19 September 2020

News Flash

चित्रकर्ती : रुक्ष वाळवंटातील ‘हरीजरी’

पाबीबेन यांनी  ‘पाबीबेन डॉट कॉम’ हा ब्रँड तयार करत शंभरहून अधिक प्रकारच्या पर्स डिझाईन केल्या आहेत.

काळानुरूप हे भरतकाम आता मशीन वापरूनही केलं जातं, त्यामुळे ते अधिक गतीनं पूर्ण होतं.

प्रतिभा वाघ – plwagh55@gmail.com

चौथी शिकलेली रबारी जमातीतली  एक सामान्य स्त्री. हातातली कला पारंपरिकच; पण त्याला आपल्या सर्जनशील नजरेनं ‘हरीजरी’ करणाऱ्या आणि त्यातून देशपरदेशात पोहोचवणाऱ्या पाबीबेन. कच्छमधल्या छोटय़ाशा गावातून बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्येही आपल्या कलेची छाप पाडणाऱ्या पाबीबेन यांनी  ‘पाबीबेन डॉट कॉम’ हा ब्रँड तयार करत शंभरहून अधिक प्रकारच्या पर्स डिझाईन केल्या आहेत. गावातल्या स्त्रियांना त्याचं प्रशिक्षण देत त्यांना त्यांच्या पायावर उभं करणाऱ्या या चित्रकर्तीविषयी-

दूरवर पसरलेलं वाळवंटाचं पांढरट पिवळसर रंगाचं पटल. अधूनमधून खजुराची, बाभळीची झाडं. झाडाच्या सावलीत बाजा टाकून गप्पा मारत बसलेले पांढऱ्याशुभ्र वेशातले पुरुष. गवताचं छप्पर असलेली शंकूकार ‘भुंगा’ घरं, त्यांच्या शुभ्र भिंती, भिंतीवरील आरसे बसवलेलं ‘लिपन’ – अर्थात नक्षीकाम आणि दुपारच्या वेळात घराच्या दारात आणि अंगणात बसलेल्या, भरतकाम करणाऱ्या रबारी स्त्रिया.. ही झाली त्यांची पारंपरिक ओळख. पण यातल्याच काही जणींनी या भरतकामाच्या कलेला थेट देशपरदेशात लोकप्रिय केलं आहे. त्यातलीच एक पाबीबेन..

पाबीबेन कच्छमधील ‘रबारी’ या भटक्या जमातीमधली. ‘रबारी’ म्हणजे जे बाहेर राहातात ते. त्यांना ‘रेवारी’ किंवा ‘देसाई’ या नावानंही ओळखलं जातं.  पुरुष पशुपालनाचा व्यवसाय करतात, तर स्त्रिया घरकाम, संसार सांभाळून भरतकाम करतात. हातानं के लेल्या भरतकामाला त्यांच्याकडे पारंपरिक पाश्र्वभूमी आहे. आपल्याकडे लग्नात जसं रुखवत मांडतात, तसा त्यांच्याकडे ‘दहेज’ मांडत असत.  ही प्रथा आता थांबवली गेली आहे. या ‘दहेज’मध्ये नवऱ्यामुलींनी स्वत: हातानं भरतकाम केलेले घागरो-कंचाली (घागरा-चोळी), केडियन (नवऱ्या मुलाचा कुर्ता), घरासाठी तोरण, प्राण्यांसाठी झूल, ब्लँकेट, गोधडय़ा, लहान मुलांचे कपडे, असे अनेक प्रकार मांडले जात. मुलींची लग्नं लहान वयात होत. दहेजमध्ये सर्व वस्तू नसतील, तर त्या पूर्ण करण्यासाठी तिला पुन्हा माहेरी पाठवलं जाई. ती अपूर्ण दहेज पूर्ण करून सासरी परत येई. या प्रथा-परंपरेमुळे मुलींची वयं वाढू लागली. त्यामुळे कच्छमधल्या पंचायतींमधील बुजुर्ग मंडळींनी १९९० मध्ये ही प्रथा बंद करण्यास भाग पाडलं. हे अत्यंत स्तुत्य असलं तरी त्याचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे त्यांची कला प्रदर्शित करण्याचं सक्तीचं ठिकाण नाहीसं झालं. अर्थात चांगली गोष्ट म्हणजे रबारी भरतकामाच्या परंपरेचा प्रवास ‘आईकडून मुलीकडे’ अजूनही सुरूच आहे; पण काळानुरूप हे भरतकाम आता मशीन वापरूनही केलं जातं, त्यामुळे ते अधिक गतीनं पूर्ण होतं. रबारी भरतकामातले नक्षीचे आकार मोठे असतात. पूर्वी यात वापरण्यात येणारे छोटे आरसे (आभला) घरातच भट्टीमध्ये तयार करत. आता ते कारखान्यातून विकत आणले जातात. या प्रकारच्या भरतकामात छोटय़ा छोटय़ा आरशांचा वापर केला जातो. नाजूक टाक्यांसाठी हे भरतकाम प्रसिद्ध आहे. आरशांबरोबर साखळी टाका बाह्य़ आकाराला वापरून कापडाला एक वेगळं सौंदर्य आणलं जातं.

