08 August 2020

News Flash

राम राम!

मला तुमच्यापैकी जवळजवळ कुणाच वाचकांचे चेहरे माहीत नाहीत. तुम्ही माझ्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहिलात तुमच्या ईमेल्सनी, तुमच्या शब्दांनी.

| December 13, 2014 01:01 am

मला तुमच्यापैकी जवळजवळ कुणाच वाचकांचे चेहरे माहीत नाहीत. तुम्ही माझ्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहिलात तुमच्या ईमेल्सनी, तुमच्या शब्दांनी. त्या शब्दांतून जाणवलं, मी लेखातून मांडू पाहणारे किती तरी प्रश्न तो लेख वाचताना तुम्ही ‘तुमचे’ करून टाकलेत, आपले मानलेत म्हणूनच या निरोपक्षणी तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे, खूप अवलंबून होते मी तुमच्या या कौतुक शब्दांवर. सवय झाली होती तुमची. तुमच्या शब्दांनी स्फुरण चढत होतं नवं लिहायला.. आता या लेखानंतर उरला फक्त एक लेख, त्यानंतर राम राम!

आजोळी आजीबरोबर पहाटे फिरायला बाहेर पडलं की वाटेत जी जी माणसं भेटायची ती बाकी काही नाही बोलली तरी ‘राम राम’ म्हटल्याशिवाय पुढे जात नसत. आजी त्यांना उलट काही म्हणत नसे, पण डोळय़ानं त्या ‘राम राम’ची दखल घेत असे. मी तिच्याबरोबर असेन तर मी त्या ‘राम राम’ला उलट ओरडून ‘राम राम’ म्हणत असे. आजीला त्याचं थोडं हसूही येत असे. आजोबा जर बरोबर असतील तर तेही समोरच्या ‘राम राम’ला दणदणीत ‘राम राम’चं प्रत्युत्तर द्यायचे. या ‘राम राम’चा नक्की एक अर्थ नसायचा असं आता जाणवतं. त्यात ‘नमस्कार. बरं आहे ना?, पुन्हा भेटूच, आहे ना ओळख’ अशा अनेक अर्थानी बोलणं असायचं. एक उपचारही असायचा. त्यानिमित्तानं क्षणभर एकमेकांच्या डोळय़ांत पाहून एकमेकांच्या असण्याची दखल घेतली जायची. कित्येकदा गावकरी एकमेकांशी रस्त्यात थांबून काहीबाही बोलत राहात. त्या ‘शेतबैलांच्या’ गप्पांचा शेवटही आपापल्या वाटेने निघण्याआधी ‘राम राम’नंच व्हायचा. हे ‘राम राम’ ‘पुन्हा भेटू’ या अर्थानं आज हे ‘राम राम’ विशेष आठवतं आहे. त्याला कारणही तसंच आहे. डिसेंबर महिन्यात हे वर्ष संपणार. वर्षांबरोबर या पुरवणीतील जुने स्तंभही संपणार. ‘एक उलट..एक सुलट’ थांबणार. मी ‘राम राम’ म्हणायची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. हा ‘राम राम’ नक्की कुठच्या अर्थाचा असेल हे आता मला माहीत नाही. आयुष्याची ही गंमत आहे. पुढचं काही आधी कळत नाही. एकदम आठवलं, संत तुकारामांनी सर्वाचा अखेरचा निरोप घेतला तेव्हा हेच शब्द वापरले होते, ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा’ तुकारामांचा हा ‘राम राम’ दैवी, तितकाच मागे उरलेल्यांना व्याकूळ करणारा. शब्द तेच पण पैस बदलला, भवताल बदलला की सगळंच किती बदलतं. त्या ‘राम राम’ची तुलना माझ्याच काय इतर कुठल्याच ‘राम राम’ शी नाही. ते म्हणणारा तुक्या, सस्मित शांत वदनाचा. सगळय़ाच्या पार पोचलेला. दुसऱ्या गावी निघालेला. जाण्याआधी त्या गावी नेणाऱ्या गरुडयानाचं वर्णन करणारा, ‘पैल आले हरि शंख चक्रशोभे करी’ तुक्याला न्यायला साक्षात हरी प्रकटले. ‘तुका झालासे संतुष्ट घरा आले वैकुंठपीठ’ असं आनंदभरानं सांगून सर्वाचा निरोप घेणारा तुका! ‘संत तुकाराम’ चित्रपटातला हा प्रसंग कितीदा जरी पाहिला तरी डोळय़ातलं पाणी खळत नाही. तुका अवकाशात दिसणाऱ्या गरुडयानाचं वर्णन करताना समस्त गावकरी तुक्याकडे पाहात