‘ब्रेक’ ही मोकळा श्वास घ्यायला लावणारी एक ‘भावना’ तर आहेच, पण ती एक ‘संकल्पना’ आहे. रोजचा तोचतोपणा मनातून जाऊन मुक्त वाटणं म्हणजे ब्रेक. नुसतं शरीरानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यानं ब्रेक मिळत नाही. अगदी काश्मीरला गेलं तरी दाल सरोवरात आपल्या मनात ‘मुलं नीट जेवली असतील ना?’ ‘मुलगी उशिरापर्यंत बॉयफ्रेण्डबरोबर भटकत असेल का?’ ‘बॉसनं रजा दिलीय पण परत गेल्यावर काम अंगावर येईल.’ असेच विचार येत असतील तर  काश्मीरमध्ये असलो तरी मनानं आपण घरातच असतो. मग ब्रेक कुठला? त्यासाठी हवा रोजच्या जगण्यातून एक खराखुरा ब्रेक, ताजंतवानं होण्यासाठी!
‘हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी,
 दिसशी तू नवतरुणी काश्मिरी’
हे गाणं लागलं की मला माझ्या लहानपणची आठवण येते. सुट्टीत आम्ही मुलांनी कुठेतरी सहलीला जायचा तगादा लावला आणि वडिलांना शक्य नसेल की ते म्हणायचे, ‘‘बरं लग्गेच चला. कुठे जायचं?’’ आम्ही आनंदानं समजा ‘राजस्थान’ सांगितलं की ते म्हणणार, ‘‘चला डोळे मिटा, गाडीत बसा, आता बघा, आलं जयपूर..’’ मग जयपूरच्या राजवाडय़ांचं वर्णन, मग चितोड, राणी पद्मिनी, मधेच हल्दिघाटची लढाई..राणा प्रताप..’ अशी राजस्थानच्या भूत आणि भविष्याची सफर करून आम्ही दोन-तीन मिनिटांत रेल्वेत, विमानात कशातही बसून परत यायचो. कधी कधी या व्हच्र्युअल सहलीची मजा यायची. खरंच कुठेतरी जाऊन आल्यासारखं मस्त वाटायचं. व्हच्र्युअल सहल फार वेळा झाली की भांडून आम्ही निदान जवळ कुठेतरी खरोखरीची सहल काढायला लावायचो.  त्या वेळी कधी ‘हे चिंचेचे झाड.. ’ गाणं लागलं की आई मजेनं म्हणायची, ‘तुमच्या पपांसारखाच दिसतोय हा कवी.. फक्त याच्या डोळय़ासमोर चिंचेचं तरी झाड आहे आणि पपा तुम्हाला डोळे बंद करून जगभरात कुठेही फिरवून आणतात एवढाच फरक..’’
आता मोठेपणी अनेकदा रोजच्या त्याच त्या दिनचय्रेचा कंटाळा येतो, कुठेतरी बाहेर जावंसं वाटतं पण जमणार नसतं तेव्हा लहानपणीसारखा कल्पनेतला ब्रेक घ्यावासा वाटतो. एक तर असा ब्रेक कधीही घेता येतो. त्यात आपण ते ठिकाण पूर्वी पाहिलं असेल तर तिथे फारच पटकन जाऊन येता येतं. तिथली थंड हवा शरीराला जाणवते, तिथे भटकताना अचानक दिसलेला एखादा गोंडस पक्षी दिसतो, त्याचा आवाजही ऐकू येतो आणि भटकतानाची ताणरहित मोकळेपणाची भावनाही जाणवते. डोळे उघडल्यावर थोडा वेळ तेव्हाइतकंच छान वाटतं आणि आतून मनात येतं, ‘आता खरोखरच जायला हं तिथे. ब्रेक घ्यायलाच हवा.’
‘ब्रेक’ ही मोकळा श्वास घ्यायला लावणारी एक ‘भावना’ तर आहेच, पण ती एक ‘संकल्पना’ आहे. रोजचा तोचतोपणा मनातून जाऊन मुक्त वाटणं म्हणजे ब्रेक. नुसतं शरीरानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यानं ब्रेक मिळत नाही. अगदी काश्मीरला गेलं तरी दाल सरोवरात आपल्या मनात ‘मुलं नीट जेवली असतील ना?’ ‘मुलगी उशिरापर्यंत बॉयफ्रेण्डबरोबर भटकत असेल का?’ ‘निघताना सासू ‘काळजी घ्या’ म्हणाली, ते खरं होतं की टोमणा होता?’ ‘बॉसनं रजा दिलीय पण परत गेल्यावर काम अंगावर येईल.’ असेच विचार येत असतील तर  काश्मीरमध्ये असलो तरी मनानं आपण घरातच असतो. मग ब्रेक कुठला?   
