झाडावरची कळीसुद्धा तिच्यावरून मायेनं हात फिरवला तर लवकर छान फुलते म्हणतात. मनापासूनचं कौतुक हे असं असतं, डोक्यात न जाणारं.. आतून हळुवार फुलवणारं. मग आतल्या दोन डोळ्यांनी आपणच आपल्याकडे, आपल्या चुकांकडे कधीतरी का होईना प्रेमळ हसून पाहिलं तर?
माझ्या आत दोन डोळे आहेत वटारून बघणारे. क्षणोक्षणी. माझं काय चुकतं आहे याच्यावर लक्ष ठेवून असणारे. काही चुकताच मोठे होणारे. रागावणारे. त्यांची खूप भीती वाटते. इतकी, की मी चुकताक्षणी एकदम कावरीबावरी होते आणि ओरडायलाच लागते. समोरच्याला वाटतं, मला राग आला आहे. पण राग नसतो तो. भीतीचं दुसरं नाव कधीकधी ‘राग’ असतं. आतल्या दोन वटारल्या डोळ्यांना घाबरून मी बाहेरच्या कुणावर तरी ओरडायला लागते. आतल्या वटारल्या डोळ्यांना सांगत राहते, ‘मी नाही केली चूक. त्या अमुकमुळे झालं तमुक..’ आता राग येणं स्वाभाविक.. पण ‘साधा’ राग वेगळा आणि हा ‘भीतीचा’ राग वेगळा. हा भीतीचा हात धरून येणारा राग हा नुसता ‘येत’ नाही. तो एखाद्या त्सुनामीसारखा ‘उसळतो’ आतल्या आत. मग मी माझी राहात नाही. मी त्या उसळलेल्या त्सुनामीचाच एक भाग होऊन जाते. घाबरून मी, मला जे म्हणायचं नसतं ते म्हणून बसते. त्या म्हणण्याने, माझ्या आतल्या त्सुनामीसारखीच त्सुनामी समोरच्याच्याही आत उसळते. तोही जे म्हणायचं नाही ते म्हणून बसतो. दोन्हीकडून जे बाण सोडायचेच नव्हते कधी ते सुटून बसतात, ज्या जखमा करायच्याच नव्हत्या कधी त्या होऊन बसतात. या त्सुनामीतसुद्धा खूप हानी होऊन बसते. नात्यांची..
हे सगळं इथेच थांबत नाही. या सगळ्या गदारोळात आतल्या दोन वटारलेल्या डोळ्यांच्या भीतीनं मी त्या ‘चुकलेल्या’ क्षणापासून धूम ठोकून पळून जाते. आणि या पळून जाण्यामुळे मी एक फार मोलाची गोष्ट गमावून बसते. ती म्हणजे ‘धडा’! माझी प्रत्येक चूक खरं तर तिच्याबरोबर एक ‘धडा’ घेऊन आलेली असते, शिकवायला. मी तिच्यापाशी शांत थांबते. तर ती तो मला शिकवणार असते. पण माझं धूम पळणं बघून ‘धडा’ शिकवण्यासाठी बोलू पाहणारी ती चूक गप्प होते. एक उसासाही सोडत असावी बिचारी. कारण तिला कळलेलं असतं, तिला परत यावं लागणार. हे तर ठरलेलंच.. ‘चुकी’बरोबर येणारा ‘धडा’ शिकला नाही की तिला परत यावंच लागतं. तिचं काम त्याशिवाय पूर्णच होत नाही. तिच्याबरोबर येणारा तिचा ‘धडा’ तिनं मला शिकवला, मी शिकले. ‘मी शिकले’ अशी तिची खात्री झाली की मगच तिचं काम पूर्ण झालं. मग ती पुन्हा येत नाही. माझ्या अनुभवावरून सांगते, ‘चूक’ आणि ‘धडय़ाचं’ काम फार शिस्तशीर असतं. इतकं, की वाटतं त्यांच्याकडे पक्कं लिहून ठेवलेलं असणार, कोणत्या चुकीनं तिचा धडा घेऊन कोणाकडे जायचं, कधी जायचं, कितीदा जायचं, आणि कधी थांबवायचं. मी तो ‘धडा’ शिकले की ते लगेच त्यांच्या यादीत त्या जागेसमोर टिकमार्क करत असणार! ‘चूक’ आणि ‘धडा’ फार निर्लेप असतात. मी शिकेपर्यंत ते न थकता येत राहतात. आतल्या वटारल्या डोळ्यांसारखे ते रागवत नाहीत..