कच्छमध्ये सोळा प्रकारचं भरतकाम केलं जातं. सिंध आणि राजस्थानपासून त्यांना प्रेरणा मिळाली. एकच सौंदर्याकार ते घागरा वा लेहंगा यावर पुनरावृत्त करतात. आरसे लावून देठाच्या टाक्यानं त्याचा बाह्य़ाकार बनवतात. धावटीप, भरीव टाका, काजाचा टाका हे टाके वापरतात. कच्छपासून राजस्थानपर्यंत राहणाऱ्या रबारी जमातीच्या भरतकामाच्या शैलीत भौगोलिक स्थितीनुसार कपडय़ांचे रंग, आरशांच्या आकारातली विविधता, मोती, लटकन, कवडय़ा, बटणं यांचा वापर, अशी विविधता दिसते. जशी मैलामैलावर भाषा बदलते तसंच काहीसं इथंही दिसतं. रबारी भरतकामाचे विषय ग्रामीण जीवनाशी संबंधित आहेत. दैनंदिन जीवनातले प्रसंग- पाणी आणणाऱ्या स्त्रिया, रबारी समुदायाच्या कथा, वाळवंटाशी संबंधित वातावरणातले प्रसंग इत्यादी गोष्टी स्त्रिया कापडावर आणि पुरुष चामडय़ावर नक्षीकामाच्या स्वरूपात उतरवतात. आरसा कापडावर गुंफण्यासाठी घातलेल्या टाक्यांच्या प्रकारावरून विशिष्ट जमातीनं केलेलं भरतकाम ओळखू येतं.

काळानुरूप ही कला अधिक वेगवान बनवली ती पाबीबेन रबारी या चित्रकर्तीनं. तिनं ‘हरीजरी’ हा कला प्रकार अस्तित्वात आणला- म्हणजे पूर्वी हातानं के ली जाणारी कलाकृती बाजारात आयत्या मिळणाऱ्या शोभिवंत, नक्षीदार कापडी पट्टय़ा, रिबन्स, पायपिन्स आणून मशीनच्या साहाय्यानं शिवून तयार करणं. या प्रकारातल्या तिच्या बॅगा या ‘पाबी बॅग’ म्हणून प्रसिद्ध झाल्या. अगदी बॉलीवूड आणि हॉलीवूडमधल्या मंडळींनीही तिच्या डिझाईन्सना दाद दिली. ही पाबीबेन अवघी पाच वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. आईनं मोलमजुरी करून तीन मुलींना चौथीपर्यंत शिकवलं. पाबी भावंडांच्यात सर्वात मोठी. लहान भावंडांना सांभाळून ती घरकाम करी आणि पाणी भरण्यासाठी लोकांच्या घरी जाई. पूर्ण दिवसभराचं पाणी भरून दिलं की १ रुपया मजुरी मिळत असे. आपल्या आजी आणि आईकडून ती भरतकाम शिकली. गावात भरतकाम करणाऱ्या स्त्रियांच्या गटात तिला काम मिळू लागलं; पण तरीही तिला एक खंत होती. ती म्हणजे बिगरशासकीय संस्था आणि मोठे व्यापारी आपल्याकडून काम करून वस्तू नेतात, पण त्यात कारागीराचं नाव कुठेच येत नाही. त्या-त्या व्यापाऱ्याचंच नाव येतं. पण एका घटनेनंतर ही खंत दूर झाली. पाबीबेनच्या विवाह सोहळ्यात अमेरिके हून एक परदेशी पाहुणी आली होती. आलेल्या पाहुण्यांना भेट म्हणून पैसे किंवा कपडे द्यायची रबारींची परंपरा आहे. या पाहुणीला काय द्यावं, असा प्रश्न पाबीबेनला पडला. तिनं ‘दहेज’मध्ये मांडलेली एक बॅग त्या पाहुणीला दिली. अमेरिके तल्या अनेकांना ती बॅग प्रचंड आवडली. साहजिकच आपल्या पुढील भारतभेटीत तिनं पाबीबेनकडून अशा अनेक बॅगा विकत घेतल्या. आज तीच बॅग ‘पाबी बॅग’ म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे; देशात आणि परदेशातही!

