बहुतेक लोकांचं असं म्हणणं असतं की त्यांना दु:ख सहन करता येत नाही. सुखासाठी तर हाती भिक्षापात्र घेऊन, हात पसरून उभे असतात. पण खरी गोष्ट अशी की लोक ना सुख सहन करू शकतात ना दु:ख सहन करू शकतात. कारण सुख ही उत्तेजक अवस्था असते आणि दु:खसुद्धा तेवढीच उत्तेजित करणारी अवस्था असते. दोन्हीही त्रासदायक आणि बरेचदा सुख एवढं तोडतं जेवढं दु:खानं कधीही तोडलं नसेल.
एक गोष्ट आहे. एक माणूस दर महिन्याला एक रुपयाचं लॉटरीचं तिकीट विकत घेत असे. त्याला ती सवयच जडली होती. गरीब माणूस होता. शिंपी होता. आपल्याला लॉटरी लागेल असं कधी त्याला वाटलं नव्हतं. अशी आशा मनाशी बाळगली नव्हती की स्वप्नं पाहिली नव्हती. वर्षांनुर्वष सवयीनं आपला एक तिकीट खरेदी करण्याचा परिपाठ मात्र ठेवलेला होता. लॉटरी मिळेल इतकं आपलं कुठलं नशीब हाच विचार मनात ठाम होता. पण एके दिवशी त्याच्या नावे लॉटरी लागली. मोठी कार येऊन समोर उभी राहिली. त्यातून नोटांची बंडलं काढून त्याला दिली गेली. दहा लाख रुपये होते. त्याचा विश्वासच बसेना. डोळे जणू बघायला असमर्थ झाले. डोळ्यांसमोर धुकं पसरल्यासारखं झालं. चक्कर यायला लागली. दहा लाख रुपये! बापडय़ा शिंप्यानं जन्मात कधी एवढे पैसे नजरेने पाहिले नव्हते. त्याची छाती धडधडू लागली. चक्कर आली. त्या रात्री तो नीट झोपू शकला नाही. दुसऱ्या दिवशी त्यानं दुकानाला कुलूप ठोकलं आणि चावी विहिरीत फेकली. आता दुकानाची गरजच काय? बात खतम. आता काय शिंपी थोडंच राहायचंय. मोटरगाडी खरीदली, मोठं घर विकत घेतलं. वेश्यांच्या माडय़ा चढू लागला. आता दुसरा उद्योगच काय?
पूर्वी नेहमी निरोगी, तब्येत राखून असे. तो वर्षभरात एकदम रोडावला. तब्येत पार बिघडली. अगदी जराजर्जर झाला. वर्षांनंतर त्याला बघणारा माणूस त्याला ओळखूच शकत नसे. तो म्हणे, अरे काय दशा झाली रे तुझी! आता दारू, वेश्या, नाच-गाणी, रात्री-बेरात्री भटकणं आणि दुपापर्यंत झोपून राहणं, मन चाहेल ते खाणं-पिणं हाच त्याचा आयुष्यक्रम झाला. त्याला वाटत होतं, मी सुखाच्या राशीवर लोळतो आहे. पण तब्येत पार रयाला गेली. गरीब होता तेव्हा या प्रकारचे उपद्रव कधी आयुष्यात आले नव्हते. अशा तऱ्हेचे त्रास व्हायला वेगळी क्षमता लागते. ती सगळ्यांजवळ नसते. गरिबांची  दु:खं वेगळी आणि अमिरांची दु:खं वेगळी. पैसे नसण्याचं दु:ख भोगतो गरीब; पण पैसे असण्याचं दु:ख टोचत असतं श्रीमंताला. दु:ख दोघांनाही चुकली नाहीत. तुम्ही काळजीपूर्वक पाहय़लंत, नीट निरीक्षण केलंत, अलिप्त भावानं बघितलं तर लक्षात येईल की गरिबापेक्षा श्रीमंताला जास्त दु:खं असतात. गरिबाला निदान आशा असते की दु:खं दूर होतील. पैसा मिळेल. अमिराला ती आशाही नसते. हेच दु:ख त्या शिंप्याच्या मागे लागलं. वर्षभरात तो बरबाद झाला. पैशांनी सुख मिळेल असं नाही. दु:खाची अवस्था तुम्ही ओढवून घेता. तुम्हीच नाहीशी करू शकता.
