दुसऱ्या दिवशीची सकाळ निर्णायक होती. तिची यायची वेळ झाली. वर एक तास उलटून गेला. ती आलीच नाही. त्यानंतर कधीच आली नाही. मी आयुष्याचे आभारच मानले. पण मला दु:खही झालं. आपण विसंबून असतो निधरेकपणे कितीतरी गोष्टींवर. सारखं काय सावध राहायचं? माझ्या आसपासचा विश्वासाचा कोश ती विस्कटून गेली आहे, असं वाटत राहिलं..
मला सोन्याचे झुमके फार आवडतात हे कुठूनसं माझ्या सासूबाईंना कळलं. माझ्या एका वाढदिवशी त्यांनी मला स्वयंपाकघरातल्या देवघरासमोर बोलावलं आणि माझ्या हातात दोन टपोरे, सुंदर, डौलदार सोन्याचे झुमके ठेवले. मला आवडतात म्हणून खास माझ्यासाठी आणलेले. माझ्या डोळय़ांत पाणीच आलं. आपल्याला एखादी गोष्ट खूप हवी असेल आणि न मागताच कुणीतरी ती आपल्या हातात ठेवली की किती आनंद होतो! तो निर्मळ आनंद त्या दिवशी माझ्या सासूबाईंनी मला दिला. मी लगेच ते कानात घातले. दिवसभर मिरवले. रात्री एका दमलेल्या आनंदानं ते काढून त्या कानातल्याबरोबर दिलेल्या छोटय़ा मखमली डबीत ठेवले. अजूनही विश्वास बसत नव्हता, ते माझे आहेत!
पुढचे काही दिवस खूप गडबडीचे होते. दोन दिवसांत मुंबईसाठी निघायचं होतं. तशी गडबडीतच निघाले. निघताना आठवणीनं झुमक्यांची मखमली डबी बॅगच्या आतल्या बाजूच्या चोरकप्प्यात ठेवली. मुंबईला पोहोचल्यावर लगेचच एका सिनेमाच्या मीटिंगसाठी निघायचं होतं. ती मीटिंग झाल्यावर एका मैत्रिणीकडे पार्टी आणि तिथेच राहायचं असा धमाल कार्यक्रम होता. मुंबईत पोहोचायला जरा उशीर झाला. मीटिंगवाल्यांचे सारखे फोन येत होते. घाईघाईनं फक्त बॅग मुंबईच्या घरी टाकली आणि तडक मीटिंगला निघाले. वाटेत लक्षात आलं, झुमके त्या बॅगेतच राहिले होते. काढून लॉकरमध्ये ठेवायचेच राहिले. एक क्षण भीती वाटली. माझी नेहमीची घरी काम करणारी ताई बाळंतपणासाठी काही महिने रजेवर होती. तिनं बदली म्हणून नवी बाई दिली होती कामासाठी. ज्या नव्या बाईकडे घराची किल्ली होती, तिला काय काम करायचं हे समजावून दिलेलं होतं त्याप्रमाणे ती तिच्या वेळेला यायची आणि काम करून जायची. ती नवी होती, त्यामुळे मी सगळय़ा मौल्यवान गोष्टी कडीकुलपातच लॉकरमधे ठेवायचे. आज घाईमुळे ते राहिलं होतं. मी रात्री मैत्रिणीकडे जाणार होते. तिचं घर बरंच लांब होतं, माझ्या घरापासून. तिथून बाई येण्याच्या वेळेपर्यंत घरी पोहोचणं अवघड होतं. ‘एका सकाळचा तर प्रश्न आहे, काही होणार नाही’ असं मी स्वत:ला समजावत राहिले, पण तरी भीती वाटतच राहिली. मैत्रिणीकडच्या पार्टीतपण मध्येच ते टपोरे, गोल, झगागते झुमके आठवत होते. सकाळी घरी पोहोचले तोवर बाई येऊन काम संपवून गेलेली दिसत होती. मी घाईनं बॅगेकडे धावले. घाईघाईनं चोरकप्प्याची चेन उघडली. आत काहीच नव्हतं. पोटात खड्डा पडला. पूर्ण बॅग तीन वेळा उलटीपालटी तपासली. संपूर्ण घर धुंडाळलं. इथे तर नाही ना, तिथे तर नाही ना, चुकून पर्समध्ये नाही ना. कुठेच नव्हते झुमके! मटकन कॉटवर बसले. आत काही पोहोचतच नाही आहे, असं वाटलं. स्वत:चाच राग यायला लागला खूप. झुमके सोन्याचे होते, महागडे तर होतेच खूप, पण माझ्यासाठी ते त्याहूनही मौल्यवान होते. मला आनंद व्हावा म्हणून माझ्या जिवाभावाच्या कुणीतरी धडपडून माझ्यासाठी आणलेली गोष्ट होती ती. इतक्या सुंदर वाटेनं माझ्यापर्यंत आलेली इतकी सुंदर गोष्ट अशी क्षणात अदृश्य होऊ शकते. माझ्याबरोबरच आयुष्याचाही राग यायला लागला. मी ठरवलं, ‘‘मी याचा सोक्षमोक्ष लावणारच.’’ दुसऱ्या दिवशी ती बाई आली. मी खोल श्वास घेऊन तिच्यासमोर गेले. म्हटलं ‘‘तुझ्याशी जरा बोलायचं आहे ताई.’’ ती निर्मळ हसून म्हणाली, ‘‘बोला की!’’ एकदम माझं अवसानच गळालं, ते गोळा करून मी तिला शांतपणे झुमक्यांचं सांगितलं. ते कसे सापडत नाही आहेत, ते कसे मला माझ्या सासूबाईंनी प्रेमाने दिले होते, असं सगळं तिला सांगताना मला रडायलाच यायला लागलं. मी तिला जवळजवळ काकुळतीनं विचारलं, ‘‘कुठे असतील गं ते झुमके?’’ यावर तिच्या चेहऱ्यावर यत्किंचितही भीती आली नाही. ती अचानक हसून म्हणाली, ‘‘काल तुमची सीरियल चालू झाली ना संध्याकाळी, तेव्हा मी नेमकी आंघुळीला गेलेवते. पण मग शीर्षक गीत लागलं ना, तवा भर्रकन् भायेर आले. छान दिसता तुमी त्यात. मला फार आवडती ती सीरियल!’’ मी दिङ्मूढ. माझ्या प्रश्नाचं हे उत्तर कसं असू शकतं? मी म्हटलं, ‘‘नाही, ते झुमके’’ मला तडकन् सोडत ती म्हणाली, ‘‘काय की बाई!’’ निर्मळ हसली आणि कामाला लागली. मी ती जाईपर्यंत नुसती बसूनच होते. काही सुधरेना. काही पुरावा नव्हता माझ्याकडे. ती गेल्यावर माझ्या एका पोलीस स्नेह्य़ांना फोन लावला. ते म्हणाले, ‘‘तीही असू शकते. जरा वेगळय़ा शब्दांत चौकशी करावी लागेल. ठीक  ना?’’ यावर एकदम मी घाबरून म्हटलं, ‘‘नको नको! राहू देत मग!’’ एकदम धीर खचला. वाटलं एकवेळ आपलं नुकसान झालं तरी चालेल, पण तिने ते नसेल केलं तर.. तिच्यावरच काय, कुणावरही खोटा आळ येता कामा नये. खरंतर ते तिनेच केलं असणार असं मनोमन स्पष्ट दिसत होतं मला. पण पोलिसात जायचा धीर होईना. चरफडायला झालं. ‘तुझ्या आवडीची एकही गोष्टं तुझ्याकडे राहणार नाही आणि सोनं तर तुझ्या नशिबातच नाही,’ अशा विचारांनी मन अंधारून आलं.
ती बाई कामाला येत राहिली. मी सगळं विसरून तिला माफ करण्याचा प्रयत्न करत राहिले, पण जमत नव्हतं. मन वेडं झालं होतं. अजूनही कुठल्याशा पाऊचमधून झुमके अवचित बाहेर येतील असं वाटत होतं. काही दिवस गेले. मी प्रत्येक गोष्टं आता लॉकरमधे ठेवत होते. कपाट आणि लॉकर खूप जुनं झालं होतं. बदलायला हवं होतं, वेळ मिळत नव्हता. त्या वेळी माझं एक नाटक चालू होतं, रंगभूमीवर. नाटकाची ‘नाइट’ मिळाली की घरी येऊन मी ती लॉकरमध्ये ठेवायचे. एके रात्री तशीच ठेवायला गेले तर लक्षात आलं, ‘काल मी तीन प्रयोगांची तीन पाकिटं आत ठेवली होती, आज दोनच दिसतायेत!’ कॅश खूप नव्हती एका पाकिटात, पण माझ्या मेहनतीची होती. नाटकाची होती. माझं डोकंच फिरलं. आता लॉकरमधल्या गोष्टीसुद्धा गायब व्हायला लागल्या तर मी करायचं तरी काय? पुन्हा पुरावा नाहीच माझ्याकडे काही. उद्याच्या उद्या भक्कम लॉकरचं दुसरं कपाट घ्यायचं ठरवलं. पण मग वाटलं, ‘या सगळय़ाला काही अंत आहे की नाही. नवं कपाट तर ती बाई उघडणार नाही ना’ असं म्हणत मी सतत घाबरतच राहायचं का? त्या बाईला पोलिसात द्यायचा विचार येताक्षणी मला भीती वाटायची. वाटायचं, ‘आपल्याला नीट आठवतं आहे ना, तीनच होती ना पाकिटं?’ खरंतर मला पक्कं आठवत होतं, पण दयाही येत होती. तिचा दारुडा नवरा आठवत होता. काय करावं सुचेना. एका तिरमिरीत उठले. एक पांढरा स्वच्छ कोरा कागद घेतला. त्यावर ठळक स्केचपेननं मोठय़ा अक्षरांत लिहिलं, ‘थांबा, या पैशांना हात लावायचा नाही. हे पैसे मी मेहनतीनं कमावले आहेत. त्यावर माझा हक्क आहे. तुमच्या मेहनतीचे पैसे मी तुम्हाला भरभरून देते आहे. हे तुमचे नाहीत. हात मागं घ्या. देव तुम्हाला भरभरून देवो, ही सदिच्छा!’ तो कागद लॉकरमध्ये ठेवला. मनात एकच मागितलं आयुष्याकडे, ‘जर ती बाई हे करत असेल तर ती आपोआप माझ्या आयुष्यातून निघून जाऊ दे.’
