13 December 2019

News Flash

प्रतिदाहक ग्लुटॅथिऑन

फ्रेडरिक हॉपकिन्स यांना ज्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले तो अन्नघटक म्हणजे ग्लुटॅथिऑन.

|| डॉ. नितीन पाटणकर

फ्रेडरिक हॉपकिन्स यांना ज्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले तो अन्नघटक म्हणजे ग्लुटॅथिऑन. व्हिटॅमिन ‘ई’ आणि ‘सी’ यांना प्रतिदाहक म्हणून ओळखले जाते, परंतु त्यापेक्षा कित्येक पट ताकदवान प्रतिदाहक म्हणजे ‘ग्लुटॅथिऑन’. ते शरीरात कमी पडले म्हणून ज्या रोगांना वाढण्यास चालना मिळते त्यात अल्झायमर्स, पाíकन्सन्स, एड्स, रक्तदाब, हृदयविकार, कोलेस्टेरॉलची अनियंत्रित वाढ आदींचा समावेश होतो. शरीरातील ग्लुटॅथिऑनचे प्रमाण वाढण्यासाठी काय करता येईल?

सूक्ष्म अन्नघटक किंवा मायक्रोन्यूट्रियंट्स हे प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि कबरेदकांइतकेच महत्त्वाचे असतात. हे व्यवस्थित असले तर स्वास्थ्य उत्तम असते. यांच्या असण्याचे दृश्य परिणाम दिसत नाहीत आणि नसले तर जे परिणाम दिसू लागतात ते पटकन कळत नाहीत. म्हणूनच यांच्या नसण्याचे परिणाम माहीत करून घ्यायला लागतात. एकदा का अशा संशयी दृष्टीने बघायला लागले की यांची कमतरता पटकन दिसून येते. सूक्ष्म अन्नघटकांच्या बाबतीत ही संशयी दृष्टी फायदेशीर असते; कारण लवकर निदान झाले तर त्यावरचे उपाय सोपे असतात.

सूक्ष्म अन्नघटक म्हटले की जीवनसत्त्वे आणि क्षार किंवा खनिजे डोळ्यासमोर येतात. ते अगदी बरोबर आहे, पण हे सोडूनही अनेक सूक्ष्म अन्नघटक आहेत जे बरेचदा माहीत नसतात. अशाच एका अन्नघटकाची ओळख करून घेऊया. ज्याचे नाव आहे  ‘ग्लुटॅथिऑन’. याचे मराठी भाषांतर नाही. सर फ्रेडरिक हॉपकिन्स यांनी शोध लावला ग्लुटॅथिऑनचा. या पदार्थाचे इतके गुणधर्म समोर आले की याला ‘जीवसृष्टीची सुरुवात करणारा पदार्थ’ असे नाव दिले गेले. १९२९ चे नोबेल पारितोषिक फ्रेडरिक हॉपकिन्सना मिळाले ते याच शोधाबद्दल.

गेल्या लेखात (२७ जुलै) आपण इन्फ्लमेशन किंवा प्रतिदाह म्हणजे काय ते पाहिले. प्रतिदाह हा अत्यल्प असेल तर तो फायदेशीर असतो पण जास्त असेल तर त्याचे दुष्परिणाम होतातच. हा प्रतिदाह निर्माण करण्यासाठी शरीर एक सोपी युक्ती करते. आपण जो प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन शरीरात घेतो त्याचाच विविध पद्धतीने वापर केला जातो. अन्नातील ऊर्जा मोकळी करण्यासाठी ऑक्सिजन लागतो. या ऑक्सिजनला संजीवक स्वरूपातील ऑक्सिजन म्हणतात. याच ऑक्सिजनचे एक रूप असते त्याला दाहक स्वरूप म्हणतात. हा दाहक ऑक्सिजन जीवाणूंना मारण्यासाठी उपयोगी पडतो. गरजेपेक्षा खूप जास्त अन्न घेतले तर संजीवक आणि दाहक असे दोन्ही ऑक्सिजन तयार होतात. दाहक ऑक्सिजन हा स्वत:च्या पेशींचेही दहन करू पाहतो. त्यातूनच प्रतिदाह निर्माण होतो आणि बरेच रोगसुद्धा निर्माण होतात. यालाच ‘ऑक्सिडेटिव्ह डॅमेज’ म्हणतात.

पूर्वी संसर्गजन्य आजार होते त्यांची जागा आता जीवनशैलीजन्य आजारांनी घेतली आहे. या सर्व जीवनशैलीजन्य आजारांचे मूळ हे ‘प्रतिदाह आणि दाहक प्राणवायू’ यामध्ये आहे. जेव्हा कुणीही विचारतो, सर्वात जास्त साइड इफेक्ट असलेली औषधे किंवा पदार्थ कोणते तर त्याला उत्तर आहे, ‘गरज नसताना खाल्लेले अन्न’.

