07 July 2020

News Flash

कर्मयोगाचा सदरा!

‘कामात तल्लीन होणे’ हा आश्वासक मानसशास्त्राचा पायाचा एक दगडच आहे! आपलं एक मन सारखं आपल्याला सांगतं की, ‘कार्यरत राहू या.’

| August 29, 2015 01:22 am

‘कामात तल्लीन होणे’ हा आश्वासक मानसशास्त्राचा पायाचा एक दगडच आहे! आपलं एक मन सारखं आपल्याला सांगतं की, ‘कार्यरत राहू या.’ तर दुसरं मन म्हणत असतं, ‘कशाला ते मान मोडून काम करायचं? मज्जा करू.’ जे लोक पहिल्या मनाचं ऐकतात ते भावी मन:स्वास्थ्याची बेगमी करत असतात. जे दुसऱ्या मनाचं ऐकतात त्यांच्यावर कासावीस व्हायची वेळ येतेच.
खूप पूर्वी वाचलेली एक बालकथा आठवते. वसंतऋतूचे दिवस. निसर्गात प्रसन्नतेची, हिरवाईची उधळण चालू असते. गवताळ कुरणात इकडून तिकडे बागडणारा एक गवतकिडा आपल्याच मस्तीत टणाटण उडय़ा मारत असतो, मज्जा करत असतो. तेवढय़ात त्याला एक छोटुकली मुंगी अन्नाचा अवजड कण पाठीवर घेऊन जाताना दिसते. तो तिला डिवचतो, ‘‘काय गं, कुठे निघालीस तरातरा एवढय़ा मस्त हवेत? चल माझ्याबरोबर नाचायला!’’ मुंगी न थांबता संथपणे चालत त्याला म्हणते, ‘‘बाबा रे, तुझं नाचगाणं चालू दे खुशाल. मी जर का असं करत बसले तर माझा अन्नाचा साठा कसा होईल? हिवाळा तोंडावर नाही का? तू तरी वेळ इतका का वाया घालवतो आहेस?’’ गवतकिडा तिला झट्कन म्हणतो, ‘‘बावळटच आहेस. खाण्यापिण्याचं काय नंतरही बघता येईल की. आत्ताच्या हवेत मजाच करायला हवी!’’ तो तसाच टणटणत राहतो. मुंगी शांतपणे निघून जाते. थोडय़ाच दिवसांत कडाक्याची थंडी पडते. गवतकिडाचा भुकेनं जीव कासावीस होतो, पण अन्न कुठे साठवलेलं असतं? तेव्हा त्याला लगबगीनं अन्नकण वाहून नेणारी मुंगी आठवते, पण काय उपयोग? खूप उशीर झालेला असतो.ही गोष्ट मला माणसाच्या मनाचीच प्रातिनिधिक गोष्ट वाटते. आपलं एक मन सारखं आपल्याला सांगतं की, ‘चला कशात तरी गुंतवून घेऊ या. कार्यरत राहू या.’ तर दुसरं मन म्हणत असतं, ‘कशाला ते मान मोडून काम करणं? मज्जा करू त्यापेक्षा. आयुष्य उपभोगू किंवा मग आळशीपणानं पडून राहू!’ जे लोक पहिल्या मनाचं ऐकतात ते जणू भावी मन:स्वास्थ्याची बेगमी करत असतात. जे दुसऱ्या मनाचा पगडा स्वीकारतात ते त्या वेळी ‘मज्जेत’ वाटले तरी नंतर त्यांच्यावर कशानं तरी कासावीस व्हायची वेळ येतेच. नुकतंच आपल्याला मनापासून चटका लावून गेलेलं एक महाप्रयाण आपण पाहिलं. आयुष्याच्या ८३ व्या वर्षी व्यासपीठावरून आवडत्या विषयावर तरुणांशी संवाद करता करता एक कर्मयोगी खाली कोसळला. त्यांना कधीच दुसऱ्या मनाच्या लोभस हाका ऐकू आल्या नसतील का? मग कशाच्या बळावर ते इतके ताजेतवाने, प्रफुल्लित आणि कार्यरत राहिले? तर त्यांनी घातलेल्या कर्मयोगाच्या सदऱ्यामुळे! त्या सदऱ्याचा त्यांना कधी जाच झाला नाही. उलट ते वस्त्र स्वत:च्या हातांनी धागा धागा ते ओढत, विणत राहिले!

