01 March 2021

News Flash

निरामय घरटं : निश्चिंत पाखरं

प्रत्येकालाच आनंददायी घरटय़ाची ओढ असते.

बाहेर कितीही ताणतणाव असले तरी घरी आल्यावर शांतता मिळणार याची आश्वासकता हे घरटं देत असतं.

उमा बापट – umaajitbapat@gmail.com

प्रत्येकालाच आनंददायी घरटय़ाची ओढ असते. बाहेर कितीही ताणतणाव असले तरी घरी आल्यावर शांतता मिळणार याची आश्वासकता हे घरटं देत असतं. लहानपणीचा काळ हेच सगळं अनुभवण्याचा असतो. मुलांना त्यांच्या वाढीच्या काळात असं निश्चिंत करणारं घर मिळालं तर मोठेपणी तेही आपल्या पिल्लांना तसंच उबदार घर देणार हे नक्की. हेच सांगणारं हे सदर आज संपत असलं तरी प्रत्येकाला आपलं घर निरामय घरटं करता येऊ शकतं, हाच या सदराचा सांगावा आहे.

एक दृश्य डोळ्यासमोर आणू. बालवाडीतल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमापूर्वी एक-दोन तास छोटय़ा, शिशुगटातल्या मुलांना रंगमंचाच्या मागे नटवून बसवलेलं. ‘कुठे हात लावू नका’, ‘बोलू नका’ या सूचनांचा भडिमार. पाहुण्यांना वेळ नसतो किंवा कार्यक्रमाच्या मध्ये मुलांचे पालकसुद्धा स्वस्थ चित्तानं भाषणं ऐकून घ्यायच्या मानसिकतेत नसतात म्हणून मुलांच्या कार्यक्रमाच्या आधी अध्यक्षीय कार्यक्रम. कार्यक्रम सुरू होईपर्यंत रंगमंचाच्या मागे ते ‘स्नेहसंमेलन’ आहे की ताण-मोजमापन, असा प्रश्न पडू शकतो. काही मुलं रडवेली, काही कंटाळलेली, कोणा राजाला मुकुटाची जर टोचते, तर कोणा ससुल्याचे कान खाली सरकून डोळ्यावर येत असतात. ताटकळण्याचा अनुभव घेतच कार्यक्रम सादर करायचा अशी सांस्कृतिक परंपरा जणू तयार झालेली. कोणालाच त्यात काही खटकत नसावं.

या सदराच्या सुरुवातीच्या लेखामध्ये (‘एक काडी निरागसतेची’- १८ जानेवारी) उल्लेख केलेल्या समाजमान्य अशा ‘फॅन्सी ड्रेस’सारख्या लहान वयातील अयोग्य स्पर्धा, तसाच हा प्रकार. ताणरहित नाचावं, बागडावं असा बालपणीचा काळ. तिथे सादरीकरणाचा अवास्तव आग्रह. त्याला जोडून आपसूक तयार झालेली पालक, शिक्षक, सगळ्यांना ओढून घेणारी चिंतेची मालिका. इथून परत फिरायचं आहे. निश्चिंत पाखरं चहूबाजूला विहरायला आपण ‘निमित्तमात्र’ होऊ शकतो. आपण शिक्षण संस्थांशी जोडलेले असू तर सुरुवात विशिष्ट वयाला साजेसे, योग्य तेवढेच उपक्रम निवडून होऊ शकते. कार्यक्रमांची गर्दी कमी केली की शिकण्याच्या प्रक्रियेत पूर्णपणाने बुडून जाता येईल. स्वस्थतेकडे शिक्षक आणि विद्यार्थी वळू शकतील.

घराघरात निवांतपणा जपायला, निखळ जगणं सहज मुरायला रोजच्या जगण्यातल्या बारीकसारीक गोष्टींचा विचार या सदरातील विविध लेखांतून अनेकदा केला. अनिताचं आमंत्रणाशिवाय कोणाला सहज भेटणं वा सुनीलनं ठरवल्याप्रमाणे सलग काही वेळ तरी मुलाला स्वस्थ बसू देणं म्हणा किंवा गृहपाठ, स्पर्धा, यापलीकडे सायलीचं मुलाबरोबर कोणतीतरी गोष्ट मिळवण्यासाठी नव्हे, तर सहज एकत्र असणं म्हणा. अशा वरवर साध्या वाटणाऱ्या सवयी जेव्हा नित्याच्या होतील तेव्हा निश्चिंतता जवळ येईल. मृदुलाचं काही अनावश्यक बाबी सोडून देणं, परिस्थितीनं हताश न होता पुष्करचं साधे पर्याय शोधणं, असं होत गेलं तर त्यांना चिंताजनक अवस्थेतून बाहेर कसं यायचं याची आशादायी वाट सापडायला लागेल.