व्हिटॅमिन ‘ई’ आणि ‘सी’ यांना प्रतिदाहक (अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट) म्हणून ओळखले जाते. त्यापेक्षा कित्येक पट ताकदवान प्रतिदाहक म्हणजे ‘ग्लुटॅथिऑन’. ‘सी’ आणि ‘ई’ ही जीवनसत्त्वं शरीरातील पेशींच्या बाहेरील बाजूस काम करतात. पेशींच्या आत ‘ग्लुटॅथिऑन’ काम करते. प्रत्येक पेशीचा प्राण म्हणजे तिचे केंद्रक (न्युक्लीअस). तसेच प्रत्येक पेशीचा ऊर्जास्रोत असतो त्याला ‘मायटोकॉन्ड्रिया’ म्हणतात. दाहक ऑक्सिजनची दृष्टी या अतिमहत्त्वाच्या ठिकाणांवर पडली तर पेशी मृत होऊ शकतात.  ‘ग्लुटॅथिऑन’ या दाहक ऑक्सिजनपासून त्यांचे रक्षण करतेच पण इतरही अनेक ठिकाणी ‘ग्लुटॅथिऑन’ संरक्षक म्हणून काम करते.

ग्लुटॅथिऑन शरीरात मुबलक प्रमाणात तयार होत असले तरी त्याचा वापर खूप ठिकाणी होतो, गरज खूप ठिकाणी भासते. यामुळेच ते खूप असूनही कमी पडते. ग्लुटॅथिऑन कमी पडले म्हणून ज्या रोगांना वाढण्यास चालना मिळते त्या रोगांची यादी पाहिली तरी या सूक्ष्म अन्नघटकाचे  महत्त्व लक्षात येईल – अल्झायमर्स, पाíकन्सन्स, मेंदूचे आजार दमा, सी.ओ.पी.डी. (फुप्फुसाचे विकार) एड्स, प्रतिकारक्षमता कमी होण्याचे आजार रक्तदाब, हृदयविकार, कोलेस्टेरॉलची अनियंत्रित वाढ मोतीबिंदू, काचिबदू, रेटिनाचे आजार श्रवणदोष यकृताचे आजार, त्यातून वाढीला लागणारा टाइप २ मधुमेह अकाली वार्धक्य ग्लुटॅथिऑन इतके आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहे. हे आहारातून मिळविण्यासाठी विविध पदार्थ आहारात असावे लागतात. ग्लुटॅथिऑन हे तीन प्रथिनिका (पेप्टाइड्स) मिळून बनलेले असते. सिस्टीन, ग्लयसिन आणि ग्लुटामिक अ‍ॅसिड या तीन प्रथिनिका. त्यामुळेच या तीनही मिळविण्यासाठी एकच एक पदार्थ खाऊन भागत नाही. तसेच या तीनही प्रथिनिकांना एकत्र बांधण्यासाठी लागणारे पदार्थ आहारातून मिळवावे लागतात.

