ch20जगायचं तर पैसे कमावणं गरजेचंच होतं. त्यामुळे आधी नर्सचं काम, मग शिलाईचं काम सुरू केलं. त्यातही भागेना तेव्हा चणे-फुटाणे विकले, मग खाणावळ, त्यातच बँकेची साफसफाईही केली. त्याच पैशातून भाचीचं शिक्षण केलं. आज ती ‘गुरुकुलम’ची मुख्याध्यापिका झालीय आणि ही झालीय गावाची सरपंच. आयुष्यभर काबाडकष्ट करून जीवन जगणाऱ्या रतन कांबळेंचं हे आयुष्य.
गु रुकुलम्च्या दारातून भाएर पडले. स्टँडकडं निघाले. पुण्याची बस पकडून घरी जायचं होतं. गुजरबाई माझी भाची. भयनीची लेक! तिला लहानपणापासून मीच वाढवली. तिची आई शेतावर कामाला जायची तवा मीच पहायची तिला! ती शिकली. बी.एड. झाली. आज ती काकांच्या म्हंजी.. गिरीश प्रभुणे काकांच्या ‘गुरुकुलम्’ची मुख्याध्यापिका हाय! पण तिला तिथवर पोहोचवण्यासाठी माझं आयुष्य खर्ची पडलं. तिच्या आणि माझ्या पोटापाण्याची सोय करण्यात जिंदगी सरली. तिच्या संस्थेतून निघाले. स्टँडवर पुण्याची एस.टी. लागून व्हती. एस.टी. सुटली आन् माझे विचार बी सैरावैरा सुटले..
माझं आयुष्य खेडय़ांत गेलं. तिथं लाइट नव्हती. पानी नव्हतं. संडासं नव्हती. पहाटंला खड्डय़ावर जायचं. जवळ नदी, वढे, आड असायचे. तिथंच आंघोळी करायच्या. कपडे धुवायचे आन् दिवस उजाडता, कपडय़ांचे पिळे घिऊन घर गाठायचं. आमची काय शेतीवाडी नव्हती. आम्ही शेतमजूर! वडील मिलिट्रीतून रिटार झाले आन् शेतीच्या कामाला जायाला लागले. आई हाळय़ापाटय़ा घिऊन विक्री करायची. भाजीपाला घिऊन खेडोपाडी वणवण फिरायची. मी थोरली. मला शाळा शिकायची होती, पण पोटाची खळगी भरं ना. माझं गाव जावळी तालुक्यातलं कुडळ! गावात एक नर्स होती. मायनी तिला सांगितलं, ‘हिला तुमच्या हाताशी घ्या! तेवढच चार पैसं मिळतील ही आशा! मी त्या नर्सबाईबरोबर खेडोपाडी फिरायची. आम्ही दोघी बरोबर आठला भाएर पडायचो. दुपारी बारा वाजस्तवर मुलांना ट्रिपल पोलिओचे डोस द्यायचे. गरोदरबाईची पयल्यापासून तपासणी करायची. तिच्याकडून माहिती घ्यायची. आजारी लोकांना बघायचं. पातळ औषध, गोळय़ा देऊ लागायचो. आरोग्यखात्यामार्फत औषधं मिळायची. ती खेडोपाडी, वाडय़ा-वस्त्यांवर नेऊन द्यायची. सिस्टरच्या हाताखाली लय काम असायचं..
माझी बस गचके देऊन थांबली. स्टँडवर बटाटेवडय़ाचा वास आला. पन खाली उतरून खायची वासना होईना. आज जवळ चार पैस हाएत, पण सगळय़ा इच्छाच मेल्यात. मला चुलत भयनीचं लगिन आठिवलं. त्या लगनाला माझा सासरा आला व्हता. त्यानं बैठक बोलवली. मी सासरचं घर सोडून आली व्हती. मी सातवीत असतानाच आईबापानं माझं लग्न लावलं. मला शिकायचं व्हतं, पण आईबापानं मला पास नापास कायच कळू दिलं नाय. लग्न लावलं. मी सासरी ग्येले आन् माज्या लक्षात आलं. सासरा आपल्यावर वाईट नजर ठिवतोय. माजं वय ल्हान. रानांत, डोंगरावर मोळय़ा आणायला ग्येलं की तिथं बी येतोय. चुलत भयनीच्या लग्नाच्या निमित्तानं मी सगळय़ांदेखत त्याची अब्रू काढली तसा तो गप बसला. दुसऱ्या दिवशी गपगुमान निघून गेला. तवाधरनं मी म्हायेरच्या आडोशाला हाय!
