|| मंगला जोगळेकर
मागच्या लेखात आपण व्यायाम, त्यानं कमावता येणारं एकूणच आरोग्य आणि तल्लख मेंदू यांचा कसा संबंध असतो, ते पाहिलं. याच प्रकारे वेगवेगळ्या प्रमुख अवयवांचं आरोग्य एकमेकांवर अवलंबून असतं. मेंदू हृदयावर कसा अवलंबून असतो, हे विविध अभ्यासांमध्ये समोर आलं आहे. उच्च रक्तदाब, रक्तवाहिन्या अरुंद होणं आणि परिणामी हृदयविकार याला प्रतिबंध    के ल्यास ते निरोगी मेंदू आणि उत्तम स्मरणशक्तीसाठीचंच एक पाऊल ठरेल.

शरीराच्या वरिष्ठ अवयवांमधला एक प्रमुख अवयव म्हणजे हृदय.  शरीराच्या अतिसूक्ष्म पेशींपासून इतर अवयवांपर्यंत संपूर्ण शरीराला ते रात्रंदिवस अन्नपुरवठा करतं. हृदय देत असलेल्या ठोक्यांच्या लयीवर शरीराचं कार्य चालतं. शरीराचा हा व्यापार चालायचा, तर हा सेनापती सदैव ‘खडे रहो’ स्थितीतच हवा. विशेषत: मेंदूचा रक्तपुरवठा क्षणभरसुद्धा खंडित होणं ही धोक्याची गोष्ट. म्हणूनच हृदयाच्या आरोग्यावर मेंदूचं आरोग्य अवलंबून आहे असं म्हटलं जातं. हृदयविकार आणि मधुमेह हे दोन्ही आजार असणाऱ्यांमध्ये डिमेंशियाचंही प्रमाण वाढतं असतं, हेही आता सिद्ध झालं आहे. म्हणूनच आजच्या या सदरातील लेखात हृदयाच्या आरोग्याच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांची ही  विस्तृत माहिती…

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

हृदयाचा कारभार नीट चालला आहे की नाही हे दोन गोष्टींवरून आपल्याला समजू शकतं, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल. रक्तदाबाची योग्य पातळी १२०/८० हवी हे सर्वसामान्य व्यक्तीलाही माहिती असतं. रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहात असताना त्यावर अंतर्गत दाब (प्रेशर) किती असतं, त्याला रक्तदाब असं म्हणतात. रक्तदाब जितका जास्त, तितका आपल्या वाहिन्यांवर पडणारा ताण जास्त. कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीरात तयार होणारा एक प्रकारचा चिकट पदार्थ आहे. शरीराच्या कारभारासाठी त्याची नितांत आवश्यकता असते. त्याची उपस्थिती पेशीच्या आतल्या अस्तरापासून मेंदू, स्नायू, आतडी, हृदय, कातडी अशा शरीराच्या प्रत्येक भागात असते. शरीरातील हार्मोन्स    (संप्रेरकं ) तयार करायला, ‘डी’ जीवनसत्त्व तयार करायला, आपण खाल्लेल्या मेदयुक्त पदार्थांचं पचन करणारं अ‍ॅसिड (आम्ल) तयार करायला, अशा कामांमध्ये त्याची मदत होते. परंतु त्यासाठी शरीराला अत्यल्प प्रमाणात कोलेस्टेरॉल लागतं. आपल्या आहारात मात्र त्याच्या कित्येक पटींनी ते अधिक असतं. त्यामुळे रक्तामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलं की ‘अथिरोस्क्लेरोसिस’ ही समस्या होण्याची शक्यता असते. ‘अथिरोस्क्लेरोसिस’ म्हणजे काय ते आपण बघणारच आहोत.

