‘दिवाळी आजी-आजोबांची’ या विषयावर समस्त आजी-आजोबांनी भरभरून प्रतिक्रिया पोहोचवल्या. काही जण आपल्या बालपणीच्या दिवाळीत रमले. त्या काळाचा मनसोक्त विहार करून आले. त्यातल्या अनेकांना आताच्या पिढीच्या दृष्टिकोनात झालेला बदल मानवलेला नाही तर काहींनी मात्र खुल्या दिलाने हा बदल स्वीकारलाय. हा काळाचा महिमा आहे हे मान्य करून टाकलंय. काय प्रतिक्रिया आहेत आजी-आजोबांच्या हे त्यांच्याच शब्दांत..
‘‘गोविंदा..गो..विंदा। अशी मोठय़ाने आरोळी ठोकत जो कोणी भल्यापहाटे सर्वप्रथम तुळशीसमोरील कारटं फोडेल त्याचा दिवाळीदिवशी भलताच मान असायचा. भेटणाऱ्या प्रत्येकाला ‘मिया फोडलाय पयला कारटां..’ असे छाती फुगवून सांगण्यात त्याला कोण आनंद व्हायचा. कोकणातल्या थंडीत आमची दिवाळी चुलीतल्या कढत पाण्यातील आंघोळीने व्हायची. आमच्या घरात एकत्र कुटुंब पद्धती होती. काका, भाऊ, चुलत भाऊ-बहीण असा मोठा गोतावळा होता. एकत्र मजेत दिवाळी साजरी करायचो. रांगेत बसून उटण्यानं मालिश करताना एकमेकांची थट्टा मस्करी करताना मजा यायची, मग नवे कपडे घालून देवळात जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं. आणि घरी आल्यावर आठवडाभर श्रमून आई, आजीने केलेल्या फराळाची ताटं समोर यायची.. मस्त वातावरण असायचं ते.’’
आरोंदा, सावतंवाडी येथे राहणारे मोहन पुरुषोत्तम आरोसकर हे ९० वर्षांचे आजोबा, आपल्या बालवयातल्या कोकणातल्या दिवाळीत असे रमून गेले. पण शेवटी भूतकाळातून मन येतं वर्तमानकाळात. थोड खंतावत ते लिहितात,‘‘आता परिस्थितीत बदल हातोय. लोकांचं टायमिंग महत्त्वाचं झालंय. आपुलकीच्या भावनेनं ओथंबलेली शुभेच्छांची जागा कोरडय़ा एस.एम.एस. नी घेतलीय. नातीला विचारलं, ‘अगं, हॅपी दिवाळीचा फोन नाही केलास? आम्हाला विसरलीस की काय?’ तर उत्तर येतं, ‘आजोबा कालच एस.एम.एस. केला की!’ इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी नव्या पिढीचं तन-मन झपाटलंय. वेळ काढून मस्त खाणं, गप्पा हे तर लांबच त्यांना सण, नाती सांभाळायला वेळ नाही. घरात येणाऱ्या नवीन खरेदीवर त्यांचा आनंद बेतलाय असं वाटतं. पण ते आपल्या विश्वात रमलेत हे बघून मीही आनंद मानायला शिकलोय.’
सांगलीचे बंडा यज्ञोपवीत दिवाळीच्या आठवणीत रमताना लिहितात, ‘शेजारपाजारच्या बायका एकमेकींकडे फराळाचे जिन्नस करायला जात. वसुबारसादिवशी दारात आलेल्या गाय-वासराची पूजा करायचो. त्या दिवशी आईचा उपवास म्हणून तिखट मीठ वज्र्य, मग त्या दिवशी फक्त करंज्या, चिरोटे तळायचे. गणपतीचं नाव घेऊन सुरुवातीला मोदक केले जात. चकली पात्रातून काढून तळली की घरातल्या सर्वानी खुसखुशीत चकलीची चव पाहायची. कढईत उरलेल्या त्याच तेलात मग संध्याकाळी चिवडा होई.
     पहिलं अभ्यंगस्नान आटोपत असतानाच दारात काळा कोट, पांढरा शर्ट, धोतर, डोळ्याला मुंडासं, धोतराचा शेव व कंदील एका हातात आणि दुसऱ्या हातात डमरू घेऊन पिंगळा यायचा. ‘लई भाग्याची हाईस, तुझ्या पायात लक्ष्मी हाय. तुझ्यामुळं घराचं नाव व्हनार, तुझ्या मालकाचा तुझ्यावर लई जीव, पोरगं मोठं व्हनार, घराचा बंगला हुनार’ असा त्याचा आशीर्वाद ऐकताना आई-वडिलांचे चेहरे समाधानाने उजळत. मग देवाला फराळाचा नैवेद्य दाखवून मग फराळ होई. बरोबरीने दही-पोहे असायचे. तेव्हा दिवाळी म्हणजे इव्हेंट, ग्लॅमर प्रकार नव्हता. वर्षांतला पवित्र सण होता. सहलीला जाण्याचा प्रघात नव्हता तर पोट्टय़ाला सुट्टी आहे तोवर चार दिवस माहेरी जाऊन ये, असं सांगितलं जायचं. माणसातलं नातं जपणारी, माणूसपण साधणारी, शेजारच्यांशी ॠणानुबंध राखणारी दिवाळी आमच्या लहानपणीही होती.’
कल्पना धर्माधिकारी (वय ६५), या आजी कोथरूडहून लिहितात, ‘दिवाळीचं स्वरूप नक्की बदललंय! नात्यातला ओलावा किंवा प्रेम भावनेपेक्षा देखावा, बेगडीपणाला महत्त्व आलंय. फराळाचे पदार्थ, नवे कपडे, एकमेकांना भेटणे यामधील अप्रूप जवळजवळ संपलंय. दिवाळीतसुद्धा पंजाबी, चायनीज असे स्पेशल हवे असते. लहान मुलांचा किल्ला विक त मिळतो. त्यांच्या हाताला मातीचा स्पर्श कधी होणार? दिवाळी अंकाच्या वाचनाची जागा आता टीव्हीवरच्या कार्यक्रमांनी, दिवाळी पहाटेने घेतलीय. एक मात्र आहे, दिवाळी साजरी करण्याच्या दृष्टिकोनात आता बदल झालाय. मागच्या वर्षी आम्ही वृद्धाश्रमाला भेट देऊन फराळ दिला. यामधे माझ्या नव्या पिढीतल्या नातीलाही खूप आनंद झाला.’

