नीरजा

आक्रमकता हा आपला स्वभाव वाऱ्यावर सोडून देऊन निघालेला, संवादावर विश्वास ठेवायला सुरुवात करणारा पुरुष आपल्या आजूबाजूला आहे. फक्त तो दिसत नाही आपल्याला आणि त्याला स्वत:लाही. असा पुरुष जर पुरुषानंच स्वत:तून शोधून बाहेर काढला तर सारंच किती बदलून जाईल. लिंगसत्तेचा आग्रह न धरता स्त्रीपुरुष समानता म्हणजे नेमकं काय आहे हे आता समजून घ्यायला हवं..

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
young woman saved a caged dog in a burning building shocking video goes viral on social media
जीवाची पर्वा न करता तरुणीने वाचवला पेटत्या इमारतीमध्ये फसलेल्या कुत्र्याचा जीव, VIDEO पाहून येईल अंगावर काटा

अलीकडेच एक लघुपट पाहण्यात आला. तीन मित्रांच्या ‘साहसा’ची कथा सांगणारा. कोणतं साहस होतं हे? यातल्या एका पात्राला- म्हणजे विनयला त्याचा मित्र समीरचा मेसेज येतो. त्याच्या घरी संध्याकाळी सात वाजता भेटण्याचा. हाच मेसेज समीर दुसऱ्या मित्रालाही पाठवतो. विनय तयार होतो. बाहेर टी.व्ही. पाहत बसलेल्या बायकोचं लक्ष त्याच्या हालचालींकडे असतं. तो तयारी करत असताना स्वयंपाकघरात फ्रीज, ड्रॉवर उघडल्याचे आवाज येतात आणि नंतर जॅकेटच्या आत काहीतरी भरून ‘समीरकडे जातो.’ असं सांगून विनय बाहेर पडतो. बायको थोडी आश्चर्यचकित, थोडी अस्वस्थ होऊन लगेच समीरच्या बायकोला फोन लावत ‘ती कुठं आहे’ असं विचारते. समीरची बायको आईकडे आलेली असते मावशीला भेटायला. समीरचे कार्यालयामधले सहकारी येणार असल्यानं तो आला नाही सोबत असं सांगितल्यावर विनयची बायको कोडय़ात पडते. ‘विनय तुमच्याच घरी गेलाय,’ असं समीरच्या बायकोला सांगते. दोघींच्याही लक्षात येतं, नेमका काय बेत असणार त्यांचा. समीरची बायको ‘बघतेच आता’ असं म्हणून आपल्या घरी परतते. किल्लीनं हळूच दार उघडते. आपल्या नवऱ्याला ‘रंगेहाथ’ पकडण्याचा विचार तिच्या मनात असतो. ते काय करत असतील हे तिच्याप्रमाणे आपल्यालाही माहीत असतं. दारूच्या बाटल्या समोर दिसणार याची आपण कल्पना केलेली असते. पण ती आत शिरल्यावर जे दृश्य पाहते त्यानं आपल्यालाही धक्का बसतो. एक अनपेक्षित पण सुखद धक्का. तीन मित्र स्वयंपाकघरात आहेत. दोघे खाली बसून चकल्या पाडताहेत आणि एक ओटय़ावरच्या गॅसवर चकल्या तळतोय. वर्तमानपत्राच्या तुकडय़ावर आपण किती छान चकली पाडू शकतो याचे नमुने दाखवत ‘एन्जॉय’ करणाऱ्या त्या तिघांना पाहून डोळे वटारून पाहणाऱ्या समीरच्या बायकोच्या चेहऱ्यावर हळूहळू एक मनमोकळं हसू पसरत जातं. त्या हसण्यात ‘हॅपी दिवाली’ म्हणत ते तिघेही सामील होतात. आपल्या मित्रांना म्हणतात, ‘‘चला या दिवाळीत हे साहस करू या. चॅलेंज घेऊ या.’’

