News Flash

आंतरिक उन्मीलन kkishore19@gmail.com

उन्मीलनाच्या प्रक्रियेतून मुक्त होणारी ऊर्जा, आपल्या अंतरंगात खोलवर दडलेल्या गोष्टींनाही चालना देऊन घट्ट झालेल्या गोष्टींचा जेव्हा निचरा होऊ लागतो,

| December 21, 2013 07:38 am

उन्मीलनाच्या प्रक्रियेतून मुक्त होणारी ऊर्जा, आपल्या अंतरंगात खोलवर दडलेल्या गोष्टींनाही चालना देऊन घट्ट झालेल्या गोष्टींचा जेव्हा निचरा होऊ लागतो, तेव्हा आपल्यात एक रिक्तता निर्माण होऊ लागते. ही भकास, मृतवत रिक्तता नसते, तर उत्कटतेच्या ऊर्जेने ओतप्रोत भरलेली रिक्तता असते.
ती एक अतिसुंदर बाग होती; उत्तम प्रकारे निगा राखण्यात आलेली. दिवसाची उन्हं कमी होऊन संध्याकाळ होत आलेली होती व हवेत वाढणारा गारवा अंगाला सुखकारक वाटत होता. बागेत आता लोकांची गर्दी होऊ लागली होती व अनेक प्रेमी युगुलं तेथील बाकांवर निवांतपणे बसून गप्पा मारत होती. त्या बागेत फुलांचे अनेक वाफे होत व त्यात नाना तऱ्हेची फुलं होती. काही पूर्ण उमललेली, काही अधरेन्मीलित तर काही कळ्यांच्या अवस्थेतील. ती फुलं बघताना स्वत:च्या अस्तित्वाचं भान विसरायला होत होतं. पूर्णोन्मीलित फुलं म्हणजे निसर्गाचा सौंदर्याविष्कारच होतो. ती इतक्या उत्कटपणे उमललेली होती, की त्यांच्या उमलण्याला पाकळ्यादेखील कमी पडत होत्या. अत्यंत नाजूक व सुकोमल अशा त्या फुलांमध्येदेखील उत्कटतेची ती प्रचंड ऊर्जा होती जी स्वत:तील सर्व काही उन्मुक्तपणे उधळून देण्यास उत्सुक होती. अधरेन्मीलित फुलं बघताना वाटत होतं, की किती घट्ट धरून ठेवल्या आहेत पाकळ्या यांनी, एखाद्या घट्ट झाकलेल्या मुठीसारख्या. मूठ एकदम उघडली तर पाकळ्या गळून पडतील. पूर्णपणे उमलण्यासाठी यांनी फक्त स्वत:ला थोडं सैल सोडणं आवश्यक आहे. उमलण्याची उत्कटता व घट्ट झाकून ठेवण्याची प्रवृत्ती यांच्यातील समतोल राखत अत्यंत धीराने व हळुवारपणे उमलण्याची प्रक्रिया घडत असते. तेथे कोणत्याही प्रकाराची घाई-गडबड ही घातक ठरते. कळ्यांच्या अवस्थेतील फुलं मात्र अजून सुप्तच होती. आपल्यातील सर्व संभावनांची जपणूक करत स्वत:तच मिटलेली, बाहेरच्या जगतापासून पराङ्मुख असलेली. सकाळच्या कोमल सूर्यकिरणांच्या उबदार वर्षांवाने त्यांच्या उन्मीलित होण्याच्या उत्कटतेला चालना मिळून त्यांच्यातील उन्मीलनाची प्रक्रिया चालू होणार होती. माणसाचं जीवन इतक्या सुंदरपणे सहज उलगडत का जात नाही?
खरंच माणसाचं जीवन इतकं कुरूप का आहे? त्यात इतका ओंगळपणा, स्वार्थ, भ्रष्टाचार, हिंसा का आहे? निसर्गाने मानवाला इतकं कुरूप का घडवलं आहे? असं तर नाही ना, की या कौरूप्याला मनुष्य स्वत:च पूर्णपणे जबाबदार आहे? माणसाची तथाकथित प्रगती ही इतक्या एकांगी मार्गाने का चाललेली दिसते? विज्ञान, माहिती, तंत्रज्ञान यांच्या साह्य़ाने आपल्या भौतिक जीवनात आश्चर्यकारक बदल घडवून आणणारा मानव आंतरिकदृष्टय़ा इतका मागासलेला का आहे? त्याच्यातील उपजत सौंदर्याचा आविष्कार त्याच्या रोजच्या जीवनात घडताना का दिसून येत नाही? की हे सुंदरतेचं अंग मुळातच त्याच्यात नाहीये?
निसर्गातील सुव्यवस्था व पूर्णत्व बघितल्यावर निसर्गाचाच एक भाग असलेला मानव जात्याच इतका अव्यवस्थित व कुरूप कसा असू शकेल? साहजिकच आहे, की मानवाच्या सध्याच्या अवस्थेला मानवच पूर्णपणे जबाबदार असला पाहिजे. माणसाने आपलं जीवन इतकं भ्रष्ट व संघर्षमय का बनवून टाकलं आहे?
