरून कसाऱ्याला शेअर टॅक्सीनं आलो आणि नंतर कसारावरून लोकलच्या भर गर्दीतून घेऊन आलो त्या सहा ट्रॉफीज. आई म्हणाली, ‘‘असू दे रे आपल्याकडेच.’’ मी म्हणालो, ‘‘खूप येतील.’’ ते खरंच झालं. आज घरात मात्र राज्य पुरस्कारांच्या २१ ट्रॉफी ठेवल्या आहेत. मग एकांकिकांचे प्रयोग होत राहिले. खूप झाले. विविध ठिकाणी विविध ग्रुप ते करत राहिले.

रुईया कॉलेजनं मला शिकवलं, घडवलं. ‘रुईया नाटय़ वलय’ मातृसंस्था. वृंदा (नंतर बायकोही झाली) इथेच भेटली. संजय नार्वेकर मी लिहिलेली एकांकिका बसवत होता. त्यात ती काम करत होती. एक दिवस खूप पाऊस पडत होता. मी बस स्टॉपवर उभा होतो. कुठल्या दिशेला जावं कळत नव्हतं, म्हणून उभा होतो भिजत. तिनं येऊन छत्री धरली डोक्यावर. अजून धरली आहे, तिचा हात थकला-भागला नाही अजून..

मग कॉलेज संपलं.. पण सतत लिहायचो. रेल्वे स्टेशनवर बसून, कॅन्टीनमध्ये किंवा मराठी ग्रंथसंग्रहालय दादर.. अशी खूप ठिकाणं होती. मी घरातून बाहेर पडलो होतो. मला माझं ओझं घरावर टाकायचं नव्हतं. मला भिंतीवर डोकं आपटायचं होतं आणि भिंत तोडायची होती. मग आयुष्यानं तालीम सुरू केली. लोकल ट्रेन, बॉईज कॉमन रूम, हॉटेल, स्टेशन, कुठेही झोपायचं. मिळेल तिथे, मिळेल ते खायचं. मिलिंद सफईनं खूप मदत केली. डॉक्टर गोडे सर नेहमी हिंमत द्यायचे. अडचणीत कायम मदत करायचे. ‘साक्षरता अभियान’साठी खूप लिहू दिलं त्यांनी मला आणि पैसेही मिळवून दिले. त्यावर दिवस जात होते. माझ्या हातात कायम अरुण साधूंचं ‘शोधयात्रा’ होतं. ते माझ्यासाठी ‘बायबल’ होतं त्या दिवसांमध्ये. कसलीच भीती, काळजी, काहीच वाटायचं नाही मला. ‘रुईया’च्या बॉईज कॉमन रूममध्ये आंघोळ करायचो अनेकदा. मला माहीत होतं, ही परिस्थिती येऊन पडलेली नाही आपल्यावर. आपण ती निवडली आहे. आणि ज्यासाठी हे निवडलं त्याच्या मागे लागलो. हे दिवस मला वाढवायचे नव्हते. पूर्ण लांबीचं नाटक लिहिण्याचा सराव झाला होता.  मी पूर्ण लांबीचं एक व्यावसायिक नाटक लिहिलं. निर्माता मिळाला. दिग्दर्शक माझा मित्र आणि थोडासा गुरू, विनायक. नाटकात काम करायला कुणी तयार होईना. नाव असलेले कलाकार नसतील तर त्या नाटकाचं काय होणार? दिवस भयानक होत चालले होते. रात्र रात्र मी आणि विनायक ठाणे स्टेशनवर चर्चा करत जागायचो. एकदा स्निग्धा आम्हाला म्हणाली, ‘‘तू तरी याला सोड किंवा याने तरी तुला सोडावं.. तू नाववाला दिग्दर्शक शोध किंवा तू नाववाला लेखक शोध. तरच नाटक होईल. नाहीतर निर्माता जाईल.’’ दुसऱ्या दिवशी  ‘गडकरी’ ला निर्माता आणि विनायक एका दुसऱ्या लेखकाचं नाटक वाचताना दिसले, मग एक मोठं राजकारण.. माझं नाटक आलं, पण मी ते नव्यानं लिहिलं होतं. ‘आईचं घर उन्हाचं’. अभिनेत्यांमध्ये नीना कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी, दिग्दर्शक विजय जोशी. नाटकाला त्या वर्षी कौतुक, यश आणि पारितोषिकं मिळाली. मी व्यावसायिक लेखक झालो. विनायकला ‘कमिट’ केलेलं नाटक मी अजून कोणालाही दिलेलं नाही.

