‘फेसबुक’च्या सीओओ शेरील सॅन्डबर्ग यांनी आपल्या ‘लीन इन’ पुस्तकात ‘मेक युवर पार्टनर रियल पाटर्नर’ हा यशस्वी आयुष्याचा मंत्र सांगितला आहे. अनेक यशस्वी स्त्रियांनीही आपल्या यशाचं श्रेय पतीला, कुटुंबाला दिलं आहे. करिअरमध्येच नव्हे तर घरातही जेव्हा स्त्रीला कुटुंबीयांची साथ मिळते, तिचं आयुष्य आनंदी होतं आणि आनंदी स्त्रीचं कुटुंब समाधानी असतं. पुरुषांनाही ते कळू लागलं आहे. हे कळणं अधिकाधिक प्रत्यक्षात येण्यासाठी, त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यासाठी युनायटेड नेशन्स (यू.एन) -वुमन विभागाने जागतिक पातळीवर एक मोहीम हाती घेतली आहे. ती आहे, ‘ही फॉर शी’. तिच्यासाठी त्याचं उभं राहाणं.

आज कौटुंबिक पातळीवरच नव्हे तर सामािजक पातळीवरही स्त्रीला पुरुषाच्या याच साथीची गरज आहे. स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांनी कळस गाठला आहे. जगातली तीनपैकी एक स्त्री आयुष्यात एकदा तरी शारीरिक वा लैंगिक अत्याचाराची बळी ठरतेच.याला आळा घालायचा असेल तर पुरुषांमध्ये समानतेचं भान येणं गरजेचं आहे. ‘ही फॉर शी’ ही २० सप्टेंबर २०१४ पासून सुरू झालेली मोहीम २०३० पर्यंत जगभरात लिंगभेद समानता -gender equality चे उद्दिष्ट घेऊन उभी आहे. त्यासाठी येत्या जुलैपर्यंत जगभरातल्या १ अब्ज मुलगे, तरुण, पुरुषांना या जनजागृती मोहिमेत सामील करून घेण्यात येणार आहे. सोशल मीडिया, विविध कायर्शाळा, माहितीपटाद्वारे विविध महाविद्यालये, विद्यापीठं, कॉलेज कॅम्पसमध्ये, नागरी वसाहती, कार्यालयातून मानवी हक्कांतील असमानतेविरुद्ध उभं राहाण्याची, स्त्रियांसाठी, मुलींच्या समानतेसाठी भूमिका घ्यावी यासाठी शपथ घेतली जाणार आहे. प्रत्येक पुरुषाने मी माझ्या कुटुंबातल्या स्त्रीला तिच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करीन. तिला माझी साथीदार म्हणूनच वागवेन, अशी एक साधी शपथ घेतली आणि तो तसं वागला तर खरंच स्त्री आज ज्या मुक्कामावर पोहोचली आहे त्याच्या कितीतरी पट पुढे जाईल. आणि तिची ही झेप फक्त स्वत:पुरती असणार नाही तर कुटुंबाला पुढे घेऊन जाणारी असेल. म्हणूनच स्त्री-पुरुष दोघांच्याही समानतेसाठी पुरुषांनी आता पुढाकार घ्यायला हवाय.
या समानतेची आत्यंतिक गरज व्यक्त करताना या कॅम्पेनची गुडविल अ‍ॅम्बेसिडर ऐमा वॅटसन या ‘हॅरी पॉटर गर्ल’ ने आवाहन केलंय, या मोहिमेच्या पुढाकारासाठी प्रत्येकानेच स्वत:ला विचारलं पािहजे, मी नाही तर मग कोण? आणि आता नाही तर कधी?
तुम्हीही या मोहिमेत सामील होऊ शकता-
heforshe@unwomen.org
http://www.unwomen.org