ती एक ‘हसीना’. नावाने आणि दिसायला, स्वभावालाही. पण एका सैतानाच्या क्रूरतेने तिच्या वाटय़ाला आलं वेदनादायी, नरकयातनांचं कुरूप जग. दहा वर्षे बिछान्याला खिळलेल्या आणि ३५ शस्त्रक्रिया सहन केलेल्या हसीनाने आता सुरू केलाय संघर्ष स्वत:साठी आणि तिच्यासारखं जिणं वाटय़ाला आलेल्या अनेकजणींसाठीही! तिच्याच नव्हे तर असंख्य हसीन चेहऱ्यांना गालबोट लावणाऱ्यांच्या विरोधात लढा लढणाऱ्या धाडसी हसीना हुसैनविषयी..
‘हसीना हुसैन’. ईशान्य बंगळुरूमधील जालनहळ्ळी भागात राहणारी अठरा-एकोणीस वर्षांची देखणी, उत्साही मुलगी!  फॅशन डिझायनर बनण्याचे स्वप्न उराशी घेऊन त्या दिशेने धडपड करणारी आणि सोबतच वाणिज्य शाखेतील पदवीला प्रवेश घेतलेली निरागस युवती!  आíथक परिस्थिती बेताचीच असल्याने ‘फॅशन डिझायिनग’च्या कोर्सला प्रवेश घेता आला नाही तरी त्या संबंधीची विविध पुस्तके आणून वाचणारी आणि त्यानुसार पोशाखांचे नवनवीन डिझाइन्स तयार करणारी, तिला कुठे माहीत होते की तिच्या आयुष्याचे सुंदर डिझाइन एका सतानाच्या मर्जीने एका क्षणात विद्र्रूूप होणार होते ते?  पण ते झालं.. इतकं की तिचं संपूर्ण आयुष्य आमूलाग्र बदलून गेलं. ज्या आयुष्याची तिने कधीही कल्पना केली नव्हती असं वेदनादायी आयुष्य तिच्या वाटय़ाला आलं आणि सुरू झाला संघर्ष स्वत:साठी आणि तिच्यासारखं जीणं वाटय़ाला आलेल्या अनेकजणींसाठी!
हसीनाचा जन्म आणि शालेय शिक्षण सर्व बंगळुरू इथेच झाले. ती सांगते, ‘‘माझे पदवीचे शिक्षण सुरू होत असतानाच कॉम्प्युटरचा एक छोटा कोर्स मी केलेला होता. त्यामुळे बी. कॉम.च्या पहिल्या वर्षांला असतानाच मला एका ठिकाणी काम मिळाले. रॉड्रिग्ज जोसेफ नावाच्या भारतीय वायू दलातील एका पूर्वकर्मचाऱ्याने बंगळुरू इथेच सुरू केलेल्या कंपनीत मी रुजू झाले. मी तेव्हा जेमतेम १८ वर्षांची होते. काही दिवस सर्व काही व्यवस्थित होते. पण जोसेफच्या मनात माझ्याबद्दल आकर्षण निर्माण झाले आणि एक दिवस त्याने मला मागणी घातली. माझ्या मनात त्याच्या विषयी अशा काही भावना कधीच नव्हत्या. तसे मी त्याला सांगितले. पण त्याने मला सतत याविषयी विचारणे सुरूच ठेवले. मला हा मानसिक ताण झेपेनासा झाला होता. सुदैवाने मला लगेच दुसऱ्या एका कंपनीत नोकरी मिळाली आणि मी लगेच तिथे रुजू झाले. जोसेफपासून सुटका झाली असे मी माझ्या मनाचे समाधान करून घेतले. दरम्यान, जोसेफचं मला त्रास देणे सुरूच होतं. माझ्या कंपनीत तू का काम करत नाहीस, तुला इथेच काम केले पाहिजे अशी ‘जिद’ तो करीत असे. एकदा तर जीवे मारण्याचीही धमकी दिली त्यानं, पण मी ते फार मनावर घेतले नाही आणि तिथेच माझ्याकडून सर्वात मोठी चूक घडली..’’  हसीना खंतावत सांगते.
