‘गोफ जन्मांतरीचे’ हे पुस्तक लिहिणं हा माझ्या वैयक्तिक आयुष्यातही एक महत्त्वाचा अनुभव ठरला. उत्क्रांती या विषयावर समग्र आणि तेही ललित अंगाने लिहायचं म्हणजे आधी स्वत: तो विषय सर्व बाजूंनी नीट समजून घेणं आवश्यकच होतं. विषय खोलात जाऊन अभ्यास सोपा करून मांडताना, अनेक पुस्तकं वाचून संकल्पना समजून घ्याव्या लागल्या, त्यामुळे एक झालं. हा विषय छान समजला. एक वेगळी दृष्टी मिळाली. मानवी व्यवहार अधिक स्पष्टपणे कळू लागलं. माणसामाणसातील नाती, त्यातील ताण, व्यक्ती आणि समाज या दोन्ही परस्परविरुद्ध भूमिका एकाच वेळी बजावताना होणारी ओढाताण, सारं लख्ख उमजू लागलं. मुख्य म्हणजे, माझ्या आवडीच्या कलाकृती नव्याने समजू लागल्या.
आपलं मन ‘कोणात का’ गुंततं हे तर उत्क्रांतीचं विज्ञान सांगतंच पण ‘कोणात किती प्रमाणात’ गुंततं याचंही गणित मांडतं. ते समजून घेतलं की ‘माया पुढे पळते’ याचा अर्थ कळतो. ‘नातवंडं म्हणजे दुधावरची साय’ याचा उलगडा होतो. ‘आपली मुलं वाईट नाहीत सरकार, आपलं म्हातारपण वाईट आहे’ या नटसम्राटमधील वाक्यातील कठोर वास्तव समजून घेता येतं. ‘तुझं माझे जमेना, तुझ्याविना करमेना’ अशा स्त्री-पुरुष नात्याची पुन्हा एक वेगळीच गंमत आहे. त्यांच्यात जनुकीय नातं नाही. परंतु दोघांचंही समान भाग भांडवल मुलांमध्ये गुंतलेलं असतं. त्यामुळे त्यांच्या नात्यात वेगळेच पेच! ‘Men are after quantity and women are after quality.’ हे वैज्ञानिक सत्य अभ्यासल्यावर ‘शेवटी मीही एक पुरुष आहे’, या वाक्यातील अगतिकता समजते. तसेच बुद्धिमान देवदत्ताची आणि पिळदार शरीराच्या कपिलची एकाच वेळी अभिलाषा धरणाऱ्या ‘हयवदन’ नाटकातील पद्मिनीची ओढाताण समजते. पुरुषाची फुलपाखरी वृत्ती आणि स्त्रीचा पूर्ण पुरुषाचा ध्यास या नैसर्गिक प्रेरणा आहेत, हे कळल्यावर मात्र जोडीदाराशी एकनिष्ठ राहून कुटुंबसंस्थेला आणि पर्यायाने समाजजीवनाला स्थैर्य देणारी माझ्या आसपासची सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसं मला अधिक ‘मानवी’ आणि म्हणूनच अधिक ‘थोर’ वाटू लागली. कारण नैसर्गिक प्रेरणेनुसार वागणं ही प्राण्यांची ‘जनुकीय नियती’ आहे, नैसर्गिक प्रेरणेला बुद्धीने लगाम घालणं, प्रसंगी जनुकांविरुद्ध बंड करणं हे माणसाचं सामथ्र्य आहे.
माणूस ‘कसा’ आहे हे मला साहित्यातून समजलं आणि तो तसा ‘का’ आहे हे विज्ञानाने सांगितलं. माझ्या मनातील बरेचसे प्रश्न सुटले. सजीवसृष्टीचं कोडं उलगडलं. मानवी व्यवहाराचे नियम समजले. आपल्या संवेदनांचा आवाका, क्षमतांची ताकद आणि मर्यादांची जाणीव झाली. आता मला मिळालेल्या अवकाशकाळाच्या लहानशा चौकटीत निसर्गनियम मान्य करून, जगण्याचा खेळ मी समरसून खेळणार आहे. एवढंच नाही तर, त्या खेळाकडे अधिक डोळसपणे, अधिक सजगतेने पाहण्याचा आनंदही घेणार आहे आणि एवढं यश माझ्यासाठी रगड असणार आहे.