बाहेरच्या जगातला कोलाहल झेलून घरी परतण्याची ओढ तर हवीच. आजचा थकवा घालवणारी नि उद्याची धावपळ पेलायला बळ देणारी निश्चिंतता घरून मिळायला हवी. ‘घरपण’ अनुभवणं हा निश्चिंत होण्यासाठी पाया आहे. आबालवृद्धांसाठी घर हे कायम ऊर्जेचा मूलस्रोत राहायला हवं. वृक्ष डेरेदार बहरला, फांद्या पसरल्या तरी पोषण मुळांमधून होतं. सामान्य नागरिकांचं रक्षण करणारं सैन्य, रुग्णांना नवजीवन देणारे वैद्यक क्षेत्रातले तज्ज्ञ, अशा इतरांचा आधार बनणाऱ्या मंडळींनाही समाजासाठी निश्चिंतपणे झोकून देण्यासाठी घरचा आधार लागतो. ‘करोना’शी सामना करताना आणि त्याच काळात देशाच्या सीमेवर युद्धजन्य परिस्थिती ओढवून संरक्षणाची गरज निर्माण झाली तेव्हा आपण याचा प्रत्यय घेतला. ‘निर्भय कणखरपणा’(६ जून) या लेखात अशा कुटुंबांच्या धाडसाची दखलही घेतली. हक्काच्या, जिवाभावाच्या, पडद्यामागच्या व्यक्तींच्या अमर्याद साथीमुळे, निस्सीम प्रेमामुळे एखाद्या विषयाला आयुष्य वाहून घ्यायला काही जण सहज तयार होतात. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ापासून संशोधन, समाजकार्य, कला, साहित्य अशा अनेक क्षेत्रांत मोलाचं योगदान दिलेल्या अनेक व्यक्ती या ठिकाणी आपल्या नजरेसमोर तरळून जातील. त्याचबरोबर या ध्येयवेडय़ा व्यक्तींचे तितकेच समंजस कुटुंबीय स्मरतील. परस्परस्वातंत्र्याचा आदर करत (‘निकोप स्वातंत्र्य’,    १५ ऑगस्ट) एकमेकाला निश्चिंतता देण्यासाठी संवेदनशील, तत्पर असणं, कुटुंबाचं एकत्र वाढणं, हे आपल्या घरटय़ाचं अंगभूत वैशिष्टय़ बनवू.

‘करोना’मुळे आलेल्या टाळेबंदीच्या काळात अचानक ‘ऑनलाइन’चं पेव फुटलं. वरचेवर पडद्यावर दृश्य, माध्यमांत एकमेकांसमोर बोलणं, यात घराचा ‘स्टुडिओ’ झाल्यासारखं भाग्यश्रीला वाटायला लागलं. पण त्यासाठी रेषा कुठे आखायची हे तिनं वेळीच ठरवलं. काळाची गरज म्हणून आवश्यक ते काम या माध्यमातून केलं, त्याचबरोबर दृश्य माध्यम वापरणाऱ्या सगळ्यांकडे दरवेळी ठरावीक प्रमाणात प्रकाशयोजना कशी असेल? स्वयंपाकघर म्हटल्यावर विविध आवाज हे स्वाभाविक! असं जिवंत घरपण स्वीकारलं. दिखाव्यासाठी आकर्षक घर, लोकप्रियतेसाठी पाळणाघरातला डामडौल, शिक्षण संस्थेच्या ‘क्रमांक एक’च्या मानांकनासाठी रचना, बाजारात टिकाव लागावा याकरिता कामाच्या ठिकाणची स्पर्धा, हा दिशाभूल करणारा रस्ता आहे. मुळातून या व्यवस्थांचा मुख्य हेतू मनुष्याच्या आयुष्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी! मनुष्यानंच स्वत:च्या गरजा ओळखून यांसारख्या यंत्रणा तयार केल्या. घरात मोकळं वातावरण, पाळणाघरात मुलांसाठी विविध सोयी, आनंददायी शिक्षण, कामाच्या ठिकाणी निरोगी स्पर्धा, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, रुग्णालयात दक्षता, हे हवं. कशासाठी? या सगळ्याची उत्तरं मनुष्य-स्वास्थ्य या टोकाला जाऊन मिळतील. हरवत चाललेला अस्सल माणूस आणि माणूसपण जिवंत राहाण्यासाठीची ही तगमग. धडपड वाटली तरी ती शांतता, समाधान, निरामयतेकडे वळण्यासाठीचीच आहे.

माणूसपणाला प्राधान्य देण्याची सुरुवातही घरापासून करायला हवी. आपण एकमेकांसाठी पुरेसं उपलब्ध असणं, आवश्यक तो वेळ अटीतटींशिवाय देऊ शकणं, एकमेकांचे ताण हलके करायला मानसिक आधार देणं, याची गरज ‘नि:शंक ऐकणं’(२९ फेब्रुवारी), ‘निचरा एक निकड’