ब्रेक ही संकल्पना बदलाशी निगडित आहे आणि ती कुठल्याहीसंदर्भात वापरता येते. सहलीमुळे मिळणारा ब्रेक किंवा दूरदर्शनवरचा जाहिरातींसाठीचा ब्रेक याच्यापलीकडेही ब्रेकची व्याप्ती खूप मोठी आहे. वेगवेगळय़ा संदर्भातली ब्रेकची शक्ती समजून घेणं ही मला प्रगल्भतेकडे नेणारी एक पायरी वाटते आणि सकारात्मकतेकडे, सुधारणेकडे जाण्यासाठी तो जाणीवपूर्वक वापरणं ही त्यापुढची पायरी. आपल्याकडे जेवढे जास्त संदर्भ असतील तेवढा ब्रेक या संकल्पनेचा सर्वस्पर्शी आवाका आपल्यालाच वेगवेगळे आयाम देत जातो.
बदलत्या काळासोबत जगण्यातली गुंतागुंत आणि ताण वाढतायत, तशीच ब्रेकची गरजही वाढतेय. अथक काम केल्यानंतर एका टप्प्यावर मन आणि शरीर आपल्याला वेगवेगळय़ा मार्गानी थोडं थांबायला-ब्रेक घ्यायला सांगत असतात पण जोपर्यंत शरीर असहकार पुकारत नाही तोपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हा बावळटपणा आपण बहुतेक जण मोठेपणासारखा मिरवतो. अखेरीस आजारपण येतं.  आजारपण-अपघातामुळे अंथरुणावर पडून काढलेला काळ म्हणजे नेहमीच्या जगण्यातून घ्यावा लागलेला सक्तीचा ब्रेकच. शक्यतो अशा ब्रेकची वेळ येऊ नये, पण येते तेव्हा ती जगण्याचाच नव्यानं परिचय करून देते.
माझ्या एका घशाच्या ऑपरेशनच्या वेळी डॉक्टरांकडून चुकून स्वरयंत्राला धक्का लागून आवाज पूर्ण गेला. साधारण तीन आठवडय़ांत आवाज परत यावा अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात हा अ-संवादी ब्रेक जवळजवळ आठ महिने टिकला. त्या आठ महिन्यांनी मला किती नव्या जाणिवा दिल्या त्याला तोडच नाही. आपण बोलतोय आणि घशातून स्वराऐवजी हवाच निघतेय या अनुभवाचा धक्का पचवणंच खूप अवघड होतं. आपल्या शरीराची सुदृढता आणि नेहमीची परिस्थिती कायम अशीच राहणार आहे, असं आपण किती सहजपणे गृहीत धरतो ते जाणवलं. ‘कुठल्याही क्षणी काहीही घडू शकतं’ हे गुळगुळीत झालेलं वाक्य माझ्यासाठी एक खोलवरचा अनुभव बनला. आपण एक शब्दही बोलू शकत नाही याचं वाईट वाटायचंच पण माझ्याशिवाय सर्वाना बोलता येतंय म्हणून जगावर जळायला व्हायचं. त्या आठ महिन्यांत कमतरतेचा अर्थ मला खरंच सर्वागानं समजला.
थोडंही बोलण्यानं खूप दमायला व्हायचं त्यामुळे कमीत कमी शब्दांत अगदी जरुरीपुरतं बोलणं मला भागच होतं. ‘तोंडची वाफ दवडणं’ हा वाक्प्रचार मला एकेका शब्दागणिक शब्दश: समजायचा आणि या वाफेसाठी किती ऊर्जा खर्च होते तेसुद्धा. कुणाही बोलणाऱ्याच्या वाक्यांचं मनातल्या मनात एडिटिंग करण्याची सवय तेव्हापासून लागली आणि आपण सगळेच किती अनावश्यक बोलत असतो ते फार तीव्रपणे जाणवलं. ‘दुर्दैवानं आवाज परत आलाच नाही तरी आपण खचायचं नाही,’ या भावनेतून यापूर्वी विचारही न केलेले अनेक पर्याय मी तपासून पाहत असे. तेव्हापासून लेखनाकडेही मी पूर्वीपेक्षा जास्त गांभीर्यानं पाहायला लागले. एकूणच त्या अनपेक्षित ब्रेकनं माझ्याच स्वभावाचे चांगले-वाईट अनेक अनोळखी पापुद्रे मला दाखवले.
