माझ्या डोळ्यातून झरझरणाऱ्या माझ्या आतल्या दुखऱ्या अंधाऱ्या पाण्याला मी एक वचन देते. मीच माझी जनी होईन. वेणी उकलणारी आणि मीच माझा विठ्ठलही होईन.. माझं काही ‘नकोसं’ किती सुंदर आहे हे त्याच्या प्रेमळ न्हाऊ घालण्यातनं माझ्या मनाला पाझरवणारा.. माझा मानसपिता!
मा झ्या आत किती तरी लपव्याछपव्या चालू असतात. आतल्या किती तरी जागा नकोशा वाटणाऱ्या, पण त्या आहेत आत. कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी आहेत. त्या माझ्या आहेत. मला कळतं त्यांना माझ्याशिवाय कुणीच नाही. तरी मी त्यांना आपलं न म्हणता आतल्या आत दडवायला बघते, दडपायला बघते. माझ्या आतलं मला हवं तेवढं, हवं तेच पाहते. आतल्या काहीच भागावर प्रकाश टाकते. उरलेला भाग नकोसा वाटतो म्हणून अंधारातच ठेवते. पण अंधारात गोष्टी दिसत नसल्या तरी त्या तिथे असतात. त्या अंधारात ठेवल्या म्हणून नाहीशा होत नाहीत. त्या गोष्टी माझ्या आत, अंधारात आहेत हे मला दिसत नसलं डोळ्यांना, तरी जाणवत असतं. त्या माझी वाट पाहत आहेत. मी त्यांना आहे असं स्वीकारायची, ‘माझं’ म्हणायची. त्यांच्यासकटच्या मला स्वीकारायची. अशा गोष्टींपैकीच एक गोष्ट आहे ‘ती’.
ती मला आवडत नाही. माझ्या आसपासच्या बऱ्याच जणींना ‘ती’ आवडत नाही. तिची घाण वाटते. तिच्यामुळे पोटात दुखतं, कंबर दुखते. शाळेत असताना तिच्यामुळे कधी तरी कपडय़ांवर डागपण पडलेत, लाल.. अगदी पूर्वी तर तिच्यामुळे आमच्यासारख्या सगळ्यांना बाजूला बसवायचे. आम्हाला स्पर्शही केला जायचा नाही. माझ्या लहानपणी अशा काही बाजूला बसलेल्या पाहिल्या खऱ्या, पण आता ते सगळं इतिहासजमा..
मला तिची चांगली बाजू शाळेत, शास्त्राच्या पुस्तकात जाता जाता कळली तेवढीच. ती बाळ होण्याच्या निर्मितीची मूलाधार. पण तेवढय़ापुरतं शास्त्रात शिकलेलं तिच्या माझ्या रोजच्या नात्याला काहीच सकारात्मक पुरवत नाही. ती तरीही कायम मला नकोशीच. कशाच्या तरी आड येणारी. नेमकी नाटकाच्या पहिल्या प्रयोगादिवशी आली, नेमकी ट्रिपच्या दिवशी आली. अशा दूषणांनीच तिचं माझं नातं भरलेलं. ती नित्यनियमाने तिच्या तिच्या वेळेत येते बापडी. पण तिच्याबद्दलच्या नकोशानं मला तिचं येणंसुद्धा लक्षात ठेवावं वाटत नाही. ती वचन दिल्यासारखी ठरलेल्या तारखेला येते. ती तारीख विसरलेली मी उलट तिलाच, आज कशी आलीस अचानक? असं रागात विचारून बुचकळ्यात टाकते. एकदाही तिचं स्वागत केल्याचं आठवत नाही. तिला नेहमीच मी नावडत्या पण न टाळता येणाऱ्या नातेवाइकासारखं पाणीसुद्धा न विचारता तिष्ठत ठेवलेलं आहे. तिला मी एकदाही आपली म्हटल्याचं आठवत नाही. तिच्यासकटच्या मला आहे तसं, घाण न मानता मला पाहता आलेलं नाही.