‘माझ्या बहिणीला भाऊबीजेला फाऊंटन पेन पाहिजे होते. नशिबाने मला रस्त्यावर एक झाकण नसलेले पेन सापडले. एका दुकानदाराला पेन दाखवले. त्याने दुसऱ्या पेनचे शिल्लक झाकण दिले व भाऊबीजेला बहिणीला जेव्हा मी ते पेन दिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मी कधीच विसरू शकत नाही. आता लांबच्या अंतरामुळे मनात असूनही बहिणींकडे जाता येत नाही. म्हणून फोनवरुन शुभेच्छा देतो. दिवाळी पूर्वीची व आताची यात फरक असला तरी नाती मात्र पूर्वीसारखी घट्ट आहेत.’
रा. अ. कंटक, पुणे

गिरगावचे विनायक नेने (वय ७२). ते लिहितात,‘‘दसरा संपला की आम्ही आकाशकंदिलाच्या तयारीला लागायचो. पहाटे चार वाजता उठून फटाके लावले की सर्वाना उठणे भागच पडे. पत्ते, विटी-दांडू सारखे खेळ खेळण्यात, गाण्याच्या भेंडय़ा खेळण्यात वेळ निघून जाई. थोडेच मिळालेले फटाके वाजवण्यात मजा होती. भाऊबीजेची गंमत औरच होती. बहिणीकडून अंग रगडून घेऊन केलेल्या आंघोळीनंतर तिने तिलक लावून केलेल्या औक्षणामुळे भगिनीप्रेमाची अनुभूती आनंद द्यायची. त्यानंतर नोकरीनिमित्त मुंबईला आल्यावर दिवाळी आर्थिक स्थैर्यामुळे चांगली साजरी होऊ लागली. बोनस मिळाल्यामुळे पत्नीला साडी, नवा दागिना, मुलांना फटाके, नवीन कपडे घेणं जमू लागलं. आता काळ बदलला. दिवाळी पहाट, परेड यांसारखे कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांना आवडतात. रांगोळी, पणत्या, आकाशदिवे आणि फराळाचे करून कितीतरी अंध, अपंग, मूक मुलं, बचतगटाच्या महिलांना, कलाकारांना आर्थिक मदत मिळवून देत हे चांगले आहे.’’
शुभदा वैशंपायन, डोंबिवली यांनी, दिवाळीदिवशी पहाटे रेडिओवर नरकासुर वधाचं कीर्तन जाहिरातीच्या व्यत्ययाशिवाय लागायचं असं सांगून, ‘उठा उठा दिवाळी आली..’ अशी जाहिरात करावी लागत नसल्याचे नमूद केले आहे. मुख्य म्हणजे चाळीतील मुलांत सर्वात आधी मीच हे सांगण्यात आनंद असायचा. भरपूर पैसा, कपडे, असूनही आज मानसिक समाधान शांतता नाही. ज्येष्ठ व्यक्तींनी काळाबरोबर बदलावे म्हणजे किती? याला काही मर्यादा आहेत का?
चंद्रशेखर कळवणकर सूरतहून लिहितात, ‘‘दिवाळी म्हणजे प्रकाशाची पूजा म्हणून घरा-दारात पणत्या. संस्कृती म्हणजे स्त्री-पुरुष समानता, मोठय़ांचा अन् आल्या-गेल्यांचा सत्कार आपण फराळाची ताटं शेजाऱ्यांना देतो ते. चिन्ह आहे मन जुळल्याचं. दिवाळीच्या सणाला तर्कशास्त्राचा आणि विज्ञानाचाही आधार आहे. दिवाळीच्या सुमारास रब्बीची पिके आलेली असतात. शिवाय हेमंत-शिशिर ॠतूंच्या आगमनाची चाहूल लागलेली असते. त्वचा कोरडी पडते म्हणून तेल लावून अभ्यंगस्नान, वर्षभराच्या कष्टाचं फलस्वरूप म्हणून गोडधोड करतात. स्निग्ध गोड पदार्थाचं पचनही लवकर होते. ’’
 ६५ वर्षांच्या अलिबागच्या अंजली भातखंडे आजींनी  दिवाळीनिमित्त आपल्याकडे येणारे पाहुणे, दाराशी येणारे इतर जण, कर्मचारीवर्ग यांना दिवाळीत फराळाचे पदार्थ करून देऊन संतुष्ट करणे याला आपल्या संस्कृतीत खूप महत्त्व असल्याचे सांगितले आहे. सर्व विकत मिळतं पण स्वनिर्मितीचा आस्वाद कधी मिळणार असा प्रश्नही त्या विचारतात.
जयवंत कोरगावकर, परळ (८३) यांनी आता दिवाळी अंकांची किंमत न परवडणारी असल्याचे नमूद करत म्हटले आहे,‘आताच्या अंकात उच्च प्रतीचे साहित्य नसते. मुखपृष्ठावर तरुणीचे मोहक चित्र असते आणि कितीतरी जाहिराती असतात म्हणून महागाईचे अंक घेतले जात नाही. पूर्वी तटपुंजा पगार पण डोक्यावर कर्जाचा बोजा नव्हता. आता बोनस असला तरी त्याला अनेक वाटा असतात. तेल महाग मग एखादीच पणती मिणमिणणार. आपल्या काळच्या आठवणी सांगणे एवढेच मग वाटय़ाला येते.’
भालचंद्र देशपांडे, नागपूरचे (७२)! ‘बुलढाण्याच्या थंडीत मुलं उघडी होऊन बसायची तेल, उटणं, आंघोळ, औक्षण सगळं कुडकुडत व्हायचं,’ असं सांगत ते लिहितात ‘दिवाळीला सुगंधी साबण बाबा आणायचे एरवी आमची व साबणाची गाठ सहसा पडत नसे. आज मुलांना वेगवेगळी साबणे लावायला मिळतात व थंडीचा तर पत्ताच नसतो. तेव्हा आम्ही दिवाळीत रेडिओवर प्रसारित होणाऱ्या नाटकांचा श्रवणानंद घ्यायचो. एकमेकांना कोडी घालायचो. पाठांतर करायचो. आजची मुलं घेतात का हा ज्ञानानंद? स्वस्ताई असली तरी पैसाही दुर्मिळ होता त्यामुळे नवी चड्डी-शर्ट दिवाळीतच शिवले जायचे. आईचा काळ पातळांचा, पत्नीच्या काळात साडी आली, सुनेच्या काळात ड्रेस आले. आता पुढे? काळ झपाटय़ाने बदलतोय हेच खरे. बाबा सामाजिक उत्तरदायित्व न विसरता हिंगण्याला कर्वे आश्रमात भाऊबीज म्हणून १० रुपये मनीऑर्डरने पाठवायचे. आज मात्र आम्ही अनुभवलेली दिवाळी कुठंतरी हरवून गेलीय.  