विवाहानंतर तिच्या पतीनं- लक्ष्मणभाई रबारी यांनी पाबीबेनला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा आग्रह सुरू केला. आपल्या समाजातल्या स्त्रियांनाही याचा फायदा मिळेल, या आश्वासनानंतर तिनं २०१५ मध्ये २० हजार रुपये गुंतवून मशीनवर ‘हरीजरी’चा वापर करून सुंदर पर्स बनवल्या.  त्या इतक्या उत्कृष्ट होत्या, की सत्तर हजार रुपये किमतीच्या वस्तूंची पहिली मागणी आली आणि पाबीबेनचा उत्साह वाढला. तिनं हळूहळू प्रदर्शनं भरवण्यास सुरुवात केली. आठ महिने काम आणि चार महिने विविध ठिकाणी प्रदर्शनं. पाबीबेनच्या मते सुंदर, कलात्मक वस्तू बनवणं ही जशी कला आहे, तसंच वस्तू विकणं हीसुद्धा कला आहे. त्यासाठी तिला मार्गदर्शन हवं होतं.  सहकार आणि विकास विभागामधील नीलेश प्रियदर्शी यांनी तिला सहकार्य केलं. ते आपल्या १८ वर्षांच्या अनुभवाचा उपयोग करत काही प्रकल्पांद्वारे  खेडेगावातल्या लोकांचं राहणीमान सुधारत आहेत. पाबीबेन रबारी आणि नीलेश प्रियदर्शी यांनी आता ‘कारीगर क्लिनिक’ सुरू केलं आहे. तळागाळातल्या कारागीरांना येणाऱ्या समस्या दूर करण्याचं काम या क्लिनिकमध्ये होतं. आलेल्या कारागीरांना त्यांना हव्या असलेल्या किमतीत माल विकता यावा यासाठी योग्य किंमत ठरवायला मदत केली जाते. दोन ते पाच र्वष त्यांना सतत संपर्कात ठेवून वार्षिक उलाढाल कमीत कमी पाच लाख रुपयांपर्यंत नेण्याची त्यांची क्षमता झाल्यावर त्यांना स्वतंत्रपणे व्यवसाय करायला उत्तेजन दिलं जातं. व्यवसाय करताना आवश्यक असलेल्या बाबी- म्हणजे व्यवसायाबद्दलची चाचपणी, डिझाईन, विपणन, लेखा अहवाल यासंबंधीचं, तसंच आर्थिक आणि सामाजिक दर्जा सांभाळून पुढे सातत्यानं व्यवसाय सुरू राहावा यासाठीचं मार्गदर्शन कारीगर क्लिनिकमध्ये दिलं जातं. पारंपरिक कला जपून त्यामधून व्यवसायाच्या संधी निर्माण करण्यासाठीच्या योजना आखण्याचं काम नीलेश करतात. हे सारं विनामूल्य असतं.