परवा एका कार्यक्रमातल्या एका सुंदर रचनेनं, ती रचना लिहिणाऱ्या माझ्या जुण्याजाणत्या सखीनं मला ते शिकवलं. त्या सखीचं नाव संत जनाबाई. त्या कार्यक्रमाचं नाव, ‘जनी म्हणे..’  झेलम परांजपे या विख्यात ओडिसी नर्तिकेनं त्यात जनीची एक रचना सादर केली. जनी वयात येते. तिला बाजूला बसवलं जातं. तेव्हा तिला खूप एकटं वाटतं. तिच्या त्या ‘स्त्री एकटय़ा’तही तिचा विठुराया तिला साथ देतो. एका अर्थाने त्या एकटय़ा तिला तो स्वीकारतो. आपलंसं करतो. जनीच्या त्या रचनेला झेलमताईनं ज्या पद्धतीनं फुलवलं, जनीच्या शब्दात तिनं जे काही पाहिलं, स्वत: अनुभवलं आणि प्रेक्षक म्हणून मला अनुभवू दिलं, ते सारं आतल्या अनेक गाठी हळुवार सोडवणारं होतं. आतून मला सैलावणारं. माझ्यातल्या दडवलेल्या थोडय़ा तरी अंधारापाशी हळुवार प्रेमळ पणतीचा प्रकाश आणणारं होतं. जनी बाजूला बसली आहे, एकटीच. तुळशीच्या बनात. तिच्या मनात काय काय चाललेलं, वयात येते आहे. शरीर बदलतं आहे. ते आतून सुखावणारं वाटत आहे. पण तरी खूप काही आवडतपण नाही आहे स्वत:चं. खूप काही कळतही नाही आहे आतलं. समजावणारंपण कुणी नाही. अशा एकुटवेळी तिला लहानपणाच्या बागडण्याच्या आठवणी येत आहेत. ते पारदर्शी आनंदी दिवस.. अजून आत आहेत खरं तर. मनात अजून तेवढंच लहानगं वाटतं आहे. पण शरीर हे काय म्हणतं आहे, ज्याने मी अशी ‘बाजूला’ बसले आहे, अशा त्या एकटय़ा क्षणी ‘तो’ तिथे आला आहे. तिचा चक्रपाणी. तिला बाप म्हणून न्हाऊ घालायला. सांगायला, ‘‘हे जे काही बदलतं आहे ना, ते दुखरं असलं थोडं तरी सुंदर आहे. बाळे, मी तुझ्याबरोबर आहे..’’
 जनी म्हणते ,
जनी उकलीते वेणी तुळशीचे बनी
हाती घेऊनिया लोणी डोई चोळी चक्रपाणी
माझे जनीला नाही कोणी नाही कोणी
म्हणूनी देव घाली पाणी
जनी सांगे सर्वलोका, न्हाऊ घाली माझा पिता
हल्ली असं काही पाळता येतंच असं नाही, पण अगदी माझ्या लहानपणापर्यंत ‘ती’ आली की चौथ्या दिवशी न्हायची पद्धत होती. म्हणूनच तिला ‘न्हाणं आलं’ म्हणतात का? पण हे साक्षात विठ्ठलानं जनीला न्हाऊ घातलेलं न्हाणं. त्या ‘बाजूला’ बसण्याच्या गरम्म एकटेपणानं तेव्हापासून ते अगदी आतापर्यंत बाजूला न बसाव्या लागणाऱ्या माझ्याही मनात किती गाठी मारून ठेवलेल्या आहेत. ‘जनी उकलीते वेणी’. जनी या सगळ्या गाठी उकलून केस मोकळे करते आहे. तिला स्वत:ला मोकळं करते आहे. तिच्यासारख्या मला मोकळं करते आहे. तिचा विठ्ठल तिच्या डोईवर मऊ थंड लोणी चोळत असताना तो मऊ थंडपणा माझ्याही आतलं किती, काही सैल करतो आहे. तो पित्याचा हात मलाही थंडावतो आहे.