सुख आणि दु:ख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जो माणूस दु:खापासून मुक्त होऊ इच्छितो, पण ज्याला सुख कवटाळून ठेवायचं आहे, तो कधीही दु:खापासून मुक्त होऊ शकणार नाही. नाण्याची एक बाजू धरून ठेवायची झाली तर दुसरी बाजू कशी टाकून देता येईल? ज्याला दु:खापासून मुक्त व्हायचं आहे त्याला सुखही दूर सारावं लागेल. त्याला ते सगळं नाणंच टाकून द्यावं लागेल.
सुख आणि दु:ख या मनाच्या उत्तेजित अवस्था आहेत. जी उत्तेजित अवस्था मनाला आवडते तिला आपण  सुख म्हणतो. जी उत्तेजित अवस्था त्रासदायक वाटते त्याला आपण दु:ख म्हणतो.
ज्याला आपण आज सुख म्हणतो तेच चार दिवसानंतर दु:ख वाटू लागतं. हे कधी तुमच्या लक्षात आलं आहे का? एखाद्या स्त्रीबद्दल असं वाटतं की ही आपल्याला प्राप्त झाली की जीवन सार्थकी लागलं. मिळवायचं असं आणखी काहीही उरलं नाही. त्याच स्त्रीबद्दल कालांतरानं भावना बदलू शकतात. जे आज सुंदर भासतं त्याला कुरूपतेचं अंगही असतंच. आज सौंदर्य बघून तुम्ही मोठे आनंदित होता, उद्या त्याचं कुरूप अंगही प्रकट होणारच!
आणि कित्येकदा असं घडतं की व्यक्ती वरून जितकी सुंदर दिसते तेवढय़ाच आत दडपलेल्या वासना, घृणा, कुंठित-अवरोधित गोष्टी, क्रोध, ईर्षांदी कुरूप गोष्टी आत भरून राहिल्या असतात आणि बऱ्याचदा कुरूप व्यक्तीच्या आत एक वेगळं सौंदर्य असतं. हे असं असतं कारण कुरूपता आणि सौंदर्य एकमेकांशी निगडित असतात. एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. सफलता-असफलता, गरिबी-श्रीमंती याही अशा एका नाण्याच्या दोन बाजू असतात.
गरिबीतसुद्धा एक प्रकारची श्रीमंती असते याचा विचार कधी तुम्ही केला आहे? श्रीमंतीत एक प्रकारची गरिबी दडलेली असते. आयुष्यातील ही गुंतागुंत लक्षात घेतली तर आयुष्य बरंचसं साधं-सरळ करता येईल. मोठय़ा अभिमानानं (उद्याच्या चिंता सोडून देऊन) आपल्याच मस्तीत चाललेल्या गरिबाला कधी पाहिलं आहे? चिंतेच्या ओझ्यानं दबून गेलेल्या श्रीमंताला कधी पाहय़लंत? तो काळजीनं नीट झोपू शकत नाही की जेवू शकत नाही. त्याची गरिबी तुमच्या लक्षात आली आहे का? सांगायचा मुद्दा एवढाच की जिथं गरिबी आहे तिथं श्रीमंती आहे. जिथं श्रीमंती आहे तिथं गरिबीही आहे.
बुद्ध आणि महावीरांनी राजमहाल सोडला आणि ते फकीर झाले ते उगीच नाही. त्यांना हे रहस्य लक्षात आलं असलं पाहिजे. गरिबीतील श्रीमंती त्यांना कळली असली पाहिजे. मालकीच्या वस्तू, उपभोगसाधनं इ. जितकं कमी असतं तितका निश्िंचतपणा अधिक हे त्यांना उमगलं असेल. जितकं लौकिक धन अधिक तितकं ते गमावण्याचं भय अधिक. जितकी संपत्ती अधिक तितकी सुरक्षितता धोक्यात! ही चिंता धनिकाला फार गरीब करून सोडते.