‘कामात तल्लीन होणे’ हा आश्वासक मानसशास्त्राचा एक पायाचा दगडच आहे म्हणा ना! कामामुळं आपल्या रोजच्या जगण्याला एक चौकट मिळते, अर्थ मिळतो! आणि हे अगदी लहानपणापासूनच आपल्याला जाणवतं बरं का. माझा एक भाचा उन्हाळी सुट्टीच्या आशेवर पूर्ण मार्च आणि एप्रिल ढकलतो. मे महिन्याचे पहिले आठ-दहा दिवस त्याची मुक्त चंगळ चालू असते. त्यानंतर मात्र तो अस्वस्थ होतो, कंटाळतो. साधारण विसाव्या दिवसापासूनच आईला छळायला सुरुवात होते, ‘‘आई, कधी एकदा शाळा सुरू होतेय, असं झालंय! काही तरी करायला तरी मिळेल!’’ त्याची ही ओढ ‘शाळा’ नावाच्या इमारतीबद्दल नसते, तर त्या वातावरणात आपण काही तरी ठोस, उद्दिष्ट असणारं, निर्मितीक्षम करतोय असं वाटणाऱ्या आनंदाची असते.हेच उदाहरण बघा ना! किशोर चांगल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ, ठसा उमटवणाऱ्या नोकरीतून निवृत्त झाले. भरपूर पसा, चौकोनी (पुढची पिढी धरली तर अष्टकोनी!) कुटुंब आणि कसलीही मोठी जबाबदारी नाही. वाटलं होतं इतकी र्वष कष्ट केले, आता मस्त आराम करायचा! काही म्हणून रुटीन आखायचं नाही; पण मग पंधरा-वीस दिवस गेल्यावर एके दिवशी सकाळी उठून आवराआवरी सुरू केली. टापटीप पोशाख घालून कॉलनीच्या दारात उभे राहिले. पूर्वी रोज त्यांना घ्यायला येणारा सव्‍‌र्हिस ड्रायव्हर लांबूनच हात करून निघून गेला. त्यांना एकदम तुटल्यासारखं वाटलं. घरी आले तरी तेच रोजचं पेपरवाचन, नाश्ता, टीव्ही-मोबाइल इत्यादींचं जग! ‘ठोस काहीच नाही घडत हातून’ असं वाटून अजूनच खचायला झालं. सगळं ‘छान-छान’ असूनही मनात ही पोकळी का जाणवते ते कळेना!त्याउलट गोष्ट विश्वासरावांची. व्यवसाय वाढता असूनही दिवसेंदिवस त्याची आर्थिक आणि व्यवस्थापनाची गुंतागुंत वाढली तसं त्यांनी स्वत:हूनच काही गोष्टी पुढच्या पिढीवर सोपवायचं ठरवलं. अर्थातच वेळ जास्त मिळायला लागला. त्यांच्याच परिसरातील एका शैक्षणिक संस्थेच्या वाढत्या पसाऱ्यात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतलं. कधी फारशा वापरल्या न गेलेल्या त्यांच्या संवादकौशल्याला, संघटनवृत्तीला एक चांगलं व्यासपीठ मिळालं. आज विश्वासराव वयाच्या पंचाहत्तरीतही अत्यंत कार्यक्षम आणि समाधानी आयुष्य जगताहेत.