नाटक रंगभूमीवर येईपर्यंतच्या त्या दिवसांनी पुढच्या आयुष्यासाठी भरपूर खाद्य पुरवलं.

१९९२ ची दंगल खूप जवळून पाहिली, हिंड हिंड हिंडलो, ट्रकवर क्लीनर म्हणून काम केलं, रात्रीची मुंबई पाहिली.. ‘बोक्या’च्या खोलीवर राहायचो आम्ही चौघे जण. मी आणि बोक्या रात्री चालत  फिरायचो. त्याच्याकडे कॅमेरा होता. तो फोटो काढायचा, चित्रं काढायचा. खूप मित्र आसपास होते. बहुतेक जण असलेच. नाटक, पुस्तक, कविता, फिल्म फेस्टिवल, वडापाव, गाडीवरची भुर्जी, लोकल ट्रेननं ‘विदाऊट तिकीट’ फिरणं, चित्रं, गाणी, हायकिंग, ट्रेकिंग, जागरण, तालमी, रवींद्र नाटय़मंदिर, छबिलदास, रुईया, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स, कॅन्टीन, रस्त्यावरची मुलं.. चाल चाल चालायचो. जाणिवांचा स्टॉक भरत चालला होता. लिहित होतो. ‘उंच माझा झोका गं’ लिहिलं. ‘ऋणानुबंध’ लिहिलं. एकांकिका चालू होत्या. त्याचे पैसे पाठवायचे कोण कोण कुठून कुठून. एम.एस.ई.बी.ची नाटकं, कामगार कल्याण केंद्राची नाटकं बसवून द्यायचो. त्याचे पैसे मिळायचे. ‘एन.एस.डी.’मध्ये (राष्ट्रीय नाटय़ विद्यालय) मी लिहिलेली तीन नाटकं एका वेळी झाली. पडेल ते काम करायचं. अख्खी मुंबई म्हणजे एक सेट लागला होता माझ्यासाठी, लाइटिंग रेडी असलेला! एका ठिकाणी ‘स्पॉटबॉय’ म्हणून काम केलं, एका ठिकाणी ‘असिस्टंट प्रॉडक्शन मॅनेजर’ म्हणजे हरकाम्या, तेही केलं सेटवर. किती लोकांचं ‘युनिट’ असेल, तर किती दूध लागेल, इथपासून अभ्यास झाला माझा. एकदा वर्सोवा ते कांजूरमार्ग मला चालत यावं लागलं. त्या दिवशी ठरवलं, पुन्हा चित्रपटात जाईन तर दिग्दर्शक म्हणूनच.

