दीक्षा दिंडे

माझ्या आयुष्यातील प्रत्येक गुरूने मला मेहनत करून हवी असलेली गोष्ट मिळवायला शिकवलंय, शारीरिक मर्यादांचा फायदा घेऊन, सहानुभूती मिळवून नाही. बरेचजण कौतुक करतात. बरेच लोक ‘तिला तिच्या अपंगत्वामुळे मिळतं हे सगळं’ असं म्हणतात, तेही कानी पडतं. पण मी ते मनावर घेत नाही. वयाची २२ वर्ष माझं जग फक्त घर आणि शाळा-कॉलेज इथपर्यंतच मर्यादित होतं. आज जेव्हा स्वतच्या क्षमतांवर विश्वास बसलाय तसं आकाश कमी पडतंय.  चार वेळा सातासमुद्रापार बाहेरच्या देशांत एकटीने प्रवास करण्याचं धाडस यातूनच मिळालंय. आता कळलंय, मीच आहे की ती राजहंस!

‘कोणी न तयास घेई खेळावयास संगे

सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे

दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक

आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक..’

लहानपणी जेव्हा केव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा त्या वेडय़ा कुरूप पिल्लात स्वत:चंच प्रतिबिंब दिसत गेलं. आपल्यातली अक्षमता, ती ठळक करत लोकांनी आपल्याला दिलेली वागणूक, यामुळे आपणच ते वेडं कुरूप पिल्लू आहोत, असं ठाम मत बनलेलं. कवितेच्या शेवटी उल्लेख केलेला राजहंस काही केल्या सापडत नव्हता. स्वत:बद्दलची असहाय्यता स्वत:ला राजहंस मानू देत नव्हती..

१९९३ चा माझा जन्म. पुण्यातच वाढले. घरात जन्मलेली पहिली मुलगी म्हणून सगळीकडे आनंदीआनंद झालेला. लाड इतके होत होते, की बाळाला कधी मांडीवरून खालीच ठेवलं गेलं नाही आणि त्यामुळे आपलं बाळ इतर बाळांसारखं रांगत नाहीये हे कळायला तसा उशीरच झाला. डॉक्टरांचे उपचार सुरू झाले तेव्हा कळलं की, बाळ चालू शकणार नाही. हा घरच्यांवर झालेला मोठाच आघात होता. मुख्यत: आईवर. आपल्या पोटी ‘वेगळं मूल’ जन्माला आलंय, त्यामुळे त्याची काही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे हे तिला हळूहळू उमगत गेलं. कळत्या वयापासूनच मला अंधूक आठवतंय, आईने त्या वेळी कोण सांगतील ते उपचार, औषधे, कोणी कोणी सांगितलेले उपास-तापास, व्रत-वैकल्यं, हेही सगळं केलं. कारण त्या वेळी माझं अपंगत्व हे माझ्या व माझ्या आई-वडिलांच्या मागच्या जन्मातील पापांशी जोडलं जात होतं. माझ्यातल्या कथित ‘व्यंगा’चं कारणं शोधता-सांगताना माझ्या आईमध्येच काहीतरी कमतरता आहे हे पुरुषसत्ताक मानसिकतेत घडलेली माणसं वेळोवेळी दाखवून देत होती. हे सगळे उपचार वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत सुरू होते. सततच्या उपचारांनी माझ्या शरीराची चाललेली चाळण, ढासळती आर्थिक परिस्थिती, हे सगळं पाहून शेवटी जे जसं आहे तसं स्वीकारून पुढे जाण्याचा निर्णय घरच्यांनी घेतला. आयुष्यात जोपर्यंत एखादी गोष्ट आपण आहे तशी स्वीकारत नाही, तोपर्यंत त्या परिस्थितीतून बाहेर निघून उपाय शोधताच येणार नाही.. आणि तसंच झालं.

अनेक नकार पचवल्यानंतर गावातल्याच सरकारी शाळेत मला प्रवेश मिळाला. मी अभ्यासात चांगली प्रगती करत होते, त्यामुळे घरच्यांनीही पुढील शिक्षणासाठी विश्वास दाखवला. आईने कधीही हार न मानता माझ्या शिक्षणाचं धनुष्य पेलून धरलं. लोकांच्या वागण्यामुळे असो किंवा स्वत:च्या मर्यादांमुळे, बरेचदा आयुष्य संपवण्याचेही विचार मनात यायचे. माझ्या शारीरिक मर्यादांमुळे घरच्यांना होणारा त्रासही पाहवत नव्हता. मला लोकांपर्यंत, मित्र-मैत्रिणींपर्यंत पोचता येत नव्हतं त्यामुळे मी आपसूकच सगळ्यांपासून लांब होत गेले. मात्र आईने आपल्याला मोठं करण्यासाठी एवढे कष्ट घेतले तेव्हा आयुष्य संपवणं हा विचार मला स्वार्थी वाटला. तसे नकार आयुष्यात बरेचदा मिळत गेले, पण त्याचं मुख्य कारण माझं दिव्यांग असणं नाही तर एक ‘वेगळं मूल’ म्हणून माझं आयुष्य सुकर करण्यासाठी लागणाऱ्या सुलभ सुविधांचा भवतालात अभाव असणं हे होतं. एकदा एका मैत्रिणीनं क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी मला तिच्यासोबत बालेवाडी स्टेडियमला नेलं, पण तिथे व्हीलचेअर उपलब्ध नाही, असं सांगण्यात आलं. मग तिच्या दादाने मला त्याच्या पाठीवर घेत एक-दीड किलोमीटरचा पल्ला गाठला. आजूबाजूची लोकं ‘बघ्याची भूमिका’ घेत फक्त हसत होते. मॅच संपल्यावर आम्ही बाहेर आलो. ट्रॅफिकमध्ये अडथळा नको म्हणून एका कडेला थांबलो. तिथे अचानक एक हवालदार काका येऊन म्हणाले, ‘काय लेका, तुम्हा लोकांना बाहेर फिरायची इतकी हौस?’