रक्तवाहिन्या आपल्या शरीरातील सूक्ष्म भागांपासून मोठ्या अवयवांना जोडणारा दुवा असतात. रस्ते कसे गावातील सर्व दूरच्या भागांना एकत्र जोडतात तसंच. या वाहिन्यांमधून ऑक्सिजन आणि पोषकद्रव्यं पेशींना पुरवली जातात आणि कार्बन डायऑक्साइड आणि अन्नघटकांमधील फेकलेला भाग जमा केला जातो. परंतु कालांतरानं रस्त्यांची जशी दुरवस्था होते तशीच रक्तवाहिन्यांचीही होते. रक्तवाहिन्यांचं आरोग्य दोन गोष्टींमुळे बिघडतं- एक त्यांचा लवचीकपणा कमी होऊन त्या ताठर झाल्यामुळे आणि दुसरं म्हणजे वाहिन्यांच्या आतील अंगास चिकट गुठळ्या (प्लॅक) चिकटल्यामुळे. वर्षानुवर्षं जर अति दाबानं रक्त वाहात राहिलं तर रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम होतो. उदा. जास्त दाबामुळे आतल्या गुळगुळीत भागातल्या पेशींवर परिणाम होऊन त्या कडक बनतात.  घरात पाणी भरण्यासाठी किंवा झाडांना पाणी घालण्यासाठी वापरात असलेला पाइप कडक होतो तेव्हा त्याचे कधीही तुकडे होऊ शकतात किंवा त्यात गाळ अडकला तर त्यातून पाणी नीट वाहात नाही. अगदी तसाच काहीसा परिणाम शरीरातील या पाइपलाइनवर होत असतो. त्यांचं अस्तर कडक होण्याबरोबर त्यांच्यामध्ये ‘प्लॅक’ अडकत जातं.

स्वयंपाकघरात फोडणीच्या, तळणाच्या तेलकटपणामुळे गॅसची शेगडी, बाजूची भिंत यांवर चिकट पदार्थ साठतात हे प्रत्येकाला माहीत असतं. आपल्या आहारातील तेलामुळे, तसंच पदार्थांतील अंगभूत स्निग्धपणामुळे शरीरात तसंच काहीसं घडतं. वाहिनीच्या आतल्या स्तरावर प्लॅक किंवा चिकट गुठळ्या, कॅल्शियम इत्यादींचा साठा होतो आणि दुसरीकडे या अंतर्गत सुजेमुळे वाहिन्यांची रुंदी कमी कमी होत जाते. त्यामुळे पुरेसं रक्त वाहू शकत नाही. साहजिकच संपूर्ण शरीरातील रक्तपुरवठ्यावरच याचा परिणाम होतो. सुजेमुळे वाहिन्यांच्या आतमध्ये बारीकसे उंचवटे आणि खळगे तयार होतात. या खळग्यांमध्ये रक्ताच्या बारीक गाठी तयार होतात. त्या गाठी वाढतात, मध्येच फुटतात आणि रक्तामधून वाहून जातात. कधी त्यांचे बारीक तुकडे हृदयाच्या नाहीतर मेंदूच्या, मूत्राशयाच्या किंवा इतर कशाच्या सूक्ष्म रक्तवाहिनीत अडकूनही बसू शकतात. वाहिनीतून वाहाणाऱ्या रक्ताला असे अडथळे पार करत करत मार्ग काढावा लागतो. अशी परिस्थिती झाल्यास पेंशींना रक्ताद्वारे मिळणारे अन्नघटक पुरेसे मिळतीलच याची खात्री नसते. कधी अति दाबानं कमकुवत झालेल्या वाहिनीची भिंतही फुगून जाड होते. या कारणांमुळे हृदयापासून मेंदू, मूत्रपिंड, हात, पाय इत्यादी अवयवांकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण होतात. या आजाराला ‘अथिरोस्क्लेरोसिस’ म्हटलं जातं. यामुळे छातीमध्ये दुखणं (अंजायना), हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक), मूत्रपिंड निकामी होणं, अर्धांगवायू, हृदय बंद पडणं असे कुठलेही दुष्परिणाम भोगायला लागू शकतात.

