20 November 2019

News Flash

परमार्थतत्त्व

गीताभ्यास-इंद्रियांना न जाणवणारे मन, सूक्ष्म , तरल व श्रेष्ठ पातळीवर आहे. सूक्ष्म तत्त्वांचा अनुभव घेण्यासाठी आपली योग्यता उंचावली पाहिजे. अंतर्मनाची म्हणजे आत्म्याची पातळी गाठण्यासाठी योगाभ्यासाने

| November 22, 2014 12:44 pm

01-bodhiगीताभ्यास-इंद्रियांना न जाणवणारे मन, सूक्ष्म , तरल व श्रेष्ठ पातळीवर आहे. सूक्ष्म तत्त्वांचा अनुभव घेण्यासाठी आपली योग्यता उंचावली पाहिजे. अंतर्मनाची म्हणजे आत्म्याची पातळी गाठण्यासाठी योगाभ्यासाने ‘योगी’ झालेल्याची आवश्यकता भासते. म्हणूनच विश्वाचे उत्तरोत्तर श्रेष्ठ व सूक्ष्मदर्शन होण्यासाठी, तसेच आत्मज्ञान होण्यासाठी ‘योगी’ हवा.

चित्ताची एकाग्रता, योगाभ्यास यांची महती पटवून ‘तू योगी हो’ असा आदेश भगवंतांनी अर्जुनाला दिला. कारण इतर चांगल्या परिणामांबरोबरच योगी झालेल्या व्यक्तीस परमात्म्याचे समग्र ज्ञान होऊ शकते हे भगवंत जाणत होते आणि अर्जुनाच्या बाबतीत तसं इच्छितही होते. म्हणूनच गीतेच्या ‘ज्ञान-विज्ञानयोग’ नावाच्या सातव्या अध्यायात गीता आपल्याला परमात्म्याचं संपूर्ण माहात्म्य सांगणार आहे.