सतीश पुळेकरांनी कुणाला तरी माझं नाव सुचवलं आणि मला एक ‘एपिसोड’ लिहायला मिळाला. ‘‘तो शेवटचा,’’ असं निर्माते म्हणाले, कारण मालिका तोटय़ात चालली होती. खर्च खूप होता, चार भाग अजून बाकी होते, पण ती ते सोडून देणार होते. मी म्हणालो, ‘‘मी करतो, मला द्या. कितीमध्ये केलं तर परवडेल तुम्हाला?’’ ते नाहीच म्हणाले. मी त्यांना म्हणालो, की आताच्या ‘बजेट’च्या २५ टक्कयांत करतो. त्यांना शक्य वाटेना, पण त्यांनी चान्स घेतला. मी माझा पहिला ‘एपिसोड’ दिग्दर्शित केला. मला काहीच येत नव्हतं. मी डोळे मिटून फटका मारला होता, पण मारला होता. त्याच संध्याकाळी त्या भागाचं पूर्ण चित्रीकरण झालं. निर्माते (खुडे त्यांचं नाव) म्हणाले, की ठरलेल्या ‘बजेट’ मधूनही २००० रुपये वाचले. मग पुढचे तीनही भाग मी केले. त्यांचं नुकसान टळलं आणि त्यांनी मला वर्षभरानं येऊन दहा हजार रुपये दिले. राजन वाघधरे यांनी मला पुढचं काम दिलं आणि मी मालिका लिहिली ‘घरोंदा’, जी सहा भागांमध्ये बंद पडली. पण राजनजींनी विश्वास ठेवला आणि मी त्यांच्या ‘सिटकॉम्स’ लिहू लागलो.

दरम्यान लेकीचा, गोदाचा जन्म झाला तेव्हा मी कोल्हापुरात चित्रीकरण करत होतो. मोहन तोंडवळकर म्हणाले, ‘‘पोस्टपोन करू या. तू घरी जा.’’ मी म्हणालो, ‘‘या दिवसासाठी घरातून निघालो होतो. हे सोडून परत घरी जाऊ?’’ चित्रीकरण संपल्यावर मी मुंबईला आलो. ‘एपिसोड’ टेलिकास्ट व्हायचा होता त्याच्या जाहिराती जमवल्या आणि तो ‘दूरदर्शन’ला सबमिट केला. मग दवाखान्यात आलो, तेव्हा आठ दिवस झाले होते. समाधानानं वृंदा आणि गोदाला भेटलो.

त्यानंतर ‘वक्त की रफ्तार’ मिळाली, चालली. आणि मग मालिका मिळत गेल्या. मी त्या दोन वर्षांत मालिकांचे सतराशे भाग लिहिले. हे प्रसारित झालेल्या भागांचे आकडे आहेत. ५२८ भाग एकटय़ा ‘वक्त की रफ्तार’चे होते. इथे रियाज पक्का झाला. तीन ‘डेली सोप’ आणि दोन ‘वीकली शो’ एकावेळी  लिहित होतो. त्या त्या सेटवर जाऊन त्या त्या दिवशी चित्रित होणारे प्रसंग लिहायचो. पाच ते शेकडो व्यक्तिरेखा एकावेळी डोक्यात होत्या. बाईकवर फिरायचो. एखादं चित्रीकरण मढला, एखादं जुहूला, एखादं एस्सेल स्टुडिओ- तुर्भेला. दोनेक महिने डोकं दुखत होतं. एक दिवस कळ आली मानेपासून कपाळापर्यंत आणि काही दिसायचंच बंद झालं. शुद्धीवर आलो तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो. थोडक्यात जीव वाचला होता.