उज्ज्वला मालाडकर या आजी लिहितात, ‘माझ्या नातवंडांना दिवाळीत पहाटे उठून उटणे लावून आंघोळ करायला आवडते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून हवेचे प्रदूषण ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून फटाके आणू नका म्हणून सांगतात. नवीन फॅशनचे कपडे घालतात. मित्र-मैत्रीणींना घरी बोलावतात. फराळाऐवजी पावभाजी, पिझ्झा अशी त्यांची फर्माईश असते. एकत्र, हॉटेलमधे जातात. आजची पिढी ही सण पूर्वीच्या पिढीसारखीच उत्साहाने साजरा करते. त्यांच्या मनात आपले संस्कार रुजलेले आहेत. आपली भारतीय संस्कृती टिकेल याबद्दल माझ्या मनात बिलकूल शंका येत नाही.’
दादरचे श्रीनिवास डोंगरे ( ७०) यांनी आत्ताच्या दिवाळीचे सुरेख वर्णन केले आहे. ते लिहितात, ‘नातवांच्या आग्रहामुळे आम्ही गिरगावातून दादरला मुलाकडे ब्लॉकमधे आलो. आमच्या भिडेखातर मुलगा, सून लवकर उठले. मुलाने बाल्कनीत प्लॅस्टिकच्या चांदणीत दिवा, सुनेने रांगोळीचा स्टिकर लावला. शेजारी मेणबत्ती पेटत ठेवली. चाळीत मुलं अंगणात फटाके वाजवतात म्हणून नातीला घेऊन खालच्या कंपाउंडमधे गेलो. लक्ष्मीबार लावल्यावर मजल्यावरून तरुण मंडळी रागाने म्हणाली, ‘आजोबा एवढय़ा पहाटे फटाके वाजवायचे का? आमची झोपमोड झाली. मुलाने लगेच मला हाक मारली. मी समजलो, वरती आल्यावर सूनबाईने गरमागरम इडली-सांबार चटणी दिले व विचारले, ‘प्रकाश’कडची स्पेशल करंजी एखादी हवी का? दिवाळीचा फराळ म्हणून इडली-चटणी हाणली. आणि नातेवाईकांचे हॅपी दिवाळीचे फोन घेत बसलो. मुलांना ‘बर्थ’डे साजरा करणे आवडते. सण दुय्यम होताहेत. माझ्या नातवाने तर भाऊबीजेला ओवाळताना निरंजनांवर फुंकर मारली. बर्थडे कँडलवर मारतात तशी. कटकट न करता आनंद लुटणे हेच खरे!’

मी पणजी. सहा मुली, जावई. अकरा नातवंडं, चार पातवंडं आहेत. लहानपणी घरी फराळ, देवदर्शन, रांगोळय़ा, गजगेबिटय़ांचे खेळ असत. मग लग्न झाल्यावर ६ मुलींचं नटणं, मेंदी, हौसेने दिवाळसण पार पडले. पूर्वी फार नवी खरेदी नसे. पितळी डबे चिंचेने घासणे, पडदे, फर्निचर, क व्हर धुणे, एकमेकांच्या मदतीने भरपूर फराळाचे करणे होई. त्यामुळे मुलींनाही कष्टाचे वळण लागले. सणाचे संस्कार झाले. आता नातवंडे , मुली नोकरदार आहेत. त्यामुळे मिळालेल्या सुट्टीत कुटुंबासह एकत्र फिरायला जाण्याचा वेळ मिळेल तेव्हा एकत्र आनंद उपभोगण्याचा समजूतदारपणा मला जास्त आवडतो. मुलं एकमेकांना गिफ्ट देतात. तेव्हा मिळवलेल्या पैशांचा आनंद सर्वासह उपभोगण्याचा मनाचा मोठेपणा त्यांच्यात दिसतो.  दोन दिवस ठरवून सगळे जमतात मग वाचलेल्या पुस्तकांच्या, ऐकलेल्या मैफिलीच्या, बघितलेल्या नाटकांच्या, मुलांच्या प्रगतीच्या आणि बदललेल्या जगाच्या चर्चा होतात. सर्वाच्या मदतीने एकत्र स्वयंपाक होतो तर कधी बाहेरून पार्सल येतं, सर्वानाच विश्रांती! माझी नातवंडे किल्ला करतात, रांगोळी काढतात, त्याचबरोबर छंदवर्गाना आणि शिबिरालाही जातात. मुलं नव्या जगाला सामोरं जाण्याची तयारी करतात आणि संस्कारही जपतात हे बघून मी धन्य होते! केदारचं तबलावादन, रसिकाचं नृत्य अभिनय आणि आदितीचं बोबडं गाणं गोष्ट ऐकून त्यांना कुशीत घेते आणि भरून पावते. आजही किल्ला करणं, रांगोळी काढणं, रांगोळी काढणं, अभ्यंगस्नान, फराळ, देवदर्शन, तोरणं, आकाशदिवे असं माझ्या लहानपणीच सारं आजही आहे. फक्त आम्ही ‘त्यातच’ रमत होतो, आता मात्र या गोष्टीबरोबरच काही नवं, अधिक मिळविण्याच्या अपेक्षा नव्या पीढीला आहेत आणि त्या योग्यच आहेत. आई आजी म्हणून नातवंडं, लेकी येतात. आणि घर भरून जातं. दिव्यांचा लखलखाट त्यांच्या आयुष्यात भरून राहावा एवढीच सदिच्छा!        
लीलावती जोशी- मुरगुडकर (७३)

अंधेरीच्या सुमन नाईक (७२) यांना बालवयातली दिवाळी अनमोल वाटते. त्या लिहितात, ‘त्या वेळी सर्व वस्तू रेशन दुकानात मिळत. अगदी कापडसुद्धा. शेजारच्या काकांनी दिवाळीसाठी चीटाचे कापड येणार आहे, असे सांगितल्यावर रांगेत उभे राहून दोन रुपयेप्रमाणे तीनवार चीटाचे कापड आणले. चाळीतल्या सिंधी मावशीने दोन रुपये शीलाई घेऊन छान झालरचा फ्रॉक शिवून दिला. व तो घालून मी सर्व आळीभर फिरले. सर्वानी म्हटलं, ‘सुमीची भाऊबीज काय छान आहे! ऐट आहे बुवा एका मुलीची.’ अशी माझी बालपणातली दिवाळी. आता भपका, दिखाऊपणा वाढला. तरीही फटाके न वाजवता मुलं ते पैसे वनवासी कल्याणला देतात हे चांगलंच.’