बायकांना सुखावणारा आणि पुरुषांच्या बाबतीतली गृहीतकं सहज मोडणारा हा लघुपट आजच्या पुरुषाचं एक आश्वासक चित्र दाखवणारा आहे, असं वाटून गेलं. इतकी वर्षे बायका करत असलेली कामं करावीशी वाटणं, ती कामं म्हणजे एक प्रकारचं साहसच आहे हे कबूल करून ‘पुरुष म्हणून आता हेही साहस करू या,’ असं आवाहन करणं हे फार महत्त्वाचं वाटलं. विशेष म्हणजे, त्या साहसातल्या ‘थ्रील’चा अनुभव घेताना आणि ते करताना आनंद घेणं आणि तो चेहऱ्यावर दिसणं हे अत्यंत साध्या-सोप्या पण अत्यंत परिणामकारक रीतीनं या लघुपटामध्ये दाखवलं आहे.

हा लघुपट किंवा अलीकडे तयार केलेल्या काही जाहिरातीतही पुरुषप्रधान व्यवस्थेच्या स्वभावात होणारा हा बदल अलीकडची कल्पक मुलं खूप तरलतेनं दाखवताहेत. मग त्या जाहिराती विवाहविषयक असोत की मॅगी, मसाले, तेल किंवा चहा-कॉफीच्या असोत. आईनं मुलाला स्वयंपाक करण्यासाठी प्रोत्साहित करताना पाहणं असो, की बाईच्या हातात सकाळचा पहिला चहा देणारा किंवा ती कार्यालयामधून परत आल्यावर गरमागरम जेवण तिच्यापुढे ठेवणारा किंवा तिनं व्हिडीओ कॉलवर दिलेल्या सूचनांप्रमाणे बाळाची नॅपी बदलणारा पुरुष पाहणं असो, हे सारंच बदलत्या मानसिकतेचं आणि बदलत्या समाजव्यवस्थेचं चित्र पाहिल्याचा आनंद देतं. स्वयंपाक करताना समरसून जाणारे या लघुपटामधील हे तीन मित्र पाहतानाच नाही तर अशा कामात आनंद घेणारे अनेक पुरुष प्रत्यक्षात पाहतानाही वाटतं, की पुरुषालाही हे सारं करण्यात आनंद मिळतो आहे. पण तो हे सारं मोकळेपणानं करू शकत नाही, कारण आजही हा बदल स्वीकारायला पुरुषसत्ताक व्यवस्थेत राहणारे इतर पुरुष व या व्यवस्थेचा बळी असलेल्या बायकाही तयार नाहीत.

आपल्या समाजव्यवस्थेनं स्त्रीला जसं तिच्या जन्मानंतर अगदी लहानसहान गोष्टीतून स्त्रीपण बहाल केलं तसंच पुरुषांनाही या समाजमनात असलेलं पुरुषपण बहाल केलं. खरोखरच किती मुलांना आवडते ही ‘मर्दपणाची’ किंवा ‘माचो मॅनची’ व्याख्या? कदाचित अनेकांना नसेल आवडत ती. त्या व्याख्येत स्वत:ला बसवण्याचा प्रयत्न करताना होणारी घुसमट किती तरी मुलं व्यक्त करत असतात त्यांच्याशी संवाद साधला तर. त्यांना विध्वंसक होण्यापेक्षा एक सर्जनशील माणूस व्हायचं असतं. एक व्यक्ती म्हणून स्वतंत्रपणे वाढायचं असतं. दिवसभर सारं घर सांभाळणाऱ्या आईला मदत करायची असते, बहिणीबरोबर खप्परपाणी खेळायचं असतं. दोरीच्या उडय़ा मारायच्या असतात. वयात आल्यावर एखाद्या मुलीचा चांगला मित्र व्हायचं असतं, तिच्यावर मनापासून प्रेम करायचं असतं, तिच्यासोबत आयुष्य घालवताना समरसून जगण्याचा अनुभव घ्यायचा असतो, मुलांना सांभाळायचं असतं, आदर्श पुत्र होतानाच आदर्श पती आणि पिता व्हायचं असतं, जमलंच तर चांगल्या गृहिणीप्रमाणे चांगला गृहस्थही व्हायचं असतं. पण आपण ते होऊ देत नाही. ‘दोरीवरच्या उडय़ा काय मारतोस, सागरगोटे काय खेळतोस, मुलींमध्ये काय बसतोस, बायल्या आहेस का?’ असे प्रश्न विचारून त्याची टर उडवत राहतात लोक. मग तोही हळूहळू मर्दपणाची झालर पांघरून जगायला लागतो आणि असं जगताना आपोआपच आक्रमक बनायला लागतो.

