‘‘आमच्या पिढीतल्या अनेकांची घरं ही आता वस्तुसंग्रहालयच झालेली आहेत. अगदी असंख्य वस्तू नुसत्या भरून ठेवल्या आहेत त्यांच्यात. अधूनमधून घासूनपुसून ठेवायच्या एवढंच. उपयोग शून्य.’’ त्या ठासून म्हणाल्या. आपण संसार करताना किती जिवापाड वस्तू गोळा केल्या, साठवल्या, जपल्या याच्या आठवणी एकेकीच्या पोतडीतून बाहेर यायला लागल्या.. सारखं कशाला तरी जपण्याचा जप करणारी आमची पिढी सगळं बाद करायच्या नादाला लागलेल्या पुढच्या पिढीबद्दलचा उद्वेग व्यक्त करू लागली…
एका प्रवासी कंपनीच्या महिला स्पेशल ट्रिपला गेले होते तेव्हाची गोष्ट. दररोज रात्री आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला जाण्यापूर्वी सर्वाना हॉलमध्ये एकत्र बोलवून दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम सांगण्याची सहल संचालकांची पद्धत होती. तसाच त्या रात्रीही आमचा ग्रुप लीडर आला आणि दुसऱ्या दिवशीच्या पर्यटनस्थळांची यादी वाचू लागला. बरंचसं नेहमीसारखंच होतं. कुठे जाऊन ग्रहतारे बघा, नाही तर कुठे जाऊन पशुपक्ष्यांचे खेळ बघा वगैरे. मात्र त्या शहरात त्या प्राचीन साम्राज्यातल्या राजघराण्यात वापरायच्या वस्तूंचं एक वस्तुसंग्रहालय होतं ते नेमकं त्या आठवडय़ात दुरुस्तीसाठी बंद होतं. त्यामुळे ते या ट्रिपमध्ये बघता येणार नाही, असं पुन:पुन्हा अजिजीने सांगत होता तो. त्याचं ज्ञानही विकाऊ आणि अजिजीही विकाऊच असावी हे स्पष्ट होतं, पण त्यावरची एका बाईंची प्रतिक्रिया चमकवणारी होती. त्या एकदम उठून म्हणाल्या, ‘‘म्युझियमच बघायला मिळणार नाहीये ना? मग जाऊ दे. आमच्या पिढीला म्युझियम्सचं काही फार कोडकौतुक नाहीये. आमची घरं ही म्युझियम्सच आहेत बाबा! वस्तुसंग्रहालयं!’’
तो तरुण सहायक तर गोंधळून गेलाच, पण बाकीच्या आम्ही बायकाही एकमेकींकडे बघायला लागलो. सावरून घेण्याच्या दृष्टीने तो म्हणाला, ‘‘तुमचा राग मी समजू शकतो काकी.. पण..’’
‘‘रागबीग काही नाही रे. मजेने म्हटलं. आमच्या पिढीतल्या अनेकांची घरं ही आता वस्तुसंग्रहालयच झालेली आहेत. अगदी असंख्य वस्तू नुसत्या भरून ठेवल्या आहेत त्यांच्यात. अधूनमधून घासूनपुसून ठेवायच्या एवढंच. उपयोग शून्य.’’ त्या ठासून म्हणाल्या. टुर ऑपरेटरच्या व्यवसायात रोज उठून असंख्य प्रवाशांना, त्यांचे स्वभाव, आवडीनिवडी, राग, लोभ वगैरेंना झेलण्याची सवय असल्याने आमच्या तरुण नेत्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिथून काढता पाय घेतला, पण जमलेल्या बायकांच्या डोक्यातून, बोलण्यातून जायचं नाव काढेना. आपण संसार करताना किती जिवापाड वस्तू गोळा केल्या, साठवल्या, जपल्या याच्या आठवणी एकेकीच्या पोतडीतून बाहेर यायला लागल्या.
‘‘मला भांडी विकत घ्यायचा खूप नाद होता. सणावारी, वाढदिवसाला, एरवीही कोणी काही दिलं की मी त्याची भांडी घ्यायची. ऐपत नव्हती तेव्हा भांडय़ांची भिशीसुद्धा लावली होती मी. फळीवर रांगेत चकाकत ‘उंचीसे एक कतार’ उभे राहिलेले डबे बघितले की कसलं धन्यधन्य वाटायचं मला.’’
