प्रतिभा वाघ – plwagh55@gmail.com

‘प्रधान गोंड’ या आदिवासी जमातीच्या िंडंगना या पारंपरिक भित्तिचित्रकलेचंच पुढचं पाऊल मानलं गेलेली ‘गोंड चित्रकला’ प्लायवूड आणि कॅनव्हासवर उतरली आणि देशापरदेशात ही वैशिष्टय़पूर्ण चित्रं नावाजली गेली. दुर्गाबाई व्याम यांनी स्वत:ची शैली या चित्रांमधून समोर ठेवली आणि पती आणि मुलीबरोबर चित्रनिर्मिती करत लोकचित्रकला पुढे नेण्यास बळ दिलं. तर आपल्या दिवंगत चित्रकार पतीलाच गुरूस्थानी मानून चित्रकला शिकणाऱ्या आणि अत्यंत सकस निर्मिती करणाऱ्या चंद्रकली कुसाम यांनी आपल्यासमोरचे अनेक अडसर दूर सारून जिद्दीनं कला जोपासली. ‘डिंगना’ भित्तिचित्रकलेतील या दोन चित्रकर्तीविषयी..

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

दुर्गाबाई व्याम- प्रधान गोंड आदिवासी जमातीची चित्रकर्ती. त्यांची आणि माझी आजवर तीनदा भेट झाली. एकदा उज्जन कलाशिबिरात, एकदा भोपाळ कलासंग्रहालयात आणि तिसऱ्यांदा भेटलो ते २०१८ मध्ये ‘कोची मुझिरिस बिनाले’मध्ये. केरळमधील कोची शहरात दर दोन वर्षांनी भरणारं समकालीन चित्रकलेचं हे आशियामधील सर्वात मोठं कलाप्रदर्शन. माझ्या लक्षात राहिली ती तिसरी भेट. या भेटीत प्रत्यक्ष दुर्गाबाई भेटल्या नाहीत, भेटली ती त्यांची चित्रं. पहिलं दालन दुर्गाबाईंच्या चित्रांचं होतं. जणू येणाऱ्या कलारसिकांचं स्वागत करणारं दालन. दुर्गाबाई आणि त्यांचे पती सुभाष व्याम यांनी मिळून कथाचित्र शैलीतून ‘मरीन प्लाय’वर आकार कापून भित्तिचित्रकला एका नव्या रूपात सादर केली होती. कोचीच्या मुक्कामात रोज एकदा तरी वेळात वेळ काढून मी चित्ररूपी दुर्गाबाईंची भेट घेत होते.

‘डिंगना’ म्हणजे प्रधान गोंड जमातीची भित्तिचित्रकला. सणासुदीला, मंगलकार्याला स्त्रिया भिंतीवर ही चित्रं रंगवत, जमिनीवरही चित्रित करत. गोंड चित्रकलेचा जन्म या ‘डिंगना’मधूनच झाला असं म्हणता येईल. गोंड ही मोठी आणि जुनी आदिवासी जमात साधारण १४०० र्वष पुरातन  असल्याचं सांगितलं जातं. संगीत आणि चित्रं यासाठी प्रसिद्ध असलेली ही जमात ‘डिंगना’मध्ये लोककथा, नीतिकथा, दैनंदिन जीवनातील प्रसंग रंगवत. चांगली चित्रं घरात भाग्य आणतात अशी त्यांची श्रद्धा असल्यामुळे ते घरातील भिंती रंगवत. त्याकरिता वापरलेले रंग हे अर्थातच नैसर्गिक रंग असत. कोळशापासून काळा, ‘रामरज’ नावाच्या मातीपासून पिवळा, चुनखडीचा पांढरा, शेण आणि झाडाची पानं यांपासून हिरवा, जास्वंदीच्या फुलांपासून लाल रंग, गेरूचा रंग, असे रंग वापरत.