मला मुंबईमध्ये जगण्याचं सामान गोळा करायचं होतं. त्यासाठी सारा आटापिटा होता हा. कारण एक प्रसंग घडला होता. वृंदाकडे आठशे रुपये होते, तिनं चारशे रुपयांचा वातीचा स्टोव्ह घेतला आणि चारशे रुपयांचे मला बूट घेतले. एकदा तो वातीचा स्टोव्ह भडकला, तिचे केस जळाले. मी तो फेकून दिला आणि पुन्हा भिंतीवर डोकं आपटायला बाहेर पडलो होतो. जगायला जे लागतं ते गोळा केलं. हॉस्पिटलच्या प्रकारानंतरही लिहिणं थांबलं नाही. मग मी बाहेरही लिहू लागलो. ‘बालाजी’मध्ये लिहिलं, ‘यू टीव्ही’मध्ये लिहिलं..  कुणीच माझ्याविषयी खात्रीनं बोलू शकत नव्हतं तेव्हा. पण वृंदाला ती खात्री वाटत होती. आम्ही दिवसच्या दिवस सोबत असायचो. एक बिस्कीटचा पुडा अर्धा चहात बुडवून खायचो, ते जेवण असायचं. पावसाळ्यात एक कणीस अर्ध अर्ध. पण खूप आनंदात होतो आम्ही. भारी दिवस होते. मी नुसता भटकत नव्हतो. माझ्या झोळीतून पुस्तकं भटकायची माझ्याबरोबर, भरदिवसा स्वप्नं भटकायची डोळ्यांतून.. खऱ्या अर्थानं घडण्याचा काळ होता तो. मी, निवास, प्रवीण- आम्ही ‘कास प्लॅन’मध्ये नोकरी करायचो. सहा महिन्याचं ‘कॉन्ट्रॅक्ट’. अठराशे रुपये पगार होता. विक्रोळीपासून भांडूपपर्यंत पसरलेल्या डोंगरावरच्या वस्त्यांमध्ये हिंडून काम होतं. मला या गल्लय़ा चांगल्या माहीत होत्या, कारण मी इयत्ता सातवी-आठवीत असताना तिकडे रस्त्यांवर आणि गल्लय़ांमध्ये फिरून फुगे विकायचो. निवास पुढे ‘एम.एस.डब्ल्यू.’साठी गेला. त्याच्या मागोमाग मग मीपण भटकलो. रस्त्यावरची मुलं, ‘क्राय’, ‘आशा सदन’, डोंगरी बालसुधारगृह, असं खूप काही जवळून पाहात राहिलो. रस्त्यावरची मुलं म्हणजे काय, त्यांचं काय होतं, ती कुठून येतात, कुठे जातात, ते काय जगणं आहे, हे जवळून पाहिलं.

याच वेळी पहिली मराठी जागतिक परिषद झाली. गार्गी पवारनं मला विनय नेवाळकर यांच्याकडे पाठवलं. मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन थांबू लागलो. तिथे खूप मोठी मोठी माणसं यायची.  राजदत्त, जब्बार पटेल, यशवंत दत्त, सुबोध गुरुजी, सुधीर नांदगावकर, खूप लोक. मी चहा देणं, भजी आणण्यापासून आलेले फोटो, पत्रं नीट लावून ठेवण्यापर्यंत पडेल ते काम करायचो. ती माझी मोठी शिकवणी होती. ही मंडळी आली की तासंतास चित्रपटावर बोलायची. ‘सिनेमा आणि सिनेमा’ या परिषदेत तोवरच्या मराठी चित्रपटांची पूर्ण माहिती असलेली स्मरणिका प्रकाशित होणार होती. ती तयार होण्याच्या कामाचा मी एक भाग होतो.

खरं तर मला नाटक शिकवलं जगतकुमार सरांनी. मला दहावीला ३९ टक्के होते फक्त. कुठेही अ‍ॅडमिशन मिळत नव्हती. अखेर मिळाली तर ती थेट ‘रुईया’ला. कॉलेजच्या पाचव्या दिवशी मी ‘नाटय़ वलय’कडून रेडिओच्या कार्यक्रमात होतो. त्या वर्षी जगतकुमार सर ‘रुईया’साठी एकांकिका बसवणार होते. मी त्यांच्या मागे मागे ते जातील तिकडे गेलो दिवसभर. अगदी दादर स्टेशनपर्यंत. शेवटी चिडून ते अंगावर आले! पण मला भूमिका मिळाली त्या एकांकिकेमध्ये. ते भाईंदरवरून यायचे अगदी वेळेत आणि आले की तालमीच्या खोलीला आतून कडी लावायचे. उशिरा येणारी मुलं बाहेरच राहायची. तीन दिवसात सगळे वेळेत येऊ लागले. तीन महिने तालमी चालल्या. ती एकांकिका ‘कोळीया राजा’. ती जिथे जिथे गेली तिथे तिथे पहिली आली. पहिलं येण्यासाठीचे परिश्रम मी तिथे पहिल्यांदा पाहिले. तीन महिन्यांत मी अनेकदा जगतकुमार सरांचा मार खाल्ला. शिव्या रोज  खायचो. मी त्यांचा मार खाल्ला, पण माझ्या करिअरसाठी इंधन म्हणून आजही तो मार कामी येतो मला.