‘‘मीसुद्धा २५ माणसांना पुरतील एवढी पातेली-सतेली, डबे-भांडी, ताटं-वाटय़ा गोळा केलंय. आधी सगळं चोख पितळेचं असे, पुढे स्टेनलेस जमवलं, पण इमानाने सतत जमवलं.’’
‘‘आमचं घर जुन्यापैकी भलं मोठ्ठं! घरातल्या पाचपंचवीस माणसांच्या पदवी घेतानाच्या तसबिरी अजून आहेत माळ्यावर. माणसं बरीचशी गेलीही त्यातली. पदव्या जपून ठेवल्या आहेत. तितक्या दणकट फोटोफ्रेम्स आता मिळणार नाहीत म्हणून. आमच्या कुटुंबात पाच पिढय़ांचा एक बारशाचा पाळणा आहे. दर नव्या बाळाला पहिल्यांदा घरी आणल्यावर त्यातच घालून जोजवत आलो आम्ही. अर्धी खोली पाळण्यानेच भरेल एवढा आकार आहे त्याचा. पण उत्तम सागवानाची चौकट आहे म्हणून ठेवलाय.’’
‘‘आमच्याकडे जुन्या पितळी, पंचधातूच्या गौरीहाराची बोळकी आहेत जपून ठेवलेली. अगदी सुबक घाट आहे एकेकाचा. दर वेळेला टाकण्यासाठी खाली काढतो. पुन्हा घासूनपुसून माळ्यावर ठेवून देतो. टाकायचा धीर होत नाही.’’
‘‘आमच्याकडे पंधरावीस गाद्या-उशा-लोड-तक्के असा मोठा सरंजाम आहे. पूर्वी गणपतीला, नवरात्रात सगळे नातेवाईक यायचे. तेवढय़ांच्या अंथरूण-पांघरुणाची सोय करत गेलो आम्ही. आता दोनदोन वर्षांमध्ये कोणीही, चुकूनही आमच्या घरी राहायला येत नाही. मग आम्ही दोघंच आळीपाळीने वेगवेगळ्या गाद्यांवर झोपून बघतो.’’
माझ्यासकट एकेकीचे सांसारिक अनुभव बाहेर येऊ लागले. अशी ना तशी, आपापली बॅटिंग संपवून पॅव्हेलियनमध्ये परत जाऊन निवांत बसलेल्या खेळाडू होत्या सगळ्या. रोमहर्षक सामना बघायला किंवा खेळायला आलेल्यांना त्यांच्याशी बोलण्याची हौस कुठून असणार? त्या आपापसातच काही अनुभव वाटून घेत होत्या आणि त्याचं आपण फारसं वाटून घेत नाहीयेत असंही दाखवत होत्या.
ज्यांच्या घरी खूप भांडीकुंडी गोळा केलेली होती त्यांचे चिरंजीव म्हणे चेष्टेने म्हणायचे, ‘‘घरी मंगल कार्यालय वगैरे काही काढण्याचा प्लॅन होता का तुमचा?’’
ज्यांच्या घरी पिढीजात पाळणा होता, त्यांच्या नातवंडांचं बारसं इव्हेण्ट मॅनेजमेंट कंपनीवर सोपवलेलं होतं. त्यांनी उंची हॉटेलात स्प्रिंगच्या सजवलेल्या पाळण्यात बाळाला ठेवून नामकरण केलं होतं. ती कल्पना खूप लोकांनी वाखाणली होती.
ज्यांच्या घरी आजोबांच्या काळापासून चालत आलेली सायकल जतन केलेली होती. त्यांच्या घरात एका मोठय़ा नातवंडाने वापरलेली सायकल दुसऱ्या, धाकटय़ा नातवंडाला ओल्डस्टाइल वाटत होती. दोघांमध्ये सव्वादोन वर्षांचं अंतर होतं.
आणखी एका घरातल्या कर्त्यां मुलीने, सुनेने नव्हे, असा फतवा काढला होता, की घरामध्ये जी वस्तू गेल्या सहा महिन्यांमध्ये लागली नाही आणि पुढचे सहा महिने लागण्याची शक्यता नाही ती तत्काळ घरातून घालवून टाकावी.