मनुष्य हा विचार करणारा प्राणी आहे व विचाराद्वारे त्याने आपल्या भोवतालचं जग निर्माण केलं आहे. विचाराची स्वत:ची एक तर्कसंगतता, एक व्यवस्था असते. त्या अंतर्गत जोपर्यंत विचार कार्य करतो, तोपर्यंत तो सयुक्तिक असतो, गोंधळ निर्माण करत नाही. परंतु विचार ही एक द्रव्यात्मक, जड प्रक्रिया असल्यामुळे ती स्वयंचलित नसते तर तिला चालवण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ही ऊर्जा माणसाच्या मानसशास्त्रीय घडणीतून मिळत असते. ही मानसशास्त्रीय घडण म्हणजे माणसाचा स्वभाव, त्याची मानसिकता. पृथ्वीवर अस्तित्वात आल्यापासून माणसाची जगण्यासाठीची धडपड चालू आहे व या धडपडीतूनच त्याचा आत्ताचा स्वभाव, त्याची मानसिकता तयार झाली आहे. ही मानसिकता त्याच्या विचारयंत्रणेला चालना देत असते. माणसाच्या स्वभावात अजूनही भय, क्रोध, द्वेष, हिंसा, वासना, महत्त्वाकांक्षा, अहंकार इत्यादी गोष्टी भरलेल्या आहेत. किंबहुना या गोष्टींनीच त्याचा स्वभाव बनलेला आहे. साहजिकच अशा प्रकारचा स्वभाव जेव्हा विचारयंत्रणा चालवतो तेव्हा तो तशा प्रकारचेच विचार व त्या विचारांच्या अनुषंगाने येणाऱ्या क्रिया निर्माण करतो. मानवी स्वभावातील हे घटक विघटनकारी व म्हणूनच संघर्ष निर्माण करणारे आहेत. तेच आपल्या विचारयंत्रणेला भ्रष्ट करून टाकतात.
अशा प्रकारे माणसाच्या आत्ताच्या अवस्थेला त्याची मानसिकता, त्याचा स्वभावच कारणीभूत आहे. माणसाच्या आत जे आहे तेच तो बाहेर व्यक्त करत असतो व बाहेर जे काही घडत असतं तेच त्याच्या अंतरंगात जाऊन वसत असतं. ही जडण-घडणाची प्रक्रिया मानवाच्या जीवनात सातत्याने चाललेली असते व त्यातूनच त्याची आंतरिक पाश्र्वभूमी तयार होत असते. ही आंतरिक पाश्र्वभूमी मग त्याच्या जीवनाचा आधार बनते. प्रत्येक मनुष्य आपल्या आपल्या जगण्यातून ही पाश्र्वभूमी अधिकाधिक घट्ट, वैविध्यपूर्ण व समृद्ध बनवत असतो. परंतु कितीही समृद्ध केली तरी ही पाश्र्वभूमी मर्यादितच राहते व त्यावर आधारित मानवी जीवनदेखील मर्यादितच बनतं. मानवी विचारयंत्रणेला चालवू शकणारी अशी ऊर्जा नाही का, की जी विघटनकारी नाहीये?
आपण गोष्टींना इतक्या घट्टपणे का पकडून ठेवलेलं असतं? मग त्या भौतिक पातळीवरील पैसा-अडका, संपत्ती, व्यक्ती, विविध वस्तू असोत अथवा मानसशास्त्रीय पातळीवरील संकल्पना, उद्दिष्टं, इजा, दु:खं असोत. आपण त्यांच्याशी इतकं एकरूप झालेलो असतो, की आपण त्यांना घट्ट पकडून ठेवलं आहे, याचंही आपल्याला भान राहत नाही व याच गोष्टी मग आपलं जीवन बनून जातात. कोणत्याही गोष्टीला घट्ट पकडून ठेवणारे मानसशास्त्रीय पाश म्हणजे आसक्ती होय. ज्या गोष्टीसंबंधी आपण आसक्त होतो तीच गोष्ट मग आपलं जीवन बनते.