पन तवापासून आजपत्तुर मी स्वत: कमावलं आन् खाल्लं. मी माघारी आले तसं वडील म्हणाले, ‘तू अशीच ऱ्हातेस तर ह्य़ा पोरीला सांभाळ! तिची आई कामाला जाते. तर हिला कोण बघल? तवर आई आजारी पडली. चार भावंडं ल्हान. त्या पोरांचं बघावं लागलं. मी जवान असताना माघारी आले तवापासून आजपत्तुर या घराची जबाबदारी माज्या शिरावर यिऊन पडली. आता भाऊ शिकले. भावजया आल्या. आता मी येकटी ऱ्हाते.
या पोरीची, घराची जबाबदारी आली आन् माझं नर्सबरोबरचं काम सुटलं. मंग मी घरच्या घरी शिलाईकाम सुरू केलं. पन त्यात काय होत व्हतं? गावातल्या बाया चार कापडं शिवायला द्यायच्या. एक घिऊन जायच्या शिवून आन् बाकी ब्लाऊज पैसं मिळालं की नेऊ म्हनायच्या. पन पैसं भेटलंच नाय तर ब्लाऊज नेणार कसं? माझी अशी शिलाई बुडायला लागली. तवा म्हनलं, आता काय तरी जोडधंदा करावाच लागंल. गावात शाळा व्हती. शाळंपासून जरा लांब पयल्यांदा रोडच्या कडंला चणे-फुटाणे घिऊन बसली. लय लाज वाटली, ह्य़े असं रस्त्यावर बसायला. पन गुरुजी चांगले व्हते. म्हणले, शाळेच्या तोंडावर बसा, म्हंजी चांगला धंदा व्हईल. मी आणखी थोडी पुढं बसायला लागले. मंग दिवसाला शे-दोनशेचा धंदा व्हायला लागला. सातारा होतं १८ किलोमीटरवर. आठ दिवसातून येकदा साताऱ्याला जायची. लोकांकडून उसनवारीवर पैसं घ्यायची आन् ५ किलो वाटाणे, १० किलो शेंगदाणे, ५ किलो भाजलेली डाळ, कुरमुरे घ्यायची. गावात भट्टी नव्हती. मग सातारलाच भट्टीवर नेऊन सगळं भाजायचं. सोबतीला चॉकलेट, गोळय़ा घ्यायची. साताऱ्याहून एकटीने एवढा माल उचलून घरी यायची. तो माल अख्खा आठवडाभर विकायचा. जोडीला गावातले पेरू, जांभळंबी ठेवायची विकायला, पन धंदा काय दिवसभर नसायचा. मंग रिकामं कशापायी बसायचं? मंग गिऱ्हाईक नसलं की ब्लाऊजचं, हातशिलाईचं काम करायची. शनिवार- रविवार शाळंला सुट्टी! तवा ब्लाऊज शिवायची!
दिवसभर एवढी धडपड करून बी पोटाला पुरेसं मिळायचं नाय. पोरीचं शिक्शान! भावंडांची शिक्शनं! सगळा पैसा त्यांतच जायचा. पोरगी गुणाची व्हती. कधी रोडला आलीच तर दोन रुपयं मागायची. एरव्ही कदी पैसे घेतले नाय मागून! मी दिवसभर उन्हात पाटी घिऊन बसायची. ते शिक्षकांनी बघितलं व्हतं. काही शिक्षक या गावात बदलीवर आले व्हते. ते म्हनायला लागले, ‘‘आमचं हिथं घर नाय. बायका-पोरं नाय. तुम्ही आम्हाला जेवायला घाला.’’ म्हनलं ह्ये काम बरं हाय! कष्ट पडतील, पण गाठीशी चार पैसं बांधता येतील. मंग पोरगी शाळंला सात वाजता निघाली का मी कामाला लागायची. दहा वाजायच्या आत १० शिक्षक जेऊन जायचे. ते मला जेवणाचे पैसे द्यायचे.
