News Flash

इवलीशी रोपे लावियली दारी..

उद्या (२४ ऑगस्ट) ‘वर्ल्ड किचन डे’ अर्थात ‘जागतिक परसबाग दिन’. यंदाचे वर्ष कौटुंबिक परसबागकाम वर्ष (Family Kitchen Gardening Year) म्हणून संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी

| August 23, 2014 02:01 am

उद्या (२४ ऑगस्ट) ‘वर्ल्ड किचन डे’ अर्थात ‘जागतिक परसबाग दिन’. यंदाचे वर्ष कौटुंबिक परसबागकाम वर्ष (Family Kitchen Gardening Year) म्हणून संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने जाहीर केले आहे. जगात ८४ कोटी लोक कुपोषित आहेत. त्यापैकी ६५ टक्के जनता ही एकटय़ा आशिया-पॅसिफिक प्रदेशात आहे. या लोकांचे पोषण होण्यासाठी कौटुंबिक शेतीवर भर द्यावा, असे युनोचे म्हणणे आहे. आपणही आपल्या कुटुंबासाठी शहरी सेंद्रिय शेती करू शकतो का? या विचाराचा ध्यास घेतला. घरच्या घरी सेंद्रिय भाजीपाला पिकविण्यासाठी शहरी शेती फुलविण्यासाठी गच्ची, गॅलरी किंवा अगदी खिडक्यांवरील ग्रिलचाही वापर करू शकतो. ही शहरी शेती तुमच्याच स्वयंपाकघरातल्या कचऱ्यावर वाढवता येईल, म्हणजे कुटुंबाला सेंद्रिय अन्न, भाज्या मिळेल आणि कचरा डेपोवरचा भारही हलका होईल. कुटुंबाचे पोषण आणि पर्यावरणाचे रक्षण दोन्ही साधणारी ही शेती आनंदही देईल तो विरळाच! स्वयंपाकघरातल्या देठ, साली यापासून घरात खत तयार करून त्यावर भाजीपाला घेण्याच्या प्रयोगांचा हा वेध..

