विकत मिळणारे आयते तक्ते लावणं आणि मुलांनी विषय निवडून त्यावर तक्ते तयार करणं यात महत्त्वाचा फरक म्हणजे मुलांना स्वत: केलेले तक्ते ‘आपले’ वाटतात. त्यासाठी ते स्वत: मेहनत घेतात. विचार करतात आणि मुख्य म्हणजे संघभावनेनं काम करतात..
कुठून तरी फतवा येतो की शाळेच्या भिंतीवर तक्ते लावा, पताका लावा, तोरणं लावा. पण हे सगळं इतक्या उंचीवर असतं की मुलं मान वर करून ते किती वेळा वाचणार? आणि वाचावं असं त्यात काय असतं? हल्ली तर सगळी माहिती, अगदी तक्त्यासह ‘रेडी’ मिळतं. विचारपूर्वकता यात फार नसते. ज्या मुलांसाठी हे सारं बनतं त्यांनाच जर त्यांचं काही वाटलं नाही तर निरुपयोगीतेत समाधान किती मानायचं! खरं म्हणजे अशा आजूबाजूच्या सुंदरतेने मन सुंदर व्हायला मदत होतं. डोळय़ावर वेगळे संस्कार होतात. गंमत अशी आहे की कशाचीच जाणीवपूर्वक रचना नसल्याने फतवा-फतवा म्हणूनच आकार घेतो.
त्या शाळेचं इतर शाळांसारखेच होते. एके दिवशी गुरुजींनी वर्गात तक्ते लावले. जुने कपडे लोंबत असावे तसे तक्ते दिसत होते. खालीवर आकाराचे चौकोनी-गोल लांबट आकाराचे. नुसतेच शब्द, अंक, आकार लोंबत होते. चला एक काम झालं. कारण प्रत्येकानेच कुठल्यातरी स्टेशनरीच्या दुकानातून तक्ते आणले होते. छत झाकून गेलं. रिकाम्या भिंती झाकल्या. नाही म्हटलं तरी जरा जिवंतपणा आला.
मुलं वर्गात आली. आपल्याच नादात. कुणाचंच लक्ष नव्हतं. गरुजींना स्वत:बद्दल धन्यता वाटली. त्यांना वाटलं, सगळय़ा मुलांना मजा वाटेल, गंमत वाटेल. पण असं काहीच घडलं नाही. शाळा विचार करू लागली, ‘उत्सुकतेनं बघावं असं कदाचित त्यात काही नसेल. वारांची नावं, महिन्यांची नावं, पाढे, इतिहासातल्या सनावळय़ा, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द आणि किती तरी. कुठेही काहीही. खास आकर्षण कुठे होतं त्यात.’ मुलांचा दंगा-गोंगाट सुरू होता. रात्रभर एकटी असणारी शाळा एकदम जिवंत झाली, भरून पावली.
इतक्यात गरुजींनी मुलांना नेहमीप्रमाणे शांत केले. ‘जर आता कुणी आवाज केला तर..’ मग एकदम जिकडे तिकडे शांतता पसरली. ‘मुलांनो! आज वर्ग बघितलात का? कसा वाटतोय?’ कोणीच काही बोललं नाही. एक मुलगा म्हणाला, ‘तक्ते लावलेत कुणीतरी’.
‘आवडले ना! मी आणलेत’ गुरुजी मनातल्या मनात म्हणाले. ‘जिथं आपला जीव गुंतलेला नसतो, आपला सहभाग नसतो, त्याबद्दल असंच वाटतं. सगळं फुकट. काहीच वाटेनासं झालंय. काय करावं मुलांचा जीव गुंतावा म्हणून!’ विचाराच्या नादात गुरुजी लिखाणकामात दंग झाले.
आता मात्र शाळा विचार करू लागली. असं का व्हावं? इतकी सजावट झाली, पण निर्जीव का वाटतंय? मग उपयोग काय याचा? काही तरी केलं  पाहिजे. मुलांचा कौल घेतला पाहिजे. मुलांना काय वाटतं? मुलांना काय हवंय? मुलांची मनस्विता लक्षात घ्यायला हवी. काहीही करायचं झालं तर त्यांचा विचार घ्यायला हवा.