रक्ताची गाठ तयार होण्याची क्रिया खरं तर आपल्या बचावासाठी घडते. आपल्याला जखम झाल्यास त्यातून भारंभार रक्त वाहून जाऊ नये म्हणून रक्ताच्या गाठी बनण्याची योजना असते. रक्त हे पाणी, पोषकद्रव्यं, हार्मोन्स, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स यांनी बनलेलं असतं. जखम झाल्यावर रक्त वाहू नये म्हणून मेंदूनं आज्ञा देताक्षणीच एका द्रव्याद्वारे प्लेटलेट्स एकमेकांना चिकटून रक्ताचं गाठीत रूपांतर होतं. रक्तवाहिन्यांचं आरोग्य एकदा ढासळलं की नको तिथे रक्ताच्या गाठी अडकून बसतात हे आपण वर बघितलंच आहे. ज्यामुळे पेशींचा, अवयवांचा रक्तपुरवठा बंद होण्यापर्यंत परिस्थिती येते. सुजेमुळे आधीच कमकुवत झालेल्या वाहिन्यांमधून कमी रक्त पोहोचत असलेल्या भागांना पुरेसं रक्त पुरवण्याचा हृदय आटोकाट प्रयत्न करतं. त्यामुळे वाहिन्यांवर अधिकच दडपण येतं. आणि संपूर्ण शरीराचा ‘कार्डिओव्हॅस्क्युलर’ आजाराशी सामना चालू होतो.

अथिरोस्क्लेरोसिस आणि उच्च रक्तदाब हे एक दुष्टचक्र आहे. उच्च रक्तदाब हाच मुळात रक्तवाहिन्या पुरेशा लवचीक राहिलेल्या नाहीत आणि त्यामुळे त्यातून रक्त व्यवस्थित वाहात नाही, हे सांगतो. रक्त नीट वाहात नसल्यामुळे ‘प्लॅक’ जरा वेगानंच रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतं. म्हणजेच अथिरोस्क्लेरोसिसचा धोका वाढतो. अथिरोस्क्लेरोसिसमुळे वाहिन्यांवरचा ताण वाढून रक्तदाब आणखी वाढतो.

रक्तदाबाच्या विकारामुळे अर्थातच मेंदूचाही रक्तपुरवठा कमी होतो. तसंच त्यामुळे अर्धांगवायू (स्ट्रोक) होण्याची शक्यता बळावते. स्ट्रोक म्हणजे मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होणे. हा रक्तपुरवठा किती काळ खंडित होतो त्यावर मेंदूला किती नुकसान पोहोचतं ते अवलंबून असतं. कितीही अल्पसा, न समजणारा स्ट्रोक झाला, तरी मेंदूतील पेंशींची फार मोठी हानी होते. हजारो, लाखो पेशींना धारातीर्थी पडावं लागतं. मोठा स्ट्रोक झालेल्या माणसाच्या मेंदूची ‘एमआरआय’च्या (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग) सहाय्यानं छायाचित्रं घेतली असता मेंदूच्या स्ट्रोक झालेल्या भागात न भरून येणारं नुकसान झालेलं दिसतं. अशा ठिकाणच्या पेशी पूर्णपणे मरून तिथे छोटी, छोटी छिदं्र पडलेली दिसतात. पुढे स्ट्रोक झालेल्या व्यक्तीला काही कारणांनी विस्मृतीचा आजार झाला, तर अशा व्यक्तीची स्मरणशक्ती फार लवकर नाश पावू शकते.

रक्तदाब वाढला तरी त्याचा सहसा काहीच त्रास जाणवत नसल्यानं रक्तदाबाच्या नियमित तपासणीकडे दुर्लक्ष केलं जातं. कधीही रक्तदाब न तपासल्यामुळे आपला रक्तदाब जास्त आहे हे माहिती नसणारी माणसं खूप मोठ्या प्रमाणात असतात. उच्च रक्तदाबाला त्यामुळेच छुपा रुस्तम म्हटलं जातं. त्याचा मेंदू, मूत्रपिंड, रक्तवाहिन्या, डोळे यांवर परिणाम होऊ शकतो. हृदयविकार होतो किंवा अकाली मृत्यू येऊ शकतो. हा छुपा रुस्तम अनेकजणांचे नाहक बळी घ्यायला कारणीभूत होतो. म्हणून रक्तदाब १४०/९० ही पातळी ओलांडून जायला लागला, की त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. साधारण चाळिशीनंतर दरवर्षी रक्तदाबाची तपासणी वेळच्या वेळी करावी. पुष्कळदा तपासल्यावर रक्तदाब वाढता दिसला, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं जरूर असल्यास औषधं चालू करायला हवीत.

