ज्या कुटुंबांमध्ये उत्तम संवाद आहे, एकमेकांविषयी काळजी, प्रेम आहे अशा कुटुंबात प्रश्न प्रलंबित राहत नाहीत. उलट सगळ्यांच्या सहभागाने आणि एकीने जादूची कांडी फिरवावी तशी प्रश्नांची उत्तरं मिळत जातात आणि कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे घरात येणाऱ्या पैशाचा योग्य मान राखला, व्यवहारात पारदर्शकता ठेवली तर पैसाही घरात चांगला स्थिरावतो.

आरोग्यशास्त्र हा आयुष्यातील फार महत्त्वाचा घटक आहे. रोजच्या जगण्यात प्रामुख्याने सहा गोष्टींचं आरोग्य आपल्याला जपावं लागतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाचं आरोग्य, मिळकतीच्या पैशाचं आरोग्य, आपलं आध्यात्मिक आरोग्य, भावनिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि आजकाल ज्या लहानसहान साधनांचा वापर आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे त्या गॅझेटचं आरोग्य. या सगळ्या घटकांचं आरोग्यशास्त्र या आणि पुढील काही भागांमधून पाहणार आहोत.
(१) कुटुंबाचं आरोग्यशास्त्र – मोठी कुटुंबं वा एकत्र कुटुंबपद्धती जाऊन आता छोटी कुटुंबं आकाराला येत आहेत. त्यात जागतिकीकरणाच्या शर्यतीमुळे आणि वेळेअभावी कुटुंबीयांशी रोजचा संवाद साधणं, आपल्याला काय वाटतंय हे मोकळेपणाने सांगणं या गोष्टीसुद्धा कमी झालेल्या दिसतात. अख्खं एकविसावं शतक जणू आपण एका दशकात संपविणार आहोत या अविर्भावात सगळे धावताहेत आणि आपण आपल्या माणसांपासून दुरावत चालले आहेत! संवाद जो अखंड राहायला हवा तोच खंडित होत चालला आहे. आजकाल नवरा-बायकोचं बोलणेही ‘व्हॉट्स अ‍ॅप’मार्फत होऊ लागलं आहे. म्हणूनच खंडित झालेला किंवा तुटक होत चाललेला हा संवाद एक प्रकारचा आजार बनला असून एच.आय.व्ही. पेक्षाही भयंकर रूप धारण करू लागला आहे. संवादाअभावी, नैराश्य, आत्महत्या, आक्रमकपणा आणि गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं. या वाढीच्या मुळाशी कुटुंबाचं बिघडलेलं आरोग्य कारणीभूत असल्याचं समोर येतं आहे. म्हणूनच कुटुंबाचं आरोग्यशास्त्र जपणं आणि ते अधिक सुदृढ करणं आता अत्यावश्यक बनलं आहे. एक कुटुंब म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन एकमेकांशी असलेल्या नात्यांचा सन्मान करायला हवा, जेणेकरून त्यांच्यातील संवाद कायम राहील. त्यादृष्टीने समोरासमोर बसून जेवणं, नाश्ता करणं या छोटय़ा-छोटय़ा गोष्टीसुद्धा खूप गरजेच्या असतात. पूर्वी कुटुंबांमध्ये वर्तुळाकार जेवायला बसायची पद्धत होती, ती खरंच योग्य होती. असं गोलकार बसल्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाचा चेहरा स्पष्ट दिसायचा, समोरच्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव- मग हास्य असो किंवा वेदना असो- सारं स्पष्ट कळायचं. आजकाल सगळ्यांची तोंडं वेगवेगळ्या दिशांना, नाही तर टीव्हीकडे एकवटलेली असतात, मग अशा वेळी बोलणं ते काय होणार? सगळ्यांनी आनंदाने आणि एकत्र बसून जेवण केलं की पोट संतुष्ट होतं आणि आपण ग्रहण केलेलं अन्न अंगी लागतं. जेव्हा मन तणावमुक्त असतं तेव्हाच जेवणाचा रसास्वाद मनाला सुखावतो.
