सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व
मी मुलांवर विश्वास ठेवला, अंधविश्वास ठेवला नाही. फाजील लाड केले नाहीत, तसा जास्त धाकही दाखवला नाही. वर्तमानपत्र व चांगलं वाचायची सवय लावली. आपल्यापेक्षा बुद्धीने, विचाराने व ज्ञानाने श्रेष्ठ असणाऱ्यांशी मैत्री करावी, हे सांगितलं.. आज दोन्ही मुलांच्या बाबतीत मी समाधानी आहे.
मूल शाळेत जाण्यायोग्य झालं म्हणजे मुलापेक्षा त्याच्या पालकांनाच त्याचा ताण येतो. लहान मुलांच्या कोणत्याही शाळेच्या बाहेरची पालकांची गर्दी पाहिली म्हणजे या विधानातली सत्यता पटते. बरेच पालक तर शाळा सुटेपर्यंत तिथेच थांबतात. याला काय म्हणावं. कौतुक, काळजी की आपल्या मुलाला आपणच अपंग बनवणं?…
मला एक मुलगा. एक मुलगी. दोघांनाही मी शाळेत पोहोचवायला जात असे आणि लगेच परत येत असे. त्यामुळे मुलं शाळेत रडली तरी ते मला न कळल्यामुळे ताण यायला प्रश्न नव्हता. हळूहळू त्यांनाही कळायला लागलं की रडून काही उपयोग नाही. पप्पा पुन्हा घरी न्यायला येत नाहीत. हे वागणं तेव्हा थोडंसं कठोर असेल, पण त्याचा सकारात्मक परिणाम दिसला. शिक्षणाच्या बाबतीत आपले आई-बाबा आपले लाड करणार नाहीत. हेही ते जसजसे मोठे होत गेले, तसं त्यांना समजू लागलं आणि त्यांनी ते स्वीकारलं.
एवढं असून मुलगी दहावीला नापास झाली. मी एका शब्दानेही बोललो नाही. मुलगा कॉलेजला गेला. प्रत्येक वर्षांत त्याचे विषय राहू लागले. तेव्हा मात्र माझ्यातला पालक जागा झाला. त्याला कारण होतं, माझे भाऊ-बहिणी. एके दिवशी कोणत्या तरी कौटुंबिक कारणानिमित्त सगळे जमले असताना, त्यांनी मला आणि मुलांना धारेवर धरलं. मी मुलांकडे लक्ष देत नाही म्हणून मला, आणि मुलं कमी मार्क मिळवतात म्हणून त्यांना. तेव्हाही मी शांत राहिलो.
मग एके दिवशी घराच्या गच्चीवर दोन्ही मुलांना (प्रत्येकाला स्वतंत्र) घेऊन गेलो आणि शांतपणे त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही तुमच्या आवडीचा अभ्यासक्रम निवडला आहे. जसा आणि जेवढा अभ्यास कराल, तसे मार्क मिळतील. तशी नोकरी मिळेल. नोकरीच्या आणि पगाराच्या लायकीचा जोडीदार मिळेल. आणि त्याच श्रेणीतला संसार तुम्हाला करावा लागेल. दर महिना अखेरीस उसनवारी करून तुम्हाला जगायचं असेल, तर माझी हरकत नाही, हे एक आणि मी कुठेही डोनेशन देणार नाही. चांगले कॉलेज पाहिजे असेल, तर तसे मार्क मिळवा. मी फी, क्लास, पुस्तके याला अपुरा पडणार नाही. पुन्हा नापास झालात, तर तुमचं शिक्षण आहे, तिथंच थांबवेन.’’ एवढंच सांगितलं, पण शांतपणे.
माझ्या बोलण्याचा परिणाम झाला. दोन्ही मुलं पहिल्या श्रेणीत ग्रॅज्युएट झाली. दोघांना पुढे शिकायचं होतं. मुलीला एम.एस.डब्ल्यू. आणि मुलाला एम.बी.ए. करायचं होतं. मुलीचा नंबर मेरिटने लागला. डोनेशन अर्थातच नाही. मुलगा एमबीए प्रवेश परीक्षा पास झाला. पण कमी मार्कामुळे त्याने मिळालेलं साधारण कॉलेज नाकारलं. एक वर्ष गॅप घेतो आणि चांगले कॉलेज मिळवतो, म्हणाला. मी विश्वास ठेवला. मुलाने या विश्वासाला जागून एम.बी.ए. मार्केटिंग आणि फायनान्समध्ये प्रथम श्रेणीत केलं. तिन्ही कॅम्पस इंटरव्ह्य़ूमध्ये त्याची निवड झाली आणि नोकरीपण त्यानेच मिळवली.
या सर्व प्रक्रियेमध्ये मुलाने कुठे अ‍ॅडमिशन घेतली, कुठे रूम घेतली, कोणती मेस लावली यात मी कधीही, कुठेही मध्ये पडलो नाही. त्याचे निर्णय त्याला घेऊ दिले. कुबडय़ांची सवयच लावली नाही. त्यामुळे दोन्ही मुलांनी त्यांच्या जबाबदारीचे भान ठेवून माझ्या नातेवाइकात माझी मान खाली जाऊ दिली नाही. कारण मरणापूर्वी माझी आई माझ्या दोन्ही मुलांना सांगून गेली होती, ‘पप्पांपेक्षा मोठे व्हा.’ मी मोठा आहे की नाही, मला माहीत नाही. पण मी मुलांवर विश्वास ठेवला, अंधविश्वास ठेवला नाही. फाजील लाड केले नाहीत, तसा जास्त धाकही दाखवला नाही. वर्तमानपत्र व चांगलं वाचायची सवय लावली. आपल्यापेक्षा बुद्धीने, विचाराने व ज्ञानाने श्रेष्ठ असणाऱ्यांशी मैत्री करावी, हे सांगितलं..
 आज दोन्ही मुलांच्या बाबतीत मी समाधानी आहे.