स्त्रिया गावात मोलमजुरीच्या कामाला गेल्यावर काम पूर्ण झालं, की पुन्हा नवं काम मिळेपर्यंत खंड पडतो; पण पाबीबेन सातत्यानं त्यांना काम देत असते. लोकांनी आपलं गाव सोडून कामासाठी दुसरीकडे जावं हे तिला पटत नाही. तिच्याकडे आता साठ स्त्रिया काम करतात. तिनं स्वत:चा ‘ब्रँड’च तयार केला आहे. ‘पाबीबेन डॉट कॉम’ (www.pabiben.com) ही त्याची ओळख. संपूर्ण जगभर ‘पाबी बॅग’, ‘पाबी पर्स’ प्रसिद्ध झाल्या आहेत. शंभरहून अधिक प्रकारच्या पर्स तिनं डिझाईन केल्या आहेत. ती या स्त्रियांना प्रशिक्षण देते, माप देते आणि कामाचा दर्जा उत्तम राहावा, काम नीटनेटकं असावं, यावर ती भर देते. नमुना दाखवून त्यानुसारच वस्तू बनवायला सांगते. स्त्रियांना पैशासाठी संघर्ष करण्याची वेळ येऊ नये, असं तिला मनापासून वाटतं. मूळची अंजर तालुक्यातील भादोरी गावची पाबीबेन आता कु कडसर गावात राहते आणि ‘पाबीबेन डॉट कॉम’च्या माध्यमातून एक प्रकारे जगभर संचार करते.

पाबीबेनला मिळालेले पुरस्कार आणि प्रसिद्धी हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. तिचा इंग्रजी माध्यमात शिकलेला मुलगा तिला तिच्या प्रगतीच्या दृष्टीनं उपयोगी पडतील अशा गोष्टी संगणकावर दाखवत असतो. दिल्ली, मुंबई आणि परदेशातही २० ते २२ ठिकाणी तिच्या कलात्मक वस्तू विक्रीसाठी जातात. ‘द अदर एन्ड ऑफ द लाइन’ या इंग्रजी आणि झोया अख्तर दिग्दर्शित ‘लक बाय चान्स’ या हिंदी चित्रपटासाठी तिनं डिझाईन केलं आहे. ‘सुई धागा’ या चित्रपटासाठीही तिनंच के लेला ‘लोगो’ वापरण्यात आला आहे. २०१३ मध्ये अमेरिके तील ‘सान्ता फे फोक आर्ट फेस्टिवल’मध्ये तिला आमंत्रण होतं. व्हिएतनामी कारागीराच्या कार्यशाळेत तिचा सहभाग होता. ‘हरीजरी’ निर्मितीसाठी अनेक सत्कार, पुरस्कार तिला मिळाले. चोवीसावा ‘जानकीबाई बजाज पुरस्कार’ तिला २०१६ मध्ये मिळाला. ‘क्वालिटी मार्क पुरस्कार’ही मिळाला. ‘इंटरनॅशनल बायर-सेलर मीट’ (अहमदाबाद) येथे तिला आमंत्रण होतं. कच्छची ‘ब्रँड अ‍ॅम्बॅसडर’ म्हणून निवड झालेली पाबीबेन हे रुक्ष वाळवंटातलं एक रंगीबेरंगी वा ‘हरीजरी’ व्यक्तिमत्त्वच आहे.

पारंपरिक वेश परिधान करून देशपरदेशात आत्मविश्वासानं वावरणाऱ्या पाबीबेनचं आदरयुक्त कौतुक वाटतं. ती म्हणते, की आज आमच्या परिसरातल्या ६० स्त्रिया हा व्यवसाय करत आहेत. त्यांची संख्या ५००  झाली पाहिजे. अशा ५०० ‘पाबीबेन’ तयार झाल्या पाहिजेत आणि प्रत्येक पाबीबेननं आपला संघ तयार करून स्त्रियांना आत्मनिर्भर बनवायला पाहिजे. हा विचार इयत्ता चौथी शिकलेल्या, खेडेगावातल्या चित्रकर्तीचा आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवणारी, प्रचंड मेहनत घेणारी आणि आपल्यासह इतरांच्या प्रगतीचा विचार करणारी पाबीबेन के वळ रबारी जमातीच्याच नव्हे, तर सर्वच स्तरांतल्या भारतीय स्त्रियांना प्रेरणा देणारी आहे.

विशेष आभार- नीलेश प्रियदर्शी, कच्छ- गुजरात

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2020 12:49 am

Web Title: harijari ladies purse pabiben kutch art and crafts chitrakarti dd70
Next Stories
1 महामोहजाल : ‘सोशल’ युगातल्या ‘ट्रोलधाडी’!
2 सायक्रोस्कोप : सुखनिवास
3 न्यायालयाचे न्याय्य पाऊल
Just Now!
X