रोज सकाळी उठल्याबरोबर हा संकल्प करा, ‘मी जो आहे, जसा आहे तसा फारच छान आहे. आणि इतरही सर्व जण जसे आहेत. तसे फारच चांगले आहेत.’ अशा प्रकारच्या स्व-सूचना देऊन बघा, तणाव तुमच्यापासून खूप दूर गेलेला असेल..
आज आपण बहुतेक सर्व जण आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष पुरवत आहोत. रोज सकाळी उठल्याबरोबर आपण जॉगिंगला जातो. प्रोटीन, व्हिटामिन, कॅल्शियम, मिनरल्स यांनी युक्त असलेले जेवण घेतो. कुठेही बाहेर जेवायला गेलो तरी चांगल्याच हॉटेलमध्ये जेवतो. पण तितक्याच जागरूकतेने मनातील विचारांची गुणवत्ता तपासतो का? आज डॉक्टर्स सांगतात, Stress is Psychosomatic ८० टक्क्याहून जास्त आजार हे सायकोसोमॅटिक आहेत म्हणजेच मानसिक ताणांमुळे उद्भवलेल्या या शारीरिक समस्या आहेत.
तणाव परिस्थितीमुळे येतो. परिस्थिती काही सांगून येत नाही. अकस्मात घरात एखादी वाईट घटना घडू शकते, व्यापारात नुकसान होऊ शकतं, प्राकृतिक आपत्ती येऊ शकते. या गोष्टींचे तर आपण पूर्वअनुमान लावू शकत नाही. मात्र जेव्हा असे प्रसंग आपल्यासमोर उभे राहतात त्यावेळी मनात अधिक करून येणारे विचार हे नकारात्मक असतात. त्यांना आपण खरे तर तिथेच थांबवलं पाहिजे, पण आपण त्यांना वाढवतच करत जातो.
एक अतिशय उमदे व्यक्तिमत्त्व, ज्यांना आम्ही ‘दादा’ म्हणतो, त्यांचे वय आहे ७५ वर्षे. खूप प्रेमळ व्यक्ती. नेहमी हसतमुख, प्रसन्नचित्त, टवटवीत चेहरा अगदी या वयातही. लोक त्यांना म्हणतात, दादा तुम्ही वर्षांतले ३६५ दिवस हसत कसे बरे राहू शकता? त्यावर दादा म्हणतात- Life is question of Options. Life is a question of choice. प्रत्येक बाबतीत आपल्यासमोर २ पर्याय असतात. समजा, आपण दुकानात गेलात. एक तर आपण तेथील वस्तू विकत घेऊ किंवा घेणार नाही, सकाळी आपण उठतो तेव्हादेखील आपल्यासमोर २ पर्याय असतात. एक तर हसत उठावं किंवा कंटाळत उठावं. कुठला पर्याय चांगला वाटतो आपल्याला? अर्थातच हसत उठण्याचा, आपण ऐकतोही जे सतत हसत असतात ते दिलखुश असतात. त्यांच्याकडे आजारपण फारसं फिरकत नाही. एखादी विपरीत परिस्थिती आपल्यासमोर आली तेव्हा देखील २ पर्याय आपल्यासाठी असतात. एक तर परिस्थितीशी टक्कर देणं, अर्थात तिचा सामना करणं किंवा कोलमडून पडणं, खचून जाणं. यातही कुठला पर्याय चांगला वाटतो? परिस्थितीशी टक्कर देण्याचा.
एकदा या दादांचा अपघात झाला. त्यांना हॉस्पिटलमध्ये आणले गेले. तेथे त्यांचे बरेचसे स्नेही भेटायला आले. दादांनी त्या सर्वाच्या चर्चेवरचे भाव ओळखले. दादा म्हणाले, ‘आताही माझ्यापुढे २ पर्याय आहेत. जगण्याचा किंवा मरणाचा. त्यांनी डॉक्टरांनादेखील सांगितले, ‘माझ्यावर शस्त्रक्रिया रुग्ण समजून करू नका, तर आशावादी दीपस्तंभ म्हणून करा. ज्याला स्वत: जगण्याची व इतरांनाही जगवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे.’ आणि खरोखरच त्यांच्या इच्छेप्रमाणे शस्त्रक्रिया यशस्वी होऊन थोडय़ाच दिवसांत दादा बरे झाले. मॉर्निग वॉकलाही जाऊ लागले.
नुकतेच बऱ्याच दिवसांनी मला ते भेटले. म्हणाले, ‘सांग, तुला तणावयुक्त जीवन जगायला आवडेल की तणावमुक्त जीवन जगायला आवडेलच. मीच काय आपण सर्वही जण हेच उत्तर देऊ की आम्हाला तणावमुक्त जीवन जगायला आवडेल. अर्थात त्यासाठी काही विचारांचा समावेश आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीत केला तर निश्चितच आपण तणावमुक्त राहू शकतो.
सतत दुसऱ्यांबरोबर स्वत:ची तुलना करणं, हा खरे तर एक प्रकारचा गैरसमज आहे. आणि हा गैरसमज एकटा येत नाही तर त्याच्यासोबत कुटुंबालाही घेऊन येते. तिचे कुटुंब म्हणजे संशय, द्वेष किंवा मत्सर, शत्रुत्वाची भावना, राग. यांच्यात एवढा एकोपा असतो की ते जेथेही जातात तेथे एकत्रच जातात व त्या घराला नरक बनवतात. म्हणून या कुटुंबापासून सर्वानी सांभाळून राहायला हवं. आपणच अशा प्रकारच्या समजुतीने लहानपणापासून मुलांच्या मनात विषवल्ली पेरू लागतो. आपणच मुलांना तणावाची ओळख करून देतो.