‘आपल्याला कुणीच नाही’ असं आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पद्धतीनं वाटत असतं. जनीचं हे ‘त्या’ दिवसातलं ‘मला कुणी नाही’ असं वाटणं, हे त्या दिवसांचं अनाथपण माझ्याही माहितीचं, त्या दिवसांत कधी कधी उगीच टचकन रडू येतं. कुणीच नाहीसं वाटतं. खूप रागवावंसं वाटतं आणि स्वत:च्या या सगळ्या वाटण्याचाही राग येत असतो. त्या वेळी त्या कातर एकटय़ा क्षणांना मला तरी कुणा स्त्रीपेक्षा जवळ हवा असतो तो कुणा ‘त्याचा’ प्रेमळ हात. हो, स्त्री मुक्त झाली, आधुनिक झाली, कुणाच्याही मदतीशिवाय सगळं काही यायला लागलं तिला. हो मान्य. पण अजूनही माझ्या आयुष्यात तरी काही वेळा फक्त ‘त्याच्या’ आठवणीच आहेत. त्या बाबतीत मी अजून ‘मागची’ राहिली असेन कदाचित, पण काही एकटेपणांना फक्त ‘त्याचा’ हात हवासा वाटतो. आपापलं सगळं जमवता जमवता एकदम कुणा त्याच्यावर विसंबावंसं वाटतं. ‘तो’ म्हणजे फक्त नवरा या अर्थानं नाही. तो- सखा, पिता, विठ्ठल, ‘तो’ एक संकल्पना. ज्यावर सगळं विसंबून मोकळं व्हावं असा. म्हणून ‘जनी सांगे सर्वलोका, न्हाऊ घाली माझा पिता’ हा क्षण जनीइतकाच माझाही वाटतो मला. माझ्याही आयुष्यात घडावा असं खूप खूप असोशीनं वाटलेला आणि कित्येकदा जेव्हा हा क्षण अनुभवायला मिळाला, तेव्हा आयुष्यभर त्याची ऋणी राहायला लावलेला तो क्षण. तो क्षण झेलमताईनं जो साकारला आहे तो अविस्मरणीय आहे. ‘माझे जनीला नाही कोणी, नाही कोणी’ या ओळीला झेलमताई अतिशय एकाकी, विकल, एकुटवाणी खाली बसते. तिची मान खाली. डोळे खाली. जणू एक मृत पाखरू. वाद्यवृंद शांतवलेला. जनी एकटीच पडलेली. तोच सतारीचा एक मंद झणत्कार. त्या पाखराच्या पाठीवर पाण्याचा थेंब पाडणारा. ते थरारतं. अजून एक थेंब. अजून, अजून. जनी त्या प्रेमथेंबांनी शहारत जाते. तिच्या अंगावरचं ते टपटपणारं पाणी हळूहळू वाढत जाणाऱ्या सतारीतून, बासरीतून, व्हायोलिनमधून, मृदंगातून झेलमताईच्या भिजून जाण्याच्या शब्दातीत आविष्कारातून आणि आपल्या डोळ्यातूनही झरायला लागतं. ते पाणी.. विठ्ठल जनीच्या अंगावर बरसवतो आहे. ती आकंठ न्हाते आहे. ते पाणी तिला मोकळं करत माझ्या डोळ्यावाटे वाहत आहे. मलाही मोकळं करत आहे.
त्या माझ्या डोळ्यातून झरझरणाऱ्या माझ्या आतल्या दुखऱ्या अंधाऱ्या पाण्याला एक वचन देते. मीच माझी जनी होईन. वेणी उकलणारी आणि मीच माझा विठ्ठलही होईन.. माझं काही ‘नकोसं’ किती सुंदर आहे हे त्याच्या प्रेमळ न्हाऊ घालण्यातनं माझ्या मनाला पाझरवणारा.. माझा मानसपिता!