‘निवृत्ती वय’ या विषयावर जगभर प्रचंड संशोधन होतंय. आयुर्मर्यादा वाढत आहे, पण नोकरी/नियुक्त कामे करण्याची मर्यादा काहीशी घटतानाच दिसत आहे. त्यामुळे जेवढी वष्रे तारुण्यात ठरावीक कामं ठरावीक पद्धतीनं करण्यात घालवली, जवळजवळ तेवढीच र्वष निवृत्तीनंतर हाताशी मिळताना दिसतात. वयाच्या साठीत पूर्वीच्या जोशानं काम करणं शक्य नसलं तरी पूर्ण रिकामपण खायलाच उठणार! मग नको त्या फालतू गोष्टींचं स्तोम माजवावंसं वाटायला लागतं. एक असुरक्षितता मनाला वेढून राहते. आपलं महत्त्व आसपासच्या लोकांना आक्रमकपणे पटवून द्यावंसं वाटायला लागतं. छोटय़ा छोटय़ा शारीरिक कुरकुरी एकदम जीवन-मरणाच्या वाटू लागतात. (संदर्भ: चित्रपट-पीकू?!) याला सगळ्यात चांगला उतारा म्हणजे स्वत:ला निरुपयोगी न मानता ठरवून एखादं काम स्वत:हून अंगीकारणे, त्याची मजा घेणे. (आणि अन्य कुटुंबीयांनीही ती स्वीकारणे!)अर्थात कर्मरत राहणे आणि ‘वाघ लागल्यासारखं काम करत राहणं’ यात खूपच मोठा फरक आहे. कामं कधी एकदा पूर्ण होतायत, एखादे वेळी काम न करता स्वस्थ बसणं म्हणजे महापाप, एकाच वेळी भरमसाट कामं ओढवून घेणं म्हणजे आपण खूप व्यग्र आहोत असं मानणं, यातून कुठला आनंद मिळणार? कामातला आनंद एखाद्या रागासारखा जमत जातो. आधी संथ लय- मग मध्य- मग द्रुत लय आणि एखादी लपेटदार तान घेऊन समेवर येण्यासारखं ते संपवणं आणि पुढची मफल सुरू होण्याआधी झालेल्या मफलीतले सूर मनात ताजे करणं!कामात रमणं आणि ‘नोकरी’ किंवा ‘अर्थार्जन’ याचा नेहमी संबंध असेलच असं नाही. फारच थोडय़ा सुदैवी आणि स्वत:च्या आयुष्याचं उत्तम नियोजन करूशकणाऱ्या लोकांना असा राजमार्ग मिळतो; पण त्यापलीकडे ही आपल्या प्रत्येक कृतीकडे पाहाताना ती अधिकाधिक मनापासून, आनंद देणारी कशी होईल हे समजून करणं शक्य असतं. कामात जितकं वैविध्य जास्त तेवढं ते जास्त ऊर्जा पुरवणारं होतं. एकाच प्रकारचं/एकसुरी काम कितीही कळीचं/ महत्त्वाचं/ अत्यावश्यक असलं तरी त्यामुळे मेंदूला एक प्रकारचा शिणवटा जाणवायला लागतो. सुरुवातीला इंटरेस्टिंग वाटलेल्या कामाची मजा नंतर आटल्यासारखी वाटते. ‘मॉडर्न टाइम्स’ या चार्ली चॅप्लिनच्या प्रसिद्ध चित्रपटात दिवसभर सारखे नट आणि स्क्रू पिळत राहणाऱ्या माणसाला त्याचा कसा ‘ओव्हरडोस’ होतो