 २० एप्रिल १९९९. आपल्या  पुढय़ात आज काय वाढून ठेवले आहे याची पुसटशीही कल्पना नसलेली हसीना नेहमीप्रमाणेच उत्साहाने ऑफिसमध्ये जायला निघाली. तिच्यासाठी साक्षात सतानाने कटच रचला होता जणू! ती ऑफिसच्या गेटजवळ जेमतेम पोहोचली असेल तेवढय़ात एक मोटारबाइकस्वार तिच्या अगदी जवळ येऊन थांबला आणि. काहीही कळायच्या आत त्याच्या हातातील जार त्याने हसीनाच्या डोक्यावर उपडा केला आणि तो लगेच वेगाने पळून गेला.
‘‘असह्य़ वेदनांनी तळमळत मी जमिनीवर कोसळले. क्षणात माझी शुद्ध हरपली! मी जेव्हा भानावर आले तेव्हा कुठल्याशा हॉस्पिटलमध्ये आहे हे मी जाणले. डोळ्यांवर पट्टी असल्याने समोरचे काहीच दिसत नव्हते. माझ्याबाबत काय घडले हे हळू हळू मला समजत गेले. जोसेफने मी दिलेल्या नकाराचा सूड म्हणून दोन लिटर कॉन्संट्रेटेड सल्फ्युरिक अ‍ॅसिड माझ्या डोक्यावर ओतले होते! ”
या हल्ल्यात हसीनाच्या डोक्याला कायमस्वरूपी एक भोक पडले. तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला व डोळेही गेले. एका कानाचा पडदा फाटून तो कान निकामी झाला आणि मानेचा बराचसा भाग जळला. तिच्या हाताची बोटे एकमेकांना चिकटली आहेत आणि त्यांचा आकारही विचित्र झाला आहे. सलग दहा वष्रे हसीना बिछान्याला खिळून होती. आतापर्यंत तिच्यावर ३५ हून जास्त शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.
‘‘एक एक ऑपरेशन ७ ते १० तासांचे असे. नाकाचे ऑपरेशन तर सर्वात वेदनादायी होते.’’ ती सांगते. ‘‘माझ्या वडिलांनी आपले सर्वस्व माझ्या उपचारांसाठी पणाला लावले. आजपर्यंत २०-२२ लाख रुपयांहून अधिक रक्कम खर्च झाली, त्यासाठी आमचे घरही त्यांना विकावे लागले.’’
‘‘मला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळणार असे कळताच आमच्या कितीतरी नातेवाइकांनी ही ब्याद घरी कशाला आणता? एखादे इंजेक्शन देऊन मामला आटपा, असे सल्ले माझ्या आई-वडिलांना देणे सुरू केले. खरे तर आम्हाला त्या वेळी मानसिक पािठब्याची, सहानुभूतीची अधिक गरज होती, पण नातेवाइकांचा हा हल्लादेखील काही कमी क्रूर नव्हता, ” हसीना सांगते.  
हसीनाचे आईवडील मात्र ‘ती वाचली यातच सर्व काही  मिळाले. आम्ही तिचा सर्वतोपरी सांभाळ करू’ या भावनेने खंबीर राहिले. अनेक महिने हसीना कुणाच्या आधाराशिवाय उठून बसूदेखील शकत नसे. रोज नवनव्या अडचणींची ओळख होत होती.  पूर्णत: खचून गेलेली हसीना हळू हळू सावरली.
हे सर्व घडत असताना तिकडे पोलिसांनी जोसेफवर आरोपपत्र दाखल केले होते. त्याला जामीन नाकारला गेला. खालच्या कोर्टाने त्याला केवळ ५ वर्षांची कारावासाची व तीन लाख रुपये दंड ही  शिक्षा दिली. त्याच दरम्यान हसीनासारख्या पीडित महिलांसाठी  ‘Campaign and Struggle against Acid Attack On Women’ ही एक संस्था उभारली गेली आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक मदतीचे हात हसीनासाठी पुढे आले. त्यातच जोसेफला मिळालेल्या अत्यल्प शिक्षा हसीनाला अस्वस्थ करून गेली. तिला नरकयातना सहन करायला लावणाऱ्या त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी होती. तिने या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील केले. उच्च न्यायालयाने पुढे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्य़ाअंतर्गत जोसेफला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आणि हसीनाला दोन लाख रुपये पुनर्वसन राशी म्हणून देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने हीच शिक्षा नंतर कायम ठेवली.