(१२ सप्टेंबर) या लेखांमधून जाणली आहे. वेगवेगळ्या वयात आणि वेगवेगळ्या परिस्थितीत चिंतेची, अस्वस्थतेची रूपं भिन्न असतात. रेल्वेतून प्रवास करताना मधल्या स्थानकावर गाडी थांबली म्हणून बाबा पाणी भरायला गाडीतून बाहेर पडला तेव्हा छोटय़ा कुणालचा जीव कासावीस होऊन गेला. ‘‘गाडी इथं दहा मिनिटं थांबते. आपण वेळ लावू या. दहा मिनिटं पूर्ण झाल्याशिवाय गाडी सुरू होणार नाही. बाबा त्याआधी परत येणार आहे.’’ अशा आईनं काढलेल्या आश्वासक समजुतीची कुणालला गरज होती. तेव्हा तो निश्चिंत होऊ शकतो. अशा वेळी रडू नको म्हणून ओरडून कसं चालेल? अवास्तव महत्त्व देऊ केलेलं स्पर्धेचं शैक्षणिक वातावरण हा मुलांसाठी स्वाभाविकपणे पेलता येणारा ताण नाही, हे आपण ‘निसर्गनियम’ (७ नोव्हेंबर) या लेखात पाहिलं आहे. अशा वेळी पालकांच्या खंबीर पाठिंब्यानं मुलं मिळेल ते यश, अपयश पेलायला निश्चिंतपणे सामोरी जाऊ शकतील.

‘करोना’च्या टाळेबंदीच्या काळात काही लोकांना समुपदेशनातून मदत करायची मला संधी मिळाली. अनिश्चिततेमुळे आलेल्या परिस्थितीत काही जण जणू ग्वाही शोधत होते. कोणाच्या घरचं एखादं कोणी परदेशी अडकलेलं, एखाद्या घरी नात्यातले ताणतणाव वाढून मुलांची कुचंबणा झाली तरी मोठय़ांना त्याचं गांभीर्य वाटलेलं नव्हतं. कुमार वयातल्या मुलांशी अशा प्रसंगात बोलणं त्यांना दिलासा देणारं होतं. आपल्याला कोणी समजून घेणारं आहे, हे या काळात मुलांना निश्चिंततेजवळ नेणारं होतं.

या सदरातील विविध लेखांमधल्या महत्त्वाच्या ओळीसुद्धा काही वाचकांना निश्चिंत अनुभव देऊन गेल्या याचं समाधान आहे. त्या-त्या वेळी वाचकांना जाणवलेली सकारात्मकता, आशा, वाचकांनी त्यांच्या प्रतिक्रियांमधून भरभरून व्यक्त केली आहे. अडचणींना सामोरं जाताना वाचकांना या लेखनातून कधी वाट सापडली, कधी लेखात दिलेल्या उदाहरणांशी जवळीक वाटली. कोणाला आपला भूतकाळ आठवला, कोणाला भविष्याकडे उमेदीनं बघायची दृष्टी मिळाली. महाराष्ट्रातल्या लहानशा गावापासून भारताबाहेरही पसरलेले मराठी वाचक ‘चतुरंग’ पुरवणी आवर्जून वाचतात ही आश्वासक आणि आनंदाची बाब आहे. ही लेखमाला वाचून कित्येक वर्षांत संपर्क न झालेल्या परिचित व्यक्तींनी परत संपर्क केला. मानसशास्त्रज्ञ, डॉक्टर, शिक्षक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचं या लेखनाला प्रोत्साहन मिळत गेलं. समाज आणि साहित्याची नाळ जोडलेली राहील. लेखनातून मनावर मूलगामी परिणाम करण्याची ताकद अबाधित राहील, यावरचा माझा विश्वास या लेखनानं फिरून एकवार दृढ झाला. माणसा-माणसापर्यंत निश्चिंतता पोहोचत राहावी यासाठी आपण प्रांजळ प्रयत्न करत राहाण्याचं भान ‘निरामय घरटं’ या सदराच्या नियमित, विस्तृत लेखनामुळे माझ्या मनात सतत जागृत राहिलं. या लेखनानं मला अनेक निश्चिंत क्षण दिले. त्याबद्दल सर्वाचे मनापासून आभार.

परग्रहांच्या शोधात अवकाशाला गवसणी घालत यंत्रमानवाबरोबर मानवतेलाही धरून वाढणं अखंड जपू. आधुनिकातलं आधुनिक घरटं बनवण्याची अद्ययावत तंत्रं विकसित करतानाही, स्वत:च्या चोचीनं घरटं विणण्याची पारंपरिक कला जोपासू. आपली पिल्लं निश्चिंत निरामयतेनं नांदावी ही सहजी ऊर्मी भरभरून अनुभवू. त्याबरोबर सैरभैर झालेल्या पिल्लांना कवेत घेऊ. घरटय़ाची उभारणी स्वबळानं करणाऱ्या, कालच्यापेक्षा लांबच्या भरारीची स्वप्नं घेऊन उंच झेप घेणाऱ्या पंखांना निरामय समाधानानं न्याहाळू. नव्या युगातील नव्या दमाच्या पाखरांची आपण निश्चिंत सोबत बनू!

(सदर समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 1:17 am

Web Title: happy home niramay gharta dd70
Next Stories
1 जीवन विज्ञान : अन्न पूर्णब्रह्म!
2 यत्र तत्र सर्वत्र : सर्वत्र.. स्त्री संचार!
3 व्वाऽऽ हेल्पलाइन : ना.शा.ची भाषा
Just Now!
X