अर्थात, सगळेच लोक सरसकट वाईट नसतात. बहुधा अशा अनुभवांतूनच आपण आपल्या ‘मी’कडे स्पष्टपणे पाहू लागतो. जेव्हा आपण स्वत:ला एक समृद्ध आणि सर्वसमावेशक समाज म्हणतो तेव्हा बरेचदा नकळतपणे आपण काही वेगळ्या गटात किंवा वेगळ्या गरजा असणाऱ्या लोकांना सोबत नेणं विसरतो. अशी लोकं मग आपोआपच नराश्यग्रस्त होतात. एक मात्र आहेच, आपल्या समाजाची सर्वसामावेशकतेची व्याख्या बहुतेकदा फक्त त्यांच्या सभोवतालच्या, ‘कम्फर्ट झोन’मधल्या लोकांपुरती मर्यादित असते.

काही वेळा कुटुंबातही तसंच होतं की.. आई जशी सहज जवळ असायची तसं मला माझे बाबा कधीच सहज सापडले नाहीत. एकेकाळी खूप रागावणारा बाबा ते ‘बघा हेमंत दिंडेची पोरगी जगभर फेमस झाली’,असं चारचौघात सांगून अभिमानाने कॉलर वर करणारा बाबा. त्यांची दोन्ही रूपं आता आठवतात. आपल्या पोरीने नेहमी पहिल्या तीन नंबरांत आलं पाहिजे, तिने आयुष्यात नेहमी टॉपचंच काम केलं पाहिजे, हा त्यांचा आग्रह असायचा. आज मागे वळून पाहिलं तर कळतं, हा धाक जर नसता तर माझ्या आयुष्याला आकार आणि शिस्त मिळाली नसती, आपल्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय याची अक्कलच नसती आली. वाहवत गेलं असतं आयुष्य कुठच्या कुठे! ‘आयुष्यात कितीही वाईट गोष्टी घडूदेत आपण आपलं काम चुकवायचं नाही,’ ही त्यांची शिकवण कधीच विसरले नाही. अचानक हृदयविकाराच्या धक्क्यानं गेले त्याला तीन वर्ष झाली. ते गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी आईने सांगितलं, ‘‘बाबाला वाटत होतं ना, तू नवनवे अनुभव घ्यावेत.’’ मी लगेच वाहते डोळे पुसत एका मोठय़ा परिषदेसाठी मुंबईला निघाले. आई-वडील, आजी या कोणीही कधीच दु:खाला कुरवाळत बसू दिलं नाही. आपले वडीलच गेल्यावर एकदम मोठं व्हायला होतं, जबाबदारी वाढते, राग वाढतो, चिडचिड वाढते, त्यात सगळ्यांना सांभाळूनही घ्यायचं असतं, पूर्ण कस लागतो. आरशापुढं उभं राहून आपलं असणं आणि दिसणं यातलं अंतर समजत जातं. मन शांत होतं आणि ‘आपुलाची वाद आपणासी’साठी जागा मिळते.

सातेक वर्षांपूर्वी एका घरगुती कार्यक्रमा- दरम्यानच अनाथाश्रमातील काही मुलांना भेटले आणि माझ्यातल्या दीक्षाला दिशा मिळाली. एक चिमुरडी जवळ येऊन म्हणाली, ‘‘ताई, जेव्हा कलेक्टर होशील, तेव्हा मला इथून घेऊन जा.’’ तिचं ते सहज बोलून गेलेलं वाक्य माझ्या आयुष्याला खोलवर वळण देणारं होतं. आजपर्यंत मी माझ्याकडे काय नाहीये तेच ठळक करून बघत होते. आणि ही मुलगी, जिचं कोणी नाही ती माझ्यावर विश्वास टाकत ‘मला इथून घेऊन जा’ म्हणत होती. जाणवलं, आपल्याला तर ऐकू येतंय, दिसतंय, देवाने चांगले आईवडील, मित्र-मत्रिणी दिलेत त्याकडे न पाहता, मी एक गोष्ट नाहीये तिला धरून बसलेय. त्यानंतर मी ‘रोशनी’ नावाच्या एका विद्यार्थी संघटनेशी जोडली गेले. वंचित मुलांचं शिक्षण, मासिक पाळीसंदर्भाने कार्यशाळा घेणे, अपंगांच्या हक्कांसंबंधी जागृती आणि त्यांना सुविधा पुरवणं अशी कामं प्रामुख्यानं असतात. संस्थेचं काम आता देशविदेशात पसरलंय. दृष्टिहीनांना ब्रेल आणि ऑडिओ बुक्स पुरवणं, त्यांचं पुनर्वसन करणं, त्यांच्यासाठी चांगला भवताल निर्माण व्हावा म्हणून मुख्य प्रवाहातल्या लोकांचं प्रबोधन करणं, असं बरंच काय काय आम्ही करतो. या सगळ्या दरम्यान मलाही माझ्यातली नवी ‘मी’ सापडत जाते.