‘वक्त की रफ्तार’साठी लेखक म्हणून मी पहिल्यांदा जेव्हा गेलो, तेव्हा मी आठवा होतो. सात लेखक गेले सहा महिने काम करत होते. मला दोन प्रसंग लिहून आणायला सांगितले. मी पुढच्या पाच मिनिटांत ते लिहून गौतम सरांच्या केबिनचं दार वाजवलं. त्यांनी विचारलं, ‘‘हो गया?’’ ‘हो’ म्हणालो. ते म्हणाले वाच. मी वाचले. त्यांनी आशीष पाटील आणि ज्ञानेश भालेकरला सांगितलं, ‘‘कल आठ बजे’’ आणि ते गेले. दुसऱ्या दिवशी मी आठला पाच मिनिटं असताना ऑफिसच्या दारात होतो. एक दोन मिनिटांत आशीष आला, पाठोपाठ गौतम भैया आले. आठला दार आतून लावून घेतलं. बाकी लेखक मंडळी बेल वाजवत राहिली दहा-अकरा वाजेपर्यंत पुढे. गौतमभाईंनी दार उघडायचं नाही असं सांगितलं. माझ्यावर त्यांनी विश्वास टाकला आणि अख्खी मालिका माझ्या हातात आली. आयुष्यातला ‘टर्निग पॉइंट’. मुंबईत जगायचं सामान गोळा करू शकलो. मुंबईचा तुफान पाऊस तरीही मी चित्रीकरणाला पोहोचलोय, वाचनाला पोहोचलो, तालमींना पोहोचलो.. आजवर कुठेही पाच-दहा मिनिटं उशीर झाल्याचं मला आठवत नाही. हे सगळं जगतकुमार सर मला देऊन गेले.

मालिका लिहित बरं चाललं होतं, पण आता मला चित्रपट करायचा होता. सारं त्यासाठीच तर होतं. त्याच वेळी ‘अल्फा मराठी’ चालू झालं होतं. ‘बंदिनी’ लिहित असताना आदितीशी (आदिती देशपांडे) भेट झाली. आम्ही निर्मिती संस्था सुरू केली. ‘पाऊस येता येता’, ‘रेशीमगाठी’, ‘श्रावणसरी’ अशा ठरावीक भागांच्या मालिका केल्या. मग एक ‘डेली सोप’ करायला घेतली- ‘अथांग’. सकाळी नऊपर्यंत मी सीन लिहायचो आणि त्यानंतर दिग्दर्शक म्हणून काम सुरू करायचं. ७० भाग केले. लतादीदी गायल्या, पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत केलं होतं. त्याच वेळी ‘अल्फा मराठी’नं एक मोठा प्रोजेक्ट दिला.  एक ‘डेली सोप’ मालिका करायची होती. मी आणि माझा सहाय्यक राजू सावंत कर्जतवरून पुण्याला जायला निघालो पहाटे. घाटातून जाताना गाणं लागलेलं, ‘नदीला पूर आलेला कशी येऊ..’ आणि कथा सुरू झाली डोक्यात. पुणे येईपर्यंत सगळं व्यवस्थित  शिजलं. पोहोचलो, निर्मात्यांना कथा ऐकवली आणि काम सुरू के लं. फार सुंदर अनुभव होता तो.  एका वेगळ्या जगात गेलो होतो आम्ही. लोकांना ती मालिका आवडली. उत्कृष्ट पटकथा, दिग्दर्शन, छायाचित्रण आणि मालिका अशी बक्षिसं मिळाली. ती होती, झाले मोकळे आकाश.