 मीरा रोडचे नरेंद्र पाटील (८५) आजोबा-जुन्या दिवाळीत रमतात. लिहितात, ‘लाडू करंज्या आदी पदार्थानी भरलेली तबकं शेजाऱ्यांच्या घरी नेऊन देण्यात आणि परस्परांनी परस्परांच्या घरी जाऊन दिवाळीचा फराळ खाण्यात मुलांना आनंद असायचा. आता फराळ देण्याची व करण्याची प्रथाच बंद झाली. त्यामुळे तो आनंदही हरवला.’
वध्र्याच्या सीमा देशपांडे (६६) बालपणात रमताना सांगतात, ‘सुट्टी लागली की बैलगाडीचा प्रवास करून आम्ही खेडय़ावर पळायचो. सुवासिक शिकेकाई तेल, उटणे यांसह मोठा हंडा भरून गरम पाण्याने मनसोक्त स्नान होई. मग फराळ करायला मज्जा असे! सुट्टीत आम्ह्ी सर्व एकत्र जमायचो. नवीन कपडे, गप्पा, गोष्टी यात दिवाळी कशी निघून जायची कळायचेच नाही. आता नात्यांची गरज बदलत चाललीय. सर्वाच्या स्वतंत्र खोल्या, स्वतंत्र वस्तू आणि टायमिंग यात कोणाची लुडबुड आजच्या पाढीला नको आहे. हा सगळा काळाचा महिमा!’
दहीसरच्या तुकाराम कलगुटकर (७४) या आजोबांना त्यांच्या काळातील दिवाळीचे फटाके विशेष भावतात. फटाक्याचे त्या वेळचे प्रकार आता बंद झाले. त्या वेळी पानपट्टी आकाराचा पोपट, मिरच्या, तडतडय़ा, आपटबार, चिडीया असे प्रकार असत. ते लिहितात, ‘माझ्या मोठय़ा भावाच्या मित्राने एक झाड बनवले व त्याला निरनिराळे फटाके लटकवले. आग लावताच ते खालपासून पेटले. तो नयनरम्य देखावा होता. पण एकदा चाळीत असाच एक माणूस अंगाला कापूस लावून हनुमानाचे रूप घेऊन आला व माकडासारखा नाचू लागला. इतक्यात तिसऱ्या माळय़ावरुन कुणीतरी आपटबार टाकताच तो रंगात आला. पण शेवटचा आपटबार पायाजवळ फुटून तो कापसामुळे उभा पेटला. नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण आम्ही मात्र घाबरून गेलो. अजूून ती आठवण काही जात नाही.’
मंगला खोत, वाकोला मुंबई, (७२) लिहितात, ‘पूर्वी सण धार्मिक भावनेतून साजरे होत, आता पार्लरच्या. यामुळे मालीश कमी झाले. पण त्याचबरोबर स्पर्शातला ओलावाही हरवला. मात्र आजची पिढी वृद्धाश्रमात जाण्यासारख्या उपक्रमांमध्ये हिरीरीने भाग घेणारी आहे. एरवी फाटक्या जीन्स्, हाफपँटमधे वावरणारे नात-नातू दिवाळीला पारंपरिक वेशात नटतात. हे खूप सुखावह आहे.’
श्रीकांत ना. जोशी, गारगोटी (६७) लिहितात, ‘तेव्हा गडी माणसं, दूधवाला, पोस्टमन यांनाही फराळ दिला जाई. नात्यांची वीण त्यामुळे घट्ट होई. आता फराळ खातानाही मनात ‘शुगर’, ‘बी.पी’ची चिंता असते. पूर्वी भेटकार्ड तयार करून ती वेळेवर पोहोचतील अशा बेताने पाठवण्यात आनंद असायचा, आज मोबाइल शुभेच्छा म्हणजे ‘शब्द बापुडे केवळ वारा’ त्या जपून कशा ठेवायच्या? आज रांगोळी काढायलाही वेळ नाही. आणि तेलाची पणती नाही. चिनी लाइटच्या माळा पाहून मला तरी दिवाळीचा आत्मा हरवल्याचाच भास होतो!’
सुवर्णा मयेकर, अंधेरी, मुंबई यांनी दिवाळी साजरी करण्याची पद्धत बदलली हे सांगताना लिहिले आहे, ‘आता सूनबाईला फराळचे करायला वेळ नसतो. आणि आवडही नसते. नातवंडांना लाडू करंजीपेक्षा पिझ्झा, बर्गर श्रेष्ठ. एक दिवस सुट्टी म्हणून आरामात उठणे. अभ्यंगस्नानावर फुली. एस.एम.एम. करून शुभेच्छा. कॅप सहलींमुळे सुट्टी सत्कारणी लागते. आता दिवाळी म्हणजे आनंद उपभोगण्याचा इव्हेंट झाला आहे. भाऊबीजेला ओवाळणी घालायची नसते तर बहिणीला गिफ्ट द्यायचे असते. दिवाळीचा आनंद नातेवाईक, मित्रमंडळींसह घ्यायचा नसून सुट्टी उपभोगण्यासाठी घ्यायचा असं समीकरण झालं आहे.’
राम खांडेकर, नागपूर (७९) हे आजोबा मुलगा मुंबईत असल्याने त्याच्या सहवासात राहण्याचा योग नाही अशी भावना व्यक्त करतात. ते म्हणतात, ‘नको धन, नको मुद्रा, मोतीयांचे हार, देई प्रेमाश्रूंची धार, भाऊराया’ असं बहीण-भावाचं नि:स्वार्थी नातं आम्ही अनुभवलं. माहेरवाशिणी व बाहेरगावचे सर्व दिवाळीनिमित्त एकत्र येत होते. त्या तीन पिढय़ांचे एकत्र वातावरण आम्ही अनुभवत होतो. वर्षभरातील कष्ट विसरून आजी-आजोबांपासून नातवांपर्यंत सर्वामध्ये नवीन उत्साहाची भरती येई. आता फ्लॅटमुळे शेजारधर्मही नाहीसा होऊ लागला.’
मनीषा दीक्षित, बाणेर, पुणे (६५) म्हणतात,‘चकलीची भाजणी लाडवासाठी भाजलेला रवा. यांचा घराघरात घमघमाट असे. सर्व पदार्थ घरीच होत आणि वर्षांतून एकदाच व्हायचे त्यामुळे त्याची अपूर्वाई वाटायची. अजूनही या पदार्थाची चव जीभेवर तरळते आहे’
 र. गो. पडळकर, पुणे यांनी पूर्वी आकाशकंदिलात पणती लावावी लागे ही आठवण सांगितली आहे. त्यासाठी आकाशकंदील दोरीने वर करण्याची व्यवस्था लागे. विजेचे दिवे लावण्याची सोय नसल्याने रोषणाई म्हणजे फक्त पणत्याच होत्या. दिवाळीचा फराळ स्टोव्हवर किंवा चुलीवर व्हायचा. वाडय़ातील सगळे मिळून संडासासकट सर्व स्वच्छ करत. दिवसभर सगळ्यांच्या घरातलं फराळाचं खाणं म्हणजे दिवाळी असे, असं ते लिहितात.