कुणालाही आपण केलेल्या कामाबद्दल आपल्याला शाबासकी मिळावी, हे वाटणं अगदी स्वाभाविक आहे. आनंदाने जर का एखाद्याची पाठ थोपटली तर त्याला खूप आनंद होतो. मुलांच्याही यशात जसे आपण सहभागी होतो, तसेच अपयशातही झाले पाहिजे. अपयशात जर का आपल्याकडून त्यांचा आत्मविश्वास वाढवणारे बोल बोलले गेले, त्यांना धीर देणारे व पुन्हा त्यांच्यात यशाची नवचेतना निर्माण करण्याचे काम केले गेले तर खरोखरच ते खूप परिणामकारक होतील. मग आज आपण ज्या आत्महत्या होताना पाहतो त्या होणारच नाहीत. म्हणून तणाव शब्दच विसरायचा असेल तर दुसऱ्याचं नेहमीच कौतुक करा. नुसतं दुसऱ्यांनाच नाही बरं, स्वत:चंही कौतुक करून बघा काय किमया घडते ती.
मुलांची सवय अशी असते की ते त्यांना आवडणाऱ्या विषयांचा व जे सोपे आहेत अशा विषयांचा अभ्यास आधी करतात व कठीण वाटणाऱ्या विषयांचा अभ्यास करताना थोडे नाखूशच असतात. त्यामुळेदेखील ते तणावाचा अनुभव करतात. नेमके जे आपल्याला येत नाही तेच परीक्षेत विचारले गेले तर अशी भीतीही त्यांच्या मनात घर करून राहते. उलट आपल्यात कोणत्या प्रकारची उणीव आहे, कमतरता आहे, आपली कमकुवत बाजू ओळखून तिला परिवर्तन करण्याची जिद्द ठेवली गेली तरीही आपण तणावापासून दूर जाऊ.
एका गावात एक माणूस राहायचा. त्याला कुस्ती खेळण्याची खूप आवड होती. पण एका अपघातात त्याचा डावा हात कापला गेला. पण कुस्ती खेळण्याची ऊर्मी मात्र तशीच कायम होती. तो एका उस्तादांकडे आला व म्हणाला, ‘मला कुस्ती शिकायची आहे.’ त्यांनी त्या माणसाकडे पाहिले व त्यांच्या लक्षात आले की याला डावा हात नाही. त्यांनी त्या माणसाला सांगितले की तुला तर डावा हात नाही. तरीही तो माणूस म्हणाला, ‘मला कुस्ती शिकायची आहे.’ त्याचा उत्साह पाहून उस्तादांनी त्याला कुस्ती शिकवण्यास सुरुवात केली. उस्ताद त्या माणसाला एकाच प्रकारचे डावपेच शिकवू लागले. तो माणूसदेखील त्या डावपेचात पारंगत झाला. एके दिवशी उस्तादांनी सांगितले की शेजारच्या गावात कुस्तीची स्पर्धा आहे. ‘तू तेथे जा व कुस्तीत भाग घे.’ तो माणूस त्या गावात गेला. व एकामागून एक अशा अनेक कुस्तीगीरांबरोबर कुस्ती खेळला. तो प्रत्येकाबरोबर जिंकत गेला. त्याला खूप आनंद झाला व धावतच तो उस्तादांकडे आला. तो म्हणाला, ‘उस्ताद मी जिंकलो, पण मी कसा जिंकलो हे मात्र मला कळले नाही.’ तेव्हा उस्ताद म्हणाले, ‘मी जाणूनबुजून तुला एकाच प्रकारचे डावपेच शिकवले. त्यात तू तरबेज होत गेलास. आणि मी शिकवलेल्या डावपेचात एक अशी खुबी होती की तुझ्या डावपेचाने समोरील कुस्तीगीर खाली पडायचा. पण त्याला उठण्यासाठी तुझ्या डाव्या हाताची गरज लागायची. तो तुझा डावा हात शोधत बसायचा पण त्याला तो मिळायचा नाही. म्हणजेच तुझ्यात जी कमकुवत बाजू होती तिलाच मी तुझी ताकद बनवलं.’ हे उदाहरण एवढय़ासाठीच की आपण नेहमीच आपली कमकुवत बाजू आधी शोधून काढायची. त्यावर मात कशी करता येईल ते पाहायचं आणि मग पाहा तणाव तुमच्यापासून लांब पळणारच.
कधी तरी आपल्याला खूप अस्वस्थ झाल्यासारखे वाटते, तेव्हा आपण आपली नाडीपरीक्षा करतो. तसेच रोज सकाळी आपल्या संकल्पनांची स्पंदनं तपासली पाहिजेत. सकाळी उठल्याबरोबर असा संकल्प करा, ‘मी जो आहे, जसा आहे तसा फारच छान आहे, आणि इतरही सर्व जण जसे आहेत, तसे फारच चांगले आहेत.’ अशा प्रकारची स्व-सूचना देऊन बघा, तणाव तुमच्यापासून खूप दूर गेलेला असेल.

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?