गणपतीचे दिवस म्हणजे वातावरणामध्ये उत्साह / प्रसन्नता / पावित्र्य आणि आध्यामिकता भरून राहिली आहे.  भाद्रपद शुक्ल पंचमी अर्थात ऋषी पंचमीचा दिवस म्हणजे गुरुवंदना. पावसाळा हळू हळू कमी होतोय. भाज्यांमध्येसुद्धा विविधता बघायला मिळते. सिंधींची साई-भाजी, गुजराथी उंधियो, दक्षिणेकडची अविअल आणि मराठमोळी ऋषीची भाजी. कल्पना एकच पण चवीमध्ये मात्र विविधता. या भाजीची अजून एक खासियत म्हणजे कोणतेही मसाले न वापरता मिळणारी भाजीची मूळ चव! करायला अतिशय सोप्पी. बऱ्याच घरांमध्ये अजूनही ही पारंपरिक भाजी बनवली जाते.
ऋषीची भाजी
साहित्य : भेंडीचे तुकडे, अळूची पाने / लाल माठ /  चवळी / आंबट चुका / अंबाडी भाजी, पडवळाच्या चकत्या, लाल भोपळ्याच्या फोडी , मटार / पापडी / मक्याचे  दाणे, शेंगदाणे (भिजवलेले), चिंच कोळ , हिरवी मिरची, ताजा खवलेला नारळ, तूप, जिरे, मीठ
   कृती : कोणतीही पालेभाजी शिजवून मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. वाटताना मिरचीही घालावी. तूप-जिऱ्याची फोडणी करावी. त्यामध्ये सर्व भाज्या फोडणीस घालाव्यात. थोडा वेळ परतून वाटलेली पालेभाजी घालावी. चिंचेचा कोळ घालावा. चवीपुरते मीठ आणि भाज्या शिजण्यापुरते पाणी घालावे.
मध्यम आचेवर साधारण १५ मिनिटे भाजी शिजू द्यावी. आणि ओला नारळ घालून एकत्र करावे. एक उकळी काढावी. गरमागरम भाजी दशमीबरोबर खाण्यास द्यावी.
तिखटाची दशमी
साहित्य : १ कप गव्हाचे पीठ, १/२ कप बेसन, २ टीस्पून लाल मिरची, १ चमचा गरम मसाला, १ टीस्पून धणे – जिरे पूड , दीड टीस्पून ओवा, कोथिंबीर, थोडे तेल.
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करावे. त्याची मऊ  कणीक भिजवावी.  तव्यावर खरपूस भाजावी. गरम असताना तूप लावावे. भाजी आणि दशमी – एकदम उत्तम मेनू. आपल्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे तेलाचे मोहन घालून दुधात कणीक भिजवावी. पण वयाप्रमाणे आणि प्रकृतीप्रमाणे मूळ रेसिपी थोडीशी बदलली तरी चालेल.
ऋषी म्हणजे ज्याचं जीवनच आध्यात्मिक बनलं आहे आणि जो सर्व मोह-मायांपासून अलिप्त झालाय! जे साधनेतूनच शक्य आहे. ऋषी पंचमीच्या दिवशी सप्त ऋषींचं स्मरण आणि पूजन अतिशय महत्त्वाचं आहे. ऋषींचा आहार म्हणजे कंदमुळं आणि फळं. म्हणून ऋषीची भाजी पंचमीच्या दिवसासाठी अतिशय समर्पक. कदाचित आपल्याला हा संदेश असेल -जिभेचे चोचले न पुरवता शुद्ध, सात्त्विक आणि नैसर्गिक चवीमध्ये बदल न करता शरीर आणि आत्मशुद्धी करावी!