ज्योती पाध्ये, डोंबिवली (६७) लिहितात, ‘फराळाचे करायला मदतीला कोणी नसल्याने हळूहळू १५-२० वर्षांनंतर माझाही उत्साह कमी झाला. १-२ पदार्थ आयते येऊ लागले. हवामानाचा फरक पडला. कडाक्याची थंडी दिवाळीतून गायब झाली. त्यामुळे, उटणे, आंघोळी याचे महत्त्व कमी झाले. आता दिवाळी म्हणजे आनंद मग तो कोणत्याही मार्गाने मिळवतात! घरात माणसे कमी, एकच मूल त्यामुळे भावंडे नाहीत. फटाक्याची वाटणी, भांडणं नाहीत, भाऊबीजेला भाऊ किंवा बहीण नाही. आपले भावंडाला द्यावे हा संस्कार नाही. जे सर्व आहे ते माझे मी कोणाला देणार नाही, ही वृत्ती वाढते. आपणही नव्या दिवाळीचा स्वीकार करून ई-दिवाळी, ई-भाऊबीज करूया.’
    र. भ्यं. मानवतकर, शुक्रवार पेठ पुणे, (७५) म्हणतात, ‘आता दिवाळी नातवंडांची म्हणजे एका मुलाचे एक नातवंड. एका गावात असतील तर सणावारी भेटणं, नाहीतर मुलांच्या सुटय़ा, आईवडिलांच्या रजा असं सांभाळून एक सुट्टी म्हणजे पर्यटन, एकदा एका कुटुंबामार्फत हॉटेलमध्ये भाऊबीज तर दुसऱ्या कुटुंबामार्फत दुसऱ्या हॉटेलात ‘पाडवा’ साजरा होतो. महागडय़ा वस्तू खरेदी करण्यावर आता जास्त कल आहे. मुलांचे वर्षभर आर्थिक सुबत्तेमुळे कपडय़ांचे लाड होतात. त्यामुळे दिवाळीचे नावीन्य कमी झाले आहे!’
मंदा खापरे-डोंेबिवली, यांनी आता मुलं रोज लवकर उठून, आंघोळ करून शाळा कॉलेजात जातात, मग दिवाळीला सुट्टी म्हणून दिवसभर आल्यावर उठतात. तेलापेक्षा शांपू आवडतो. अत्तराऐवजी स्प्रेचे फवारे उडतात. असे सांगून सणासुदीला सुट्टी म्हणून घराबाहेर टूरला जाण्याऱ्यांच्या घरात दिवाळीच्या दिवसात मात्र अंधार असल्याची खंत व्यक्त केली आहे.
 सुलभा  चौधरी, नागपूर यांनी सुट्टीतल्या नातवडांच्या प्रोजेक्ट, होमवर्कबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. उशिरा का होईना तेल, उटणं लावून नातवंडांची आंघोळ होते. आता खरा दिवाळसण सुना-मुलांचा. त्यांच्या आवडी-निवडी यांच्या विचारांचा, कल्पनांचा रंगच दिवाळीला असावा, असं समंजसपणे म्हटलंय.
वा. न. पवार, पंढरपूर यांनी आता दिवाळीची पूर्वतयारी १५ दिवसांऐवजी ४ दिवसांत होते, असे लिहितात, ‘मुलांचे मम्मी, पप्पा ऑफिसमधे. त्यामुळे आमचा मुक्काम नातवंडांकडेच. कामावरून येतानाच मॉलमधून खमंग पदार्थ स्वीट घरी येतात. पूर्वी बच्चे कंपनीसह मनमुराद फराळ आणि गावभर हुंदडणं म्हणजे आमची खरी दिवाळी असे’, अशा आठवणी सांगतात.
शैलजा कुमठेकर, सोलापूर यांनी भाऊबीजेची आठवण सांगितली आहे. ‘भाऊ पुस्तक, रिबिनी, रंगपेटी अशी ओवाळणी द्यायचा, त्याचे अप्रूप वाटे. मामाची आईला ओवाळणीची मनीऑर्डर आली की सिनेमा पाहण्याचा कार्यक्रम होई. पूर्वीच्या पणतीच्या उजेडातील सोज्वळ, शांत, प्रसन्न दिवाळी लोप पावली तरी मुलांची प्रचंड ऊर्जा विधायक कामाकडे वळविण्यासाठी न धरी शस्त्र करी मी, सांगेन गोष्टी युक्तीच्या चार, ही शिकवण जुन्या पिढीने आचरणात आणावी!’
एल. एस. जोशी, रत्नागिरी यांनी फराळाचे करायला शेजारच्या ४-५ बायका पोळपाट लाटणे घेऊन येत, अशी आठवण सांगून मामा भाऊबीजेला येताना खरवस आणायचा हे लक्षात असल्याचं सांगितलंय. भाऊबीजेला आई श्रीखंड, बटाटाभजी करायची. मामा ५-१० रुपयांची ओवाळणी घालायचा,  पण त्या भेटीची ओढ अमूल्य होती. मामा परत निघाला की आईच्या डोळ्यांतले अश्रू आजही आठवत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
डॉ. मंगला वैष्णव, औरंगाबाद यांनी लहानपणीची आठवण सांगत म्हटलंय की, दिवाळीला  आत्या, काका यांची मुलं येत. त्यामुळे २५ माणसं जमायचो. एका मोठय़ा सतरंजीवर आम्ही सगळी झोपत असू. आताच्या मुलांना हे सहन होणार नाही, असे मत व्यक्त केले आहे. भाऊबीजेला भाऊ सतवायचे, ‘चांगलं मालीश कर नाहीतर ओवाळणी मिळणार नाही. बहिणीही ऐकायच्या. ओवाळणीची रक्कम फार नसे पण प्रेम असायचं असं म्हटलंय.     