पुरुष म्हणजे घरात काहीही काम न करण्याचा परवाना, केव्हाही कुठंही जाण्याचा आणि रात्रीअपरात्री केव्हाही घरात परतण्याचा परवाना, नाक्यावर उभं राहून आल्या-गेल्या मुलींची शिटय़ा वाजवत टिंगल करण्याचा परवाना, कोणावरही हात उगारण्याचा परवाना, स्त्रीला वस्तू समजून तिचा हवा तसा वापर करण्याचा परवाना, बायकोला पायातल्या वहाणेसारखं वापरण्याचा परवाना. पुरुषाला कोणीच कशासाठी ‘नाही’ म्हणू शकत नाही आणि जो म्हणेल त्याची ‘वाट’ लावण्याचा परवाना. असे सारे गैरसमज ठासून भरले आहेत या व्यवस्थेनं त्याच्या मेंदूत. त्यामुळेच सारं आयुष्य या अशा भ्रामक कल्पना डोक्यात घेऊन तो जगत राहतो.

खरं तर आपली ही पुरुषसत्ताक व्यवस्था त्याला अशा प्रत्यक्षाहूनही मोठय़ा प्रतिमेत बसवून स्वत:वर अनाठायी प्रेम करायला शिकवत राहते. समज यायला लागल्यापासून त्याला सांगितलं जातं, की पुरुष म्हणजे स्त्रियांचा तारणहार, त्यांचा संरक्षक, इतर वाईट पुरुषांपासून वाचवणारा सिक्स पॅक असलेला माचोमॅन. त्याच्याच हातात कुटुंबाच्या दोऱ्या, तो कर्ता, तो कमावता, तो सर्वेसर्वा. मग या जगाचा सारा भार आपल्याच डोक्यावर असल्याची भावना घेऊनच तो जगायला शिकतो. बायकांनाही ‘पुरुष हा असाच असतो’ असं सांगितलं जातं. त्यांनाही मग या अशा पुरुषाची स्वप्नं पडायला लागतात,

‘एक पुरुष हवा आहे,

या घराला एक आडदांड पुरुष हवा आहे.

बटनं सापडत नाहीत म्हणून आरडाओरडा करून घर डोक्यावर घेणारा,

आमटीला फोडणी खमंग पडली म्हणून खुशालून जाणारा,

केसांतून बोटं फिरवली की बाळ होऊन कुशीत शिरणारा

दमदार पावलांनी तिन्हीसांजेचा केविलवाणा अंधार उधळून लावणारा

पुरुष हवा आहे या घराला..’

(अनुराधा पोतदार)

आडदांड पुरुषाची ही जी व्याख्या केली आहे त्या व्याख्येत बसण्यासाठी धडपडणारा पुरुष आपल्याला आजूबाजूला दिसतो तेव्हा आपल्या हे लक्षात येत नाही, की लहानपणापासून पुरुष होण्याचा हा ताण घेऊन मोठी होणारी मुलं मग अनेकदा जमत नसतानाही कर्ता पुरुष होण्याच्या स्पर्धेत धावायला लागतात.