गोंड पेंटिंग हे रेषांवर आधारित असतं. बाह्य़ाकार आणि आतील आकार दोन्हीमधील रेषा काळजीपूर्वक काढलेली दिसते. ती बिनचूक तर असतेच, पण अशा पद्धतीनं रेखांकित केली जाते की स्थिर आकारही गतिमान होतात. ऑस्ट्रेलियातील आदिवासी कलेशी (Aboriginal art) गोंड कलेचं साम्य आढळतं. पूर्वी फक्त भिंतीवर असलेली ही कला साधारण चाळीस वर्षांपूर्वी ‘गोंड लोकचित्रकला’ म्हणून प्रसिद्धीस आली, ती दिवंगत तरुण चित्रकार जनगड सिंग श्याम यांच्यामुळे.  सुप्रसिद्ध चित्रकार जे. स्वामीनाथन यांच्या प्रोत्साहनानं जनगड यांनी कागद आणि कॅनव्हासवर ही चित्रं चित्रांकित करण्यास प्रारंभ केला आणि गोंड चित्रकला जागतिक पातळीवर नेऊन ठेवली. सुभाष व्याम हे जनगड सिंग श्याम यांचे मेहुणे असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा या दांपत्याला फायदा झाला. त्यांनी दुर्गाबाईंना चित्रांतून सतत नवनवीन आकार उतरवण्याचा प्रयत्न कर, असा सल्ला दिला आणि दुर्गाबाईंनी तो प्रत्यक्षात आणलाही.

दुर्गाबाई यांचा वयाच्या १५ वर्षी विवाह झाला. विवाहानंतर त्या आणि पती सुभाष मध्य प्रदेशातील पाटणगड सोडून भोपाळला स्थलांतरित झाले. सुभाष व्याम माती आणि लाकूड यात उत्तम शिल्पं बनवतात. त्यांची आणि दुर्गाबाईंची बावीस वर्षांची कन्या रोशनी सध्या बंगळूरुमध्ये ‘एनआयएफटी’चा अभ्यासक्रम शिकते आहे. ती वस्त्रविद्या आणि गोंड कला यांचा मिलाफ करण्याचे प्रयोग करीत आहे. एकूणच हे कलावंत कुटुंब गोंड लोक- चित्रकलेत विविध प्रयोग सातत्याने करीत असतं.

दुर्गाबाईंनी पौराणिक गोंड कथेवर आधारित एक सुंदर कलाकृती ‘कोची बिनाले’मध्ये प्रदर्शित केली. एकुलत्या एका नणंदेला जीवे मारण्याचा कट पाच भावजया करतात, पण तिला एक पक्षी वाचवतो, असा त्या कलाकृतीचा विषय होता. या कलाकृतीतील सर्व चित्रांची रेखांकनं दुर्गाबाईंनी केली होती. प्रशस्त कलादालनाच्या चारही भिंतींवर, मधल्या खांबावर ‘मरीन प्लाय’वर आकृती कापून, त्या रंगवून, भिंतीचा आधार घेऊन मांडणीशिल्प (इन्स्टॉलेशन) सादर करण्यासाठी सुभाष व्याम यांचं भक्कम सहकार्य होतं. मूळ ‘डिंगना’मध्ये (भित्तिचित्रं) मातीच्या भिंतीवर शेणानं सारवून, पिवळ्या रंगाची रामरज नावाची माती, लाल माती, काळी माती, पांढरा चुना यांच्या साहाय्यानं चित्रांकन करतात. दुर्गाबाई वयाच्या सहाव्या वर्षांपासून आपल्या आईकडून ‘डिंगना’ शिकल्या. अजूनही त्यांच्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी नानाविध रंग घेऊन कागदावर उतरतात. आपल्या चित्रांत त्यांनी अजूनही या कथांवरच आधारित अधिकाधिक चित्रं चित्रित केल्याचं त्या सांगतात. आकार भरण्यासाठी काही गोंड चित्रकार ठिपके, रेषा, वर्तुळ वापरतात. दुर्गाबाई तांदळाच्या आकाराची पुनरावृत्ती करतात. त्यांचे आवडते विषय म्हणजे नदी, झाड, बांबूचं वन, दिवाळीचा सण, कन्यादान, घर, मुलं, वाघ, हरीण, मोर, बैल, सुसर, डुक्कर, झाडाच्या शेंडय़ावर बसलेले पक्षी, असे आहेत. दंतकथा सांगणारी भडक रंगाची सुंदर चित्रं त्या रंगवतात, अगदी स्वत:च्या खास शैलीत! त्यांचं सारं निरीक्षण प्रधान गोंड जमातीमधील स्त्री म्हणून असलं, तरी पारंपरिक लोककथांचं चित्रण करताना समकालीन सौंदर्यशास्त्र त्या कुशलतेनं वापरतात. त्यांच्या चित्रातलं हरीण निळ्या रंगाचं, त्याचे केशरी रंगाचे टप्पोरे डोळे, बैल जांभळ्या आणि पिवळ्या रंगाचे आणि हसऱ्या चेहऱ्याचे दिसतात. त्यांच्या शिंगांवर फुटलेल्या झाडाच्या फांद्यांवर पक्षी आनंदानं बसलेले दिसतात. प्राणी, झाडं आणि पक्षी यांचं सुंदर नातं त्या आपल्या चित्रांत दाखवतात. आपल्या चित्रातलं अगदी सूक्ष्म कामसुद्धा त्या बारीक कुंचल्यानं सहजतेनं करतात.

