स्तनपानाचं महत्त्व अनेकांना माहिती असतं, मात्र तरीही स्तनदा मातेला अनेक अडचणी येऊ शकतात. म्हणूनच या वर्षीचे जागतिक स्तनपान सप्ताहाचे घोषवाक्य आहे, ‘स्तनपानासाठी मदत, मातेच्या जवळ.’ अर्थात स्तनदा मातेला इतर स्तनदा मातेकडून मदत आणि आधार! एखाद्या स्तनदा मातेला आलेले अनुभव, त्यातून आलेले शहाणपण, त्यातून घडलेलं यशस्वी स्तनपान हे सर्व ती इतर स्तनदा मातांना प्रभावीपणे समजावून सांगू शकते! कसा असतो हा ‘स्तनदा आधार गट’ ते सांगणारा लेख, १ ऑगस्टपासून साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ निमित्ताने..
ख रं तर आता जगात मातेच्या दुधाची महती न जाणणारी एकही व्यक्ती नसेल, त्यांना साधारणपणे मातेचे दूध हे बाहेरच्या दुधापेक्षा चांगले असते, तो बाळाचा नसíगक आहार आहे, बाळ जन्मल्यावर एका तासाच्या आत स्तनपानाला सुरुवात झाली पाहिजे. प्रथम स्रवणाऱ्या दुधाला चीक दूध म्हणतात आणि त्याच्याने बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बाळाला पहिले सहा महिने केवळ मातेचे दुधाचे द्यावे. त्याने बाळाची शारीरिक आणि मानसिक योग्य वाढ होते, हे माहीत असणारच आणि तरीही, बाळाला सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपान करण्याचे प्रमाण आपल्यासारख्या प्रगतिशील देशातही केवळ ४० टक्के इतके कमी आहे.
याचा अर्थ माहिती आणि ज्ञानाचा अभाव हे त्याचे कारण नसून, मातेला आवश्यक पाठिंब्याचा, मदतीचा, प्रात्यक्षिक मार्गदर्शनाचा अभाव हे असावे. नवजात शिशू आणि माता हे दोघेही एकमेकांना अनोळखी असतात, बाळ अतिशय नाजूक असते, त्याला कसे धरल्याने बरे वाटेल, काय केल्याने प्यायला सोपे जाईल हे तिला कळत नसते. बाळाच्या गरजा, त्याच्या सवयी या मातेला नव्या असतात. प्रत्येक माता आणि बाळाच्या अडचणी वेगळ्या असणार आहेत. बाळ रडते तर का रडते? त्याला किती दुधाची आवश्यकता असते? स्तन भरून आले तर काय करायचे याची तिला जाण नसते. एकत्र कुटुंबामध्ये स्तनदा मातेजवळ जाऊ, सासू, नणंद, वहिनी, आजी असे कुणीतरी असायचे, तिला थोडीबहुत माहिती आणि आधार मिळायचाच. बाळंतपणाच्या श्रमाने आई दमून गेलेली असते, काही वेळा बाळाच्या रडण्याने तिला जागरण झालेले असते, बाळाच्या भुकेने ती व्याकूळ झालेली असते. बाळाला केवळ चीक दूध पुरेसे असते, हे माहीत असूनही मातेला काळजी वाटते, कारण ते चीक दूध अगदी थोडेसे दिसते त्याने पोट भरेल याची तिला खात्री वाटत नाही आणि शिवाय चोवीस तासांत दहा ते पंधरा वेळा पुन:पुन्हा बाळाला स्तनाला लावावे लागते, बाळ स्तनाला कधी तोंड लावत नाही तर कधी नवजात बाळाला तोंड उघडून ओढता येत नाही, काही वेळा बाळाला हे शिकायला वेळ लागतो आणि गडबड करून वरचे दूध दिले तर बाळाला स्तनावर ओढायला शिकायला आणखीनच उशीर होतो. इथे कंटाळा करून किंवा दमून चालत नाही. बाळाला वरचेवर स्तनाला लावणे आवश्यक असते, अशा नवस्तनदा मातेला आधाराची मदतीची अतिशय गरज असते.
    या वर्षीचे जागतिक स्तनपान सप्ताहाचे घोषवाक्य आहे, ‘स्तनपानासाठी मदत, मातेच्या जवळ.’ अर्थात स्तनदा मातेला इतर स्तनदा मातेकडून मदत आणि आधार! एखाद्या स्तनदा मातेला आलेले अनुभव, त्यातून आलेले शहाणपण, त्यातून घडलेलं यशस्वी स्तनपान हे सर्व ती इतर स्तनदा मातांना प्रभावीपणे समजून सांगू शकते! नवस्तनदा मातांच्या अडचणी तिला सहज लक्षात येऊ शकतात व ती त्यांना प्रत्यक्ष मदतही करू शकते, परंतु ही मदत नवस्तनदा मातेपर्यंत कशी पोचणार? अनोळखी महिलेकडून ही मदत मातेला कशी मिळणार?
