एक अतिशय गुणी पथ्यकर देशी भाजी असंच पडवळाचं वर्णन करावं लागेल. तरीही पडवळ फारसं लोकप्रिय नाही. भरपूर चोथा असल्यामुळे मलावरोधासाठी उत्तम. शरीरातली विषारी द्रव्यं बाहेर टाकण्यास मदत करणारं एक नैसर्गिक अ‍ॅन्टिबायोटिक म्हणून पडवळ ओळखलं जातं. पडवळात पुरेशी पोषक द्रव्यं असून ते शरीराची उष्णता कमी करतं, वजन कमी करायला मदत करतं आणि हृदयाचं टॉनिक म्हणून काम करतं. पडवळाचा रस केसातला कोंडा कमी करतं तर पानांचा रस काविळीत उपयोगी पडतो.
पडवळाची पचडी-
साहित्य : पाव किलो कोवळं पडवळ, अर्धी वाटी चणाडाळ, १-२ हिरव्या मिरच्या, प्रत्येकी पाव वाटी कैरीचा कीस, कोथिंबीर आणि ओलं खोबरं. चवीला मीठ, साखर, फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल, मोहरी, हिंग, हळद.
कृती : चणाडाळ ३-४ तास भिजत घालावी आणि मिक्सरमध्ये मिरच्यांबरोबर वाटून घ्यावी. पडवळ किसून घ्यावं. वाटलेली डाळ, कैरीचा कीस, कोथिंबीर, खोबरं, मीठ, साखर एकत्र करावं. तेलाची फोडणी करून त्यावर घालावी.
वसुंधरा पर्वते – vgparvate@yahoo.com