उषा दहापुते, वाशी लिहितात, ‘दिवाळी म्हणजे नात्यातील गोडवा जपण्याचे सांस्कृतिक धन. पण आता मुंबईत वास्तव्य. दसरा काय, दिवाळी काय? माणसांनी स्वत:भोवती तटबंदी उभारलेल्या. खूप मिठाई, खूप फटाके, पण शेजाऱ्यांशिवाय मजा नाही. गरम गरम करून ताटात वाढलेल्या खाण्यात जी आपुलकी, प्रेम आहे ते विकतचा मिठाई बॉक्स आणि देणाऱ्याचा औपचारिक कोरडेपणा मनाला कुरतडतो. मरगळलेल्या मनाला उभारी देणारे, तुटलेल्या नात्यांना जोडणारे, नात्यांना नवसंजीवनी देणारे हे सण पूर्वीसारखे होत नाहीत. किमानपक्षी बहीण, भाऊ, मामा, मावशी तसेच सर्वाची मुले अजूनही या बंधनात आहेत हेही नसे थोडके.’                                                                         
मंगला परांजपे, सांगली, यांनी दिवाळीतील दिव्यांसाठी मोठय़ा प्रमाणात वाती वळण्याच्या आठवणी सांगितल्या आहेत. ‘पूर्वी एक कपडा अंगावर व दुसरा दांडीवर असे. आता कपडय़ांची कपाटं भरून वाहतात. आता मंगळसुत्रालासुद्धा फाटा दिला जातो हे आमच्या पिढीला न मानवणारे आहे.’ अशी खंत व्यक्त केली आहे.
शशिकांत लावणीस, सोलापूर यांनी दिवाळीत एकमेकांच्या मदतीने फराळ न होता मिठाई, ड्रायफ्रुट्सचे बॉक्स दिले जात असल्याची खंत करत असतानाच दिवाळी म्हणजे आनंदाचे झाड, असंही म्हटलं आहे.
हेमा भोबे यांनीही दिवाळीत आम्ही काटकसरीने फराळाचे मोजकेच पदार्थ बनवायचो त्यामुळे वाटय़ालाही मोजकेच पदार्थ येत असं म्हटलं आहे. आज नात्यांच्या गरजा, मागण्या बदलल्या यापेक्षा नातीच राहिली नाहीत, पण स्वरूप बदलले तरी दिवाळी साजरी करण्याचा उत्साह मात्र कमी नाही, असं मत व्यक्त केले आहे.
छाया पुराणिक (६६),  पुणे यांनी  फराळाचे डबे छोटे झाल्याची खंत व्यक्त केली आहे. ‘कामवाल्या बाईलासुद्धा फराळापेक्षा बोनस महत्त्वाचा वाटू लागला आहे. मुलगा सून रोजच अभ्यंगस्नान करतात मग दिवाळीत चार दिवस थोडा आराम केला तर कुठे बिघडले? त्यांच्या धावपळीच्या जीवनात एकमेकांना जमेल तेव्हा वेळ देणेच गरजेचे आहे’, असं म्हटलंय.
मधुरा भगत (६६), भांडुप, लिहितात ‘भाऊबीजेला पाकिटात पैसे देतात. यात चूक नाही. पण म्हातारपणामुळे कुठे जाणे-येणे होत नाही. नातवंडांचा आनंद पाहूनच समाधान मानायचे. आई-वडिलांना वाटते मुलांवर जेवढा खर्च करू तेवढे प्रेम! पण मुलांना आई-वडिलांचे प्रेम व वेळ हवा आहे. पण लक्षात घ्यायला हवे असे म्हटले आहे.’
गंधवती तांबे, ठाणे लिहितात, ‘दिवाळीत पाडव्याच्या ओवाळणीची वाट पाहणारी गृहिणी आता दिसत नाही. तर नवऱ्याच्या बरोबरीने बोनस घेणारी बायको दिसते. दुकानात चकचकाट असतो. आठवडाभर काम करून दमलेले आई-बाबा एका रविवारी सगळी खरेदी, ऑर्डर देणे काम करतात. दिवाळीचा चेहरामोहरा बदलला तरी आनंद तोच आहे!’
मधुकर खोचीकर (७९), कोल्हापूर यांनी काहीतरी हरवत चालल्याचे जाणवत असल्याचे  सांगत दिवाळीला घरच्यांबरोबरचा सहभाग आता कुठेच आढळत नाही म्हणून ‘गेले ते दिन गेले..’ म्हटले आहे. आम्ही आजी-आजोबाच दिवाळीला चार भिंतींत अडकून पडलेलो असतो. कृत्रिम ओढून-ताणून आणलेल्या आनंदात ४ दिवस निघून जातात. मुलं, नातवंडं मात्र दिवाळीची सुट्टी कशी मजेत घालवली याचं वर्णन करतात, अशी खंत व्यक्त केली आहे.
 आसावरी फडणीस, (६७) ठाणे लिहितात, ‘पूर्वी समृद्धी आणि चंगळ नसली तरी त्या आठवणी अनमोल वाटतात. फटाक्यांसाठी भांडणं, आईचा डोळा चुकवून पाहुण्यांसाठी राखून ठेवलेल्या चकल्या फस्त केल्या म्हणून तिचा खाल्लेला ओरडा, भावांनी मुद्दाम पुसलेली रांगोळी याची लज्जतच काही न्यारी! आई चकल्या तळतेय आणि मुलं फस्त करतात हे दृश्यच आता नाही. दिवाळीला पाहुणे घरी येण्याऐवजी ऐन दिवाळीत बरेच लक्ष्मीपुत्र घरच्या लक्ष्मीला घेऊन पर्यटनाला जातात. या गोष्टीची खंत जास्त वाटते.’
पद्मजा आंबेकर, (७६) बोरिवली लिहितात, ‘आमच्या वेळी वाडय़ातील सात बिऱ्हाडांकडचा फराळाचा कार्यक्रम एक प्रतिनिधी ठरवायचा.  घरी दाटीवाटीने बसून कागदावर फराळाचे जीन्नस वाटत. एखादी हौशी गृहिणी शिरा, पोहे करी. सर्व मुले खुळखुळ्याची करंजी खात. ‘नको’ असा नाटकीपणा नव्हता. आता शिकलेल्या मुली, सुनांमुळे सणांना आपोआप सोपे व्हावे लागले. भाजणी विकतची, चिरोटा दुरावला, अनारसा अधिकात गेला. फराळात लाडू नकोसा झाला. करंजी ओल्या नारळाची झाली. येण्याजाण्याची अपूर्वाई संपली. थोडा कोरडेपणा आला फक्त आपल्यापुरते उरले.’
प्रभाकर शंकर, (७०) डोंबिवली , मुंबईत गिरणी-कारखान्यांना बोनस जाहीर होई. मग दिवाळीची खरेदी होई. आता दिवाळीला शहरीकरणाचा बाज आला. दिवाळी घरापुरती मर्यादित झाली, असं म्हटलं आहे.