तुम्ही म्हणता विषाद नको. दु:ख नको. पण तुम्ही विषाद हा जणू काही आपला चेहरा करून टाकला आणि  त्या आधारावर लोकांजवळ सहानुभूती मागू लागलात. प्रेम मागू लागलात, तर तुम्ही ते दु:ख, तो विषाद सोडणार तरी कसा? कारण मग भीती वाटेल की विषाद जर सुटला तर हे सगळं प्रेमही दूर जाईल.  ही सहानुभूती, लोकांचं लक्ष हे सगळं हरवून जाईल. (या भीतीनंच) तुम्ही त्या दु:खाला, विषादाला घट्ट धरून ठेवाल. त्याला  वाढवत जाल. अतिशयोक्ती कराल. लोकांना दाखवताना त्याचा भरपूर विस्तार कराल. मग एखाद्या फुग्यासारखं ते फुगवत न्याल आणि भरपूर आरडाओरडा कराल. मी किती दु:खी आहे ते लोकांच्या मनावर ठसविण्याचे उपाय मोठय़ा प्रमाणावर अमलात आणाल.
जरा विचार करा. लोक दु:खाची चर्चा करतात त्याबाबत विचार करा. ते काय म्हणतात तिकडे लक्ष देऊ नका. कसं म्हणतात ते नीट निरखून बघा. ते फार रस घेऊन सांगताहेत असं तुमच्या लक्षात येईल. त्यांच्या डोळ्यांत तुम्हाला एक चमक दिसेल. आणि तुम्हाला उमजेल की त्या सगळ्यात.. दु:खाचा बाजार मांडण्यात त्यांना निंदनीय, विकृत प्रकारचं सुख मिळतं आहे. आपल्या दु:खांचं इतरांपाशी वर्णन करता करता त्यांच्या जीवनात वेगळीच झगमग प्रकटते. वर्णन करण्यात ते अगदी पटाईत होतात. त्यात अगदी रस घेऊन ते सांगू लागतात आणि तुम्ही (ऐकताना) त्यात रस घेतला नाही तर ते दु:खी होतात.
दुसऱ्यांची फिकीर सोडा आणि स्वत:बद्दल विचार करा. तुम्ही जेव्हा दु:खाबद्दल बोलाल तेव्हा चुकूनसुद्धा त्यात रुची घेऊ नका. नाही तर तुम्ही त्या  दु:खशृंखलेत बांधले जाल. मग खूप  आरडाओरड केलीत तरी मनोमन तुम्हाला सुटका नको असते. तुम्ही तुरुंगात वस्ती कराल. आपल्या पारतंत्र्याबद्दल भले तुम्ही जोरजोरात निषेध कराल. ओरडा कराल. पण तुमच्या कारागृहाचे दरवाजे उघडले गेले तरी तिथून पळण्यासाठी तुमचा पाय उचलला जाणार नाही. तुम्हाला तिथून काढून लावलं तरी मागच्या दरवाजानं तुम्ही तिथंच येऊन दाखल व्हाल. कारण आता तुमच्या लेखी कारागृह फार बहुमूल्य असतं. ते सोडणं कठीण होतं. जवळपास अशक्य होतं.
लक्षात घ्या. जीवनात काटे असतात. फुलंही असतात. कशाची निवड करावी हे तुमच्यावर अवलंबून असतं. (स्वत:च जर काटे निवडले तर मग आरडाओरड करणं चुकीचं ठरतं.) म्हणून जेव्हा दु:ख, विषाद वाटतो तेव्हा थोडा विचार करा. तुम्ही दु:खाच्या व्याख्येत चूक करत आहात. आणखी एक गोष्ट पक्की मनाशी धरा. दु:ख आपोआप प्रविष्ट होत नाही. तुम्ही स्वत: त्याला आपल्या जीवनात आणता. ते झटकून टाका. त्यापासून पळ काढा. स्नान करा. नाचा. काय हवं ते करा. पण दु:ख, वैफल्याची धूळ कसंही करून झटकून टाका. त्यातून स्वत:ची सुटका करून घ्या. तुम्हाला दु:खानं वैफल्यग्रस्त करणारा राग आवळत बसू नका. नाही तर तो राग म्हणजे तुमचा दुसरा स्वभाव होऊन बसेल.

(‘ओशो विचारतरंग’ या मनोविकास प्रकाशनच्या माधवी कुंटे यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार)

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?