या एका ब्रेकमधून मिळालेल्या अनुभवांनी मला वेगवेगळय़ा समुदायांच्या वेगवेगळय़ा भावनांशी आणि समस्यांशी जोडलं. रिक्षावाल्याला माझं बोलणं कळायचं नाही, म्हणून बाहेर निघताना चिठ्ठीवर लहान मुलासारखा पत्ता लिहून घ्यावा लागायचा. मूकबधिरांना येणाऱ्या अडचणींचं ते एक प्रात्यक्षिकच होतं. मूकबधिर किंवा कुठलीही कमतरता असणाऱ्यांसाठी आपल्या मनातली सहृदयता कितीही प्रामाणिक असली तरी प्रत्यक्ष भोगणाऱ्यासाठी ती किती वरवरची असते, हे अनुभवल्याशिवाय नाहीच कळत. माणसांना समजून घेताना त्यानंतर ही जाणीव माझं वाहन झाली. तिच्यामुळे आणखी खोलवरच्या पातळय़ांचं भान आलं. हा साच्यापलीकडचा सक्तीचा ब्रेक परीक्षा पाहणारा होता पण त्यानं तेवढीच भावनिक समृद्धीदेखील दिली.
०*
हे जसं वैयक्तिक अनुभवांच्या बाबतीत तसंच कौटुंबिक बाबतीतही हा ब्रेक महत्त्वाचं काम करत असतो. बिनसलेलं नातं पुन्हा जुळवण्यासाठी अनेकदा जाणीवपूर्वक घेतलेला छोटासा ब्रेक उपयोगी ठरतो. परस्परांना गृहीत धरणं, अपेक्षा, गैरसमज अशा काहीही कारणांनी नात्यांमध्ये ताण येतात. नातं तोडायचं नसतं तरीही रोजचं सोबत राहणं त्रासदायक होत असतं. अशा वेळी त्याच त्या चक्रातून फिरणारी आणि रोज बधिर करणारी परिस्थिती काही काळासाठी दूर गेली तर नव्यानं स्वच्छ विचार करायला अवकाश मिळतो. दूर गेल्यानंतर माणसाची किंमतही नीट समजते. ताणलेलं नातंच कशाला, रोजच्या आयुष्यात नवरा बाहेरगावी गेल्यावर एखादा दिवस बरं वाटतंही पण नंतर त्याच्याबद्दलच्या रोजच्या तक्रारी विसरल्या जाऊन आठवतो तो त्याच्या असण्यातला आधार. एरवी पत्नीची नॉनस्टॉप बडबड कंटाळवाणी होत असली तरी ती माहेरी गेल्यावर तिच्या असण्यानं घर कसं जिवंत वाटतं याचा साक्षात्कार होतो. मुलांची कटकट, मोडतोड, अभ्यास न करणं एरवी अगदी डोकं उठवतं, पण मुलं लांबच्या सहलीला गेल्यावर शांत शांत घर खायला उठतं तेव्हा रोजच्या तक्रारी एकदम क्षुल्लक वाटायला लागतात. अनेकदा या छोटय़ा पण योग्य वेळी आलेल्या-घेतलेल्या ब्रेकमुळे नात्यांचा अर्थ नव्यानं समजतो, आपल्या वागण्याकडे नव्या नजरेनं बघायची संधी मिळते. ती घेता आली तर नाती खूप समृद्ध होतात. पूर्वी माहेर दूर असण्याच्या काळात माहेरवाशिणी हक्काचा ब्रेक घ्यायच्याच दरवर्षी. संपूर्ण कुटुंबच ब्रेकवर जायचं त्या वेळी. नवरा-बायकोला परस्परांपासून आणि मुलांना रोजच्या मित्रमैत्रिणींपासून मिळणारा हा काही काळाचा ब्रेक नात्यांना ताजेपणा देऊन जायचा. आणि गावी खूप काळानंतर भेटलेल्या सग्यासोयऱ्यांच्या प्रेमाचा वेगळाच अनुभव मिळून जायचा. आता काळ बदल्याने हे सगळ्यांनाच शक्य होतं असं नाही पण तरीही अनेकींसाठी हा ब्रेक महत्त्वाचा ठरतोच.     ०
व्यवसाय-नोकऱ्यांमधल्या विविधतेसोबत आणि उपलब्धतेसोबत कामाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनदेखील बदलत गेला. आयुष्यभर एकच एक नोकरी करण्यात धन्यता मानण्याची मनोवृत्ती बदलली. नवीन संधीसाठी चालू जॉबमध्ये ब्रेक घेणं किंवा कंपनीनं ब्रेक देणं नित्याचं झालं. या अपरिहार्य बदलाला चूक किंवा बरोबरचं लेबल लावून उसासे सोडण्यापेक्षा आपण ब्रेककडे कसं पाहतो, यातून ब्रेक आपल्याला काय देऊ शकतो ते खरं तर ठरतं. सतत एकच एक गोष्ट करत राहण्यानं साचलेपणा येतो तर सारखं बदलत राहणं अस्थैर्य आणतं. सातत्य आणि बदल या दोन्ही गोष्टी गरजेप्रमाणे मिळवण्यासाठी ब्रेकची भूमिका महत्त्वाची ठरते.