नवस्तनदा मातेला, अशी मदत मिळवून देण्याचे काम जगभरामध्ये १९६० सालीच सुरू झाले. कारण १९५७ साली केलेल्या एका सर्वेक्षणात अमेरिकेत स्तनपानाचे प्रमाण केवळ २० टक्के इतके खाली आले होते,  तेव्हा एका बालरोगतज्ज्ञाने शाळेतल्या मुलींना आवाहन केले. देशासमोरील अत्यंत संवेदनाक्षम प्रश्न कळकळीने मांडला, त्या मुलींनी त्यांच्या माहितीतील स्तनदा महिलांना बरोबर घेऊन प्रथम प्रशिक्षण पार पडले आणि ‘ला लेचे लीग’ ( Leaders in promoting Breastfeeding ) ची १९६० मध्ये अमेरिकेत स्थापना  झाली.  अशा मदत करणाऱ्या मातांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना सक्षम करून बनवलेल्या गटाला ‘मदर सपोर्ट ग्रुप’ असे म्हणतात.
अमेरिकेत एक वेळ ठीक आहे, आपल्याकडे कुठे अशी सोय असणार, अशा तऱ्हेने प्रशिक्षित होऊन नवस्तनदा मातांना मदत करायला कोण महिला जाईल? लांबचं कशाला इथे मुंबईतच हा आगळा प्रयोग, ‘ब्रेस्ट फीिडग प्रोमोशन नेटवर्क ऑफ इंडिया, महाराष्ट्र ( BPNI,  Maharashtra ) च्या दोन तरुण डॉक्टरांनी केला. डॉ. प्रशांत गांगल आणि संजय प्रभू! दोघांनीही केईएम रुग्णालयातून शिक्षण संपवून बालरोगतज्ज्ञ म्हणून खासगी प्रॅक्टिस सुरू केली. मातेच्या दुधाचे अनन्यसाधारण महत्त्व प्रत्येक रुग्णाच्या मातेच्या मनात ठसवायचे. आजारी बाळ बरे होण्यात औषधापेक्षा मातेच्या दुधाचे महत्त्व समजून सांगायचे, आणि त्या मातांना तसाच सल्ला संपर्कात आलेल्या इतर मातांनाही द्यायला सांगायचेही विसरत नसत. काही माता स्वत:चे बाळ मोठे झाले तरीसुद्धा इतर मातांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पुन:पुन्हा, बीपी एनआय (महाराष्ट्र )च्या या दोन डॉक्टर कार्यकर्त्यांना भेटायच्या, या महिलांचे प्रदीर्घ शास्त्रीय प्रशिक्षण झाल्याने फक्त माहिती नव्हे स्तनदा मातेला प्रत्यक्ष मदत मिळू लागली, पुढे अशा ट्रेनिंग मिळालेल्या मातांचा गट तयार झाला, ‘मदर सपोर्ट ग्रुप’ अर्थात ‘स्तनदा आधार गट’!
बी.पी.एन.आय.(महाराष्ट्र) व युनिसेफच्या प्रयत्नातून संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय आरोग्यसेवकांचे आणि डॉक्टर मंडळींचे जिल्हय़ाजिल्हय़ांत ‘स्तनपान व बाळाचा आहार याविषयीचे जे चार-पाच वष्रे प्रशिक्षण कार्यक्रम झाले, त्या वेळी या ‘मदर सपोर्ट ग्रुप’च्या महिला प्रशिक्षक म्हणून आल्या, तेव्हा असे लक्षात आले की या महिलांचे स्तनपानाबद्दलचे ज्ञान व प्रत्यक्ष मदत देण्याची क्षमता प्रशिक्षणाने डॉक्टरांपेक्षाही अधिक झालेली असते. या त्याच्या क्षमतेचा उपयोग नवस्तनदा मातेला व्हावा म्हणून मुंबईतील पंचतारांकित रुग्णालयांना पत्रे लिहिण्यात आली, याला अमेरिकेतील चळवळीचा संदर्भ देण्यात आला आणि ‘मदर सपोर्ट ग्रुप’ची महिला त्यांनी त्यांच्या रुग्णालयाच्या पे रोलवर घेतलीसुद्धा!