आहेत. यानाकडे नाही. कारण ते केवळ तुक्यालाच दिसते आहे. त्याच्या दैवी डोळय़ांना. त्यांना ते दिसत नाही तसेच मलाही ते दिसत नाही. तुका निघालेल्या गावाचा पैलही पाहण्याची शक्ती अजून माझ्यात नाही. मी अजून याच गावात कशाकशात गुंतलेली.. माझी अवस्था तुमच्याच शब्दांत ‘कन्या सासुराशी जाए मागे परतुनी पाहे’ अशी आहे. म्हणूनच माझ्या या छोटय़ा जगात मी तुमचा घेत असलेला हा निरोप माझ्यासाठी डोंगराएवढा मोठा होऊन बसला आहे. गलबलून येतं आहे. मीच मागे म्हटल्याप्रमाणे मला हा निरोप मनापासून अनुभवायचा आहे. त्यापाशी थांबून. तरीही व्हायचं ते होतंच आहे. दोन-अडीच वर्षांचा हा स्तंभ खूप जवळचं माणूस होऊन बसला आहे आयुष्यातला. त्याचा निरोप घेताना सैरभैर वाटतं आहे. जाणाऱ्या माणसाकडे दुर्लक्ष करून दुसरीकडे मन गुंतवावंसं वाटायला लागतं. तसं केल्याने त्याच्यावरचं आपलं अवलंबून असणं काढून घेता येईल असं वाटतं. लहान मुलं आवडतं माणूस निघालं की दुसऱ्या खेळण्यात मन गुंतवतात तसं.. त्यामुळे एरवी वेळेत लेख देणारी मी, आता अगदी ऐनवेळी लेख देऊन ‘चतुरंग’ ला त्रास देते आहे. कारण मध्येच काहीच लिहू नये असं वाटतं आहे. स्तंभ निघालाय म्हणून त्याच्याशी अबोला धरावासा वाटतो आहे. दुसऱ्याच क्षणी हा अबोला सोडून भरभरून बोलावंसं वाटतं आहे. कितीतरी विषय राहूनच गेले लिहायचे! विजय तेंडुलकरांच्या ‘कोवळी उन्हे’ या स्तंभाचं नाटय़रूपांतर माझा नवरा संदेश कुलकर्णीनं केलं तेव्हा त्यानं स्तंभाचं पात्र निर्माण केलं होतं. स्तंभ आणि लेखक अशी एकमेकांशी बोलणारी पात्रं. त्यांचं बदलत जाणारं नातं. सुरुवातीला लेखकाच्या मर्जीप्रमाणे वागणारा स्तंभ नंतर हळूहळू स्वत:ची वेगळी मतं मांडायला लागतो. लेखकाला काही सडेतोड सवालही करतो. मला वाटतं आहे, माझ्याही स्तंभानं असे अनेक सवाल गेली अडीच वर्षे मला विचारले आहेत. माझ्या एकटेपणात मला सोबत केली आहे. कित्येकदा समजूत घातली आहे. त्यामुळे तो निघताना वाटतं आहे, चाललास? खूप राहिलं आहे सांगायचं. तो तमूक विषय राहिलाच असं म्हणून निघण्याच्या ऐन मोक्याच्या क्षणी कुठलासा महत्त्वाचा विषय काढून त्याचं मन गुंतवावंसं वाटतं आहे. त्याचं जाणं लांबवावंसं वाटतं आहे. खरं तर तक्रारीला मुळीच तसूभरही जागा नाहीये मला. एखादं नातं किती परिपूर्ण असू शकतं, किती समाधानी, शांत, लाड करणारं तसं नातं या स्तंभानं, ‘चतुरंग’च्या संपूर्ण टीमनं पुरवलं आहे. शेवटही अगदी व्हायला हवा तसाच. स्तंभ संपता संपता त्यावरचं पुस्तक ‘राजहंस’सारख्या अवीट पुस्तकं देणाऱ्या संस्थेकडून निघालं. ‘लोकसत्ता’ आणि ‘राजहंस’ या दोघांमुळं या सुंदर प्रवासाचा शेवट खणा-नारळाच्या ओटीचं लेणं लेवून झाल्यासारखा वाटतो आहे. माहेरवाशीण सासरी निघते तेव्हा तिला मिळणारं हे लेणं तिच्या निघण्याच्या दु:खाला शांतवत असेल. पुढे सासरच्या एकटय़ा क्षणांना हे लेणं तिला लोण्यासारख्या मायेची साथ करेल याचं समाधान आहे. शिवाय जे घडतंय ते योग्यच आहे असंही कुठेतरी मनापासून वाटतं आहे. स्थित्यंतर नेहमीच मोठं करतं मनाला, कितीही नकोसं वाटलं तरी. चांगली गोष्ट योग्य वेळी संपवावी म्हणतात. म्हणूनच आतले सगळे कल्लोळ घेऊन मी या निरोपरेषेपाशी शांतपणे उभं रहायला शिकते आहे. तिथून जेव्हा तुम्हा सर्वाकडे पाहण्याचा प्रयत्न करते तेव्हा मला जाणवतं, मला