शुभदा कुलकर्णी (७५) दिवाळीतील भाऊबीजेची आठवण सांगतात, लिहितात, ‘आईचा भाऊ गावाहून यायचा. बहीण-भावाच्या प्रेमाला उजाळा मिळायचा. बाबांची आत्याकडे जाण्याची लगबग असे. आमच्या बहीण-भावंडांची भाऊबीज लटक्या भांडणातच औक्षण करून साजरी व्हायची. एकत्र कुटुंबात भाऊ म्हणून दिरांनाही औक्षण करायचो. आजोळी गेल्यावर दिवाळीची जास्त मज्जा यायची. मी नोकरी करूनही सर्व सांभाळले. एकत्र जमून दिवाळी करण्यात आनंद द्विगुणित व्हायचा. नात्यात प्रेम, माया, आदरभाव नकळत वाढायचा. आता नव्या पिढीला कशातच नवलाई, अप्रूप राहिलेले नाही. आपणच आपला दृष्टिकोन बदलायचा एवढेच खरे!’
मंगला थत्ते, (६५) ठाणे, यांनी दिवाळीला प्रयोगशाळा म्हटलंय. ‘माती, रंग, कागद, रांगोळी, खाद्यपदार्थ हे सर्व करण्यात छोटय़ांची लुडबुड, त्यातून साकारणारी नवनिर्मिती, मासिक वाचण्याची धडपड. शक्य झाले तर नवे कपडे. आज पाणावल्या डोळय़ांनी आजी-आजोबा लॅपटॉपवर नातवाशी बोलतात. मुलांच्या पाठीवर शाळा, क्लासचा होमवर्क असतो. पण नातू आजोबांना देवदर्शनाला नेतो. हेही महत्त्वाचंच.’
शैलजा पुरोहित लिहितात, ‘फराळाचे बारा महिने तेरा काळ हे पदार्थ मिळतात. मग त्यांत कसलं आलंय अप्रूप? घरात हे सगळं करण्यात वेळ घालविण्यापेक्षा दोघांनीही आपापल्या करिअरकडे लक्ष दिलं तर काय चुकलं आमचं? बटन दाबलं की सारं घर उजळून टाकणारे, परिसर प्रकाशमय करणारे दिवे असताना वाती वळून पणत्या लावा कशाला? या वृत्तीला काय म्हणावे? परिस्थितीमुळे, वातावरणामुळे झालेला हा पालट योग्य असेलही! आम्ही तो काळाची गरज म्हणून स्वीकारलादेखील! पण.. पणतीतील मंद भगभगीत प्रकाश आपला नक्कीच नाही. नात्यातील भावबंधदेखील असेच आहेत. म्हणूनच ते जपायला हवेत.’
 शुभा शिरोळकर (७८) गोरेगाव,  यांना चाळीतलं आपलेपणा उपनगरात नाही असे वाटते. चाळकरी मुलांची काळजी घेत. येथे शेजारी कोण राहते? हे माहीत नसते. भेट दिली तर ती आवडेल की नाही शंका. कितीही मिळालं तरी तृप्ती नाही, असा सूर व्यक्त केला.
शकुंतला नानिवडेकर, (७९) ठाणे, यांनी आमचे कारेगावात २५ माणसांच्या कुटुंबातल्या आठवणी सांगत म्हटलंय की ‘आताही मुलं उच्चविद्याविभूषित असली तरी एकमेकांना चिकटून आहेत. उंच भरारणारी पाखरं पिलासह दिवाळीला घरटय़ात येतात. व सर्व घरीच केलेले व बाहेर न जाता घरातच साजरे होते, याचे समाधान व्यक्त केले आहे.
गोविंद पवार, (६८) श्रीवर्धन, यांना दिवाळीतील बैलांच्या झुंजी आठवतात. फराळाचे आजूबाजूला पोचवणे, फटाके उडविणे अशा माफक अपेक्षा असल्याचे ते सांगतात.
अनघा ठोंबरे, कोथरुड, पुणे, लिहितात, ‘आताच्या कुटुंबात भावंडं एखादंच. मग भाऊबीजही शांत, पाडवा हॉटेलमध्ये होतो. गाठीभेटी, माहेरपण याला आता दिवाळी लागत नाही. इंग्रजी माध्यमाची मुलं आता दिवाळी अंक कसे वाचणार? पाहुणे आल्याने पूर्वी आनंद दुप्पट व्हायचा आता फ्लॅटच्या बंद दाराआड सगळे!’
प्रभाकर खाडिलकर (६५) सांगली, लिहितात, ‘त्या वेळी स्वयंपाकघरात बिस्किटं, फरसाण यांचे डबे नसायचे. म्हणून आम्ही फराळावर तुटून पडायचो. दिवाळी म्हणजे आत्ताच्या काळात सुट्टी बोनस, कुटुंबाचा एकत्र येण्याचा आनंद!’
पुष्पा प्रभुणे, ठाणे यांनी बदललेला काळ स्वीकारलाय. त्या लिहितात, ‘आता सुट्टी कमी असते. मग फिरायला जाणं पण होतं, पण जाताना औक्षणाचं सामान सोबत असतं. मग तिथेच लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज होते. फराळाचे बरोबर असते. खरेदी तिथे होते. आम्ही सुवर्णमध्यातून आनंदात सहभागी होतो.’
सुधा पगारे, पुणे, लिहितात, ‘आजची नातवंडे उंच भरारी घेतात. त्यांना ती घेऊ दिली पाहिजे. ही मुलं योग्य वेळी आमचा नातेवाईकांचा सन्मान करून संस्कृती जपतात, मग आम्हा आजी-आजोबांना आणखी काय हवे?’
पद्माकर औटी, वाशी- यांना सणाचे मित्र-मैत्रिणींसह झालेले व्यापक स्वरूप आवडले. चंगळवाद असला तरी दुसऱ्या पिढीने सणांना नवे रूप देत परंपराही जपल्या आहेत.
सुषमा पोंगुर्लेकर यांनी परिस्थितीशी जुळवून घेतले तरच नाती टिकतील असे लिहिले आहे. लिहितात, ‘आता वजन कमी करण्याच्या उद्देशाने सर्वाकडे फराळ होत नाही. ईमेलवरच्या शुभेच्छांतही प्रेमच असतं. करिअरमुळे त्यांना वेळ नसतो. पण मोठय़ांनी त्यांना नात्यांची जाणीव करून द्यावी. प्रेम कमी झाले नाही. व्यक्त करण्याची पद्धत बदलली.’