दोन पुस्तकं माझ्या नावावर असली तरी मुळात मी वाचकच आहे. वयानुरूप वाचनाची आवड बदलत गेली. कालांतराने वाचन इंग्रजीकडे वळलं. साहित्यातून माणूस कसा आहे हे हळूहळू उलगडत गेलं. पण तो तसाच का आहे, मुळात माणूस आणि ही सजीवसृष्टी अस्तित्वातच का आली, कशी आली याबाबत मला काहीच हाती लागलं नाही. वैद्यकीय शिक्षण घेताना, शरीराची रचना आणि कार्य अभ्यासताना एवढी प्रचंड गुंतागुंत आणि त्यामध्ये असलेली कमालीची सुसूत्रता पाहताना जाणवलं. वरपांगी साध्या, सहज, नैसर्गिक दिसणाऱ्या लहानशा सजीवातही अचंबित करणारी एक योजित व्यवस्था दडली आहे. त्याच्या कार्यकारणाविषयी मात्र काहीही पत्ता लागला नाही. कालांतराने मी व अजय आम्ही दोघांनीही उत्क्रांती या विषयावरची आणि त्याच्या अनुषंगाने इतरही अनेक पुस्तकं वाचली, चर्चा केल्या, वाद घातले. डोळ्यावरचं एक-एक अभ्रं नाहीसं झालं. चार अब्ज वर्षांचा चलतचित्रपट डोळ्यासमोर उलगडला. सजीवसृष्टीच्या स्पष्टीकरणासाठी आता कोणत्याही गृहीतकाची गरज उरली नाही.
वैज्ञानिक तत्त्व जाणून घेणं आणि त्याचा तांत्रिकदृष्टय़ा उपयोग करून घेणं याबाबत आपला काळ हा अद्वितीयच म्हणावा लागेल. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत जनुकीय तंत्रज्ञानाने क्रांती घडते आहे. काळाबरोबर राहायचं असेल तर आपल्या सर्वानाच हे सारं समजून घ्यावं लागेल. ‘राजहंस’ने प्रकाशित केलेल्या ‘गोफ जन्मांतरीचे – अस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे’ या पुस्तकाची निर्मिती, हे त्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे. ‘गोफ जन्मांतरीचे’ लिहिताना सारखं वाटायचं. ‘कोण हे पुस्तक वाचेल? आणि कशासाठी? आपल्याला जी गोष्ट महत्त्वाची वाटतेय, ती इतरांनाही वाटेल असं का गृहीत धरतोय आपण? आजच्या सहज करमणुकीच्या जगात अशा गंभीर विषयावरच्या पुस्तकाला काही स्थान उरलंय का?’ परंतु लवकरच मला समजलं की, मराठी वाचकांना ओळखण्यात माझी चूक झाली होती. वाचकांनी या पुस्तकाला भरभरून प्रतिसाद दिला. अवघ्या चार महिन्यांत या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली. वाचकांच्या अभिप्रायानुसार दिला जाणार नाशिकच्या ‘सा.वा.ना.’चा प्रतिष्ठित पुरस्कारही या पुस्तकाला मिळाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत फोन आले. लहान-लहान खेडय़ांतील फारशा न शिकलेल्या गृहिणींनीही नेमक्या आणि नेटक्या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. लोकांना हे पुस्तक ‘आपलं’ वाटलं, ते खूप लोकांपर्यंत गेलं पाहिजे अशी कळकळ त्यांच्या शब्दात होती. अनेकांनी त्यासाठी वैयक्तिक प्रयत्न केलं. तीन-चार वाचकांनी तर ५०-५० पुस्तकं विकत घेऊन आपल्या मित्र-मैत्रिणींना वाटली. वाचकांच्या या कौतुका-प्रेमापेक्षा लेखिकेला आणखी काय हवं असतं? अनेक शाळा-कॉलेज-संस्थांकडून भाषणासाठी मला आमंत्रणं आली. प्रत्येक ठिकाणी प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम खूप रंगला. लहान मुलांच्या, तरुण मुलांच्या डोळ्यात एक उत्सुकता, जिज्ञासा आणि कोडं सुटल्यावर निर्माण होणारी चमक मला दिसली. पुस्तक लिहिल्याचं सार्थक वाटलं.
chaturang@expressindia.com

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!