20 June 2019

News Flash

गच्चीवरची बाग : विटांचे वाफे..

प्लॅस्टिकच्या पिशव्या, गळक्या बादल्या वा वेताच्या करंडय़ांप्रमाणेच गॅलरीत/गच्चीवर पुरेशी जागा असेल तर किंवा जमिनीवरच आपण विटांचे वाफे करू शकतो. यात भाज्या चांगल्या येतात.

| May 23, 2015 01:02 am

प्लॅस्टिकच्या पिशव्या, गळक्या बादल्या वा वेताच्या करंडय़ांप्रमाणेच गॅलरीत/गच्चीवर पुरेशी जागा असेल तर किंवा जमिनीवरच आपण विटांचे वाफे करू शकतो. यात भाज्या चांगल्या येतात. गच्चीवर वाफे विविध तऱ्हेने बनवू शकतो. वाफा िभतीलगत असल्यास त्याची रुंदी अडीच फुटांपेक्षा जास्त नसावी. लांबी कितीही चालू शकेल.
जर वाफा टेरेसच्या मधोमध असले तर चार ते साडेचार फूट रुंद असावा. लांबी कितीही चालू शकेल. आपल्या टेरेसचे बांधकाम जुने असेल तर त्यावर सिमेंट काँक्रीटचा एक इंच थर द्यावा. तो दोन-तीन दिवस पाणी टाकून पक्का करावा. त्यावर विटा कैची पद्धतीने टेरेसलगत रचाव्यात. तसेच कायम स्वरूपी करायचे असल्यास सिमेंट- वाळूचा वापर करून बांधकाम करून घ्यावे. या वाफ्यांची खोली १२ ते १६ इंचांपेक्षा अधिक नसावी. आपल्याला टेरेसची खात्री असो की नसो वरील प्रकाराला फाटा देऊन प्लॅस्टिक कागद अंथरून त्यावर विटांचे वाफे तयार करता येतात. पण या प्रकारात आपणास दर दोन वर्षांनी वाफ्याची जागा बदलणे गरजेचे आहे.
आपल्या टेरेसची खात्री नसेल किंवा थोडय़ा उंचीवर वाफे करण्याची इच्छा असल्यास तसे वाफेही साकारता येतात. हा प्रकार थोडा खर्चीक आहे. िप्लथ वॉलच्या लगत व टेरेसवर एक फूट उंचीवर दुहेरी विटांच्या साहाय्याने जागोजागी उंची करावी. त्यावर कडप्पा ठेवावा. कडप्प्यावर एकेरी, दुहेरी विटांचे वाफे करता येतात. तसेच विटांऐवजी बाजूला कडप्प्यांचाही वापर करता येतो. कडप्प्यांना एक इंचाचा उतार द्यावा. या वाफ्यातून निचरा होणाऱ्या पाण्याचा आपल्याला पुनर्वापर करता येतो. या वाफ्याचा दुसरा फायदा म्हणजे बागकाम करण्यासाठी आपल्याला खूप खाली वाकण्याची गरज पडत नाही. त्यामुळे ज्येष्ठ मंडळींना या प्रकाराचा खूप फायदा होतो. तसेच या प्रकारामुळे वाफ्यांखालील जागा कुंडय़ा किंवा इतर बाग साहित्य (पाण्याची नळी, विळा, टोपले, फावडे) ठेवण्यासाठी करता येतो.
मात्र, हा प्रकार िप्लथ वॉलच्या बाजूनेच साकारता येतो. टेरेसच्या मध्यभागी नाही. सलगपणा व सारखेपणा आल्यामुळे बागेला एक सुसूत्रता येते. तसेच या प्रकारच्या वाफ्यात ठिबक सिंचनाचाही सोयही करता येते.

First Published on May 23, 2015 1:02 am

Web Title: garden on the terrace