मूलभूत सोयी-सुविधांचीही वानवा असणाऱ्या सिंधुदुर्ग, मुरबाड, रोहा, डहाणू, पेण व मंडणगड अशा दूरदूरच्या ठिकाणच्या दुर्गम भागातील शाळांमधली स्थिती बदलण्यासाठी कारणीभूत ठरत आहे, मुंबईची ‘लोककल्याण’ शिक्षण संस्था. संस्थेचे विश्वस्त गुरुप्रसाद रेगे आणि त्यांचा चमू शाळांच्या पुनरुज्जीवनाच्या कामी सज्ज झाला व दात्यांचे हातही मिळत गेले..

‘‘रो ह्य़ापासून ६/७ कि.मी. अंतरावरील डोंगराळ भागातील धामणसई गावातील आमची शाळा, एका जीर्ण-शीर्ण बंगल्यात भरायची. तुटकं छप्पर, पडक्या भिंती, उखडलेली जमीन, खिडक्यांच्या तर नुसत्याच चौकटी आणि नैसर्गिक गरजांसाठी पाठीमागची शेताडी! अशा परिस्थितीतही मुलांची शिकण्याची ऊर्मी मात्र थक्क करणारी. अशा या आमच्या शाळेला भेट द्यायला मुंबईसारख्या शहरातून कधी कोणी येईल याची सुतराम शक्यता नव्हती. पण जे घडलं ते कल्पनेच्याही पलीकडचं..’’ धामणसईच्या रामभाऊ महादेव वागळे विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर शाळेच्या पुनर्जन्माची कथा सांगत होते. ‘‘२००९ सालची ही गोष्ट. मुंबईच्या लोककल्याण शिक्षण संस्थेचे विश्वस्त गुरुप्रसाद रेगे (जे बालमोहन विद्यामंदिर संस्थेचे विश्वस्त व संचालक आहेत) भेटून गेल्यावर त्यांचे इंजिनीअर्स, आर्किटेक्ट आले. शाळेच्या नूतनीकरणाविषयी त्यांच्यातील चर्चा ऐकताना मला वाटे, ही बोलाचीच कढी तर नव्हे ना? कारण जिथून एका पैशाचादेखील फायदा नाही तिथे आपला वेळ आणि पैसा खर्च करायला कोण येणार हो? पण माझ्या सगळ्या शंका-कुशंकाना छेद देऊन काम सुरू झालं. मोडकळीला आलेली दारं-खिडक्या, खचलेल्या भिंती उभ्या राहिल्या. लटपटणारे लाकडी जिने घट्ट-मुट्ट झाले. नवं फ्लोअरिंग, लालचुटूक कौलं, आतून बाहेरून रंग, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह याबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मार्गदर्शन अशा कायापालटामुळे गेल्या चार-पाच वर्षांत आमचा दहावीचा निकाल ५० टक्कय़ांवरून चढत ९४ टक्कय़ांपर्यंत पोहचलाय आणि येत्या एक-दोन वर्षांत तो १०० टक्के करण्याचा आमचा इरादा आहे..’’
आधाराचा एक हात कोणता बदल घडवू शकतो हे समजण्यासाठी एवढं एकच उदाहरण पुरेसं आहे.
अशा सहा शाळा ज्या सर्व प्रकारच्या सोयी-सुविधांपासून कोसो दूर आहेत आणि ज्या सिंधुदुर्ग, मुरबाड, रोहा, डहाणू, पेण व मंडणगड अशा दूरदूरच्या ठिकाणी दुर्गम भागात आहेत, त्यांची मिणमिणती ज्योत आता लोककल्याणच्या मदतीने तेजाने उजळू लागलीय. या शाळांच्या इमारतींची डागडुजीच नव्हे तर तिथल्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘लोककल्याण’चे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी त्या शिक्षकांना मुंबईत बोलावून किंवा त्यांच्या शाळेत मार्गदर्शक पाठवून प्रशिक्षण देणं, दहावीच्या परीक्षेसाठी सराव पेपर्स, आदर्श प्रश्न व अपेक्षित उत्तरं यांचा संच पाठवणं, शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा व वाचनालयं उभी करणं, कधी कळवून तर कधी न कळवता शाळांना भेट देणं, संक्रांतीला तिळगुळाचे लाडू पाठवणं.. अशा कायमस्वरूपी संपर्काचे परिणाम आता दिसू लागलेत. पेटी, तबला, डंबेल्स, लेझीम, क्रिकेट व बास्केटबॉलचं साहित्य, झोपाळे, घसरगुंडी.. अशा अनेक खेळांची व कलेची साधनं मिळाल्यामुळे आता या शाळांतील गळतीचं प्रमाण खूपच कमी झालंय. जून २०१५ पासून या शाळांमध्ये ई-लर्निगची सुविधा सुरू होतेय. त्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर, एलसीडी टीव्ही व इतर आवश्यक उपकरणे, शिक्षकांचे प्रशिक्षण याच्या तयारीत सध्या ‘लोककल्याण’ची टीम गर्क आहे.