सगळ्यांना जोडून ठेवणारे हे क्षण अनुभवून पाहा. त्यातून खूप ऊर्जा मिळते. तुम्ही म्हणाल की हे रोज शक्य नाही. पण जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा याच पद्धतीने सगळे एकत्र जेवायला बसा. दिवसभराचा सगळा राग, सगळी चिडचिड निघून जाईल आणि गप्पांमधून ताण अगदी सहज हलका होत जाईल. इथे आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे – ती आहे घरातील आईच्या बाबतीत. बहुतेक घरांमध्ये आई सगळ्यांना वाढत राहते आणि सगळ्यांची जेवणं झाल्यावर एकटीने बसून जेवते. ही पद्धत आता बदलायला हवी. आईनेसुद्धा सगळ्यांबरोबरच जेवायला बसलं पाहिजे आणि गरम गरम जेवलं पाहिजे. जेवताना प्रत्येकाने आपली सर्व गॅझेट्स लांब ठेवली पाहिजेत किंबहुना जेवण होईपर्यंत बंदच ठेवावीत. तरच जेवताना घरच्यांबरोबर सुसंवाद होऊ शकतो. हे क्षण तुमचं आरोग्य आणि मन दोघानांही निरोगी ठेवतात. एकत्र जेवण्याची पद्धत कुटुंबातील सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते. लहानपणीचे आजी-आजोबा, आई-बाबा, काका-काकू, भावंडं यांच्यासोबत एकत्र बसून जेवायचो आणि एकमेकांच्या ताटातील पदार्थ वाटून खायचो ते दिवस आठवा. आवडीचा पदार्थसुद्धा सगळ्यांनी वाटून खायचा आणि जो नसेल त्याच्या वाटणीचा घास बाजूला काढून ठेवायचा. याने केवळ उदरभरणच केलं नाही तर अनेक संस्कारही केलं. आजही अशी देवाणघेवाण, सगळ्यांनी पदार्थ वाटून खाण्याची पद्धत यासारखे संस्कार गरजेचे आहेत. पंगत हा आणखी एक सर्व थरातील लोकांना जोडणारा एक चांगला प्रकार आहे. माणसा-माणसाला जोडण्याची ही कला आपल्याकडील चांगल्या पद्धतींमधून आलेली आहे.
भारतात कुटुंब या शब्दाची व्याख्या फार व्यापक आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये सुद्धा ‘आम्ही एक कुटुंब आहोत’ असं म्हटलं जातं. पुनर्वसन केंद्रांमध्ये लोक एका ठरावीक कारणाने एकत्र येतात आणि सर्व मिळून एकमेकांची काळजी घेतात. एखाद्या कुटुंबाप्रमाणे एकमेकांना बरं करण्यासाठी हातात हात घालून उभे राहतात. अनेक कुटुंबांमध्ये त्या घरातील मोलकरणीलासुद्धा आपल्या बरोबर जेवायला दिलं जातं तेव्हा माणसातील भेदभावाच्या भिंती तुटून पडतात. पण आजकाल बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाताना आपली मुलं सांभाळण्यासाठी किंवा त्यांना भरविण्यासाठी मोलकरणीला बरोबर नेणारी कुटुंबं पहिली की वाईट वाटतं. त्यांच्या या कृत्यातून ते मुलांमध्ये भेदभावाची भावना रुजवत असतात आणि हे माणुसकीला धरून नाही. कुटुंबातील सदस्यांशी गप्पा मारण्यासाठी, प्रसंगी समुपदेशन करण्यासाठी जेवणाच्या ठिकाणी एकत्र जमणं हा सगळ्यात चांगला उपक्रम आहे. यातून विश्वास वाढीस लागतो