आषाढाची चाहूल लागली आणि मी माझ्या गॅलरीतल्या कुंडय़ांमध्ये बिया रुजत घातल्या. आभाळीच्या पाण्याने त्या कुंडीतील माझी धरणी चिंब झाली आणि एक दिवस एक कोंब दिसू लागला. त्याची पहिली जाड पाने वर आली, त्यामागोमाग एकमेकांत हात गुंफून बाहेर पडली दोन रुंद पाने. धरणीच्या उदरातून बाहेर पडणारा तो कोंब जणू वाकून धरणीला स्पर्श करतो आणि मग ताठ उभा राहात दोन्ही हात जोडून वंदन करत होता. म्हणत होता, ‘धरणीमाते, माझा सांभाळ कर, संगोपन कर, मला बहरून जगण्याचं वरदान दे, म्हणजे मला फळाफुलांचे भरभरून दान करता येईल.’
छोटय़ाशा कुंडीतील तो कोंबही मला धरित्रीचे आपल्यावर ऋण असते, हेच तर शिकवत होता. मग सहजच माझी नजर कुंडय़ांमध्ये वाढणाऱ्या माझ्या सगळ्याच झाडांवर फिरली. पानओवा, आंबाडी, विलायती पालक, साधा पालक, अळू, व्हिटॅमिन नावाने ओळखले जाणारे झुडूप, कढीपत्ता हीच ती सारी मंडळी माझ्या कुटुंबाचे हिमोग्लोबीन सुरळीत ठेवण्यासाठी मला मदत करतात. खरं तर आपल्या प्रत्येकाचीच नाळ मातीशी जोडलेली असते. पंचमहाभूतांपासून आपला देह तयार होतो म्हणतात. कदाचित म्हणूनच आपल्या प्रत्येकाला निसर्गाची ओढ असते. हा निसर्गच माझ्या गॅलरीतील कुंडय़ांमधून अवतरला आहे.
 आपली तीव्र इच्छा आणि थोडे श्रम घेतले तर आपल्या मुलाबाळांना घरच्या कुंडीत वाढणाऱ्या झाडांपासून अल्प प्रमाणात तरी पूर्णपणे सेंद्रिय अन्न मिळू शकते. याची तर आता मला खात्री पटू लागली. पूूर्वी कुंडीत पण रासायनिक खतांवर फुलझाडे वाढवणारी मी आता घरीच सेंद्रिय खत तयार करून कुंडीतच भाज्या वाढवण्याचे प्रयोग करू लागले. गॅलरी, गच्ची नाहीतर खिडकीचे ग्रिलही या रोपांसाठी पुरेसे असते. या नव्या प्रयोगांसाठी एक निमित्त घडले. माझ्या २० वर्षांच्या भाच्याला कर्करोगाने ग्रासले. मन दु:खाने गोठून गेले. त्याच्याबरोबर रुग्णालयात गेले तेव्हा १० ते ३० या वयातली खूप मुले मला कर्करोगाशी झुंज देताना दिसली. एकीकडे समाजात ८० वर्षांचे आजीआजोबा काठी धरून आजही ‘वॉक’ला जाताना दिसतात आणि दुसरीकडे ही कोवळी मुले! या संदर्भात खूप लोकांशी बोलले, बहुतांश जणांचा सूर एकच. आजकालच्या अन्नातली कमी झालेली पौष्टिकता. पूर्वीची हाडे कशी सकस अन्नावर पोसली जायची! दरम्यानच्या काळात शेतीचा-पॉलीहाऊसचा अभ्यास करताना मला समजले की अलीकडे कोणतंही उत्पादन घेण्यापूर्वी मातीसुद्धा रासायनिक द्रव्याने चक्क भिजवून घेतात. बियाण्यांवर तर रसायनाचे थरच दिले जातात. थेट फळं येईपर्यंत रसायनांचा मारा झाडावर सुरूच असतो. हे अन्नातलं रसायन माणसाच्या आरोग्यासाठी किती घातक ठरत असेल, या जाणिवेने मनात थैमान घातले. मग विचार केला, आपणच रसायनं न वापरता कुंडीत शेती करून का पाहू नये? एक दिवस घरातली रासायनिक खते कचराकुंडीत टाकली आणि कचराकुंडीत टाकण्याचा कचरा-भाज्यांचे देठ, मुळे, फळांच्या साली वगैरे एका फुटक्या माठात साठवून सेंद्रिय खत बनवण्यास सुरुवात केली. आमच्या ३ / ६ च्या छोटय़ाशा गॅलरीत सुरू झाले खतप्रकल्पाचे प्रयोग. एक दिवस मृद्गंधाचा दरवळ असणारं सुंदर काळंभोर खत म्हणजे ब्लॅक गोल्ड तयार झाले. स्वयंपाकघरातल्या सर्वात पौष्टिक साली, देठ यांची उत्तम पोषणमूल्ये या खतात आल्याने झाडांची वाढही उत्तम होऊ लागली. झाडे सशक्त झाल्याने केमिकलची कीटकनाशके वापरण्याची गरज संपली. झाडावर मित्रकीटकांचीही वस्ती वाढली.
 मिरची, टोमॅटो, वांगी तर आलीच, पण करांदे, कणगर, सफेद रताळी, बिरमुळे यासारखे पौष्टिक कंदही कुंडीमध्ये धरले. तोंडली- कारल्याचे वेल वाढले. एकदा तर मातीत हाताला ५ बेबी बटाटे लागले तेव्हा कोण आनंद झाला!    
घरच्या पानांची अळुवडी होऊ लागली. विलायती पालक, लसूणपात, व्हिटामिनचे झाड, लिंबे या खास झाडांनी पराठय़ाची चव वाढवली. बेल, तुळस, पातीचहाच्या पानांचा सर्दीसाठी काढा आणि ग्रीन टी होऊ लागला. १ लिटरच्या बाटलीत पुदीना वाढला. त्याचा सुंदर स्वाद चहाला मिळू लागला. बाटलीत मुळादेखील घेऊन पाहिला. या आमच्या भाज्या. त्यावर आमच्या कुटुंबाची गरज भागत नाही हे खरे, पण त्या इतर ‘बाजारी भाज्या’ नाहीत. त्या रसायनमुक्त, विषमुक्त भाज्या आमच्या कुटुंबात काही अंश रसायनं कमी करू शकल्या आणि ते दिवसेंदिवस अधिकाधिक कमी होईल यात शंका नाही.
  मुंबईसारख्या काँक्रीटच्या जंगलात शहरी ‘शेती’ नक्की पिकेल, पण त्यासाठी हवी इच्छाशक्ती. समजा कुणाच्या घराला गॅलरी नसेल किंवा खिडकीला ग्रिल नसेल तर काय करणार? अशा वेळी सहकार्याने काम करावे. सोसायटीतील किंवा एका इमारतीतील लोकांनी एकत्र येऊन गच्चीचा उपयोग करावा. गच्चीवर ऊन चांगले मिळाल्याने झाडे सुंदर वाढू शकतील. तसेच प्रत्येक घरातील कचऱ्यापासून घरातच खत करावे आणि झाडांना घालावे. एकीचे बळ मोठे असते. फक्त हवी त्यासाठी इच्छाशक्ती आणि दिवसाची अवधी  ९-१० मिनिटे! प्रत्येक इमारतीने जर आपल्या कुटुंबांना लागणारी रोपं स्वत: लावायला सुरू केली तर हा हा म्हणता आपल्या परिसरातील लोकांना रसायनमुक्त, सकस फळभाज्या, फळं खायला मिळतील आणि हळूहळू ही चळवळ होऊ शकेल.
 या सेंद्रिय भाज्या शहरातील घरात पिकवण्याचे महत्त्व सर्वाना जेव्हा पटेल त्यावेळी  विषमुक्त अन्न घरीच उपलब्ध होईल, तसंच डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचा भार कमी होईल. आज आमच्या घरातला रोजचा ४०० ग्रॅम कचरा डंपिंग ग्राऊंडवर जात नाही. कृषीक्षेत्राची परिस्थिती आज बिकट होत आहे. एकेकाळी कृषिक्रांती करणाऱ्या पंजाबमध्ये आता रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे. गेल्या मोसमात युरोपने भारतीय मिरच्या नाकारल्या. आंब्यालाही पुन्हा मायदेशात खपावं लागलं. परदेशी लोक स्वत:च्या आरोग्याविषयी सजग आहेत, मग आपण का नाही? आपल्या मुला-बाळांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी थोडेसे प्रयत्न करायला काय हरकत आहे?  त्यासाठी दिवसाला फक्त ९ मिनिटांचा वेळही पुरेसा आहे. घरात पालकांनी असे प्रयोग केले तर? झाड वाढते कसे, फुलते कसे, ती कळी आनंद कसा देते हे कार्यानुभवाच्या पुस्तकातून मुलांना शिकावे लागणार नाही. त्याचे काळ्या आईशी नाते जोडले जाईल, अगदी नकळत. शिवाय या झाडे लावण्यातून त्या मुलांमधली प्रयोगशीलता, निरीक्षणशक्ती, निर्णयक्षमता आणि मुख्य म्हणजे रसिकता वाढेल. मूल क्रिएटिव्ह अर्थात सृजनशील होते. कारण त्या इवल्याशा कुंडीतले रोप त्याला सृजनाचे धडे देते. बुद्धीच्या या सगळ्या क्षमता त्याला आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात उपयोगी पडणार आहेतच. आपल्या मुलाला असे उमलवणे हे आई-वडिलांचे कर्तव्य नाही का? केवळ भरमसाट फी भरून चार भिंतीतल्या बाकांवर चिकटून बसवून पुस्तकेच्या पुस्तके पाठ करून मार्काच्या आकडय़ांची गाठोडी मुलांना वाचायला लावणे एवढीच पालकांची जबाबदारी?
आपली शहरातली मुले काँक्रीटच्या जंगलात वाढतात. मग त्यांचे पाय मातीचे कसे राहतील? आपण मातीतून घडलेलो आहोत आणि मृत्यूनंतर आपली मातीच होणार, हे जीवन शांतीने जगायला शिकवणारे तत्त्वज्ञान मुलांपासून दूरच राहते. पण याच मातीत वाढणाऱ्या झाडांच्या पोषक रसावर आपलं पालनपोषण होतं हे त्याला कुंडीतलं रोप सांगेल. एक शेंग, एक दाणा वाढायला दोन महिने लागतात आणि आपण कितीतरी दाणे- अन्न एका मिनिटात ताटात टाकून वाया घालवतो. म्हणजे शेतकऱ्याचे श्रम वाया घालवतो. हे कुंडीतले रोपच त्याला शिकवेल.
‘इवलेसे रोप लावियेले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी’ ही ज्ञानेश्वरांची संतवाणी केवळ त्या रोपापुरती राहणार नाही; ती आपल्या बाळासाठीही उपयुक्त ठरेल. मोगरा फुलला.. फुले वेचिता बहरू कळियासी आला.. या अभंगातल्या मोगऱ्याचा बहर तुम्हाला तुमच्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वात दिसू शकेल. त्यासाठी गरज आहे फक्त ती इवलेसे रोप दारी लावण्याची!   
    