आतले वटारलेले डोळे काही केल्या हसतच नाहीत. मी माझ्या मते काही ‘चांगलं’ किंवा ‘बरोबर’ केलं की आशेनं त्यांच्याकडे पाहते. ‘ते ठीक आहे, एवढं काही चढून जायला नकोय’ अशा भावाने ते थंडच असतात. ते काहीसं छान घडलेलं पाहिलं न पाहिल्यासारखे करतात. क्षणात पुन्हा वटारले जातात आणि म्हणतात, ‘आज हे जमलं ते ठीक आहे, पण उद्याचं काय? उद्या जमणार आहे? खात्री आहे? उद्याची खात्री कोण देणार?’ मी काहीतरी ‘छान’ केल्यानंतर जे ‘चांगलं’ वाटत असतं ते क्षणात  थांबवते. पुन्हा एकदा त्या डोळ्यांचा धाक घालून घेते स्वत:ला आणि कामाला लागते. आता तर मी त्या धाकाची इतकी सवय लावून घेतली आहे, की माझी कुणीही कितीही केलेली खरी, खोटी कुठलीच प्रशंसा मी आतच जाऊ देत नाही. पटकन गोड हसून मी ‘थँक्यू’ म्हणते खरी; पण आत काहीच जात नाही. अळवावरच्या पाण्यासारखी ती प्रशंसा मला पुसटसं चाटून भुर्र्रकन उडून जाते.
माझ्या नात्यातलं एक फार गोड बाळ आहे. कावेरी नावाचं. तिनं काहीही छान केलं की तिच्या आसपासचे आम्ही सगळे तिच्यासाठी आनंदभरानं टाळ्या वाजवतो. ती त्या वेळी क्षणभर थांबते. अप्रूपानं त्या टाळ्यांकडे लोभसवाणं पाहते. तिचं त्या टाळ्यांकडे कुतूहलानं पाहणं मला फार आवडतं. त्यात कुठलाच गर्व नसतो, चढून जाणं नसतं, खोटं ओशाळं होणं नसतं, दुर्लक्ष नसतं, खूप काळ त्या टाळ्यांमध्ये गुरफटणंसुद्धा नसतं. तिला त्या टाळ्या आवडतात. ती त्या पाहते, आवडून घेते आणि पुढच्या कामाला जाते.
तिच्याही आत माझ्यासारखेच दोन डोळे आहेत. सगळ्यांच्यात असतात. पण तिच्या आतले दोन डोळे ‘कुतूहलाचे’ आहेत. ते अजून स्वत:लाच दटावायला शिकलेले नाहीत. तिच्या छोटुकल्या हातातनं किती काय काय सांडतं, पडतं.. पण त्या ‘सांडण्याबद्दल’ स्वत:ला दटावत बसायला तिला वेळच नसतो. तिच्या आतल्या दोन डोळ्यांतून ऊतू जाणारं ‘कुतूहल’ त्या ‘सांडण्यापाशी’ न थांबता सुंदर काहीसं ‘उचलायला’ शिकण्यासाठी कधीच पुढे निघून गेलेलं असतं. त्यामुळे ती किती काय काय, भरभर शिकते आहे.. तिच्या आतल्या त्या दोन डोळ्यांची तिच्या आयुष्यातल्या ‘चूक’ आणि ‘धडय़ांशी’ घट्ट मैत्री आहे.
लहानपणी कुतूहलाने इकडं तिकडं बघणाऱ्या आपल्यातल्या लुकलुक डोळ्यांना दटावत दटावत मोठं करतो आपण. मोठं होता होता कुतूहल हरवत जातं आणि दटावणंच तेवढं उरून बसतं. अवास्तव लाड नकोत. मान्य, पण तसूभरही कौतुक नको? हे नाही होत आता मान्य.. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं तर काय होईल? लगेच हवेत जाऊ आपण? डोक्यावर बसू? आता मोठे झालो आपण. इतक्या वर्षांत पाय जमिनीवर टिकवणं नक्कीच शिकलो. लहान मूल शिकतं ते फक्त दटावण्यानं? खरंच का? या सगळ्या प्रश्नांपाशी थांबावंसं वाटतं आहे. मी तरी जेव्हा जेव्हा माझं मन शांत उत्सुक होतं तेव्हा तेव्हाच नव्या गोष्टी आत घेऊ शकले आहे. घाबरंघुबरं मन कसं नवं शिकणार? माझ्या मनाला शिस्त लावण्यासाठी मधूनमधून शांत खंबीरपणे काही गोष्टी नक्कीच सांगाव्या लागतात त्याला. पण त्यासुद्धा शांतपणे सांगितल्या तरंच कळतात त्याला. दटावण्यानंतर फक्त पळणं होतं आणि पळून पळून शिकणं राहतं.
दटावण्यानं भीती आणि रागाच्या त्सुनामीशिवाय दुसरं काही जन्माला घातलेलं दिसत नाही मला माझ्यात आणि आसपास..
हे सगळं मला हवं आहे का..
झाडावरची कळीसुद्धा तिच्यावरून मायेनं हात फिरवला तर लवकर छान फुलते म्हणतात. खरं, मनापासूनचं कौतुक हे असं असतं, डोक्यात न जाणारं.. आतून हळुवार फुलवणारं. मग आतल्या दोन डोळ्यांनी आपणच आपल्याकडे, आपल्या चुकांकडे कधीतरी का होईना प्रेमळ हसून पाहिलं तर? कावेरीसाठी वाजवलेल्या निखळ भरभरून टाळ्यांपैकी एखादी तरी टाळी मी त्याच निखळपणे स्वत:साठी वाजवू शकले तर? आणि तिच्यासारखं एक क्षण का होईना अत्यंत स्वाभाविकपणे ते कौतुक माझ्या आत घेऊ शकले तर?