कोबी, फ्लॉवर  यांसारख्या सल्फरयुक्त भाज्या, लसूण आणि कांदा यांना ऑलियम भाज्या म्हणतात. यातूनही सल्फर मिळते. सल्फरयुक्त भाज्यांमुळे सिस्टीनचे प्रमाण वाढायला मदत होते. व्हिटॅमिन ‘सी’ मुबलक प्रमाणात पोटात गेल्यास ते ग्लुटॅथिऑनच्या कामात मदत करते. त्यामुळे ग्लुटॅथिऑनची बचत होऊन त्याचे प्रमाण वाढायला मदत होते. सेलेनियमयुक्त पदार्थ खाल्ल्याने ग्लुटॅथिऑन बनण्यास मदत होते. बीफ, चिकन, ब्राऊन राइस, पनीर यातून चांगल्या प्रमाणात सेलेनियम मिळू शकते. पालक, शतावरी, भेंडी या भाज्यांतून ग्लुटॅथिऑन मिळते. दुधातून ग्लुटॅथिऑन मिळत असले तरी ते अत्यल्प असते. पण ‘व्हे प्रोटीन’ आहारात सामावता आले तर त्यातून चांगल्या प्रमाणात ग्लुटॅथिऑन मिळू शकते. हळद घालून दूध पिणे हे ग्लुटॅथिऑनची परिणामकारकता वाढवते.  ‘हळद घालून गरम दूध’ पिणे हा प्रकार सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. घसा दुखत असेल तर हे तोंड वेंगाडत किंवा तोंड न वेंगाडता प्यायल्याचे सगळ्यांनाच आठवत असेल. असे दूध प्यायल्याने आवाज सुधारतो असे सांगून ते मला प्यायला लावल्याच्या आठवणी अजून ताज्या आहेत. माझा गाण्याचा सोडाच बोलण्याचा आवाज ऐकण्याचे भाग्य ज्यांना लाभले असेल त्यांना कल्पना येईल की, हळद घालून दूध पिण्याने आवाज सुधारतो हे मुलांना सांगणे ही निव्वळ थापेबाजी आहे. मात्र दूध पिऊन त्यातून ट्रिप्टोफॅन नावाची प्रथिनिका मुबलक मिळते आणि झोप छान लागते हे अनेकजणांच्या बाबतीत घडते.  दूध आणि हळद या मिश्रणातून ग्लुटॅथिऑनची परिणामकारकता वाढते हेही सिद्ध झाले आहे. ‘हळद घालून दूध’ या पेयाची अवस्था, ‘अतिपरिचयात अवज्ञा’ अशी झाली आहे. अमेरिकेत ‘टम्रेरिक लाटे’ या नावाने ते लोकप्रिय आहे. याच नावाने ते भारतातही लोकप्रिय होत आहे. वजन वाढवण्यासाठी जी मुले-मुली येतात त्यांच्यासाठी ‘फणसाची साठे’ किंवा फणसपोळी ही ओला खवलेला नारळ घालून खाण्याचा सल्ला मी देत असतो. पूर्वी फणस, नारळ हे शब्द ऐकले की मुले नाके मुरडत. आमच्या क्लिनिकची आहारतज्ज्ञ अर्थात डाएटिशिअन आहे. तिला एकदा युक्ती सुचली. तिने फणसपोळीत खवलेला ओला नारळ भरला, वरून त्याला बटर पेपर गुंडाळला. आणि आमच्या कार्यशाळेमध्ये ती मुलांना खायला दिली. मुलांनी अत्यंत आवडीने खाल्ली. फरक इतकाच होता, तिने सांगितले की, हा एक नवीन इटालियन पदार्थ आहे, ‘जॅकफ्रूट फ्रँकी विथ कोकोनट स्टफ’.  नावात काय आहे म्हणतात ना? त्यांना ही गोष्ट सांगायला हवी.

ग्लुटॅथिऑनचे प्रमाण चांगले राहावे म्हणून निदान सहा तास शांत झोप आणि रोजचा अर्धा तास व्यायाम आवश्यक आहे. झोप आणि व्यायाम या दोन अशा गोष्टी आहेत की, त्या सांगितल्या की लोक जरा संशयाने बघू लागतात. चाचण्यांतून सिद्ध झाले आहे की, आहारातील बदल पुरेसे नाहीत तर सोबत झोप आणि व्यायाम असेल तरच ग्लुटॅथिऑनची पातळी उत्तम राहू शकते.

ग्लुटॅथिऑनची रक्तातील पातळी मोजणे अवघड असते. त्याची चाचणी सर्व ठिकाणी उपलब्ध नसते. तरीही आपल्याला अंदाज येऊ शकतो. ‘लिव्हर फंक्शन टेस्ट’मध्ये जर ‘जी.जी.टी.’ हे प्रमाण वाढलेले असेल तर ग्लुटॅथिऑन कमी पडते आहे असा अंदाज येऊ शकतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांशी सामना करताना जर कारणाशिवाय थकवा येत असेल, सांधे, अंग दुखत असेल, (ब १२ आणि ड ३ जीवनसत्त्व घेऊनही हे चालूच असेल) तर ग्लुटॅथिऑन कमी पडत चालले आहे असे समजायला हरकत नाही. ग्लुटॅथिऑन काही आठवडय़ांसाठी डॉक्टरच्या सल्ल्याने घेतल्यास या सर्व लक्षणांमध्ये सुधारणा तर होतेच, पण या रोगातील गुंतागुंतपण कमी होतात. आजच्या घडीला ग्लुटॅथिऑन हे अन्नपूरक (फूड सप्लिमेंट) या स्वरूपात उपलब्ध आहे. त्याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध असल्याने त्याचा म्हणावा तास वापर केला जात नाही.

जर ग्लुटॅथिऑन योग्य प्रमाणात योग्य दिवसांसाठी पोटात गेले तर त्याचा प्रतिदाह आणि दाहक ऑक्सिजनचे परिणाम कमी करण्यासाठी उपयोग होतो. सध्या हेच ग्लुटॅथिऑन दुसऱ्याच कारणासाठी वापरले जाते. वार्धक्य रोखण्यासाठी आणि त्वचेचा रंग उजळ करण्यासाठी ग्लुटॅथिऑन खूप उपयोगी पडते. ‘मला हे औषध पुन्हा नाही का लिहून देऊ शकणार?’ असे रुग्णाने विचारण्याचे भाग्य लाभलेले दुर्मीळ प्रकरण म्हणजे ग्लुटॅथिऑन!

nitinp810@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on August 10, 2019 12:10 am

Web Title: glutathione vitamin e mpg 94
Just Now!
X