आता चित्रपट गळ्याशी आला होता. धडका देत होता. मी सगळं सोडून दिलं. सहा महिने काहीच केलं नाही. पुन्हा भटकलो. पटकथा तयार केली, ‘बजेट’ बनवलं. दहा लाख रुपयांचं बजेट होतं. पंचवीस लोकांकडे फिरलो. कुणी दाद देईना. मार्केटिंगमधल्या एका मोठय़ा माणसानं सांगितलं, की पंचवीस लाख सांग, तुला निर्माता मिळेल. १० लाखांत चित्रपट बनेल यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. पण माझं बजेट तेवढंच होतं. पाच लाख रुपये देणारा माणूस भेटला. पण त्याचं म्हणणं होतं, की आधी पाच लाख मी टाकावेत. पुन्हा समोर भिंत. वृंदा म्हणाली, ‘‘हेच तर करायचं होतं, हेच करू या.’’ तिनं जमवलेलं जमेल तसं विकलं आणि मला पैसे दिले. काम सुरू झालं आणि आधी पैसे द्यायला तयार झालेला ‘बॅक आऊट’ झाला. पण कोणीतरी उभं राहातंच. ‘मोरया कन्स्ट्रक्शन’च्या उत्तम झवर सरांनी पैसे पाठवले. मला कधी भेटले नव्हते ते. कोणीतरी त्यांच्यापर्यंत ही घटना पोहोचवली होती. पुढे पैसे लागत गेले. वृंदानं उरलंसुरलं जमवलेलं देऊन टाकलं. चित्रपट पूर्ण झाला, ‘कृष्णाकाठची मीरा’. पण पुढे काहीच हाताशी नव्हतं. निवासनं एका महिन्याचं रेशन भरलं. शब्द पाळला त्यानं. राज्य शासनाच्या स्पर्धेत तीन राज्य पुरस्कार मिळाले  या चित्रपटाला आणि तो चित्रपट इंडस्ट्रीत पाहिला गेला. वृंदाला पदार्पणात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक म्हणून आठ हजार रुपये मिळाले. ते पैसे आणि तो आनंद पुरला काही दिवस. आदितीनं ‘अ‍ॅडव्हान्स’ ठेवला हातावर. पुन्हा प्रयत्न कर म्हणाली. आमच्या आधीच्या मालिका निर्मितीतले काही पैसे उरले होते तिच्याकडे. त्यातून कौशलनं (इनामदार) गाणी तयार करायला घेतली. आदितीनं कर्ज काढलं, त्यासाठी तिनं फ्लॅट गहाण ठेवला आणि चित्रीकरण सुरू झालं.  आम्ही ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ केला. त्या वर्षीची राज्य शासनाची १२ पारितोषिकं  या चित्रपटाला होती. ‘रजत कमळ’- राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा चित्रपट ‘इंडियन पॅनोरमा’साठी निवडला गेला. पुण्यात ‘प्रभात’मध्ये पंचवीस आठवडे चालला. या सिनेमानं मला चित्रपट दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून दिली. मी ‘फिल्ममेकर’ झालो.

पुढल्या प्रवासात मी समुद्र पार करून गेलो. स्वीडनमध्ये स्वीडिश कोलॅबोरेशनचा चित्रपट केला. स्वीडिश रंगभूमीसाठी एक नाटक करतोय. या वर्षी माझ्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी माझा पन्नासावा चित्रपट पूर्ण केला मी. माझं डोकं अजूनही शाबूत आहे. आणि मी फोडण्यासाठी नवीन भिंत शोधतोय.