खरं तर प्रत्येक पुरुषात स्त्री असते अन् स्त्रीमध्ये पुरुष. सी. जी. युंग या मानसशास्त्रज्ञानं जी आदिबंधाची संकल्पना मांडली आहे त्यात ‘अनिमा’ (Anima) आणि ‘अनिमस’ (Animus) या आदिबंधांचा उल्लेख केला आहे. ‘अनिमा’ म्हणजे पुरुषाच्या सचेतन मनात वसलेलं स्त्रीत्वाचं सनातन अंग तर ‘अनिमस’ म्हणजे स्त्रीमनामध्ये असलेलं पुरुषत्वाचं सनातन अंग. आपल्याकडे अर्धनारी नटेश्वराच्या कल्पनेतील शिवाच्या ठिकाणी असलेले शक्तीचे अंग म्हणजे ‘अनिमा’ म्हणता येईल किंवा स्त्रियांमध्ये असलेला आडदांडपणा, आक्रमकता ही त्यांच्यात लपलेल्या ‘अनिमस’चं दर्शन घडवते असं म्हणायला हरकत नाही. हे सारंच नैसर्गिक असताना आपल्या पुरुषप्रधान समाजानं स्त्रीपुरुषांना एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त करून टाकलं आणि त्यांना विशिष्ट अशा भूमिका बहाल करून त्याच चौकटीत जगण्याची सक्ती केली.

या चौकटीबाहेर जाऊन वागणाऱ्यांची, म्हणजेच स्त्रीच्या पुरुषी असण्याची जशी खिल्ली उडवली गेली तशीच पुरुषाच्या स्त्रण असण्याचीही टर उडवली गेली. एखादा पुरुष खूप रुचकर स्वयंपाक बनवत असतो. पण हॉटेलात शेफ म्हणून नावारूपाला आलेल्या या पुरुषाला ‘घरी मात्र मी बायकोच्याच हातचं खातो’ असं रेटून सांगावं लागतं. कारण घरात स्वयंपाक करणाऱ्या पुरुषाची सवय आपल्या व्यवस्थेला अजूनही हवी तशी झाली नाही. आमचा एक मित्र खूप छान स्वयंपाक करतो. त्याची जेव्हा ‘थर्ड शिफ्ट’ असते तेव्हा तो अनेकदा अत्यंत रुचकर पदार्थ करून कार्यालयामधून येणाऱ्या बायकोला खिलवतो आणि स्त्रिया जेवढय़ा आतुरतेनं नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहून पदार्थ कसा झालाय ते ओळखायचा प्रयत्न करतात तसाच तोसुद्धा करतो. मी एकदा म्हटलं, ‘‘याविषयी लिहायला हवं रे.’’ तर म्हणाला, ‘‘नको. माझ्या घरी आईला आवडणार नाही. नातेवाईक आणि मित्र चेष्टा करतील.’’

स्त्रीपुरुष समानतेसाठी होणाऱ्या चळवळींमुळे आज मुलींना कमीतकमी ठरवून तरी पुरुषांच्या क्षेत्रात प्रवेश करता येतो. त्यांचे खेळ खेळता येतात पण पुरुषांना मात्र त्यांच्या मर्दपणाच्या चौकटीतून बाहेर पडून व्यक्ती म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य अजूनही मिळालेलं नाही. ज्याप्रमाणे स्त्रियांना या बाईपणाच्या चौकटीत पुरुषसत्ताक व्यवस्थेनं अडकवलं आहे त्याचप्रमाणे पुरुषांनादेखील या पुरुषसत्ताक व्यवस्थेनं बंदिस्त केलं आहे मर्दपणाच्या चौकटीत.