तुमच्यापैकी जवळजवळ कुणाच वाचकांचे चेहरे माहीत नाहीत. तुम्ही माझ्यापर्यंत वेळोवेळी पोचत राहिलात तुमच्या ईमेल्सनी, तुमच्या शब्दांनी. त्या शब्दांतून जाणवलं, मी लेखातून मांडू पाहणारे कितीतरी प्रश्न तो लेख वाचताना तुम्ही ‘तुमचे’ करून टाकलेत, आपले मानलेत, म्हणूनच या निरोपक्षणी तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे, खूप अवलंबून होते मी तुमच्या या कौतुक शब्दांवर. गेली अडीच वर्षे खूप सांभाळलंत तुम्ही मला, सवय झाली होती तुमची, तुमच्या शब्दांनी स्फुरण चढत होतं नवं लिहायला. माझ्याच लेखातले मलाही न आकळणारे प्रश्न तुम्ही माझ्यासमोर मांडलेत. कुणीसं एका मेलमध्ये म्हणालं, ‘बाबांच्या जाण्याचं दु:ख किती जिव्हारी लावून घेतेस. नको करूस असं. तुझ्या असं दु:ख करत राहण्याने ते जिथे आहेत तिथे त्रास होत असेल त्यांना. मोकळं कर त्यांना. तूही हो मोकळी. तुझ्यातल्या कला जोपास. साधना कर. त्यात गुंतव मनाला.’ हे ज्या मनानं लिहिलं माझ्यासाठी तिचं एक नाव, एक गाव, एवढंच माहिती मला. ती कोण आहे, काय करते, कशी दिसते, वय काय, काही माहीत नाही. त्या बिनचेहऱ्याच्या मनाचे हात धरून तिच्या न दिसणाऱ्या डोळय़ांत बघून सांगायचं आहे, ‘ऋणी आहे, तुझी, तुम्हा सगळय़ांची,’ ‘कुणी ब्राझीलवरून मेल पाठवतं, कुणी अमेरिकेहून, कुणी कुणालाच न सांगितलेलं खोल दु:ख कुठल्याशा हक्कानं माझ्यासमोर उघडतं. कुणालाच चेहरा नाही. आहेत फक्त माझ्याशी बोलू पाहणारे संगणकावर टपटपणारे असंख्य हात. त्या सर्व हातांना कृतज्ञतेनं हातात घ्यायचं आहे. त्या संगणकावरच्या असंख्य टपटपत्या बोटांना सांगायचं आहे, तुम्ही मला तोललं आहे. कुठल्याशा गावी कुठल्याशा देवळात गेल्याचं आठवतं आहे. तिथं अनेकजण एकेक बोट लावून कसलासा गजर एकसाथ करून एक जड शिळा हवेत उचलतात. तुम्ही सर्वानी मला असंच तुमच्या बोटांवर हवेत उंचावलं आहे असं वाटतं आहे. उंचावरून वेगळय़ा गोष्टी दिसतायेत. उंचावर एक वेगळी जमीन आहे. माझे पाय उंचावरही जमिनीवर ठेवणारी. उंच म्हणजे वाढलेलं, मनानं, समजुतीनं. तुमच्या बोटांनी तोललेल्या माझ्या या समजुतीच्या उंचीसाठी तुम्हा सर्वाचे ऋण. जाताना एक वचन देते, तुमच्या कौतुकानं आलेल्या हुरूपानं एक शक्ती मिळवायची आहे. स्तंभ नसला तरी ‘लिहीत’ राहण्याची ती शक्ती मला मिळो ही प्रार्थना. स्तंभातनं भेट झाली नाही तरी भेट होतंच राहील. तुमचे चेहरे माहीत नसले तरी तुमच्या शब्दांनी, पत्रांनी मी तुम्हाला ओळखेन. वाचल्या शब्दाला जागेन. नात्याला चेहऱ्याची, नावाची ,भेटीचीसुद्धा गरज नसते हे तुम्ही शिकवलंत. हे बिनचेहऱ्याचं नातं जपेन. परवा पुस्तक प्रकाशनाला एवढा प्रचंड प्रतिसाद दिलात. मला प्रत्यक्ष भेटून ‘तो तमूक लेख माझा आवडता आहे, तोही घ्याना पुस्तकात!’ असं हक्कानं सांगितलंत. अलोट गर्दीमुळे कितीतरी जण परत गेलात. जाताना रागावला नाहीत. उलट, त्या गर्दीचे फोटो काढून मला पाठवलेत आणि म्हणालात, ‘कार्यक्रमासाठी आत येता आलं नाही. पण त्याचा आनंदच झाला.’ भरून पावले. आता फक्त एकच लेख (२७ डिसेंबर) येईल. त्यानंतर.. कळावे, असाच लोभ असावा, ही विनंती! राम राम!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2014 1:01 am

Web Title: greeting with ram ram
Next Stories
1 माई सरस्वती!
2 गोबरे गुरू!
3 ययाति
Just Now!
X