तशात पोरीचं कॉलेज शिक्षण चालू झालं. लय पैसा लागायला लागला. मी चणे- फुटाणे इकायला बसायची त्याच्या बाजूलाच महाराष्ट्र बँक व्हती. ते मला रोज बघत होते, माझे कष्ट त्यांना म्हाईत व्हते. तिथला येक शिपाई माझ्या वळखीचा व्हता. तो मजजवळ किल्ली ठेवायचा. मंग शिपाई म्हणाले, ‘तू आमचं काम कर! आमी तुला त्याचे येगळे पैसे देऊ!’ मंग मी महाराष्ट्र बँकेत झाडू मारायला लागलो. केबिनमध्ये रजिस्टरं ठिवायची. पान्याचं भांडं ठिवायचं. जे पडेल ते काम करायचं. मला त्याचे पैसे मिळायचे.
तिथले सायेब लोक लई हुशार! मी सकाळी लवकर हापीस झाडायची म्हणून ते लोकमाझी परीक्षा घ्यायचे. टेबलावर कॅश ठेवायचे. अंगठय़ा ठेवायचे. मी इमानदारीनं समदं जागच्या जागी ठिऊन हापीस झाडून चावी देऊन टाकायची. मंग त्यांचा लय ईश्वास बसला. येवडा की मोठी कॅश गाडीतून केबिनमध्ये, सेफमध्ये ठेवायला बी ते मलाच बोलवायचे.
आता ही माझी भाची.. म्हंजी मानलेली ल्येक, बी.एड. करायचं म्हणायला लागली. सोळा हजार फी व्हती बी.एड.ची! येवडे पैसे कुठून आणायचे? बँकेच्या मॅनेजरला कुनी तरी माजी पैशांची नड सांगितली. त्यांनी चार दिवसांत मला वीस हजाराचं कर्ज दिलं. इमानदारीचं फळ आस्सं असतंया! शाळेतले शिक्षकबी नकाशे, चित्रकलेचे पुठ्ठे इतर साहित्य पोरीला द्यायचे. अभ्यास झाला की आम्ही ते सगळं व्यवस्थित संध्याकाळी परत द्यायचो!
माजा प्रामाणिकपणा पोरीत बी उतरलाय. आम्ही वेळेला उपाशी ऱ्हाऊ. पन कुनाचं दहा पैसं बुडवणार नाय. गावातल्या लोकांनी माजं वागणं, चाल- चलवणूक बघितली आन् मला गावाचं सरपंच बनवलं. माज्या सही- शिक्क्याची प्रमाणपत्रं पोरं नेतात. त्यांना नोकऱ्या लागतात, पण मी कोनाकडून त्याचा रुपया बी घेत नाय. पोरं नोकरीचं पेढं देतात! मला त्याची खुशी होते. आता सरपंच कार्यक्रमांत मला मानानं बोलीवत्यात. स्टेजवर मी नेते शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासंग बसली हाय! तिथे स्टेजवर बसल्यावर मला दूरवरचं वडाचं झाड दिसतं. त्याच्या सावलीत चणे-फुटाणे, गोळय़ा, बिस्किटं विकलेली आठवतात. जीव कसनुसा व्हतो. त्या झाडाखालची चणे-फुटाणेवाली बाई आज सरपंच झालीया!
त्या वडाच्या झाडापासून स्टेजवरच्या खुर्चीपोत्तुर मी कशी आले? मी आले ते येका गुणावर! प्रामाणिकपणा! सच्चाई! बस्स! माज्यासारख्या गरिबाकडं ह्य़ो एकच दागिना हाय. तरी बी मी श्रीमंत हाय! व्हय. मी श्रीमंत हाय!
माधुरी ताम्हणे – madhuri.m.tamhane@gmail.com