शाळेला काहीच सुचेना. मुलांशी बोलणारी शाळा मुलांचाच विचार करत होती. काही सुचेना. येणारे-जाणारे म्हणत, ‘काय सजवलंय छान. रंगरंगोटी केलीय. थोर पुरुषांचे फोटो लावलेत. सुविचार..’ शाळेला प्रश्न पडला यात मुलांचा सहभाग किती? शाळेने अंदाज घेतला तेव्हा कळलं की शाळेला पैसे आलेत. ते खर्ची घातले पाहिजेत. त्यामुळे बाजारात जे काही उपलब्ध होतं ते सरांनी आणलं नि वर्गात लावलं. त्यात विषय, आशय यांचा काही लागाबांधाच नव्हता. ज्यात आपण नसतो ते विकतचं उपरंच वाटतं ना!
शाळा म्हणाली,‘माझ्या मित्र-मैत्रिणींनो, बाहेरचं खायला दिलं तर रोज रोज तसं खाणं आवडेल?’
‘हो आवडेल. कित्ती मज्जा. रोज काय काय खायचं. मजा करायची. काहीच काम नाही..’
‘चालेल. मग आता आपण असं करूया की सगळय़ांनी आपापल्या आईला स्वयंपाकाला दोन दिवस सुट्टी देऊया..’
‘नको नको.. असं नको’
‘मग! आईला सुट्टी म्हणजे एकदम दचकलात ना!.. तसंच तक्त्याचं आहे रे! तयार गोष्ट तशी पटकन मनाला रुचत नाही, मन त्यात गुंतत नाही. कारण त्यात आपण नसतो.. तर मग आपण करायचे तक्ते स्वत: तुम्हाला जमतील तसे.’
मुलं शांत होती. शाळा बोलत होती. आपण आपल्या वर्गासाठी तक्ते तयार करायचे ही कल्पना मुलांना खूप आवडली. पण काय करायचं हे काही मुलांना समजेना.
‘आम्ही प्रत्येकजण एकेक तक्ता बनवतो.’ ‘तुम्ही वर्गात इतकी मुलं मग भिंती कशा पुरणार?’ शाळेचा मुद्दा मुलांना पटला. तरी मुलं गप्पच होती. विचारात बुडाली होती. त्यांना विचारात पाहून शाळेला खूप हसू येत होतं. शाळा जर हसली असती तर मुलांना राग आला असता, मुलांची चिडचिड झाली असती. मुलांना हे माहीत होतं की शाळेच्या मनात काय चाललंय. फक्त ती आपल्याला बोलून दाखवत नाही.
‘ए, ए, शाळा! सांग ना जरा तुझ्या आयडिया!’
‘तुम्ही करा ना विचार! मग मी सुचवते काय काय त्यात..’
‘आम्ही असं करतो आम्हाला काय तयार करायचं आहे हे आम्ही ठरवतो. लिहून काढतो. आमच्या सरांना दाखवतो. सर सांगतील त्याप्रमाणे बदल करतो. नंतर मोठय़ा कार्ड पेपरवर लिहितो.’
‘खरं तर मनापासून नाही पण सर सांगतात म्हणून लिहितो! एवढा मोठा कार्ड पेपर! ती मोठी मोठी अक्षरे! कंटाळा येतो. पण काय करणार!..’
‘हं! मलाही वाईट वाटतं.. मी तुम्हाला एक प्लॅन सांगते. आपण एकाच नावाच्या १०-१० चिठ्ठय़ा करायच्या. असे तुमच्या वर्गाचे ६ गट पाडायचे..’
शाळेने मुलांच्या कानात हळूच काहीतरी सांगितलं नि मुलं कामाला लागली. चिठ्ठय़ावर नावं होती- मन, हिरकणी, ईगल, विजय,गजानन, इमारत. अशा नावांच्या प्रत्येकी १०-१० चिठ्ठय़ा तयार झाल्या. म्हणजे प्रत्येक शब्द १० कागदांवर लिहिला होता. मुलांचे गट तयार झाले. यावेळी सगळे काही शाळेने सरांना सांगितलं होते.