हे वेगळे सांगायला नको. हेच तर कुटुंबाचं आरोग्यशास्त्र आहे. आजारपणात, रुग्णालयातील अडीअडचणींच्या काळात किंवा कुठल्याही संकटाच्या काळात कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र राहणं, एकमेकांना धरून असणं हासुद्धा कुटुंबाच्या आरोग्यशास्त्राचा एक भाग आहे. कुटुंबातील किंवा जवळच्या नातेवाईकांपैकी कुणी आजारी असेल तर त्याची घेतली जाणारी काळजी, त्यासाठी दिला जाणारा वेळ या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये करुणा, आपुलकी, जबाबदारीचं भान रुजवत असतात. त्यातून दुसऱ्याला मदत करण्याच्या वृत्तीचा शोध लागत जातो. कनवाळूपणा वाढीस लागला की स्वभावातील रागीटपणा किंवा अवज्ञा करण्याची वृत्ती कमी होते. रुग्णालयात दाखल असलेल्या जवळच्या नातेवाइकाच्या सोबतीला जेव्हा पुतण्या, भाचा किंवा पुतणी-भाची जाऊन बसतात तेव्हा स्वभावातील रागीटपणा, असूया एवढंच नाही तर भूतकाळातील कटू आठवणीसुद्धा गळून पडतात आणि नात्यांचं आरोग्य सुधारतं. अन्न कुटुंबाना जोडतं पण पैसा कुटुंबांमध्ये फुट पाडतो. समजा, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली असेल तर अशा वेळी कुटुंबातील दुसरी व्यक्ती तिच्याबरोबर थोडा वेळ घालवून संवाद तर साधू शकते ना! त्यातून कदाचित प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. तसं झालं नाही तरी तुमच्या मनात असलेली करुणा त्या व्यक्तीला दिलासा देईल हे निश्चित. ज्या कुटुंबांमध्ये एकमेकांविषयी काळजी, प्रेम असतं अशा कुटुंबात प्रश्न प्रलंबित राहत नाहीत. उलट सगळ्यांच्या सहभागाने आणि एकीने जादूची कांडी फिरवावी तशी प्रश्नांची उत्तरं मिळत जातात आणि कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहतं.
(२) पैशांचं आरोग्य – प्रसन्न मनाने ग्रहण केलेलं अन्न जसं मनाला सुखावतं तसंच घरात येणाऱ्या पैशाचा योग्य मान राखला, व्यवहारात पारदर्शकता ठेवली तर त्याचंही आरोग्य चांगलं राहून पैसा घरात चांगला स्थिरावतो. बच्चे कंपनीला तर लहानपणापासूनच घरच्या आर्थिक स्थितीचा अंदाज द्यायला हवा म्हणजे व्यवहारातील पारदर्शकता, पैशाचं मूल्य याची त्यांनाही जाण येईल. पालकांच्या मिळकतीची मुलांना कल्पना असावी. मिळकतीचं व्यवस्थापन करताना जे निर्णय घेतले जातात त्यात मुलांनाही सहभागी करून घेता येतं. थोडं पुढे जाऊन आर्थिक नियोजनाबाबत मुलांची मतं विचारात घेतली जाऊ शकतात. कल्पना करून पाहा की महिन्याच्या जमा-खर्चाचा हिशेब करताना तुम्ही मुलानांही त्यात सामील करून घेत आहात आणि त्यांना पैशाचं मूल्य सांगता आहात, किती छान क्षण असेल तो! लोकशाहीचा तत्त्व आणि एकमेकांवरील विश्वास यातून एक चांगलं रसायन तयार होतं.