प्रत्येक सजीवाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अस्तित्वाची संवेदना. ही संवेदना ज्या गोष्टींमुळे त्याच्या आत तयार होते, त्या गोष्टींकडे तो स्वाभाविकपणे आकर्षिला जातो. त्या गोष्टींद्वारे ही जिवंत असण्याची संवेदना पुनपुन्हा अनुभवून त्याच्या आत त्या गोष्टीसंबंधी आसक्ती निर्माण होते व मग त्या गोष्टी त्याच्या अस्तित्वाशी बांधल्या जातात. मानवेतर सजीवांमध्ये ही प्रक्रिया उपजतबुद्धीच्या (इन्स्टिंक्ट) पातळीवर चाललेली असते तर मानवामध्ये ती मानसशास्त्रीय पातळीवरदेखील चाललेली असते. आपल्या आत निर्माण होणाऱ्या विविध संवेदनांमधूनच आपल्याला आपण जिवंत असल्याची जाणीव होत असते व ही जाणीव टिकवून ठेवण्यासाठी संवेदना निर्माण करणाऱ्या गोष्टींना आपण घट्ट धरून ठेवलेलं असतं. कोणत्याही बाह्य़ अथवा आंतरिक गोष्टींनी निर्माण केलेल्या संवेदनांवर अवलंबून न राहता माणसाला आपल्या अस्तित्वाची जाणीव होऊ शकते का?
आपल्या अस्तित्वाचं स्वरूप समजावून घेण्यासाठी मनुष्य जेव्हा आपल्या अंतरंगात डोकावू लागतो व अवधानपूर्वक तेथील गोष्टींकडे बघू लागतो, तेव्हा त्याच्यातील आसक्तीचे पाश सैल होऊ लागतात. जिज्ञासेतून निर्माण होणारी उत्कटता व जिवंतपणाची जाणीव करून देणाऱ्या घटकांना घट्ट धरून ठेवणारी आसक्ती यांच्यात जेव्हा समतोल साधला जातो तेव्हा आंतरिक उन्मीलनाची प्रक्रिया सुरू होते. आपल्या आत जे जे काही बरे-वाईट आपण गोळा करून ठेवलेलं आहे ते ते सर्व उन्मीलित होऊ लागतं. कोणतीही गोष्ट जेव्हा पूर्णपणे उमलते, तेव्हा ती आपलं संपूर्ण अंतरंग उद्घाटित करते. काहीही लपवून ठेवत नाही. तेव्हाच त्या गोष्टीचं समग्र आकलन शक्य होतं.
 पूर्णोन्मीलित गोष्टीचा जीवनकाल जेव्हा संपुष्टात येतो तेव्हा ती गोष्ट कोमेजलेल्या फुलाच्या पाकळ्यांप्रमाणे सहजपणे गळून पडते, स्वत:चा कोणताही अवशेष मागे न ठेवता. उन्मीलनाच्या या प्रक्रियेतून मुक्त होणारी ऊर्जा, आपल्या अंतरंगात खोलवर दडलेल्या गोष्टींनाही चालना देऊन घट्ट झालेल्या गोष्टींचा जेव्हा निचरा होऊ लागतो, तेव्हा आपल्यात एक रिक्तता निर्माण होऊ लागते. ही भकास, मृतवत रिक्तता नसते, तर उत्कटतेच्या ऊर्जेने ओतप्रोत भरलेली रिक्तता असते. अशा रिक्ततेतच उन्मुक्ततेच्या आनंदलहरी उमटू लागतात ज्या आपल्याला अस्तित्वाची जाणीव करून देतात-कोणत्याही बाह्य़ अथवा आंतरिक आलंबाशिवाय. या जाणीवेतून मग आपल्या अस्तित्वाचं एक वेगळंच दालन उघडलं जातं, जे प्रेममय असतं. आपल्या अस्तित्वाचं निखळ स्वरूप हे प्रेममयच आहे. माणसाने आपल्या विचारांनी ते कलुषित करून टाकलं आहे. किंबहुना मनुष्य इतकं विचाराधीन जीवन जगत असतो, की प्रेमाचा हा आयाम त्याच्यात उद्घाटितच झालेला नसतो. हे प्रेम म्हणजे आसक्ती नव्हे, संवेदन नव्हे, दोन व्यक्तींमधील लैंगिक आकर्षणही नव्हे. हा तो परिसस्पर्श आहे जो ओसाड व शुष्क जीवनालादेखील बहर आणतो, स्वनिर्मित मानसशास्त्रीय तुरुंगात जगणाऱ्यांमध्ये उन्मुक्ततेचा श्वास भरतो व दु:ख आणि निराशा यांच्या गर्तेत सापडलेल्या जीवांमध्ये जगण्याची उमेद पल्लवित करतो. प्रेम आहे तर जीवन आहे. प्रेम नाही तर काहीच नाही.     
(समाप्त)                                                                                                                          
किशोर खरनार, संचालक, कृष्णमूर्ती एज्युकेशन ट्रस्ट.
संपर्क : kkishore19@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 7:38 am

Web Title: garden
Next Stories
1 उत्तरांकडे..
2 पालकांच्या प्रबोधनाची गरज
3 गाऊ त्यांना आरती
Just Now!
X