हसीना मात्र या निर्णयावर अद्यापही समाधानी नाही. ती म्हणते, अत्यंत क्रूर गुन्हा करणाऱ्यालादेखील मिळत नसेल इतकी कठोर शिक्षा मला निष्कारण भोगावी लागते आहे. तीसुद्धा प्रत्येक क्षणी! मग या नराधमालापण असेच तडफडवून मारले जायला नको काय?”  हसीना हा रास्त सवाल करत असतानाच केवळ कठोर शिक्षेने कुरूप झालेला सुंदर चेहरा आणि आयुष्यातील महत्त्वाचा काल परत आणता येईल का? म्हणूनच कठोर शिक्षेसोबतच असे हल्ले का होतात आणि ते टाळण्यासाठी वैयक्तिक व सामाजिक स्तरावर उपाययोजना करणे आवश्यक आहे, असंही ती सांगते. ‘‘तुम्हाला असा त्रास जर कोणी देत असेल तर त्याच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करू नका! वेळीच पोलिसांची मदत घ्या,’’ ती आग्रहाने सांगते.
स्वत:च्या अस्तित्वाच्या लढाईसोबतच अशा प्रकारच्या हिडीस दुष्कृत्यांना बळी पडलेल्या अनेक मत्रिणींना न्याय मिळवून देण्यासाठी गेली अनेक वष्रे ती अत्यंत निकराने लढा देत आहे.  ‘Campaign and Struggle against Acid Attack On Women’ या बंगळुरूस्थित संघटनेमार्फत केले जाणारे विविध ठिकाणचे सर्वेक्षण, निदर्शने इत्यादीमध्ये हसीनाचा सदैव सहभाग असतो.
ती सांगते, ‘‘मी आता थोडंबहुत स्वतंत्रपणे वावरू शकते. माझ्यासारख्या इतर पीडित महिलांसाठी मला खूप काही कारायचे आहे.  माझ्या अल्प कुवतीनुसार त्यांना सर्वप्रथम मानसिक आधार देणे, त्यांच्या उपचारांसाठी लागणाऱ्या पशांची उभारणी वेगवेगळ्या संस्था व दानी व्यक्तींमार्फत  करणे, त्यांच्या गुन्हेगारांना जास्तीतजास्त शिक्षा व्हावी यासाठी शेवटपर्यंत लढा देत राहणे हेच माझे आता ध्येय आहे. माझ्या या मत्रिणी स्वत: हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांना कायदेशीर प्रक्रियेमध्ये सहभागी होणे नेहमीच शक्य नसते. तसेच त्यांच्या कुटुंबातील माणसेदेखील खचून गेलेली असतात. त्यांच्या वतीने नेटाने लढणारे बरेचदा कोणीही नसते. अशा वेळी जर गुन्हेगारांला कठोर शिक्षा झाली नाही तर वरच्या न्यायालयात अपील करावे लागते. बरेचदा जनहित याचिका दाखल करावी लागते. सरोजिनी कलबाग, हीना फातिमा या व इतर अनेक आमच्यासारख्या पीडित महिला न्याय मागण्यासाठी जिवंतच राहिल्या नाहीत. पण त्यांचा लढा आमच्या संस्थेमार्फत आम्ही लढतोच आहोत. अशा तऱ्हेचे गुन्हे करणाऱ्यांवर ३२०( रसायनांचा वापर करून जखमी करणे)३२६ (आत्यंतिक वेदना होतील अशा तऱ्हेने जखमी करणे) यासोबतच ३०७ (हत्येच्या उद्देशाने जखमी करणे) हे कलमदेखील लावले गेले पाहिजे यासाठी आमची लढाई आहे.’’ हसीनाच्या स्वरात ठामपणा जाणवतो.
   एका सुडाने सुरू झालेला हा प्रवास हसीनाचं आयुष्यच बदलवून गेला आहे. सुरुवातीला पोलिसांनी आणि नंतर विविध प्रसारमाध्यमांनी हसीनाच्या लढय़ामध्ये मोलाची साथ दिली असे हसीना कृतज्ञतेने सांगते. ‘इनेबल इंडिया’ या संस्थेच्या प्रती हसीना विशेष कृतज्ञ आहे. ‘यांनी मला अंधत्वावर तसेच माझ्यात उदृभवलेल्या इतर वैगुण्यांवर मात करायला शिकवले. त्यामुळेच आज मी voice computer  वापरू शकते,’ असे ती म्हणते.