घरात जर बेहिशेबी पैसा असेल तर तो मुलांच्या मनात पुष्कळ गोंधळ निर्माण करतो. तिजोरीत जर असा पैसा लपवून ठेवला जात असेल तर त्या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रामाणिकपणाचा आणि विश्वासाचा सेतू बांधला जाऊ शकेल? रुग्णालय, शाळा किंवा मंदिरांमध्ये दान केलेली संपत्ती जर चुकीच्या मार्गाने मिळविलेली असेल तर त्याचं चांगलं फळ मिळू शकत नाही. जे समाधान नोकरी, व्यवसाय करून, मेहनतीने मिळविलेल्या पैशात असतं ते तिथे नसतं. मग अशा वेळी पैशाचं आरोग्य बिघडतं. असा पैसा दान केल्याने स्वर्गात स्थान मिळेल हा समाज जसा पूर्णपणे चुकीचा आहे तसंच तो पैसा दान केल्याने त्याचा योग्य विनिमय झाला आणि आपल्या मुलांच्या समोर आपण चांगला आदर्श ठेवला असा समजणंही चुकीचं आहे. अशा पैशाची देणगी देणं म्हणजे कोणतेही अँटिबायोटिक घेतल्यासारखं नाही, हे आधी जाणा. अशा कृतीने दोषाचे विषाणू किंवा गुन्ह्याचे जंतू मारून टाकता येतील हा गैरसमज दूर करा, उलट हवेतून पसरणाऱ्या जीव-जंतूंपेक्षा हानिकारक असा हा अविश्वासाचा जंतू आहे. एक मोठा सरकारी अधिकारी नेहमी देवळात मोठय़ा प्रमाणात सोनं-नाणं दान करायचा. पण असला प्रकार म्हणजे गैर मार्गाने पैसा कमविण्याचा परवाना असू शकत नाही.
माझ्या परिचयाचं एक कुटुंब होतं, ज्यांनी शेअर बाजारात सगळा पैसा घालविला. झालेल्या नुकसानाची चर्चा ते दार बंद करून करायचे. मी त्यांना ही चर्चा मुलांसमोर करण्याचा सल्ला दिला. तसच विश्वासातील माणसांनाही ही गोष्ट खुलेपणाने सांगावी असं सुचवलं. मनातील भीती, दु:ख, राग, चूक केल्याने लागलेली टोचणी आणि लोकलज्जा या साऱ्या भावना त्यांनी घरात मुलांसमोर आणि नातेवाईकांसमोर मोकळेपणाने मांडल्या तर त्या चर्चेतून नवीन वाट सापडेल आणि विचारांना दिशा गवसेल असं सांगितलं. तसंच झालं, मुलांनी त्यांना, ‘या परिस्थितीत आम्ही तुमच्या बरोबर आहोत’ असं आश्वासन दिलं. हळूहळू मनातील नैराश्य आशेत बदललं. सुरुवातीला त्या घरातील पुरुषाशी जेव्हा बोललो तेव्हा तो त्याचे आर्थिक व्यवहार कधीच आईशी, बायकोशी किंवा मुलांशी शेअर करीत नसल्याचं कळलं. मी त्याला घडलेली गोष्ट घरात सगळ्यांशी शेअर करायला सांगितली. थोडय़ाच दिवसांत तो माणूस प्रसन्न चेहऱ्याने माझ्याकडे आला, कारण त्याला या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा आणि विस्कटलेली आर्थिक घडी जागेवर आणण्याचा मार्ग सापडला होता. ज्या बायकोला व्यवहारातील काही कळत नाही असा त्याचा समज होता त्याच बायकोने त्याला शहाणपणाची मदत केली होती. मुलांना आर्थिक नियोजन कसं ठाऊक असणार, असा त्याचा दावा होता त्या मुलांनी जमविलेला सगळा पॉकेट मनी मोठय़ांच्या हातात सुपूर्द केला तेव्हा त्या गृहस्थाच्या डोळ्यात पाणी तराळलं. प्रसंगाने मुलांना बचतीचं महत्त्व जाणवलं आणि अनावश्यक खर्च टाळून बायकोने साठवलेला पैसा कठीण परिस्थितीत कामी आला.