आता परमात्म्याचं समग्र ज्ञान म्हणजे काय? तर ज्ञान व विज्ञान या दोन्ही स्तरांवर परमेश्वराला जाणायचे. सर्वसाधारणपणे जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी परमेश्वराचे अस्तित्व आहे असं आपण म्हणतो. म्हणजेच बाह्य़ संपूर्ण चराचर सृष्टीतील परमेश्वराचं सामथ्र्य आपण मानत असतो. पण ते फारच वरवरचं असतं. त्याची जाणीव किंवा अनुभूती आपल्याला असतेच असं नाही. विज्ञान म्हणजे विश्वाचे आपल्या इंद्रियांना जाणवणारे दृश्य स्वरूप, ज्यात अफाट विविधता, असंख्य आकार व सततचे परिवर्तन आहे. विश्वातील या विविधतेचे ज्ञान किंवा विश्वज्ञान म्हणजे विज्ञान!
मग ज्ञान म्हणजे काय? समर्थ रामदासांनी ज्ञानाची व्याख्या दासबोधात केली आहे.
‘ओळखावे आपणासी आपण। या नाव ज्ञान।।’
आपणच आपल्याला ओळखायचे. स्व-स्वरूपाची ओळख करून घ्यायची. आपल्या शरीराला जिवंत ठेवणारी जी चेतना आतमध्ये आहे, जिच्यामुळे मला एक स्वभाव आहे, भावभावना, विकार-विचार आहेत, त्या चेतनेची म्हणजेच आत्म्याची ओळख करून घेणे म्हणजे ज्ञान! आत्मज्ञान हेच खरे ज्ञान!
या परमात्म्याचे समग्र ज्ञान होण्यासाठी ‘योगी’ का हवा? आपण ज्या पातळीवरून आजूबाजूची स्थूल सृष्टी बघतो त्या पातळीवरचे दर्शन आपल्याला होते. स्थूल डोळ्यांनी स्थूल शरीर दिसेल, पण अंतरात शिरून मन पाहण्यासाठी मनाच्या पातळीवर जायला हवे. इंद्रियांना न जाणवणारे मन, सूक्ष्म, तरल व श्रेष्ठ पातळीवर आहे. सूक्ष्म तत्त्वांचा अनुभव घेण्यासाठी आपली योग्यता उंचावली पाहिजे. अंतर्मनाची म्हणजे आत्म्याची पातळी गाठण्यासाठी योगाभ्यासाने ‘योगी’ झालेल्याची आवश्यकता भासते. म्हणूनच विश्वाचे उत्तरोत्तर श्रेष्ठ व सूक्ष्मदर्शन होण्यासाठी, आत्मज्ञान होण्यासाठी ‘योगी’ हवा.
ज्ञान-विज्ञान यांचा थोडक्यात अर्थ आपण समजून घेतला. आता गीता अधिक तपशिलात शिरून ज्ञान-विज्ञानाशी असलेला परमात्म्याचा संबंध आपल्याला स्पष्ट करून सांगेल. आपल्या सभोवतालची बाह्य़सृष्टी ही पृथ्वी-आप-तेज-वायू-आकाश या पंचमहाभूतांनी व जीवसृष्टीतील मन-बुद्धी-अहंकार या आठ घटकांची मिळून बनलेली आहे. याला अष्टधा प्रकृती म्हणतात. (याला गीतेनं दिलेलं खास नाव आहे ‘अपरा’ प्रकृती.) आपले सारे शिक्षणशास्त्र या अष्टधा प्रकृतीतच रमलेलं आहे. पृथ्वीतत्त्व म्हणजे पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र वगैरे. आपतत्त्व म्हणजे रसायनशास्त्र व इतर द्रवरूप गोष्टींचा अभ्यास. तेज तत्त्व म्हणजे विद्युतशास्त्र. वायुतत्त्वात सर्व प्रकारचे वारे-वहन, हालचाल व नृत्यकला या गोष्टी मोडतात. आकाशतत्त्व म्हणजे खगोलशास्त्र व संगीतकला. मन म्हणजे साहित्याचा आविष्कार. बुद्धीत गणित व संशोधन. अहंकार म्हणजे राजकारण, समाजकारण इत्यादी. अशा रीतीने विश्वविद्यालयाच्या सर्व शाखा या अष्टधा प्रकृती शिक्षणात वाटल्या गेल्या आहेत.
या विज्ञानात सत्त्व-रज-तम हे त्रिगुणही लपलेले आहेत. हे त्रिगुण परमात्मतत्त्वापासूनच निघालेले व त्यावरच आधारलेले आहेत. पण गंमत अशी की, परमात्मतत्त्व मात्र त्यांच्यात नाही. हा विचार नीट समजावून सांगण्याचं काम ज्ञानेश्वर महाराज खूप छान उदाहरणे देऊन करतात. ते म्हणतात, ज्याप्रमाणे बीजापासून वृक्ष, वृक्षापासून लाकूड होते, पण लाकडात बीज नसतं किंवा ढगांतील पाण्यामुळे वीज कडाडते. पण विजेत पाण्याचा अंश नसतो. तद्वतच त्रिगुण परमात्म्यापासून निर्माण होऊनही त्रिगुणांत परमात्मतत्त्व नाही. अशी ही अष्टधा प्रकृती व त्रिगुण मिळून परमात्मतत्त्वाची अचेतन प्रकृती होते, जिचं मूळ परमात्मतत्त्व होय. या सगळ्यांचं ज्ञान म्हणजे विज्ञान! या परमात्मतत्त्वाची दुसरी सचेतन प्रकृती, जिच्यायोगे सर्व जीवमात्र धारण केले जातात, तिचं शिक्षण म्हणजे ज्ञान! (या प्रकृतीला गीता ‘परा’ प्रकृती असं खास नाव देते.) या परा व अपरा प्रकृतींचं एकंदर ज्ञान म्हणजे समग्रज्ञान.
आता परमात्मतत्त्व कसं आहे ते पाहू. परमात्मतत्त्व सच्चिदानंद स्वरूप आहे. सत्-चित्-आनंद ही परमात्म्याची लक्षणं आहेत. सत् म्हणजे असणं-अस्तित्व. चित् म्हणजे चैतन्य तथा गतिमानता. आनंद म्हणजे नित्यनूतनता-बदल. यात सतत विकास दाखवला जातो. परमात्मतत्त्व निराकार, शाश्वत, शांत असं तत्त्व आहे. सर्व भूतमात्रे, चराचर सृष्टी या परा व अपरा प्रकृतींपासून उत्पन्न झाली. हे तत्त्वच मूळ बीज तथा सर्व जगाची उत्पत्ती व प्रलय आहे. मूळ कारण आहे.
भगवंत पुढे परमात्म्याच्या भूमिकेवरून स्वत:विषयी सांगत आहेत. भगवंत म्हणतात, ‘मी पाण्यातील रस आहे, मी वेदांतील ॐकार आहे, आकाशातील शब्द आहे, पृथ्वीतील गंध आहे, अग्नीतील तेज आहे, मी सर्व भूतांचे बीज आहे. मीच अखेरचे श्रेष्ठतम तत्त्व आहे. हे संपूर्ण जग म्हणजे दोऱ्यांत निरनिराळ्या रंगरूपांचे मणी ओवावेत तसं माझ्यात ओवलेलं आहे.’ या शब्दांतून परमात्मतत्त्व कसं अविभाज्य, अतूट गुंत्याने गुंतलेलं आहे हे कळून येतं.
असं हे परमात्मतत्त्व सहज आकलन होत नाही, याचं कारण ते योगमायेने वेढलेलं आहे. योगमाया त्रिगुणांनी झाकोळली आहे. सृष्टीतील स्थूलता म्हणजे जडता, हा तमोगुण. गतिमानता हा रजोगुण. सृष्टीत गतिमानता आहे म्हणून ‘जगत’ शब्द साकारलाय. सृष्टी जडतेकडून सूक्ष्माकडे विकसित होत आहे. या सर्व त्रिगुणी मायेच्या आवरणाखाली लपल्याने परमात्मा अनुभवास येत नाही. या त्रिगुणी मायेने सर्व जग- प्राणिसमुदाय मोहित झाले असल्याने त्याच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी परमात्म्याला ते ओळखत नाही. स्वत:च निर्माण केलेल्या योगमायेने लपलेलं परमात्मतत्त्व सर्वाना प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून सर्वसामान्य लोक त्या अविनाशी चिरंतन सच्चिदानंदघन परमात्मस्वरूपाला मनुष्याप्रमाणे जन्म-मरणयुक्त समजतात. अशा या अंतर्बाह्य़, अणूरेणूंत ठासून भरलेल्या सर्वाचं मूळ बीज असणाऱ्या परमात्मतत्त्वाचं समग्र ज्ञान कसं होणार? यावर भगवंत सांगत आहेत की, अगदी हजारात एखादाच परमेश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करतो. अशा प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच भगवत्परायण होऊन त्याला खऱ्या स्वरूपात जाणतो.
भगवंत म्हणतात- ‘अनन्य प्रेमाने, मन माझ्याच ठिकाणी आसक्त करून, अनन्य भावाने, माझा आश्रय घेऊन, योगयुक्त होऊन माझ्याकडे येशील तर माझ्या संपूर्ण शक्ती-ऐश्वर्य-विभूती या गुणांनी युक्त असणाऱ्या व सर्वाचा आत्मा असणाऱ्या मला तू जाणशील.’ भगवंताचं समग्र ज्ञान कोणाला मिळू शकतं याचं मार्गदर्शन यात सांगण्यात आलं आहे. याचा अर्थ असा की, परमात्मतत्त्व समजून घेण्याची दृढ तळमळ असणारे जे भक्त असतात तेच समग्र ज्ञानापर्यंत पोचू शकतात. या ठिकाणी भक्तांचे चार प्रकार किंवा चार श्रेणी गीतेत दिल्या आहेत. १) आर्त-मनात आर्ततेने सकाम भक्ती करणारे
२) जिज्ञासू- ज्यांना परमात्मवस्तूचे संशोधन करावेसे वाटते.
३) अर्थार्थी- जन्म-मृत्यूच्या चक्रांतून सुटून मोक्षाची इच्छा धरणारे.
४) ज्ञानी भक्त- अनन्य भक्तीने सर्व जगच ‘वासुदेव’ आहे या भूमिकेतून भक्ती करणारे.
परमात्म्याची ही ज्ञान-विज्ञानयुक्त सृष्टी त्याच्याच आधाराने आहे हे मनाला अत्यंत श्रद्धेने पटवणं व त्याला पूर्ण शरण जाणं म्हणजेच परमात्म्याचं समग्र ज्ञान मिळवणं होय!

First Published on November 22, 2014 12:44 pm

Web Title: greatness of philanthropy charity ethics
Just Now!
X