दिव्यांगांसाठी मी २०१४ पासून काम करते आहे. दोन वर्षांपूर्वीचा ‘राज्य युवा पुरस्कार’ किंवा गेल्या वर्षी मिळालेला ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ म्हणजे मला याच कामासाठी मिळालेली शाबासकीची पावतीच मानते मी. यापुढील कामही मला कायम पाय जमिनीवर ठेवून करायचंय. या ‘मी’ला घडवण्यात मला नेहमी साथ देऊन, ‘तू कोणी वेगळी नाहीयेस’ असंच मनावर बिंबवणाऱ्या माझ्या कुटुंबाचा, मित्रपरिवाराचा मोठाच वाटा आहे. मी मागच्या वर्षी इतिहासात एम.ए. पूर्ण केलं. आता मी नोकरी करतच पीएच.डी.ची तयारी करतेय. जुलैमध्ये ‘रिहॅबिलिटेशन इंटरनॅशनल ऑफ साथ कोरिया’ या आंतरराष्ट्रीय संस्थेनं ‘युथ विथ डिसॅबलिटीज’ या गटासाठी एशिया-पॅसिफिक स्तरावर एक शोधनिबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्याअंतर्गत मी दोन शोधनिबंध लिहिले. आशिया स्तरावर दहा जणांची निवड झाली. त्यात मी भारताचं प्रतिनिधित्व करत साउथ कोरियाचा दौरा केला. ‘एशिया-पॅसिफिक युथ विथ डिसॅबलिटीज’ या समितीवरही माझी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालीय. त्याअंतर्गत दिव्यांगजनांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील, या प्रकल्पावर मी काम करतेय. सोबतच ‘युनायटेड नेशन्स’नंही मला २०२० पर्यंत जागतिक शिक्षण राजदूत ही सन्मानाची जबाबदारी दिलीय.

माझ्या आयुष्यातील प्रत्येक गुरूने मला मेहनत करून हवी असलेली गोष्ट मिळवायला शिकवलंय, शारीरिक मर्यादांचा फायदा घेऊन, सहानुभूती मिळवून नाही. बरेचजण कौतुक करतात. बरेच लोक ‘तिला तिच्या अपंगत्वामुळे मिळतं हे सगळं’ असं म्हणतात, तेही कानी पडतं. पण मी ते मनावर घेत नाही. वयाची २२ वर्ष माझं जग फक्त घर आणि शाळा-कॉलेज इथपर्यंतच मर्यादित होतं. आज जेव्हा स्वतच्या क्षमतांवर विश्वास बसलाय तसं आकाश कमी पडतंय. आज चार वेळा सातासमुद्रापार बाहेरच्या देशांत एकटीने प्रवास करण्याचं धाडस यातूनच मिळालंय.

माणसांबरोबरच पुस्तकांचा वाटासुद्धा खूप मोठा आहे मला घडवण्यात. लहानपणी आई-आजोबांनी ‘चंपक’, ‘चांदोबा’, ‘किशोर’ हातात देऊन वाचनाची भूक भागवली, वाढवली. स्वत:तली मी सापडायला पाऊलो कोएलोच्या ‘द अल्केमिस्ट’नं बोट धरून वाट दाखवली. नसीमा हुरजुक यांचं ‘चाकांची खुर्ची,’ अरुणीमा सिन्हा यांचं ‘द गर्ल हू मुव्ह्ड द माउंटन्स’, सुधा मूर्तीचं लिखाण यांनी मला डोंगराइतकं बळ दिलं. इतके दिवस बाहेरच्या जगातील मृगजळामागे धावणाऱ्या मला अचानक स्वत:मध्येच खूप मोठा खजिना सापडल्याची प्रचीती मिळाली. कळलं, मीच आहे की ती राजहंस!

आज या छोटय़ाशाच जगण्याच्या वळणावर मागे वळून पाहताना कळतं, की आयुष्यात कठीण प्रसंग आलेच नसते तर ही ‘ ‘मी’ ची गोष्ट’ समोर यायला कारणच नसतं मिळालं. प्रत्येकातल्या फिनिक्सने जळलं पाहिजे, त्याची राख झाली पाहिजे पार.. भरारी घेण्याचं कारण मिळत नाही त्याशिवाय!

diksha.d.30@gmail.com

chaturang@expressindia.com