ही टीम कुणा धनवान मंडळींची नाही. ही आहेत तुमच्या-आमच्यासारखीच, पण ध्येयाने झपाटलेली माणसं. या लोककल्याण शिक्षण संस्थेच्या कुटुंबातील मंडळींची नावेच सांगायची तर.. गुरुप्रसाद रेगे, अनिल कुलकर्णी, डॉ. नीरज हातेकर, गोविलकर सर, डॉ. सारिका कुलकर्णी, एन.डी. पाटील सर, अ‍ॅड. दीपा चव्हाण, प्रा. पल्लवी रेगे, सुजाता आपटे, डॉ. गायत्री ठाकूर आणि असे अनेक. शाळा उभारण्याचा खर्च लाखो रुपयांचा होता. त्यासाठी या स्वयंसेवकांनी प्रथम स्वत:च्या खिशात हात घातला आणि नंतर समाजातील दानशूरांना साकडं घातलं. चांगले काम दिसल्यावर मदत मिळत जाते हा अनुभव इथेही आला.
एखादी समस्या जेव्हा आपल्या हृदयाला भिडते तेव्हाच कृतिशील उपक्रमाचा जन्म होतो. सात-आठ वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ मध्ये एकदा गुरुप्रसाद रेगे सर, नागोठणे या गावी शिक्षण महर्षी बापूसाहेब देशपांडे यांना भेटायला गेले असताना, रेगे सरांचे निरनिराळे उपक्रम जाणून घेतल्यावर त्यांचा प्रश्न होता, ‘‘आमच्या खेडय़ातील शाळांना तुमचा काय उपयोग?’’ बापूसाहेबांचा प्रश्न रोखठोक होता. ते म्हणाले, ‘‘तुम्ही एक तरी अशी शाळा पाहिली आहे का, जिथे बसायला बाके नाहीत, दिवे नाहीत, प्रसाधनगृहे तर लांबचीच गोष्ट.’’ रेगे सर सांगतात, मला या प्रश्नाचे ‘नाही’ असे उत्तर द्यायला लाज वाटली. त्याच तिरमिरीत त्यांनी ८५ वर्षांच्या बापूसाहेब देशपांडेंबरोबर भर दुपारच्या उन्हात फिरून नागोठण्याजवळच्या अशाच दोन शाळा बघितल्या. अस्वस्थ करणाऱ्या तिथल्या वास्तवाने त्यांची झोप उडाली. इथेच त्यांच्या मनात शाळा संवर्धनाचं बीज रुजलं. त्यानंतर वेळ मिळेल तेव्हा रायगड आणि ठाणे जिल्ह्य़ातील अशा दुर्लक्षित शाळा बघून येणं हा त्यांचा नेम झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील शिरोडय़ाजवळ आजगावमध्ये ‘लोककल्याण’ संस्थेतर्फे एक शाळा आणि एक डी.एड. कॉलेज चालविलं जातं. रेगे सरांचे वडील ‘बालमोहन’चे बापूसाहेब रेगे या संस्थेशी संबंधित असल्याने त्यांच्या सल्लय़ावरून नवी संस्था स्थापन न करता याच संस्थेच्या माध्यमातून हा नवा प्रकल्प राबवायचं ठरलं. ताज्या दमाची टीम मिळाल्याने आजगावच्या विद्याविहार शाळेच्या व विद्या विकास अध्यापक विद्यालयाच्या आधीच्या उपक्रमांना नवे धुमारे फुटले.

शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी काही ठरावीक असा साचा नव्हता. ‘कमी तिथे आम्ही’ या सूत्राप्रमाणे चालायचं ठरलं. या प्रकल्पासाठी शाळा निवडताना कसोशीने पाळायचे काही नियम ठरवण्यात आले. संस्थेला मदतीची खरी गरज आहे का आणि मुलांमध्ये व शिक्षकांत शिकण्या-शिकवण्याची आस आहे का हे मुद्दे सर्वात महत्त्वाचे. झालंच तर स्वत: शाळा चालवायला घ्यायची नाही आणि शाळेच्या दैनंदिन व्यवहारात हस्तक्षेप करायचा नाही हे देखील ठरलं. त्यानुसार कडू-गोड अनुभव पचवत काम सुरू झालं.
धामणसई हे आमचं गाव असल्यानं तिथल्या शाळेचं जुनं आणि नवं रूप मी प्रत्यक्ष पाहिलंय. बाकी शाळांच्या मुख्याध्यापकांशी फोनवरून बोलणं झालं. मुरबाडजवळील म्हसे गावातील सिद्धगड माध्यमिक शाळेचे सूर्यराव सर म्हणाले, ‘‘आमची शाळा सिद्धगडच्या पायथ्याशी अत्यंत दुर्गम भागात आहे. संस्थेची स्थिती फारच बिकट असल्याने सगळीच्या सगळी पावणे चारशे मुलं ज्युनियर कॉलेजसहित सतरंज्यांवर बसतात. एका मे महिन्यात तर जोरदार वाऱ्याने शाळेचं पत्र्याचं छप्परच उडालं होतं. ‘लोककल्याण’ने जबाबदारी घेतल्यापासून सगळं चित्रंच पालटलंय. त्यांनी सागितलं की, एकदा रेगे सर ‘बालमोहन’ शाळेची ८ वीची सत्तर मुलं घेऊन त्यांच्या शाळेत आले आणि त्या दिवशी ही शहरी मुलं आणि त्यांच्या शाळेची गावाकडची मुलं एकत्र शिकली. हा अनुभव दोन्ही बाजूंना बरंच काही देऊन गेला. शैक्षणिक मार्गदर्शनामुळे या शाळेचा १२ वीचा निकाल ७५ टक्कय़ांवरून ९७ टक्कय़ांपर्यंत गेलाय. इतर मुख्याध्यापकांचंही हेच म्हणणं होतं. ‘लोककल्याण’मुळे आम्हाला संजीवनी मिळाली.’’
मंडणगडमधल्या घराडी गावातील ‘स्नेहज्योती’ या निवासी अंधशाळेतील छोटीछोटी मुलं लोककल्याणने दिलेल्या मेरी गो राऊंड, झोपाळे आणि घसरगुंडय़ांवर बेहद्द खूश आहेत. या मुलांमध्ये उपजत असलेले गाण्याचे कौशल्य पाहून त्यांचं एक बँडपथक करण्याच्या दृष्टीने ‘लोककल्याण’चे प्रयत्न सुरू आहेत. निवासी अंधशाळेतील समस्या या इतर शाळांपेक्षा वेगळ्या आहेत, याबाबतीत खऱ्या अर्थाने वेगळा विचार करावा लागणार आहे आणि त्याचबरोबर या शाळेला सरकारी अनुदान मिळवून देण्याचं काम अग्रस्थानी आहे, असे रेगे सर म्हणाले.
सर म्हणतात, आमच्या समोर कामाचा डोंगर आहे. कारण शाळा नुसत्या उभ्या करायच्या नाहीत, तर त्यांचा हात धरून बरोबरीने चालवायचं आहे. ज्या शाळांना खरोखरच गरज आहे त्यांच्यासाठी आमचे दरवाजे सदैव उघडे आहेत. ज्या मुलांनी आतापर्यंत कॉम्प्युटर पाहिलादेखील नाही ती आमची मुलं पुढच्या वर्षी आधुनिक प्रणालीद्वारे शिकतील हे समाधान प्रोत्साहन देणारं असलं, तरी ही फक्त एक सुरुवात आहे. अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, पण समाजातील कृतिशील हात व संवेदनशील मनं यांची साथ असेल तर काय अशक्य आहे?
संपदा वागळे -waglesampada@gmail.com
संपर्क – लोककल्याण शिक्षण संस्था (मुंबई)
http://www.lkss.org
Email : info@lkss.org