जी कुटुंबं चुकीतून धडा घेऊन, समाजाला न घाबरता आपल्या घराची दारं उघडी ठेवून बाहेरची शुद्ध हवा आत येऊ देतात ती कुटुंबं वाचतात. पण जी कुटुंबं स्वताला आत कोंडून घेतात किंवा सतत अपमानास्पद वागणुकीचा सामना करतात, त्या कुटुंबांच्या सगळ्या आशा संपतात. जीवन संपवणं हाच एक मार्ग त्यांना दिसतो. घराची दारं बिनधास्तपणे उघडी ठेवणं म्हणजे निर्लज्जपणा, घमेंड, बेफिकिरीने वागणं किंवा आपल्या चुकीचं समर्थन करणं नाही तर चुकीतून धडा घेऊन नवीन मार्ग शोधणं असा घेता यायला हवा.
तुमच्याकडे सायकल असो किंवा गाडी, तुम्ही चाळीत राहणारे असा की मोठय़ा स्वतंत्र घरात राहणारे असा, तुमची जी काही आर्थिक स्थिती असेल त्याचा मान ठेवा. जेव्हा आपण स्वत:च्या कष्टाच्या पैशातून एखादी वस्तू विकत आणतो तेव्हा त्या वस्तूचा आदर केल्याने घरातील लहान मुलांच्या नजरेत आपल्या विषयीचा आदर वाढतो आणि कष्टाच्या पैशाने वस्तू विकत घेण्याचं स्वप्न कळत-नकळत त्यांच्याही डोळ्यात तरळायला लागतं. या छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून घरातील पैशाचं आरोग्य जपलं जातं.
मुलांचा पॉकेटमनी हासुद्धा घरात खुलेपणाने बोलण्याचा विषय आहे आणि तो एकमताने ठरवला गेला पाहिजे. या चर्चेत मुलांनाही त्यांचं म्हणणे मांडण्याची संधी द्यावी आणि त्यांच्या म्हणण्याचा मान ठेवीत आपले महत्त्वाचे मुद्देही यथार्थपणे मांडावेत. तरच ही चर्चा खूप मोकळी आणि निकोप होईल. मग पाहा, मुलांना जो काही पॉकेटमनी मिळणार आहे त्याची तेही किंमत ठेवतील आणि इतरांना मिळणाऱ्या पॉकेटमनीशी तुलना करीत बसणार नाहीत. आर्थिक गोष्टींबाबतचे निर्णय घेताना त्यात जेवढी पारदर्शकता ठेवली जाईल तेवढं घरातील मालमत्तेचं आरोग्य चांगलं राहतं.
आपण जो काही पैसा कमवितो त्यात देवाचाही वाटा आहे ही भावना असावी. त्यानुसार आपल्या मिळकतीतील काही भाग यथाशक्ती समाजाला या ना त्या रूपाने परत देण्याची वृत्ती म्हणजे सशक्त विचारांचं लक्षण मानलं जातं. इथे तुम्ही किती मोठय़ा संख्येने देता हे महत्त्वाचं नाही. भुकेल्या माणसाला तुमच्या ताटातील एक पोळी दिली तरी त्याचं मोल हे लाखो रुपयांचा आयकर चुकविल्यानंतर वा देवळात हजारो रुपयांची देणगी देणाऱ्या माणसापेक्षा किती तरी मोठं आहे.
‘देवाने आपल्याला दिलं आहे तेव्हा आपणही समाजाचं काही देणं लागतो ही परतफेडीची भावना मुलांमध्येही संस्कारचं बीज पेरते. पैसा प्रत्येकाकडे असतो, येत असतो पण जो त्याचं आरोग्य जपतो आणि आदर ठेवतो तोच सर्वात सुखी, समाधानी गणला जातो. यातून जेव्हा आयुष्याचा अर्थ उलगडत जातो तेव्हा आयुष्याला एक नवा आयाम प्राप्त होतो जो सशक्त आणि चिरस्थायी असतो.
(क्रमश:)
शब्दांकन : मनीषा नित्सुरे-जोशी
डॉ. हरीश श़ेट्टी -harish139@yahoo.com