29 October 2020

News Flash

विकृत पौरुष आणि दांभिक समाज

पुन्हा एकदा हाथरस येथील घटनेमुळे  जनक्षोभ व्यक्त होत आहे.

देशातल्या अनेक ‘निर्भया’ आजही असुरक्षित आहेत.

डॉ. शमसुद्दीन तांबोळी – tambolimm@rediffmail.com

पुन्हा एकदा हाथरस येथील घटनेमुळे  जनक्षोभ व्यक्त होत आहे. भारत धार्मिक लोकांचा देश आहे, असे अभिमानाने सांगण्यात येते, मात्र आत्तापर्यंतच्या घटना पाहाता धार्मिक समाज बलात्कार, भ्रष्टाचार, हिंसाचार कसा खपवून घेतो? हा देश धार्मिकांचा आहे, की दांभिकांचा हे ठरवावे लागेल आणि ही अपप्रवृत्ती दूर करण्याचे मूलगामी उपायसुद्धा!

देशातल्या अनेक ‘निर्भया’ आजही असुरक्षित आहेत. पालक असणारे शासन कसे उदासीन होते आणि रक्षकच कसे भक्षक होतात, हे कथुआ घटनेच्या  निमित्ताने चव्हाटय़ावर आले होते आणि आता हाथरस येथील घटनेवर उलटसुलट चर्चा होत असताना त्याचीच आठवण येते आहे. पोलीस सांगतात, या मुलीवर बलात्कार झालाच नाही. गळा, पाठीच्या कण्यावरच्या जखमेमुळे या मुलीचा मृत्यू झाला. शवविच्छेदनाच्या अहवालावरून बलात्कार झालाच नाही, असे सांगणाऱ्या पोलिसांनी या मुलीची १४ सप्टेंबर रोजी जेव्हा ही घटना घडली तेव्हा किंवा एक-दोन दिवसांत चाचणी का केली नाही? अंधारात अंत्यविधी उरकून घेऊन पोलिसांनी जनक्षोभाची ज्वाला भडकावली. पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना पत्रकारांना भेटण्यासाठी मज्जाव केला. म्हणजे या प्रकरणात शंका घ्यायला पोलीस यंत्रणेने जागा निर्माण केली आहे. आता हे प्रकरण ‘सीबीआय’कडे देण्यात येत आहे.

समाजावर पोलिसांची जरब पाहिजे म्हणणाऱ्यांचा एक  प्रवाह आहे, जो अत्यंत चुकीचा आहे. समाजात भीतीऐवजी पोलिसांशी मैत्री हवी आणि कायद्याचे, न्यायाचे राज्य हवे. सक्षम कायदे आणि न्याययंत्रणा असूनसुद्धा असे अपराध का घडतात? कायदा हातात घेऊन हिंसाचार होतो आणि न्यायालयात तांत्रिक कारणे दाखवून अपराधी निरपराध ठरवले जातात. पोलिसांनी कायदा मोडणाऱ्यांना अटकाव करून कायदा मोडल्यावर न्यायालयीन प्रक्रिया आणि शिक्षा होण्यासाठी कर्तव्य बजावायचे असते. मध्यंतरी हैदराबादजवळच्या शमशाबाद येथे एका पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला, तिला मारून टाकण्यात आले, हा निश्चितच अमानुष अपराध आहे. मात्र पोलीस जेव्हा संशयित गुन्हेगारांचे ‘एन्काऊंटर’ करतात तेव्हा समाजातील काही लोक आणि काही नेतेसुद्धा अशा पोलिसांची पाठ थोपटतात. अशी अपरिपक्वता अनेक अनर्थ घडवण्यास चालना देऊ शकते.

देशात महिला अत्याचारांबाबत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे आणि पुरोगामी महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर! मग महिला सबलीकरणासाठी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’, ‘सावित्रीच्या लेकी’ अशा जाहिरातींवरच्या खर्चाला काय अर्थ आहे? लोकप्रतिनिधी तसेच संविधानात्मक पदावर असणारे जर ‘रेप से बचना हैं तो संस्कृत श्लोक बोलें,’ असे म्हणत असतील, तर आम्ही कोणत्या दिशेने जात आहोत याची सुजाणांना कल्पना येईल. हाथरसच्या तरुणीचा गळा दाबला आणि पाठीचा कणा मोडला हे फारच सांकेतिक आणि प्रतीकात्मक आहे, असे वाटते. हा अभिव्यक्तीचा गळा घोटणे आणि संविधानरूपी आधाराचा कणा मोडण्याचा प्रकार आहे. अपराध्यांना शिक्षा करून अपप्रवृत्तींवर जरब बसवायला हवी हा महत्त्वाचा भाग असला, तरी आम्ही पुरुषप्रधान मानसिकतेवर काही उपाय करणार आहोत का? स्त्रियांना स्वातंत्र्य देण्याबाबत जेव्हा भूमिका घेण्यात आली, तेव्हा सर्वच धर्मरक्षकांनी त्याविरुद्ध आवाज उठवला. स्त्रीस्वातंत्र्यामुळे समाजाचे संतुलन बिघडेल, सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवर अनेक दोष निर्माण होतील, असे आक्षेप घेण्यात आले. आजही स्त्री-पुरुषांच्या नात्याकडे  संकुचित, पूर्वग्रहदूषित आणि नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते.