‘‘चला रे! ज्यांना ‘मन’ या नावाची चिठ्ठी आलीय त्यांनी ‘मराठी’ या विषयाशी संबंधित त्यांना आवडतील, त्यांना जसे तयार करावेसे वाटतील त्यांनी तसे तक्ते बनवायचे. कुणाला वाटलंच तर मला विचारायचं..’’ सरांनी मुलांना मराठीची पुस्तके दिली. छान छान कविता नि कवितांचा अर्थ चित्रात, कथा नि कथेतल्या माणसांची चित्रे, प्रवास वर्णने नि त्यातल्या ठिकाणांची चित्रे असे वेगळेच तक्ते तयार होऊ लागले. असंच इतर विषयांचं झालं. ‘हिरकणी’ गटाने हिंदीचे, ‘ईगल’ गटाने इंग्रजीचे, ‘गजानन’ गटाने गणिताचे तर ‘विजय’ गटाने विज्ञानाचे तक्ते तयार केले. ‘इमारत’गटाने इतिहास भूगोल. वा! काय वर्ग सुंदर दिसू लागला. तक्ते जरा वेडेवाकडे झाले, पण ते मुलांनी तयार केलेले होते. सगळी शाळा तक्त्यांनी भरून गेली. मुला-मुलींत उत्साह होता. ‘मी कुठे लाऊ, एवढी जागा कशी मिळणार?’ एकदोनच का अनेक शंका मुलं विचारत होती. सगळी शाळा एकदम जिवंत झाली.
‘इतके वर्ग इतक्या भिंती! इतके दिवस रिकाम्या होत्या. आता सगळं भरून टाकू’ एकजण म्हणाला.
‘नको. नको. आपण जागा ठरवून घेऊ. शिवाय जे तक्ते चांगले असतील तेच निवडू.’ दुसरी.
‘असं कसं करून चालेल? ज्याचा तक्ता रद्द होईल त्याला किती वाईट वाटेल..’ तिसरा.
 ‘असं करूया का प्रत्येक विषयाचा एक तक्ता असे १० तक्ते दर महिन्याला एक बंच करूया. शाळा १० महिने असते.’ सरांनी सुचवले.
 ‘सर, तुमची आयडिया भारी आहे. पण मग इतके दिवस लक्षात नाही राहणार. आपण सगळे तक्ते नीट लावले तर बघू काय होतं ते!’
आणि शाळा अगदी भरगच्च झाली. भिंती मुलांच्या शब्दांनी रंगल्या. जणू अंगभर तिनं मुलांचे शब्दच गोंदले.
हे झालं शाळेचं. शाळा आणि घर यात फरक काय? एवढाच की शाळेत बरीच मुलं असतात. घरी आई-बाबा शिक्षकांच्या भूमिकेमध्येच असतात. असं व्हायला काय हरकत आहे. मुलांचा एखादा छान निबंध, लेखन-चित्र -आकृती-वस्तू यांनी घरातल्या भिंती सुंदर दिसतील? घरातल्या भिंतीही विकतच्या सजावटीच्या वस्तू सोडल्या तर अगदी गुळगुळीत नि चकचकीत असतात. म्हणून असावा एखादा फळा जिथं मुलं गिरगोटय़ा करतील. हा फळा जाड कापडाचा, साडीचा किंवा पॅकिंगच्या पुठ्ठय़ाचा ही होईल. मी पाहिलेल्या एका घरात असा एक फळा होता त्यावर मुलांच्या आठवडाभरातील आवडलेल्या प्रसंगांचं वर्णन होतं. तसंच न आवडलेल्या घटनांचीही नोंद होती. त्या घरातला हा संवाद खूपच भावूक होता. हळूहळू पालक मुलं फळय़ाविना एकमेकांशी समंजस संवाद करू लागली.   

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
environment issue in election manifestos environmental issues in lok sabha election 2024
या रणधुमाळीत पर्यावरणाबद्दल प्रश्न विचारा..