दुर्गाबाईंचा कलाप्रवास १९९६ पासून ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालया’पासून (भोपाळ) सुरू झाला. बुडीमाई (धान्याची देवता), कुलसाहिन माता (पेरणीची देवता), बडादेव, चुल्हादेव (अग्नी- घरातील चूल नियमितपणे पेटती राहो यासाठी), खेरो माता (जी दुष्ट  लोकांपासून रक्षण करते), या आवडत्या विषयांवर त्यांनी चित्रं काढली आहेत. अनेक पुस्तकांची कथाचित्रं चित्रित करण्याचं काम त्यांनी केलं असून ‘बसीनकन्या’ (बांबूच्या जन्माची कहाणी) यातील कथाचित्रं दुर्गाबाईंनी चित्रित केली आहेत.  ‘तारा पब्लिकेशन’नं प्रकाशित केलेल्या ‘द नाइट ऑफ द ट्रीज’ या पुस्तकाला पुरस्कार मिळाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील ‘भीमायन’ पुस्तकात अस्पृश्यतेच्या अनुभवावरील त्यांची चित्रं खूप गाजली. दुर्गाबाईंना ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स’ची शिष्यवृत्ती (२००६-०७) मिळाली आहे. तसंच २००९ मध्ये ‘राणी दुर्गावती पुरस्कार’ मिळाला. फ्रँकफुर्टला पुस्तकजत्रेसाठी पहिला विमानप्रवास केल्यावर ‘विमान’ या विषयावरील एक चित्रमालिका त्यांनी रंगवली. एरवी दुर्गाबाईंच्या प्रत्येक पेंटिंगमध्ये सर्वसामान्यपणे आदिम विषय, गोंड पौराणिक कथा हे विषय आढळतात आणि स्वत:च्या खास शैलीत त्या हे सगळं निर्भयपणे व्यक्त करतात.

दुर्गाबाई आणि सुभाष व्याम यांची कन्या रोशनी व्याम २२ वर्षांची आहे. पण समकालीन गोंड चित्रकर्ती म्हणून तिला ओळखलं जातं. ‘नॅशनल इस्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’मध्ये (एनआयएफटी) शिक्षण घेणारी रोशनी सफाईदार इंग्रजी बोलते आणि आपले विचार स्पष्टपणे मांडते. या अभ्यासामुळे जागतिक स्तरावरील कलाआकार (आर्ट फॉर्म) आणि वस्त्रविद्या यांचं ज्ञान मिळालं, असं ती सांगते. तसंच, ‘‘आजूबाजूला काय घडतं हे मी पाहते. मला माझ्या गोंड बांधवांसाठी एक कलादालन सुरू करायचं असून दलालांकडून त्यांची होणारी लुबाडणूक थांबवायची आहे,’’ असं ती म्हणते. रोशनी गाणं, संगीत, नृत्य जाणते. आता नवनवीन तंत्रं, माध्यमं यांचे प्रयोग करते. कार्तिका नायर या कवयित्रीच्या पॅरीस मेट्रोवरील कवितांवर चित्रं काढण्यासाठी तिला पंधरा दिवसांसाठी पॅरिसचं आमंत्रण होतं. दुर्गाबाई, सुभाष, रोशनी यांचं रंगांत रंगलेलं कुटुंब प्रगती करत आहे. जगप्रवासाचा, प्रदर्शनांचा अनुभव घेत आहे.