हा प्रयत्न वैद्यकीय महाविद्यालये, नगरपालिका रुग्णालयांच्या बाबतीत वेगळ्या प्रकारे हाताळला. महाविद्यालयामधील, रोगप्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यक विभाग, स्त्रीरोग विभाग, नवजात व बालरोग विभाग आणि ‘मुंबई ब्रेस्ट फीिडग नेटवर्क ऑफ इंडिया( टइढउ)’ यांच्या संयुक्त प्रयत्नाने पालिका रुग्णालयात ‘मदर सपोर्ट ग्रुप’ कार्यरत झाला. या कार्यकर्त्यांसाठी युनिसेफने गेली चार वष्रे आíथक मदत केली आहे. त्यामुळे प्रत्येक पालिका रुग्णालयात ‘मदर सपोर्ट ग्रुप’च्या आठ महिला जाऊन नवस्तनदा मातांना मदत करू शकतात. इथे प्रसूत होणाऱ्या गरीब महिलांना या मदतीचा दिलासाच वाटतो.
म्हणूनच, या वेळच्या जागतिक स्तनपान सप्ताहाच्या अनुषंगाने लोकांना, मातांना, रुग्णालय प्रशासनाला व शासनाला या ‘मदर सपोर्ट ग्रुप’चे महत्त्व समजावे. सर्वच पालिका रुग्णालयात प्रसव होणाऱ्या महिलांना, मदर सपोर्ट मत्रिणीचा आधार आणि मदत मिळाली तर आपल्या देशाचा नवजात बालमृत्यू दरही कमी होण्यास फायदा मिळेल, असे वाटते. महिलेला स्तनात गाठी-गळू होणार नाहीत आणि मातेच्या दुधाच्या बँकेसाठी  (इ१ीं२३ ट्र’‘ इंल्ल‘) दूध गोळा होण्यास मदत होईल, कारण तिसऱ्या दिवशी बाळाला पुरून उरेल एवढे दूध मातेला येते. ते काढले नाही तर मातेला स्तनात गळू होईल आणि स्तनातले दूधही कमी होईल, तिला स्तनातले दूध काढायला शिकावे लागते, काढलेले दूध मिल्क बँकेमध्ये देता येते. खरं तर यात प्रशासनाचाच फायदा आहे, कारण बाळाला दूध मिळाल्याने बाळाची चांगली वाढ होईल, स्तनात दूध साठून राहणार नाही, गाठ-गळू होणार नाही, माता आजारी पडणार नाही, तिला प्रतिजैविकाची गरज लागणार नाही. तिचे रुग्णालयातले वास्तव्यही कमी होईल आणि रुग्णालयाचा खर्चाचा बोजाही कमी होईल. स्तनपानाचे महत्त्व समजून समाजातील इतर महिलांना स्तनपान करण्यास मदत करण्याची इच्छा असेल तर प्रत्येक माताही प्रशिक्षणाने ‘मदर सपोर्ट ग्रुप’ लीडर बनू शकते.
या वर्षीच्या जागतिक स्तनपान सप्ताहाच्या घोषवाक्याप्रमाणे, खऱ्या अर्थाने स्तनपानासाठी मदत मातेच्या जवळ पोहोचवायची असेल तर विविध स्तरांवर काम करावे लागेल. सर्वात आधी ‘मदर सपोर्ट ग्रुप’च्या महिलांना त्यांचे स्वत:चे महत्त्व ठासून सांगणे आवश्यक आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता महत्त्वाची नसून त्यांचा स्तनपानाबद्दलचा अनुभव आणि स्तनदा महिलांना मदत करण्याची इच्छा त्या अनुषंगाने मिळालेले प्रशिक्षण हे जास्त महत्त्वाचे असते. तीच गोष्ट समाजामध्ये िबबवणे गरजेचे आहे की स्तनपानाविषयक नवस्तनदा मातांना काही तक्रारी, प्रश्न असतील तर अशा सपोर्टची मातेला डॉक्टरांपेक्षा जास्त गरज असते.
अर्थात हीच गोष्ट, रुग्णालये, वैद्यकीय प्रशासन ,डॉक्टर्स वगरेच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे. सरकारी यंत्रणेला ‘यशस्वी स्तनपानासाठीची रुग्णालयीन दशपदी’ अमलात आणण्यास मदत करून, तसे करण्यास भाग पाडणे, म्हणजेच स्तनदा मातेसाठी सपोर्ट ग्रुप रुग्णालयातून निर्माण करणे होय. या सपोर्ट ग्रुपच्या महिलांना शास्त्रीय प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक असते, त्यांच्या स्वत:च्या मनात काही एक प्रश्न, किंतु असता कामा नयेत. प्रत्येक मातेचे आणि लेकराचे प्रश्न वेगळे असतात, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची क्षमता या महिलेत यावी लागते, हे केवळ प्रशिक्षणानेच होऊ शकते. अशा प्रकारचे गट प्रत्येक रुग्णालयात सुरू झाले तर नवस्तनदा मातेला खूपच मोलाची मदत मिळेल.
मातेला तिच्या बाळाला पाजायला मदत करणे हे देशभक्तीचे आगळे उदाहरण ठरेल.

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?