महात्मा फुले ते हमीद दलवाईपर्यंतच्या अनेकांनी उभ्या केलेल्या स्त्रीमुक्ती किंवा स्त्री-पुरुष समानतेच्या विचाराविरुद्ध धर्मशास्त्रांनी घालून दिलेला योनिशुचितेचा विचार स्त्रियांना दुय्यम स्थानी ठेवतो. स्त्रियांना स्वातंत्र्य द्यायचे की उपभोग्य वस्तू समजायचे? या दोन टोकांमधला लंबक स्त्रीस्वातंत्र्याविरुद्ध झुकलेला आहे. त्याला स्त्री समता आणि सन्मानाच्या बाजूस झुकण्यासाठी मोठी आव्हाने पार करावी लागणार आहेत. संधी मिळते तेव्हा स्त्रिया उंच भरारी घेतात, यशाची शिखरे गाठतात आणि मानवहितासाठी कामगिरी करून दाखवतात. मात्र पुरुषप्रधान मानसिकता आपल्या वर्चस्ववादासाठी धर्मतत्त्वज्ञान अंगीकारते.  दुर्गा- लक्ष्मी- सरस्वती  या देवतांना समोर ठेवून स्त्रीशक्तीचा जयजयकार करण्यात पुरुषी राजकारण असते हे समजून न घेता वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाला धागे गुंडाळतात. आजही स्त्रिया खोटय़ा गोष्टींत आपले स्वत्व शोधतात आणि शोषणाच्या बळी ठरतात. दैनंदिन व्यवहारात पुरुष अहंगंड बाळगतो, तर उच्चशिक्षित स्त्री न्यूनगंडामुळे पुरुषी वर्चस्वाला शरण जाते. याचे ताजे उदाहरण विद्येच्या माहेरघरात घडले. एका शिक्षिकेच्या नवऱ्याने तोंडी तलाक दिल्यानंतर ‘हाच पती माझा सर्वेसर्वा’ असे म्हणून ती हलाला करून घेते, हा स्त्रीत्वाचा अपमान आहे असे वाटण्याऐवजी तिला हे धर्मकर्तव्य वाटते. बुरखा घातल्याने शरीर प्रदर्शन होत नाही आणि त्यामुळे बलात्कारापासून मुस्लीम स्त्रिया सुरक्षित राहतात, असा भ्रामक प्रचार करण्यात येतो. मात्र स्त्रियांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते हे लक्षात आणून देऊन त्याचा सन्मान करण्याची वृत्ती विकसित केली नाही तर विकृती वाढत राहाणार. शरीरशास्त्राच्या अंगाने लैंगिक शिक्षण देऊन लिंगभावाकडे निकोपपणे पाहाण्याची दृष्टी आम्ही संस्कारक्षम वयात देत नाही. याचे फलित म्हणून पुरुष वर्चस्ववादी प्रवृत्ती कशी वाढते हे आपण पुन:पुन्हा अनुभवत आहोत.

कोपर्डी, दिल्ली, उन्नाव, कथुआ, बलरामपूर, हाथरस आणि इतरत्र घडणाऱ्या घटनांना लगाम लावून स्त्रियांना निर्भयपणे जगण्याचे सामथ्र्य देण्यासाठी उपाययोजना केल्या नाही, अपराध्यांना वेळेत कडक शिक्षा झाली नाही, तर हे प्रकार वाढणारच. एखाद्या राज्यात घटना घडली, तर तेथील सरकार आणि एखाद्या व्यक्तीने दुष्कृत्य केल्यास त्याच्या समाजाला लक्ष्य करण्यापेक्षा ही सार्वत्रिक विकृती आम्ही थांबवली पाहिजे. ती थांबली नाही, तर भारतीय  म्हणून शरम वाटण्याची वेळ आपल्यावर येईल.

(लेखक मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 12:18 am

Web Title: hathras rape incident and society dd70
Next Stories
1 जीवन विज्ञान : शरीराची लढवय्यी सेना!
2 यत्र तत्र सर्वत्र : इतिहासकार स्त्रिया
3 व्वाऽऽ हेल्पलाइन : अभ्यासक्रम चला, नवा येऊ द्या!
Just Now!
X