डिडोरी जिल्ह्य़ातील पाटणगडमधील चंद्रकली कुसाम या प्रधान गोंड चित्रकर्तीची कथा थोडी वेगळी आहे. वयाच्या सतराव्या वर्षी वैधव्य आलेल्या चंद्रकली यांच्यावर वृद्ध सासूसासरे आणि लहान मुलं यांची जबाबदारी होती. त्यांचे पती उदयसिंह श्याम हे उत्तम चित्रकार होते. त्यांच्या चित्रकलेमुळेच कुटुंब सुखात जगत होते. चंद्रकला यांना ‘डिंगना’चा अनुभव होता, पण कागद किंवा कॅनव्हासवर चित्रं काढली नव्हती. त्यांनी आपल्या दिवंगत पतीला गुरू मानून चित्रकला शिकण्याचा निश्चय केला. त्यांच्या संग्रही उदयसिंह यांची जी चित्रं होती, ती पाहून त्या सराव करू लागल्या आणि तीव्र आंतरिक इच्छा, मनापासून केलेली मेहनत, यामुळे चंद्रकली यांनी चित्रकलेत उत्तम प्रगती केली. आपले पती मरणोत्तरही आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ही श्रद्धा, अशी कल्पना एखादी सर्जनशील व्यक्तीच करू शकते.

लहानपणापासून निसर्गात वाढलेल्या चंद्रकलीबाईंच्या चित्रांची २०१२ मध्ये एका दिनदर्शिके साठी (कॅ लेंडर) निवड झाली. बारा सुंदर चित्राकृती, ज्यातून निसर्गाचं शुद्ध स्वरूप आणि चंद्रकलीबाईंची कल्पनाशक्ती याचा सुंदर मिलाफ दिसतो. चोचीनं मासा टिपणारा बगळा, पांढरे पंख, पण मान पिवळसर केशरी रंगाची आणि पाश्र्वभूमी निळी किंवा हिरवी न करता चक्क तांबूस रंगाची, याशिवाय कासवाला उलटं पाडून त्याच्यावर हल्ला करणारे, फुत्कार करणारे साप, रंगीबेरंगी पानांनी आणि पक्ष्यांनी गजबजलेलं झाड, त्याखाली विश्रांती घेणारे प्राणी, ‘ग्राफिक’ आकारातला मोर, माता मासा  आणि तिच्या अंगाखांद्यावर खेळणारे छोटे मासे अशी सुंदर चित्रं आहेत. विशेष म्हणजे आपल्या गुरूच्या चित्रांची नक्कल न करता चंद्रकलीबाईंच्या चित्रांमध्ये त्यांची स्वत:ची अशी एक खास शैली आहे. निव्वळ चित्रांवर कु टुंब जगवता येत नाही त्यामुळे चंद्रकलीबाई स्वत:च्या शेतात धान्य पिकवतात. एका मुलीचं लग्नही त्यांनी करून दिलं. ही मुलगीही चित्रं काढते. ती पंचायत समितीची सदस्य असून गावासाठी काम करते. त्यांचा मुलगा दीपांशू यंदा दहावीच्या परीक्षेत त्याच्या शाळेतून पहिला आला. चंद्रकली यांना कलाशिबिरात प्रशिक्षण देण्यासाठीही बोलावलं जातं.

दुर्गाबाईंनी केलेली प्रगती, त्यांना मिळालेलं वातावरण, संधी, अनुकूलता यामुळे त्यांचं नाव जागतिक पातळीवर झालं. पण प्रतिकूल परिस्थितीत दिवंगत पतीला गुरू मानून चित्रनिर्मिती करणाऱ्या चंद्रकलीबाई आपल्या मुलांना वाढवून एकलव्याप्रमाणे कलासाधना करत आहेत. दुर्गाबाईंइतक्याच चंद्रकलीबाईही मोठय़ा. कलाकार कोणत्याही आर्थिक, सामाजिक परिस्थितीतला असो. त्याच्यातली कलात्मकता सर्व अडचणी पार करून त्याला आपली कला जिवंत ठेवायला प्रवृत्त करत राहाते, हेच या दोघींच्या उदाहरणांवरून समोर येतं.

विशेष आभार-

चित्रकार आशीष स्वामी, उमरिया (मध्य प्रदेश)

सिद्धेश शिरसेकर