|| साधना तिप्पनाकजे

काळाबरोबर बदलणारं कढोली गाव. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या गावातले ग्रामस्थ ‘ग्रामपंचायत कढोली’ या अ‍ॅपवरून गावकारभाराशी संबंधित तक्रार नोंदवतात आणि त्यांचं निराकरणही होतं. गाव पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. आठवडी बाजारामुळे शेतकऱ्यांची भाजी गावातच विकली जाऊ लागल्याने त्यांचा नफा वाढला. गेल्या सहा महिन्यांपासून गावातील संपूर्ण सांडपाणी गोळा केलं जातं. त्याचं शुद्धीकरण करून त्याचा साठा करण्यात येतो. त्याचा वापर शेतीसाठी होत असल्यामुळे भर उन्हाळ्यातही शेतीला व्यवस्थित पाणीपुरवठा होतो. गावात २७ महिला बचतगट आहेत. गावात पूर्णपणे दारू आणि सट्टाबंदी आहे. गाव हागणदारीमुक्त झालं आहे नि जिल्हा परिषद शाळेचा पट आता वाढू लागलाय. ग्रामविकासाची जिद्द बाळगून बदल घडवणाऱ्या नागपूरमधील कामठी तालुक्यातलं कढोली गावाच्या सरपंच प्रांजल वाघ यांच्याविषयी..

समजा, तुमच्या घरातलं पाणी अचानक बंद झालंय किंवा आज कचरा उचलला गेलेला नाही किंवा घरासमोरील पथदिवा बंद आहे किंवा तुम्हाला कसला तरी दाखला हवा आहे. अशा कोणत्याही समस्या सोडवण्याकरिता तुम्हाला ग्रामपंचायतीत खेपा घालाव्या लागतात. मगच तो प्रश्न सोडवला जातो. हा सर्वसामान्यपणे येणारा अनुभव; पण नागपूरमधील कामठी तालुक्यातलं कढोली गाव याला अपवाद आहे. या गावातल्या गावकऱ्यांना घरबसल्या ग्रामपंचायतीत तक्रार नोंदवता येते. ‘ग्रामपंचायत कढोली’ या अ‍ॅपवर जाऊन गावकरी सुविधा आणि गावकारभाराशी संबंधित कोणतीही तक्रार नोंदवू शकतात. आणि त्याचं निवारण वेगाने होतं, असा अनुभव आहे.  गावात ही किमया करणाऱ्या धडाडीच्या सरपंच आहेत प्रांजल वाघ.

वाघ कुटुंबीयांनी कढोलीमध्ये मोठं घर बांधलं; पण तीन र्वष झाली तरी ग्रामपंचायती- कडून पाण्याकरिता नळजोडणी दिली नाही. ग्रामपंचायतीच्या सारख्या चकरा मारणं सुरू होतं. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाला त्या वैतागल्या होत्या. शेवटी पदरचे पसे खर्च करून वाघ कुटुंबीयांनी नळजोडणी घेतली. नागपूरपासून अवघ्या १५ किलो मीटर अंतरावर असणारं कढोली हे गाव राष्ट्रीय महामार्गाच्या लगत आहे; पण गावात शिरायला आहे लहानसा रस्ता आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहेत ५-६ फुटांचे खोल खड्डे. एकदा प्रांजलताई पतीसोबत जात असता वाटेत गावातल्या जिल्हा परिषद शाळेतली मुलं दिसली. फाटलेले गणवेश, ना दप्तर धड ना वह्य़ा. त्यांना वाईट वाटलं. त्या लगेचच शाळेत गेल्या. शाळेची अवस्थाही भकास होती. रंग उडालेल्या, पडझड झालेल्या भिंती, बसायचीही धड सोय नाही. मुख्याध्यापिकेशी बोलून त्यांनी मुलांच्या वह्य़ांची लगेचच व्यवस्था केली. त्यानंतर त्या शाळेत नियमित जाऊ लागल्या. कोणत्याही देवळात रक्कम दान करण्याऐवजी ती रक्कम त्यांनी गावच्या शाळेत द्यायचं ठरवलं. मुलांना शैक्षणिक साहित्य देणे, खाऊवाटप अशा प्रकारे त्या शाळेला मदत करू लागल्या. इयत्ता पाचवीपर्यंत वर्ग असणाऱ्या या शाळेतले विद्यार्थी प्रांजलताईंना ‘मामी’ म्हणून हाक मारू लागले.

ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत सोळा कंपन्या असल्यामुळे ग्रामपंचायतीला महसूलही चांगला मिळतो; पण गावाकरिता त्या पशांचा उपयोग काहीच केला जात नव्हता. सरपंच आणि सदस्यांचं गावकारभाराकडे लक्ष नव्हतं. कारभाऱ्यांचा वचक नसल्यामुळे कर्मचारीही काम करत नव्हते. प्रांजलताई याबाबत गावातल्या त्यांच्या मत्रिणींकडे आपला राग व्यक्त करत असत. प्रांजलताई २००९ मध्ये लग्न होऊन गावात आल्या. त्याचदरम्यान लग्न झालेल्या या दहा-बारा मत्रिणींचा हा गट. लग्नाआधी प्रांजलताईंचा गावाशी कधीच संबंध आला नव्हता. त्यांचे वडील एका मोठय़ा कंपनीत  अधिकारी पदावर नोकरीला होते. पूर्णपणे शहरी वातावरणात वाढलेल्या प्रांजल लग्नानंतर कढोली गावात आल्या. बी.ए. द्वितीय वर्षांपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांचं लग्न झालं. नंतर त्यांनी थ्रीडी अ‍ॅनिमेशन डिप्लोमा व डी.एड. केलं. प्रांजलताईंची गावविकासाबाबतची सततची धुसफुस पाहून त्यांच्या मत्रिणींनी त्यांना ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचं सुचवलं. त्यातच सप्टेंबर २०१७ मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. सरपंचपद सर्वसाधारण स्त्री वर्गाकरिता राखीव होतं. प्रांजलताईंचा स्वभाव मुळातच धाडसी. मत्रिणींची कल्पना त्यांना पटली. बाहेर राहून नुसती टीका करण्यापेक्षा प्रत्यक्ष कारभार करण्याची संधी मिळाली तर आपण गावाचा विकास घडवू शकतो, हे लक्षात आल्यावर त्यांनी सरपंचपदाची थेट निवडणूक लढवायचं ठरवलं. त्यांच्या घरात किंवा माहेरीही कोणतीच राजकीय पाश्र्वभूमी नाही. त्यांच्या वडिलांनी काळजीपोटी नापसंती दाखवली; पण त्यांच्या पती, दीर, जाऊ, सासू, सासऱ्यांनी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करत प्रोत्साहन दिलं. सगळ्या मत्रिणींनी प्रचाराकरिता कंबर कसली. आणि प्रांजलताईं सरपंचपदी निवडून आल्या.

ग्रामपंचायतीच्या इमारतीकरिता निधी मंजूर होऊनही इमारतीचं बांधकाम झालं नव्हतं. १९६५ पासून गावातल्या व्यायामशाळेतच ग्रामपंचायतीचं कार्यालय थाटलं होतं. प्रांजलताई सरपंचपदाचे काम समजून घेण्याकरिता रोज तिथं जात होत्या; पण रात्री झालेल्या दारूच्या पाटर्य़ाच्या वासाचा भपका तिथं पसरलेला असायचा. त्यामुळे वातावरण नकारार्थीच जास्त होतं, त्यातच कर्मचाऱ्यांकडूनही असहकार सुरू होता. त्यातही प्रांजलताईंनी संपूर्ण गावात सामान्य निधीतील रक्कम खर्च करून एलईडी पथदिवे बसवले. त्यामुळे गावातील रस्त्यांवर रात्री पुरेशा प्रमाणात उजेड मिळू लागला. महामार्गाहून गावात येण्याच्या रस्त्याच्या दुभाजकावर पाम वृक्ष लावून सौंदर्यीकरण केले. हंगामी ग्रामपंचायत कार्यालयात बसून काम करणं अवघड होत होतं. प्रांजलताईंनी कंत्राटदार बदलून दोन महिन्यांत ग्रामपंचायतीचं कार्यालय बांधून घेतलं. सरपंच कक्ष, सचिव कक्ष, हॉल, स्वयंपाकघर आणि प्रसाधनगृह असं सुटसुटीत ग्रामपंचायत कार्यालय दोन महिन्यांत तयार झालं. कार्यालयासमोरही वृक्षारोपण करून हिरवळ लावली. दरम्यान, ‘नागपूर जिल्हा सरपंच संघटने’च्या त्या सदस्या झाल्या. या संघटनेतील इतर सरपंचांकडून त्यांना गावकारभाराबद्दल, अडचणींवर कशी मात करावी याबद्दल माहिती मिळू लागली. त्यांनी गावातल्या सगळ्या रस्त्यांचं रुंदीकरण व काँक्रीटीकरण केलं. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील १६ कंपन्यांमुळे गावाला वर्षांला २० लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं; पण त्याचा गावासाठी आतापर्यंत फारसा वापर झालाच नव्हता. प्रांजलताईंनी महामार्गाकडून गावात आत प्रवेश करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या जागेचा वापर करण्याचे ठरवले. या भागात असलेले ५-६ फुटांचे खड्डे मुरूम टाकून बुजवले. याकरिता साधारण चार लाख रुपये खर्च आला. ही जागा रस्त्याच्या पातळीवर आणली. तिथं तारेचं कुंपण घालून कडेने वृक्षारोपण केले. या जागेवर दर बुधवारी आता आठवडी बाजार भरतो. पूर्वी साधी पिन आणण्याकरिताही गावकऱ्यांना दहा किलोमीटर अंतरावरील पारडी गावात जावं लागायचं. आता सर्व जीवनावश्यक गोष्टी गावातल्याच बाजारात मिळू लागल्यात. गाव पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. इथं गहू, डाळी, कापूस, सोयाबीनसोबतच भाज्याही मोठय़ा प्रमाणात पिकतात. आठवडी बाजारामुळे शेतकऱ्यांची भाजी गावातच विकली जाऊ लागली. त्यांचा वाहतूक खर्च आणि वेळ वाचल्याने नफ्यात वाढ झाली. गावात बऱ्याचशा घरांच्या अंगणात शेणखताचे खड्डे होते. त्यामुळे दरुगधी पसरायची. प्रांजलताईंनी या गावकऱ्यांशी बोलून या खड्डय़ांमधील सर्व शेण शेतात नेलं. तिथे त्याकरिता शेणखताचे खड्डे बनवले. घरांच्या आसपास असणाऱ्या खड्डय़ांमध्ये माती भरली आणि त्यातही वृक्षारोपण केलं. सरपंचपदाच्या कारकीर्दीत गावाच्या लोकसंख्येच्या दहापट वृक्षारोपण करून त्यांना जतन करण्याचा प्रांजलताईंचा संकल्प आहे.