योग्य प्रमाणातला आणि योग्य वेळी घेतलेला ब्रेकआपल्याला थांबवत नाही, तर पुढे नेतो. हे जसं करमणुकीबाबत आणि नात्यांबाबत खरं आहे, तसंच कामाबाबत आणि विचारप्रक्रियेबाबतसुद्धा खरं आहे.

शासकीय अधिकाऱ्यांसाठी मध्यंतरी पाच वर्षांचं लीन घेण्याची सोय होती. बहुतेकांना यातली संधी उमगलीच नाही. काहींना समजली तरी बदलाची गरज तीव्र नव्हती किंवा शासकीय नोकरीतल्या सुविधा सोडवल्या नाहीत. काहींनी सरकारातल्या ओळखी वापरून बाहेरून अर्थार्जनासाठी या पाच वर्षांचा उपयोग केला. काही थोडय़ांनी मात्र या सवलतीतली संधी ओळखली. माझ्या ओळखीतल्या एका अधिकारीबाईंनी ही पाच र्वष वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी वापरली. काही काळ खासगी संस्था, काही काळ एनजीओ अशा नोकऱ्या करून प्रत्येकाच्या कामाची पद्धत, मानसिकतांचा अनुभव घेतला. सरकारी कार्यालयांत स्वत:ची ओळख न देता सामान्य माणसासारख्या कटकटीही अनुभवल्या. लीन संपल्यावर पुन्हा सरकारात परतताना त्या म्हणाल्या, ‘‘सरकारी सेवेतला माझा वीस वर्षांचा अनुभव एकांगी होता, तो या पाच वर्षांच्या ब्रेकनं पूर्ण केला. सामान्य माणूस, संस्था, एनजीओ, शासन सर्वाची बलस्थानं आणि मर्यादा आता मला आतून आणि बाहेरून माहीत आहेत. शासकीय अधिकारांचा वापर कसा करायला पाहिजे ते मला या पाच वर्षांच्या ब्रेकनं नव्यानं शिकवलं आणि खुर्ची नसेल तरीही माझी ओळख काय असू शकते तेही समजलं. खूप मोकळं वाटलं. आता शासकीय नोकरीची शक्ती पूर्वीपेक्षा जास्त चांगली समजते तरीही ती सोडण्याची भीती वाटत नाही. ’’ पाच वर्षांच्या ब्रेकमधून तावूनसुलाखून निघालेलं हे ‘स्वभान’ खूप मोलाचं होतं. ‘कामात बदल हीच विश्रांती’च्या जागी ‘कामात बदल हीच समृद्धी’ असा नवा सुविचार मनात उमटला.
     ०
कधी कधी काही काळ असा येतो की काहीच करायला उत्साह वाटत नाही. नुसतं शांत बसून राहावंसं वाटतं. अनेकदा त्याची कारणं तेव्हाच्या आपल्या मानसिक स्थितीत असतात. अशा वेळी मनासोबत राहावं. मनाची-शरीराची ब्रेकची गरज समजून घ्यावी. मनाच्या उलाढालींकडे (प्रोसेसेस) बाहेरून पाहावं. कालांतरानं आपोआप निचरा होतो. मन स्वच्छ होतं. आपण आपल्याला उलगडत जातो. जुन्या गोष्टींत नवे अर्थ सापडतात आणि आपण नव्या उमेदीनं तयार होतो, उद्याच्या स्वागताला.
नवनिर्माणासाठी ब्रेकची गरज अतिशय नैसíगक आहे. निसर्गातल्या वृक्षवेली ग्रीष्माच्या काळात त्यांच्या हिरवेपणातून ब्रेक घेतात, वसंतात नवे धुमारे फुटण्यासाठी. मोरांचा पिसारा काही काळ झडतो, तो येणाऱ्या वर्षांसोबत नव्याने थुईथुई नाचण्यासाठी.
माणसासाठी असा ब्रेकचा विशिष्ट ऋतू निसर्गानं ठेवला नाहीये. म्हणून तर, जेव्हा एकसुरीपणा तीव्र होतो, कंटाळा यायला लागतो तेव्हा त्या क्षणाच्या वर्तमानातून पटकन ब्रेक घ्यायचा. डोळे मिटायचे, एक मस्त-मोकळा दीऽर्घ वास घ्यायचा. हवं ते ठिकाण, हवं ते नातं, हवी ती परिस्थिती डोळय़ांसमोर आणायची. मनानं आधी तिथे पोहोचायचं आणि नंतर लवकरच प्रत्यक्षातदेखील.

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
korean skincare, K-beautyUnlock the secrets
तुम्हालाही हवीये Glass skin? कोरियन लोकांच्या सौंदर्याचे काय आहे रहस्य? तज्ज्ञांनी सांगितल्या टिप्स