आशिया खंडात ‘होनोलुलु एशिया एजिंग स्टडी’ नावाचा एक खूप मोठा अभ्यास के ला गेला. त्यामध्ये इतर गोष्टींबरोबरच रक्तदाबाचा स्मरणशक्तीवर काय परिणाम होतो हे तपासलं गेलं. हे जाणून घेण्यासाठी चाळीस ते पन्नास वयोगटातील रक्तदाबावर औषधं घेणाऱ्या आणि न घेणाऱ्या व्यक्तींची दोन गटांमध्ये चाचणी घेण्यात आली. या अभ्यासावरून ज्यांनी रक्तदाबासाठी वेळीच औषधयोजना चालू केली नाही त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता कालांतरानं घटून त्यांच्यामध्ये औषध घेणाऱ्या गटापेक्षा स्मरणशक्तीचे प्रश्न उद्भवण्याची शक्यता पाचपटीनं जास्त असल्याचं दिसून आलं. मृत व्यक्तींच्या अभ्यासावरूनही रक्तदाब जास्त असलेल्यांच्या मेंदूचा आकार कमी होऊन त्यांना स्ट्रोक अधिक प्रमाणात झालेला दिसून आला. उच्च रक्तदाबाव्यतिरिक्त हृदयविकार, मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही पुढे अल्झायमर्स होण्याची शक्यता जास्त असते, असं दिसून आलं आहे.

रक्तदाबाचा विकार भारतातच नव्हे, तर इतर देशांमध्येही फार मोठ्या प्रमाणात आढळून येतो. तसंच जगभर जवळजवळ तीस टक्के मृत्यू हृदयविकारानं होतात. गेल्या वर्षी १.८ कोटी व्यक्ती ‘कार्डिओव्हॅस्क्युलर’ आजारानं मरण पावल्या, त्यात जवळजवळ अर्धा कोटी लोक भारतातील होते. धूम्रपान/तंबाखूचं सेवन, उच्च रक्तदाब, वाईट कोलेस्टेरॉलचं वाढतं प्रमाण, मद्यपानाचं वाढलेलं प्रमाण, चांगल्या कोलेस्टेरॉलचं कमी प्रमाण, मधुमेह, आहारातील असमतोल, बैठं जीवन, वाढलेला स्थूलपणा, तणाव या सगळ्यामुळे भारतीयांमध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांची वाढ झालेली दिसत आहे. भारतातील जवळजवळ १० टक्के जनता मधुमेहानं ग्रस्त आहे. जगातील दर सहामधील एक मधुमेहाचा रुग्ण भारतात आहे. त्यामुळे पुढील काळात हृदयरोग्यांचं प्रमाण सातत्यानं वाढत जाईल. खेदाची गोष्ट अशी, की इतर देशांच्या मानानं हे विकार भारतीयांमध्ये कमी वयात होताना दिसत आहेत. त्यामुळे पुढील आयुष्यात गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वाढते. हृदयविकार आणि मधुमेह हे दोन्ही आजार असणाऱ्यांमध्ये डिमेंशियाचंही प्रमाण वाढतं असतं, हेही सिद्ध झालं आहे.

वर दिलेली आकडेवारी वाचून निराश होण्याची आवश्यकता नाही. कारण हृदयविकार का आणि कशामुळे होतो, याबद्दल आपल्याला खूप माहिती आहे. तो टाळता यावा, यासाठी काय करता येईल याचीही माहिती आपल्याकडे आहे. त्यामुळे हृदयविकार कशामुळे होतो हे समजून घेऊन जीवनातील धोके कमी करण्याच्या जागृत दृष्टीमुळे हृदयविकाराचं प्रमाण कमी करता येईल. हृदयाचे आजार होऊनही अनेक वर्षं जगणारी मंडळी तुम्हाला माहीत असतील. कारण हृदयाचा झटका आता ‘डेथ वॉरंट’ समजला जात नाही. हृदयाचं कार्य सुरळीतपणे चालावं म्हणून रक्तदाब नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी घेण्याचं पाऊल उचलून हृदयाला खूप मोठी मदत आपण करू शकतो.

हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं या सदराच्या उद्दिष्टाप्रमाणे किमान आपल्या मेंदूसाठी तरी आपल्याला परवडणारं नाही.

mangal.joglekar@gmail.com