मुलांमध्ये शाळेची आवड निर्माण व्हावी म्हणून जाणिवपूर्वक प्रयत्न केले. एका खासगी  संस्थेने गणवेश, दप्तर, पेन्सिल अशा १३ विविध शैक्षणिक साहित्य असणाऱ्या वस्तूंचा संच प्रत्येक विद्यार्थाला भेट म्हणून दिला. ग्रामपंचायतीने चौदावा वित्त आयोग, लोकवर्गणी आणि सामान्य निधी यातून इमारत दुरुस्ती, रंगकाम (बोलक्या भिंती), दारे-खिडक्या नवीन बसवणे, प्रसाधनगृह, क्रीडा साहित्य, दोन प्रोजेक्टर, स्वयंपाकाकरिता गॅस अशा सुविधा दिल्या. कर्मचाऱ्यांना समज देऊन शालेय पोषण आहारातील गडबड सुधारली. काही शिक्षकांचंही मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होतं. अशा शिक्षकांना कडक शब्दांत समज दिली आणि भावनिक आवाहनही केलं. शाळा समितीचं पोषण आहार आणि अभ्यासाकडे बारकाईने लक्ष असतं. याचा चांगला परिणाम होताना दिसत आहे. जिल्हा परिषद शाळेचा पट आता वाढू लागलाय.

ही सर्व कामे सुरू असताना ग्रामपंचायतीच्या चारही कर्मचाऱ्यांनी ‘‘कामाचा ताण जास्त पडतो, आम्ही तुमच्यासोबत काम करू शकत नाही,’’ असं सांगत एकत्रितपणे राजीनामा सादर केला. प्रांजलताईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचं मन वळवलं. गावाच्या विकासासाठी ही कामं किती आवश्यक आहेत हे त्यांना पटवून दिलं. आज हेच कर्मचारी प्रांजलताईंना चांगली साथ देत आहेत. काही ग्रामपंचायत सदस्यही टक्केवारीसाठी अडून बसले. प्रांजलताई नमल्या नाहीत. त्यांनी कणखर भूमिका घेतली. ‘गावाचे पसे गावासाठीच खर्च होतील,’ असे या सदस्यांना कडकपणे बजावले. प्रांजलताईंच्या आक्रमक आणि धाडसी स्वभावामुळे कढोली गावाचं रूप बदलू लागलं. प्रांजलताई सरपंच झाल्यावर महिला सभाही खूप सक्षम झाली. पूर्वी फक्त कोणाच्या तरी कार्यक्रमापुरतं जमणाऱ्या स्त्रिया आता ग्रामपंचायतीत येऊन बसू लागल्या. प्रांजलताईंच्या दहा मत्रिणींचा ‘स्कॉड’ तर कायम त्यांच्या सोबतच असतो. गावात २७ महिला बचतगट आहेत.