‘‘टाकावी म्हणजे कुठे टाकावी? पाळणा काय म्युनिसिपाल्टीच्या कचरागाडीत का नेऊन टाकायचाय? शिवाय आता सेवाभावी सार्वजनिक संस्थांमध्येसुद्धा जुनं सामान घेत नाहीत. कोणाला जागेला परवडत नाही तर कोणाला दुरुस्तीला परवडत नाही. म्हणून मग वाहायची त्याची ओझी घरानं.’’ त्या बाई त्रासून म्हणाल्या. एका पुस्तकवेडय़ा घराने तर पुस्तकांचा धसकाच घेतला होता. आता पुढच्या पिढय़ांनाच काय, नामांकित वाचनालयांनाही जुनी पुस्तकं नको होती. वाचक नव्हते म्हणे त्यांना. जिथे जुन्या उंची शालूंना, दागिन्यांनासुद्धा अनेक घरांमध्ये वाली नव्हते त्यापुढे पुस्तकांची काय मजाल असणार होती?
‘‘इतकी वर्षे आम्हीच दोघांनी सासऱ्यांपासूनची पुस्तके शेल्फ मधून अधूनमधून काढून फवारे मारून किंवा पावडर लावून जतन केली. आता आमच्याने ते कष्ट होत नाहीत. पुढचे त्याकडे बघणार नाहीत. बघून बघून आपल्यालाच उद्वेग येतो. कशाला गोळा केलं आपण एवढं सगळं? कशाला केली एवढी उस्तवारी? पुढे कोणाला तरी उपयोगी पडेल, कोणी तरी या वस्तूंचे चीज करेल म्हणूनच ना?’’
सारखं कशाला तरी जपण्याचा जप करणारी आमची पिढी सगळं बाद करायच्या नादाला लागलेल्या आजच्या पिढीबद्दलचा उद्वेग व्यक्त करत होती. ‘हे सगळं जिवापाड जपा,’ असं त्यांना मागच्या पिढीनं जराही, कधीही, चुकूनही सांगितलं नव्हतं. ती सवय, ते वळण पूर्वीपासून लागलेलं होतं म्हणून होतं. त्यात कधी तरी आनंद होता, अभिमान होता, पिढय़ांमधून दुवा बनण्याचं स्वप्न होतं. आताच्या वास्तवाला हे काहीच मंजूर नव्हतं. पुस्तक वाचून झालं की त्याची किंमत संपली, उंची कपडा दोन-चार समारंभांमध्ये मिरवून झाला की त्याची किंमत संपली, असं रोखठोकपणे मानणाऱ्यांना त्या त्या वस्तूंमध्ये अडकलेल्या मनांची, भावनांची किंमत कुठून कळणार?
साधं बोलणं उगाचच अप्रिय किंवा निराशेच्या वळणावर जातंय हे एकीला जाणवलं तेव्हा तिनं पुढे होऊन सर्वाना थांबवलं.
‘‘ही ट्रिप सुरू करताना काय ठरलं होतं? कोणीही थकव्याच्या, दुखण्याच्या, नाराजीच्या गोष्टी बोलायच्या नाहीत. ठरलं होतं की नाही? दोन दिवसांनंतर पुन्हा आपल्याला आपापल्या घरीच जायचंय ना?’’
‘‘घरी म्हणण्यापेक्षा आपापल्या वस्तुसंग्रहालयात म्हणू या.’’
‘‘तसं म्हणा. प्रवासाला गेलो की आवर्जून नाना प्रकारची म्युझियम्स, संग्रहालय बघतोच ना आपण?’’
‘बघतो तर. चांगली तिकिटंबिकिटं काढून बघतो. फरक इतकाच की, जी शंभर-दोनशे-पाचशे वर्षांपूर्वीच्या गोष्टी दाखवणारी असतात. आपण आपल्याच हयातीत इतिहासजमा मानले जाऊ आणि कोणी फुकटसुद्धा तो इतिहास बघायला येणार नाही हा विचार मनात आला की उदास वाटतं एवढं नक्की.’’
‘‘मग आणू नका मनात. आपण आपल्यासाठी केलं, आपल्याबरोबर तेही संपेल. असं स्वीकारून बघितलं तर?’’ ती ठासून म्हणाली; पण का कोण जाणे, तिच्या आवाजामध्ये जेवढा जोर होता, तेवढा मनात नसावा अशी मला आपली पुसटशी शंका आली. अतिस्नेह पापशंकी असतो म्हणतात, तो असा.