त्याचे मजेदार चित्रण आहे. कधी कधी कामाचा काही भाग आपल्याला खूप छान, निर्मितीचा/ सेवेचा/ कर्तव्याचा आनंद देणारा वाटतो, तर त्याच कामाचा काही भाग थकवणारा, कंटाळवाणा किंवा आपला नसणारा ((not my cup of tea) वाटतो. जसं छानसं आइस्क्रीम खाताना थंडावा वाटतो, पण ‘कॅलरीज’ नको वाटतात तसं! थंडावा आणि कॅलरीज या त्या अनुभवाचा अभिन्न भाग असतात हे लक्षात घ्यायला हवं. जो कंटाळवाणा, नकोसा वाटतो त्यात वैविध्य आणता येईल का, काही गोष्टी ‘खऱ्याखुऱ्या’ (फार चिकित्सा न करता) दुसऱ्यांवर सोपवता येतील का? असा विचार केला, तर कामाचा ‘भार’ कमी वाटायला लागतो, असं अनेक व्यवसाय अभ्यासक मांडतात.स्त्रियांसाठी तर हे खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा अगदी पूर्णवेळ गृहिणी ‘थँक्सलेस जॉब’ करत असतात. ते गरजेचं असतं, त्यांना मनापासून आवडतंही, पण कालांतरानं त्यात रटाळपणा, एकसुरीपणा येऊ शकतो. बेटी फ्रीडन या स्त्रीवादी कार्यकर्तीने स्वत: हा अनुभव घेतला. ‘‘रोज रात्री पलंगावर पाठ टेकताना आज मी काय केलं असं आठवते आणि उत्तर येतं, काहीच तर नाही! त्यानंच मी खचून जाते.’’ असं सांगताना त्यांनी याला एक नेमकं नाव दिलं, Problem which has no name!   वेगळी क्षितिजं शोधायची, जगण्याच्या उद्दिष्टांचा पुनर्विचार करण्याची हीच वेळ असते. ‘बौद्धिक हालचाल’ बंद पडते आहे, हा धोक्याचा लाल दिवा दाखवणारी ही वेळ! अशा वेळी मूळ ढाचा स्वत:ला/ इतरांना त्रासदायक होण्याइतका न बदलताही खूप काही शोधता येतं. स्वत:च्या मूळ क्षमता, कौशल्य यांना धार लावणारे अनुभव मुद्दाम घ्यावे लागतात आणि हे फक्त गृहिणीला लागू नाही. करियरच्या कुठल्या तरी टप्प्यावर भल्याभल्यांना हा किडा पोखरू लागतो तेव्हा अर्धविराम घेत, जगण्यातल्या छोटय़ा सापटी (niche) शोधत कर्मरत राहण्याचं समाधान मिळवता येतं. ते निर्मितीतून/ अभ्यासातून/ सेवेतून/ संघटन कामातून/ भटकण्यातून/ कशातूनही येतं. मात्र निवड आपली आपणच करायला हवी. मग वय, प्रकृती, कुटुंबातील जबाबदाऱ्या, वेळ असे मुद्दे आपसूकच मागे पडतात.
० अश्विनीनं पस्तिसाव्या वर्षी स्वत:चं मोमेंटो डिझाइन युनिट सुरू केलं. छंद म्हणून सुरू केलेल्या कामात आज ती पंचवीस जणांना सामावून घेत आहे.