शिल्पा वाळिंबे, कराड यांना दिवाळीतील माणसांची वर्दळ आठवते. त्या लिहितात, ‘सुख म्हणजे भरलेलं घर हीच व्याख्या होती. सकाळी दारात गाणं म्हणत येणारा वासुदेव, बारा बलुतेदारांना दिली जाणारी पोस्त हे सगळं एक तीळ वाटून खाण्यातला संस्कार मोठा होता.’
  पद्मजा हटकर, अंधेरी, मुंबई, यांनी दिवाळीचे बदललेले स्वरूप सांगितले आहे. पण पाडव्याच्या दिवशी मुलं, नातवंड नवे कपडे घालून नमस्कार करतात तेव्हा आशीर्वादासाठी हात पुढे होतात. डोळे पाणावतात, दिवाळीचा सण ‘सण’ न राहता फेस्टिव्हल झाला हे मात्र मान्य करावेच लागेल.’ असं लिहिलं आहे.
ठाण्याच्या लक्ष्मी शेळके लिहितात, ‘आमच्या काळात सगळ्यात आनंदाचा दिवस असायचा तुळशीच्या लग्नाचा. आपल्या ताईचं लग्न असल्याने आमचा थाट खूप असायचा. खूप धमाल असायची.’

आमच्या हाती यांची पत्रे उशिरा आली, त्यामुळे यांच्या पत्रांचा समावेश नाही करू शकलो. क्षमस्व आजी आजोबा.
ललिता जोशी (ठाणे), उषा दिघे, आरती पै (बोरिवली), गणेश गायधनी (अंधेरी), मधुसुदन पाठक (ग्रँटरोड), अलका परुळेकर (कराड), उषा शिंदे (दादर), विनायक अग्निहोत्री (कोल्हापूर), शंकर देसाई (नवी मुंबई), प्रा. यशवंत बागुल (ठाणे), अपर्णा मोहिले (पुणे), विजया पुजारी (पुणे), प्रमिला वरुडकर (हिंगोली), मुग्धा पटवर्धन (अंधेरी), चारुलता औरंगाबादकर (ठाणे), शुभदा आचार्य (वडोदरा, गुजरात), रा. म. मल्लेवाडीकर (सांगली), रवी थत्ते (डोंबिवली), शोभा लेले (ठाणे), लीला वैद्य (ठाणे), शुभांगी कठाळे (मुंबई), राजश्री खरे (डोंबिवली), लीला राऊत (मालाड), गीता जाधव (अंधेरी), नलिनी नानल (पुणे), वसंत लोंढे (ठाणे), आशा पाटवदकर (औरंगाबाद), रंजना केळकर (पुणे), विनया वाळिंबे (पुणे), अरविंद वैद्य (सातारा), रवींद्र कर्णिक (मुलुंड), अनुराधा काळे (पुणे), सदानंद संखे (डहाणू), रंजना चौधरी (मालाड), रजनीश सहाणे (डोंबिवली), वसंत जोशी (दादर), सुलभा वैद्य (नाशिक), विजया आजगांवकर (डोंबिवली), प्रा. शांता सहस्रबुद्धे (रत्नागिरी), अनुराधा घाणेकर (कल्याण, ठाणे), श्यामसुंदर सामंत (डोंबिवली), स्मिता शेटे (बोरिवली), विजया पाटील, बळवंत बावधनकर,(नाशिक), सूर्यकांत भोसले (मुलुंड), प्रभा आमडेकर (चेंबूर), बबन नारकर (रत्नागिरी), निर्मला मठपती (सोलापूर), ज्योत्स्ना फडके (ठाणे), सुधाकर जोशी (बोरिवली), सुशीला तळेकर (पुणे), विनया नांदेडकर (नांदेड).

वर्षांतून एकदाच मिळालेले नवेकोरे कपडे अंगातून काढावेसे वाटायचेच नाहीत. पाडव्याला नवऱ्याने आणि भाऊबीजेला भावाने दिलेल्या रुपया-दोन रुपयाच्या ओवाळणीनेसुद्धा आमची नसलेली कॉलर ताठ व्हायची. पण साऱ्यामागची भावना सच्ची होती. नातेसंबंध अतूट होते आणि मांगल्याचे प्रतीक असलेली तांदळाच्या पिठाची रांगोळी पुसली न जाणारी होती.’
वसईच्या रजनी भागवत लिहितात, ‘आपलं आवाहन वाचून ही ७६ वर्षांची आजी एका सेकंदात लहान होऊन आपल्या माहेरी केळशी दापोलीला गेलीही.. पूर्वी जावयाचा दिवाळसण भावाची भाऊबीज आणि पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा, पूर्वी आई बाबांना ओवाळत नव्हती. पण डोळ्यांच्या निरांजनाने ओवाळणी होत होती. बळी प्रतिपदेला पिठाची मोठी पणती करून ती ‘कवाडीवर’ ठेवली जायची, कारण ‘भाऊराया’ येईल त्याला वाट दिसावी ही ‘भाबडी भावना’ हे मुके प्रेम, आपुलकी नातं जपायची.’
एकूणच ‘दिवाळी आजी-आजोबांची’ या विषयावर वाचकांनी मनापासून प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही जण आपल्या काळातल्या दिवाळीत रमले. त्यांना आताच्या पिढीत झालेला बदल मानवलेला नाही तर काहींनी खुल्या दिलाने हा बदल स्वीकारलाय.
दिवाळी हे निमित्त आहे असे शुभचिंतन, शुभसंकल्प करण्याचे! दिवाळीचे बदलते स्वरूप हजारो अनाथ, अपंग, गरजू हातांना काम मिळवून देते. शाळेत मुलं किल्ला, आकाशदिवा, पणत्या, ग्रीटिंग्ज बनवतात. तशा कार्यशाळाही असतात. अगदीच ‘रामाला दिवाळी ठाऊकच नाही’ इतकी उदासीनता नाही नव्या पीढीत आणि असेलच तर आजी-आजोबाच दीपस्तंभासारखे मार्गदर्शन ठरताहेत. वास्तवात जगात सकारात्मक चांगले विचार, संस्कार, रुजविण्याचा प्रयत्न केला तर आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांच्या विचाराचा, मार्गदर्शनाचा एक दिवा हजारो दिवे पेटवू शकतो. नव्या पिढीच्या अंतरंगात! कारण या नव्या पिढीतल्या पिलांनाही डोक्यावर आशीर्वाद देणारं छत्र आणि पाठीवरून मायेनं फिरणारा हात हवा आहेच की..! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छांचे आशीर्वाद देणारे आजी-आजोबाही म्हणतील, ‘पुढे जा.. आम्ही सोबत आहोतच की.. ! आजी-आजोबांच्या रूपाने.
    meerackulkarni@gmail.com