घरच्या कुंडीतील औषधे
कोरफड- कोरफड कुंडीत लावताना मातीत थोडी वाळू मिसळावी. कोरफडीच्या पानांचा उपयोग रोज चमचाभर खाण्यासाठी, केसाला, चेहऱ्याला लावण्यासाठी करता येतो.
तुळस- रोज चहात पाने घालावी किंवा मुलाला एखादे पान खायला द्यावे.
अडुळसा आणि बेल- सर्दीसाठी तुळस, बेल आणि अडुळशाचा काढा सर्दी सुरू झाली की लगेच द्या, म्हणजे अँटिबायोटिक घेण्याची वेळ टळेल.
पुदिना- चटणीत वापरा किंवा चहात घाला.
शतावरी- याचे कोवळे कोंब सहज चावून खाऊ शकता. पौष्टिक असतात.
गवती पातीचहा- चहात वापरा किंवा सर्दीसाठी काढय़ात वापरा. एखाद्या चायनीज भाजीतही उत्तम लागतो.
आले- याची पाने चहात वापरू शकता किंवा कुंडीतले आले थोडे थोडे काढून जेवणात घेऊ शकता.
ऑरिगेनो, बेसिल, रोझमेरी, पार्सली, सेलरी या वनस्पतीही कुंडीमध्ये वाढवू शकता. ही यादी अशीच वाढत जाऊ शकते. फक्त एकेक गोष्ट करत जाऊ या, म्हणजे नवनवीन गोष्टी सापडत जातील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2014 2:01 am

Web Title: growing vegetables at home
Next Stories
1 वृक्षारोपणाची अनोखी आनंदयात्रा!
2 देता मातीला आकार : विज्ञानप्रेमी
3 प्रेम.. कुठे मिळेल का?
Just Now!
X