आज हसीना बंगळुरूमध्येच एका सरकारी कार्यालयात स्टेनोग्राफर म्हणून काम करते आहे. ‘आत्मनिर्भर झाले की तुमचा सन्मान तुम्ही परत मिळवू शकता’ यावर तिचा ठाम विश्वास आहे. सायकॉलॉजीमध्ये पुढे शिक्षण घेऊन काउन्सेलर म्हणून काम करण्याचा तिचा मनोदय आहे. ‘अ‍ॅसिड हल्ला बळीं’साठी खाजगी क्षेत्रात नोकऱ्या मिळत नाहीत. यांना कोणी भाडय़ाने घरही द्यायला तयार होत नाहीत, कारण विद्रूप चेहऱ्यांची सर्वाना घृणा वाटते. समाजाने आपली मानसिकता बदलायला हवी, असे हसीनाचे म्हणणे आहे. परंतु एकीकडे निराशाजनक वर्तणूक करणाऱ्या समाजाची चांगली बाजूही हसीनाला तेवढय़ाच असोशीने जाणवली आहे.  समाजातल्या अनेक घटकांनी मला जगण्याची उमेद दिली, म्हणूनच आता माझे संपूर्ण आयुष्य अशा पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठीच असेल असेही हसीना सांगते.
 स्वत:च्या अस्तित्वाच्या लढाईसोबतच अशा प्रकारच्या हिडीस दुष्कृत्यांना बळी पडलेल्या अनेक मत्रिणींना न्याय मिळवून देण्यासाठी गेली अनेक वष्रे ती अत्यंत निकराने लढा देत आहे. ‘Campaign and Struggle against Acid Attack On Women’ या बंगळुरूस्थित या संघटनेमार्फत केले जाणारे विविध ठिकाणचे सर्वेक्षण, निदर्शने इत्यादीमध्ये हसीनाचा सदैव सहभाग असतो.
‘‘अ‍ॅसिड सहज उपलब्ध होऊ नये तसेच ते कोणाला विकले गेले वगरे तपशील विक्रेत्याने दिला पाहिजे अशीही मागणी आम्ही केली होती. त्याचबरोबर या पीडित महिलांचे पुनर्वसन हा कळीचा मुद्दा आहे. केवळ कडक कायदे करून समाजाची मानसिकता बदलवणे सोपे नसते. स्त्रियांबद्दलची गौणत्वाची व पुरुषी वर्चस्वाची भावना या सर्व पापकर्माना चालना देते, ती बदलायला हवी.’’ असं हसीनाला वाटतं.
 हसीना आणि याविरोधात लढणाऱ्या सगळ्यांच्याच संघर्षांचे अखेरीस चीज झाले आहे. गेल्या जुल महिन्यात भारत सरकारने अशा अ‍ॅसिड अ‍ॅटॅकच्याविरोधात कायदा संमत केला. या कायद्यानुसार विक्रेत्यांना सहजपणे अ‍ॅसिड विक्री करता येणार नाही. ग्राहकाचे नाव, पत्ता, ओळखपत्र, दूरध्वनी नंबर आदी तपशील त्यांना संबंधित कार्यालयात सदर करावा लागणार आहे. तसेच या गुन्हय़ांसाठी गुन्हेगाराला कमीतकमी १० वष्रे ते जन्मठेप अशा सजेची तरतूद करण्यात आली असून हा गुन्हा अजामीनपात्र मानला जाईल. राज्य सरकारांनी या कायद्याची अंमल बजावणी कठोरपणे करावी असेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून दुर्दैवाने असे काही घडले तर पीडित व्यक्तीला तीन लाख रुपये सरकारकडून मदत केली जावी असेही निर्देश देण्यात आले आहेत.  हसीना आणि तिच्यासारख्या या कायद्यासाठी झगडणाऱ्या इतर महिला व संघटनांना या कायद्यामुळे काही प्रमाणात का होईना न्याय मिळेल असे दिसते.
सतान, राक्षस, वेताळ वगरे हे कल्पनेतले जग नक्कीच नाही. आपल्या अगदी अवतीभोवती हे सर्व पापात्मे वावरत असतात. दिसतात अगदी सामान्यांसारखेच वावरणारे, पण वागतात मात्र सैतानासारखेच. त्यांच्या अत्याचारांना बळी पडलेल्यांपकी एखादी ‘ती’ मग दुर्गा/ अंबा/कालीचे रूप घेऊन त्यांच्या निर्दालनास सज्ज होतेच.  
‘‘रक्तबीज धूम्राक्ष मारुनी शुंभ निशुम्भासी
काली भवानी अंबा पद शोभे तुजसी’’
 या ओळीही मग केवळ देवीच्या आरतीमधल्या न राहता वास्तवात प्रत्ययास येतात.     
sharvarijoshi10@gmail.com