दुसऱ्या दिवशी सकाळी मुद्दाम ती बाई यायच्या वेळी मी काहीतरी काम काढून बाहेर गेले. तिला मुद्दाम घरात एकटं सोडलं. तिच्या जायच्या वेळेनंतर घरी आले. लॉकर उघडला. माझा पांढरा कागद जागचा थोडा हालला होता. पण आतलं सगळं तिथल्या तिथे होतं. दुसऱ्या दिवशीची सकाळ निर्णायक होती. तिची यायची वेळ झाली. वर एक तास उलटून गेला. ती आलीच नाही. त्यानंतर कधीच आली नाही. मी आयुष्याचे आभारच मानले. पण
मला दु:खही झालं. आपण विसंबून असतो निधरेकपणे कितीतरी गोष्टींवर. सारखं काय सावध राहायचं? माझ्या आसपासचा विश्वासाचा कोश ती विस्कटून गेली आहे, असं वाटत राहिलं..
कुठल्याशा कामासाठी बाहेर पडले तेव्हा न राहवून माझ्या ड्रायव्हरला म्हटलं, ‘‘मैंने सिर्फ एकही बार पहने थे वो झुमके. बहोत सुंदर थे!’’ माझा ड्रायव्हर म्हणाला, ‘‘एक बात कहूँ मॅडम, अब आपके वह झुमकें अमर हो गये हैं। जो चीज हमारे पास रहती है उसके बारे में हम भूल जाते है, पर जो चीज हमें छोड के चली जाती है, वो हमें हमेशा याद रहती है। वो झुमके अब आपकी यादों में अमर हो गये हैं।’’ मी त्याच्याकडे पाहतच राहिले.
किती वर्षे तो माझ्याकडे काम करतो आहे. मी किती विश्वासानं त्याच्या सोबत रात्रीबेरात्री प्रयोग करून लांबलांबून परत येते. परवा एकदम खूप पगार वाढवला त्याचा, तर किती सहज म्हणाला, ‘‘मॅडम, इतना क्यूं बढाया एकदम?’’
माझ्या भोवतीचा विस्कटलेला विश्वासाचा कोश पुन्हा एकदा झरझर विणला जाऊ लागला. झुमक्यांबद्दल अजून सासूबाईंना सांगितलंच नव्हतं. त्यांना वाईट वाटेल म्हणून. दोन दिवसांपूर्वी नणंदेला सांगितलं होतं रडत, म्हटलं होतं, ‘‘माझ्याकडे सोनं ठरतच नाही!’’
काही दिवसांनी माझी नणंद आणि मी एका कार्यक्रमाला भेटलो. तिथून तिचं घर जवळच होतं. ‘‘पाच मिनिटं घरी येतेस? काम आहे.’’ म्हणाली. गेले. तिनं एक मखमली डबी हातात ठेवली. त्यात एक लखलखती सोनेरी चेन होती. म्हणाली, ‘‘नाही म्हणू नकोस.
सोनं तुझ्याकडे परत आलं. आता कायमचं राहण्यासाठी. थोडय़ा दिवसांनी झुमके पण घे पुन्हा. आवडतात ना तुला.’’ मी भरल्या डोळय़ांनी तिला मिठी मारली.
थोडय़ाच दिवसांत पुन्हा एकदा मी मखमली पेटीतले सोन्याचे झुमके विकत घेतले. सासूबाईंना सगळं सांगून म्हटलं, ‘वस्तू जाते. पण मला झुमके आवडतात हे लक्षात ठेवून तुम्ही ते माझ्यासाठी आणलेत. तुमचं ते ‘लक्षात ठेवणं’ कधीच कुणी चोरू शकणार नाही. हे घ्या, हे झुमके पुन्हा एकदा मला भेट द्या.’’
आजही मी आणलेले झुमके कानात डौलात लटकत असताना सासूबाईंचे गेलेले झुमके न चुकता आठवतात. पण आता त्या आठवणीला दु:खाचा सल नाही, समाधानाच्या सोन्याची झळाळी आहे!    
amr.subhash@gmail.com

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
pune crime news, gay husband pune
समलिंगी पतीकडून छळ; महिलेची पोलिसांकडे तक्रार, पतीसह सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल
second wife of an invalid marriage may not complain of harassment but of dowry
अवैध लग्नाची दुसरी पत्नी छ्ळाची नाही, पण हुंड्याची तक्रार करू शकते
Case against five persons in case of death of worker due to crane hook falling on head
पुणे : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा