बालाजी सुतार – majhegaane@gmail.com

हाथरस येथील घटना सुन्न करून टाकणारी आहे. नेमकं काय घडलं तिथे याबाबत आजही तर्कवितर्क केले जात आहेत. या मुलीवर बलात्कार झाला की नाही याबाबतचा निष्कर्ष रात्रीच्या अंधारात तिचा मृतदेह जाळून टाकल्याने विवादास्पद ठरला आहे. त्यावरून आता राजकारणही तापलं आहे आणि समाजमनही.. हाथरसच्या या मुलीवर बलात्काराविषयी शंका निर्माण केल्या गेल्या असल्या तरी तिला केलेली बेदम मारहाण आणि तिचा मृत्यू क्षम्य नाहीच. सातत्याने घडणारे स्त्रियांवरील बलात्कार आणि त्यानंतरच्या अमानुष अत्याचाराच्या घटना आपल्या देशाला नवीन नाहीत.. काय आहे या बलात्कारांचा अर्थ, हे शोधायचा हा प्रयत्न पुरुष लेखकांच्या लेखणीतून उतरलेल्या चार लेखांतून..

raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
jalna, lok sabha election 2024, Congress
जालन्यात काँग्रेसचा सावध पवित्रा
chirag paswan
मोले घातले लढाया: पासवान पुन्हा भाजपच्या मदतीला?

खैरलांजी, दिल्ली, शक्ती मिल, कठुआ, उन्नाव, कोपर्डी, हैदराबाद, हाथरस, बलरामपूर अशी मालिका असते. आणि ही एवढीच नसते, पिढय़ान्पिढय़ा, काही हजार, काही लाख वर्षांपासून चालूच असते ती. गावांची, गुन्हेगारांची नावे बदलतात, जातीधर्म बदलतात, चेहरे, मुखवटे, चरित्र बदलत राहतं; बदलत नाही ती एकच गोष्ट- बलात्कार नावाचा हिंस्र आविष्कार!

बलात्कार होतात, चर्चा घडतात, संताप, आक्रोश, आकांत प्रकटत राहतो. क्वचित गुन्हेगारांना शिक्षाही होतात. निर्भया प्रकरणात झाल्या तशा. आणि मग त्यावरच्या समाधानी प्रतिक्रियांचे स्वर विरून जाण्याआधीच पुढचा दुसरा-तिसरा किंवा पाचवा-दहावा बलात्कार घडून येतो. का थांबत नाहीत बलात्कार? मुदलात, होतातच का बलात्कार?

कारणे फार अनाकलनीय नाहीयेत.

मागे मुलायमसिंग यादव नावाचे एक पुरोगामी, समाजवादी वगैरे बरेचसे काहीबाही विराट शक्ती असलेले महाकाय नेते उघडपणे म्हणाले होते, ‘‘लडकोंसे गलतियाँ होती ही रहती हैं. अब क्या उन्हे फांसीपर लटकाओगे?’’- म्हणजे काय, तर माजलेल्या बैलासारख्या ताकदवान तरण्या पोरांकडून अशक्त दुबळ्या पोरींवर बलात्कार होणं, ही आईबापाने लाडक्या पोराला कौतुकाने टप्पल मारून हसून सोडून द्यावी, अशी काहीतरी लाडेलाडे घडलेली गफलत असते. पोरांवर गंभीरपणे रागवावं, त्यांना शिक्षा करावी, असं काहीच नसतं त्यात. और नही तो क्या, फाँसीपर लटकाओगे उन्हें?

एका घनघोर प्रात:स्मरणीय संस्कारी संघटनेचा एक महनीय नेता म्हणाला होता, ‘‘बलात्कार इंडियामे होते है, हिंदुस्थान में नही.’’ यात ‘इंडिया’ म्हणजे जिथे मुली अर्धवस्त्रांमध्ये हिंडत असतात आणि ‘हिंदुस्थान’ म्हणजे जिथल्या बायका तोंडावरून हातभर पदर घेऊन, कुणालाही आपलं नख दिसणार नाही अशा काळोखात तोंड लपवून आपल्या महान संस्कृतीला साजेसं आयुष्य कंठत राहतात अशी जागा, असं अध्याहृत असतं. साहजिकच आहे, की बायका आपापल्या पुरुषाला ‘मालक’ म्हणून धरून राहिल्या, स्वत:ला त्याची भोग-मालमत्ता मानत फक्त घरातल्या घरात किंवा शेजघरातल्या शेजघरातच राहिल्या, तर कशाला कोण त्यांच्यावर बलात्कार करेल? ‘इंडिया’ म्हणजे संस्कृतीहीन उठवळ बायापोरींची वर्दळ असलेली जागा. ‘तशा’ बायांवर बलात्कार होणं नुसतं साहजिकच नव्हे तर रास्तही असतं, असं संस्कारी विचारांच्या नेत्यांनी सांगितलं आणि त्यांच्या अनुयायांनी तसं केलंही, तर बलात्कार ही संस्कारांच्या रक्षणार्थ केलेलीच कृती ठरते नं? ‘इंडिया’तल्या संस्कारहीन मुलीऐवजी कठुआमध्ये एका कोवळ्या, अश्राप, अबोध लेकरावर साक्षात देवळाच्या ओवरीत झालेला बलात्कारही मग संस्कारांच्या रक्षणार्थ केलेली कृतीच ठरते. कारण ती मुलगी तर आपल्या पवित्र संस्कारशील धर्मातलीच नसते. उगाच का ‘त्या आरोपींना मुक्त करा’ अशी मागणी करत खुद्द वकिलांनी न्यायालयावर मोर्चा काढला होता तिकडे?

किंवा राम रहीम सिंग नावाचा कुणी एक कथित बाबा असतो. त्याने त्याच्याच पंथाच्या साध्वींचं लैंगिक शोषण केलं. त्याच्यावरच्या खटल्याचा निकाल लागण्यापूर्वी काय काय करावं लागावं? तेव्हाची वृत्तपत्रे चाळली तर लक्षात येतं, की पंजाब, हरियाणामध्ये चार दिवस शाळा बंद केल्या होत्या. १५४ ट्रेन रद्द, लष्कराला ध्वजसंचलन करावं लागलं, जमावबंदी लागू झाली, ७२ तास मोबाइल, इंटरनेट बंद होतं. निकालाच्या वेळी बलात्काराचा आरोपी राम रहीम हा गृहस्थ शंभरावर मोटारींच्या तांडय़ातून कोर्टाकडे  गेला. त्याचे हजारो समर्थक कोर्टाबाहेर जमले होते. निकाल विरोधात गेला तेव्हा हा जमाव बेकाबू झाला आणि राज्यात एक लाख पोलिसांचा बंदोबस्त होता तरीही अनेक लोक जीवे मारले गेले. शेकडो जखमी झाले. लोकांच्या आणि वृत्तवाहिन्यांच्याही गाडय़ा जाळल्या गेल्या. आणि हे करण्यात चक्क बायकासुद्धा आघाडीवर होत्या. बलात्कार हे पवित्र कृत्य असल्याशिवाय/ मानल्याशिवाय हे असं घडू शकतं?

त्या आसारामबापूला अशाच लैंगिक शोषणाच्या कृत्याबद्दल तुरुंगात डांबलं जातं, तेव्हा त्याचे समर्थक रस्त्यावर, इतका नाही तरी, असाच उच्छाद मांडतात. असल्या बलात्काऱ्यांच्या समर्थनासाठी जमलेल्या हजारो लोकांमध्ये तरुण मुलीही असतात. या मुलींना त्या लैंगिक बळी गेलेल्या मुलींबद्दल काहीच वाटत नाही? की बलात्कार ही लिंगभेदनिरपेक्ष समर्थन करावं अशीच एखादी आध्यात्मिक कृती असते? ज्यांना बलात्कार सोसावा लागलेला नाही, पण ज्या खुद्द ‘स्त्री’ आहेत, त्या स्त्रियांनासुद्धा या गुन्ह्य़ातलं गांभीर्य नीटसं कळत नाही असं म्हणता येईल का? कारण ‘पत्नीच्या मदतीने शेजारणीवर बलात्कार’ असली शीर्षके असलेल्या बातम्याही अधूनमधून वृत्तपत्रांतून छापलेल्या दिसत असतात. बलात्कार हा केवळ बेबंद, बेभान लैंगिक अभिव्यक्तीचा आविष्कार नसतो, तर ते सूड उगवण्याचं एक शस्त्रही असतं, हे अशा घटनांच्या मागचं खरं कारण आहे. एरवी खैरलांजी- कोपर्डी- दिल्ली प्रकरणांमध्ये स्त्री-देहांवर बलात्कारानंतरही इतके भयावह हिंस्र अत्याचार केले गेले नसते.

हे बलात्कार आणि हे क्रौर्य हा स्त्रीला तिची ‘औकात’ दाखवून देण्याचा प्रकार असतो. ‘आर्टिकल १५’ या चित्रपटामध्ये रोजच्या मजुरीमध्ये अवघ्या तीन रुपयांची य:कश्चित वाढ मागण्याचं धैर्य दाखवल्यामुळे दोन दलित मुलींना बलात्कार करून ठार मारलं जातं त्या वेळच्या प्रसंगी, ‘मुलींना का मारलं?’ या प्रश्नाचं उत्तर देताना त्यातला ‘बाहुबली’ बलात्कारी म्हणतो, ‘‘औकात में नही रखेंगे, तो कामही नही हो पाएगा.’’

‘‘और औकात क्या है?’’ या प्रश्नावर तो म्हणतो, ‘‘वही, जो हम उन्हें देते है.’’

औकात दाखवून देणे!

‘युद्धानंतर विजेत्या सैन्यातले सैनिक बंदुका खाली ठेवतात आणि विजारीचे बंद सोडू लागतात’ असं एक युद्धोत्तर सत्य नेहमी सांगितलं जातं. त्यात सैनिकांमध्ये तुंबलेल्या वासना हे कारण नंतरचं असतं. मुख्य गोष्ट हीच ‘अशक्तांना औकात दाखवून देण्याची’ असते.  ‘बाईला तिच्या जागी ठेवा. पायताणाची जागा पायाखालीच असते,’ असं आपल्याकडे एक ह.भ.प. बाबा थेट कीर्तनातच सांगतात. ‘बाई कितीही शिकली आणि कितीही मोठी झाली, तरी नवऱ्याला चहा देताना तिचा हात थरथरला(च) पाहिजे,’ असं (आता दिवंगत झालेल्या) एक प्रसिद्ध बाई जाहीर व्याख्यानात ठासून सांगत असत. ‘अशा घटनांना आजच्या तरुणीदेखील तेवढय़ाच जबाबदार असतात. आज टीव्ही, सिनेमांमधून जो नंगानाच दाखवला जातो, त्यामुळे वासना चाळवल्या जाणारच. त्यातून अशा घटना घडतात. स्वत:ला जपा, कारण काटेरी झुडपावरून कापड ओढल्यास ते फाटणारच. यासाठी आईने आपल्या मुलांवर संस्कार करणे गरजेचे आहे,’ असं महाराष्ट्रातल्या एका ज्येष्ठ समाजसेविका ताईंनी (मुंबईमध्ये महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कारावर प्रतिक्रिया देताना) सांगितल्याच्या वृत्तपत्रांतल्या बातम्या उपलब्ध आहेत. ताईंचं हे म्हणणं गंभीर गमतीदार आहे. मुलं काटेरी झाड असतात आणि मुली कापडासारख्या. मुलींनी आपल्या देहाचं हे कापड पुरुष नावाच्या काटेरी झुडपावरून ओढू नये. ओढल्यास ते फाटतं, यात झुडपाचा काहीच दोष नसतो. झुडूप संपूर्ण निर्दोष आणि चूक कापडरूपी मुलीची. आणि पुन्हा यात हे बलात्काररोधक कथित संस्कार आईनं मुलीवर करायचे असतात. म्हणजे बापानं पोरं मोकाट सोडून दिली तरी चालतं. ताईंना नेमकं असंच ‘फार जाणीवपूर्वक’ म्हणायचं असेल असं नाही. सहसा पारंपरिक संस्कारांच्या प्रभावातून अशी विधानं येतात. मुलींवर ‘संस्कार’ नसल्यामुळे बलात्कार होतात, असा ‘डंके की चोट’ निकाल कालपरवा हाथरस घटनेनंतर सुरेंद्र सिंह नावाच्या एका आमदारानेही दिलाच आहे.

वर उल्लेख केलेल्या राम रहीम सिंग प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे खासदार साक्षी महाराज म्हणाले होते, की केवळ दोन मुलींच्या- (कोर्टात ‘गुन्हा’ म्हणून सिद्ध झालेल्या) आरोपावरून, कोटय़वधी भक्त ज्यांच्या मागे उभे आहेत त्या राम रहीम बाबांना शिक्षा सुनावणं चुकीचं आहे. न्यायालय करोडो लोकांचं ऐकत नाही म्हणजे काय? झालेल्या नुकसानीला कोर्ट जबाबदार आहे.

सिनेमावाल्यांचं सोडा, धर्माचा धंदा करणाऱ्या बाबा-बापू-बाईंचंही सोडा; विधानसभा-लोकसभेसारख्या कायदेमंडळात निर्वाचित स्थानांवर बसून तळातल्या प्रत्येक माणसाला सुखी करता येईलसे कायदे करणं, हेच ज्यांचं मुख्यत: काम असतं, ते आमदार, खासदार, मंत्री अशी विधानं करतात, तेव्हा बलात्कार होणार नाहीत तर काय होईल? समाजजीवनाच्या एखाद्या काळोख्या विवरात खोल तळापर्यंत उतरून अत्यंत दखलपात्र असं समाजकार्य करणारेही अशीच ‘संस्कारी’ विधानं करतील, तर बलात्काराचं सौम्यीकरण होईल नाहीतर काय होईल?

बाई भोगवस्तू असते आणि ती एकटी सापडते तेव्हा भुकेल्या प्राण्यानं भक्ष्यावर तुटून पडावं तसं नरानं तिच्यावर तुटून पडावं, एवढाच बलात्काराचा अर्थ नसतो. बलात्कार हे एक आक्रमक राजकारण असतं. ते केवळ नरानं जबरदस्तीनं मादीचा देह भोगणं नसतं. ‘नर’ आणि ‘मादी’ या देहविशेषाच्या जीवशास्त्रीय व्याख्या असतात आणि त्या माणसांशिवायही सर्व प्राण्यांमध्ये असतात.  मात्र माणसांखेरीज अन्य कोणताही प्राणी माद्यांवर बलात्कार करत नाही. बलात्कार हा फक्त मानवजातीतच सापडणारा गुन्हेगारी गुण असतो आणि राजकारण हाही मानवजातीतच टोकाचा उत्क्रांत झालेला गुण आहे.

बलात्कार हे नर-मादीतलं नव्हे, तर ‘शोषक’ आणि ‘शोषित’ यांच्या दरम्यान शोषकाच्या बाजूनं खेळलं जाणारं दहशती राजकारण असतं, ज्यात ‘लिंग’ नावाच्या भाल्याच्या साह्य़ानं स्त्रीला भोसकलं जातं. तिची ‘औकात’ दाखवली जाते. यात भोगणं हा हेतू दुय्यम असतो, स्त्रीच्या अस्तित्वालाच कवडीमोल मानून तिचा जीवनरस शोषून घेणं, ही वरवर घडणारी मुख्य गोष्ट असली, तरी त्याखाली बलात्काराला जातीय, धार्मिक आणि पुरुष वर्चस्ववादी राजकारणाचे असंख्य जहरी पदर असतात.

एका मित्राच्या ‘व्हॉटस्अ‍ॅप स्टेटस’वर परवा एक फोटो दिसला. एक मुलगा हातात पोस्टर घेऊन उभा होता. ‘काळोखात हालचाल दिसली की पुरुष भुताच्या कल्पनेने घाबरतात, आणि बाई पुरुषाच्या कल्पनेने घाबरते’ असं पोस्टरवर इंग्रजीतून लिहिलेलं होतं, ते वाचता वाचता मी मुळापासून हललो होतो. ‘बलात्कार अपरिहार्यच असेल तर रिलॅक्स व्हा आणि एन्जॉय करा’ असं सुभाषित (?) प्रचलित करण्याइतपत आपण बधिर झालेलो आहोत.

आपण पुरुष असल्याची आपल्याला शरम वाटते, असं ‘क्लिशेड्’ विधान अनेकदा केलं जातं. खरंतर, स्वत:ला ‘मानवसमाज’ म्हणवून घेण्याचीच शरम वाटावी, असंच ‘पुरुषमाणसां’चं सर्वकाळ वर्तन राहिलेलं आहे.