आज स्त्रियांना ज्याप्रमाणे या चौकटी मोडून मोकळा श्वास घ्यावासा वाटतो त्याचप्रमाणे पुरुषांनाही त्यांच्याभोवती तयार केलेल्या चौकटी मोडून मोकळा श्वास घ्यावासा वाटत असणार. चांगला मुलगा होताना चांगला नवरा आणि बाप व्हावंसं वाटत असणार. घरी आल्यावर स्वयंपाक करणारी, बायकोच्या हातात गरम चहा ठेवणारी, आपल्या छोटय़ाशा बाळाला न्हाऊमाखू घालून त्याला कपडय़ात गुंडाळून बाहेर फिरायला नेणारी तरुण मुलं आज मुंबईसारख्या शहरात तर बरीच दिसायला लागली आहेत. ही मुलं पाहिल्यावर कळतं, की कामावरून दमून आलेल्या, पाळीच्या दिवसात वेदना सहन करणाऱ्या बायकोचे पाय चेपणारे आणि बाळाच्या जावळावरून ममतेनं फिरणारे या पुरुषाचेही हात किती तरल, मऊ, मुलायम आहेत. अशा या हातातल्या स्निग्धपणाविषयी बोलताना अरुणा ढेरे म्हणतात,

‘मूलपणात रेंगाळणारा

तुझ्या पुरुष असण्याचा

हा किती सुरेख आहे प्रारंभकाळ

अकारण आक्रमकतेची ओळख नाकारणारं

एक दयामय माणूस

तू हृदयाशी घट्ट धरून ठेवतो आहेस..

चाहुल लागली आहे आतल्या अनावर वादळाची

अन् मोकळं होऊ पाहणाऱ्या उद्दाम पशूची.

पण डोळे मिटतोस तू अशावेळी आणि म्हणतोस,

चाफ्यावर रेंगाळणाऱ्या उन्हासारखा

सुखाचा स्पर्श उतरावा थेट प्राणापर्यंत

न् उजळावा दयाघनाच्या हास्यासारखा आसमंत.’

आक्रमकता हा आपला स्वभाव वाऱ्यावर सोडून देऊन निघालेला, संवादावर विश्वास ठेवायला सुरुवात करणारा हा असा पुरुष आपल्या आजूबाजूला आहे. फक्त तो दिसत नाही आपल्याला आणि त्याला स्वत:लाही. असा पुरुष जर पुरुषानंच स्वत:तून शोधून बाहेर काढला तर सारंच किती बदलून जाईल. नात्यातले बंध खूपच वेगळे होऊन जातील. कदाचित बलात्कार थांबतील. स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीवाद आणि स्त्रीमुक्ती यांसारखे शब्द बाद होऊन जातील आपल्या आयुष्यातून. लिंगसत्तेचा आग्रह न धरता स्त्रीपुरुष समानता म्हणजे नेमकं काय आहे हे आता समजून घ्यायला हवं. आपापले सारे अहंगंड बाजूला ठेवून एकमेकांचा माणूस किंवा व्यक्ती म्हणून विचार केला तर समानतेचं हे चित्र दिसायला वेळ लागणार नाही.

कोणतीही सत्ता, मग ती पुरुषसत्ता असेल किंवा स्त्रीसत्ता असेल, ती माणसाला कसं मुजोर बनवू शकते याची उदाहरणं आपल्याकडे आहेत. ‘पायातली वहाण पायातच राहायला पाहिजे.’ असं बायकांना उद्देशून म्हणणाऱ्या बेदरकार पुरुषांपासून ते ‘नवऱ्याला मी माझ्या बोटावर सहज नाचवू शकते.’ असा वृथा अभिमान बाळगणाऱ्या बायकांपर्यंत सर्वानीच आता या समानतेच्या मार्गावरच्या प्रवासाला निघायला हवं. तसं झालं तर या लघुपटामध्ये दाखवलेल्या एका हव्याशा साहसाचीच सुरुवात नक्कीच होईल.

neerajan90@yahoo.co.in

chaturang@expressindia.com