० शहादे सरांनी निवृत्तीनंतर वृत्तपत्रात ‘प्रतिसाद’ सदरात लेखन सुरू केलं. त्यानिमित्तानं अनेकांचा परिचय झाला, विषय अभ्यासले गेले.

०     मोहननं स्वत:ची सर्जरीची प्रॅक्टिस सांभाळताना काही साहाय्यकांना प्रशिक्षित केलं आणि स्वत: जवळच्या एका सेवाभावी रुग्णालयासाठी आठवडय़ातले तीन दिवस नाममात्र शुल्कावर काम चालू ठेवलं.

०     विजयाताईंनी थ्री डी ओरिगामी शिकून जवळ जवळ एक हजार वेगवेगळे नमुने तयार केले आणि अनेक शिबिरांतून मुलांना करून दाखवले, शिकवले.

०     सुयोगचं मन आयटीमध्ये रमेना म्हणून त्यानं मानसशास्त्राचं शिक्षण घेतलं आणि मुक्त प्रशिक्षक/समुपदेशक म्हणून काम सुरू केलं !

०     सुरेशराव नव्वदीला पोचलेत तरी त्यांनी रोज किमान दहा लोकांना पोस्टकार्डवर काही ना काही पॉझिटिव्ह लिहून पाठवायचं व्रत चालू ठेवलं आहे.

मानवी संपत्ती (हय़ूमन कॅपिटल) हा शब्द सध्या उद्योगविश्वात खूप कळीचा मानला जातो. सर्वच क्षेत्रांना तो लागू आहे. प्रत्येकाची ही संपत्ती अमर्याद असते. सोन्याला जेवढं तापवू तेवढं ते झळाळून उठतं. या उक्तीनुसार स्वत:च्या क्षमता-कौशल्य जितक्या विविध प्रकारे आपण शोधू- तासू स्वत:बरोबर इतरांसाठी निरपेक्षपणे वापरू तेवढी त्यात वाढच होत जाते. मग तुम्ही सोळा वर्षांचे युवक-युवती असा किंवा पंचाहत्तरी उलटलेले ज्येष्ठ नागरिक! काम जेव्हा तुमची आतली गरज बनतं तेव्हा ते खूप समाधान देतं. मग त्यासाठी थोडे जास्त श्रम/ धोके/ धावपळ झाली तरी निभते.माझ्या सासऱ्यांची मोठी हृदय शस्त्रक्रिया त्यांच्या वयाच्या पासष्टाव्या वर्षी झाली. त्यापूर्वीपासूनच ते शिक्षण क्षेत्रात/ सामाजिक कामात खूप गुंतलेले होते. देशभर प्रवास करायचे. स्वाभाविकच शस्त्रक्रियेनंतर आम्ही कुटुंबीयांनी त्यांच्यावर बंधनं आणायला सुरुवात केली. ते वैतागले. त्यांच्या स्वभावाप्रमाणे वैताग मनात ठेवायला लागले, पण कधी तरी नकळत तो अप्रत्यक्षपणे त्यांच्या डॉक्टरांपर्यंत पोचला. त्यांनी अक्षरश: आम्हाला एकत्र बोलावून सांगितलं, ‘‘ही शस्त्रक्रिया त्यांना त्यांचं आवडतं काम करता यावं म्हणूनदेखील केली आहे. खाण्यापिण्याची किमान पथ्यं पाळली म्हणजे झालं. तुम्ही कुणीही त्यांना अमकीकडे जाऊ नका- तमकं काम करू नका सांगायचं नाही. ते कामच त्यांचा श्वास आहे!’’ आणि खरंच गेली ५/६ र्वष सोडली, तर जवळ जवळ ऐंशीव्या वर्षांपर्यंत त्यांचं काम- वाचन/ चिंतन/ लोकांशी बोलणं अव्याहत सुरू होतं! कारण कुठलंही काम तुमची आतली साद बनू शकतं आणि कुठलीही साद तुम्हाला तुमचं काम दाखवू शकते. मग तो अनिल अवचटांच्या कथनातील चिवडेवाला असो किंवा ऐन तारुण्यात परदेशातली लठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारताच्या ऊर्जा प्रश्नाची तड लावू पाहाणारा ‘स्वदेस’ चित्रपटातील मोहन भार्गव असो. आपण आपलं काम शोधू या आणि अव्याहतपणे करू या-नाही का?
डॉ. अनघा लवळेकर -anagha.lavalekar@jnanaprabodhini.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2015 1:22 am

Web Title: hard working is success key
टॅग Chaturang,Loksatta
Next Stories
1  कृतज्ञ मी! कृतार्थ मी!
2 आशा उद्याची
3 कशासाठी? पोटा (नोटा)साठी…
Just Now!
X