पूर्वी गावात दारू पिऊन भांडणतंटे खूप होत असत. सट्टाही खेळला जात असे. महिला बचत गटांनी स्थानिक पोलीस स्थानकासोबतच पोलीस अधीक्षक कार्यालयातही याविरुद्ध निवेदन दिलं. पोलीस स्थानकाबाहेर आंदोलनं केली. आज गावात पूर्णपणे दारू आणि सट्टाबंदी आहे. यामुळे शांतता प्रस्थापित झालीय. गावात १६ ठिकाणी क्लोज सíकट कॅमेरे बसवण्यात आलेत. गाव स्वच्छतेबाबतीतही सुधारलं. हागणदारीमुक्त झालं आहे. घंटागाडीमधून गावातला कचरा गोळा केला जातो. ग्रामपंचायत कर्मचारी रोज गावातील रस्ते झाडतात; पण दर आठवडय़ाला प्रांजलताई आणि गावकरी मिळून गावाची सफाई करतात. गावातली संपूर्ण सांडपाणी व्यवस्था भूमिगत करण्यात आलीय. गावात पाणीपुरवठय़ाकरिता सार्वजनिक खात्याची विहीर आहे. तिथून गावाला पाणीपुरवठा होतो.  दुसरी विहीर गेली कित्येक र्वष कोरडीच होती. आता विहिरीतील गाळ साफ केला गेला आहे. गावाजवळून नाग नदी वाहते. पाटबंधारे विभागाच्या बंधाऱ्यातून शेतीला पाणीपुरवठा होतो. या बंधाऱ्याचे खोलीकरणही करण्यात आले.

गेल्या सहा महिन्यांपासून गावातील संपूर्ण सांडपाणी गोळा केलं जातं. त्याचं शुद्धीकरण करून त्याचा साठा करण्यात येतो. या पाण्याचा वापरही शेतीसाठी होतो. त्यामुळे भर उन्हाळ्यातही शेतीला व्यवस्थित पाणीपुरवठा झाला. जलसंधारणाच्या कामांनी चांगलाच वेग धरला. इतर बंधाऱ्यांचंही खोलीकरण करण्यात आलं. त्यांची सफाई झाली. यामुळे कोरडय़ा विहिरीलाही पाणी लागलं. गावाच्या हद्दीतील एका कंपनीच्या आवारातील कूपनलिकेचं पाणीही एका वॉर्डाला पिण्याकरिता वापरता येतं. विविध स्रोतांमधून गावच्या टाकीत पाणी जमा होतं. गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालंय. वीज गेल्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेत अडथळा येऊ नये याकरिता सौरऊर्जेचे पॅनेल बसवण्यात आलेत. शुद्ध पाण्याकरिता ‘रिव्हर्स ओसमोसिस’ म्हणजेच आरओ प्लांट बसवण्यात आला आहे.    गावात कुऱ्हाडबंदी, चरईबंदी आणि प्लास्टिकबंदी आहे. नागपूरपासून १५ किलोमीटरवर आणि राष्ट्रीय महामार्गाला लागून असलं तरी गावात बससेवा नव्हती. प्रांजलताईंनी पत्रव्यवहार करून गेल्या आठवडय़ात बससेवा सुरू करवली. गावाला गुणवत्ता मानांकन प्रमाणपत्र मिळालं आहे.

अजून प्रांजलताईंचा तीन वर्षांचा कालावधी बाकी आहे. त्यांच्या कामाचा झपाटा वेगाने सुरू आहे. एक आव्हान म्हणून स्वीकारलेली सरपंचपदाची जबाबदारी त्या उत्कृष्टपणे पार पाडत आहेत. ‘‘यापुढेही मी सरपंच असो वा नसो, पण ग्रामविकासाचं काम करतच राहणार,’’ असं त्या सांगतात.

‘‘सरपंचपदी आल्यावर तुमच्यात काय बदल झाला?’’ असं विचारल्यावर त्या हलकं हसून म्हणतात, ‘‘मी शांत झाले. प्रत्येक गोष्टीचा खोल विचार करायला लागले.’’ सरपंचपदी स्त्री आल्यावर गावच्या विकासाचा आलेख कसा उंचावतो याच्या उत्तम उदाहरणांमध्ये कढोली गावाचाही समावेश होतो.

sadhanarrao@gmail.com